आमच्यात आलेलं सामंजस्य, इतर वेळी कसं काय हरवतं? ते आम्हाला सांग बाप्पा!
पडघम - सांस्कृतिक
देवेंद्र शिरुरकर
  • गणपतीचं एक रेखाटन
  • Sat , 15 September 2018
  • पडघम सांस्कृतिक गणपती Ganpati गणेश Ganesh गणेशोत्सव Ganeshotsav

एकदा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीसुद्धा पुढची निवडणूक जवळ येईपर्यंत कधी जनतेकडे फिरकत नाहीत. पण बाप्पा, तू मात्र नित्यनियमानं दरवर्षी काही ठराविक कालावधीसाठी आमच्यात मुक्कामाला येतोस... कुठे दीड दिवस, कुठे पाच दिवस तर काही ठिकाणी अकरा दिवस. आमचं दररोजचं जगणं न्याहाळतोस. आता आमच्या नेतेमंडळींचं जाऊ देत. त्यांना आमच्या वेदना, समस्या तोंडपाठ असतात. ते सोडवण्याची ग्वाही देऊनच ही मंडळी लोकप्रतिनिधीगृहात गेलेली असतात. यापेक्षा अधिक महत्त्वाची कामं करायची असतात म्हणून त्यांना आमच्यात मिसळायला सवड होत नाही. आपण यांना सहज उपलब्ध झालो तर आपलं उपद्रवमूल्य कमी होईल अशी भीती वाटत असावी बहुधा. पण तू मात्र ‘गणाधीश जो ईश सर्वांजनाचा’ असूनही आम्हाला भेटणं कधी टाळत नाहीस. मग आमची झोपडी असो वा राजमहाल. तुला आमच्या पाहुणचाराचा कंटाळा येत नाही.

दरवर्षी काहीही झालं तरी आपल्या प्रियजनांच्या भेटीस जायचं हा तुझा निर्धार तू गत अनेक शतकांपासून पाळत आलेला आहेस. देवा, तुझा हा निर्धार पृथ्वीवरील सजीव सृष्टीस अस्तित्वाचं समाधान देणारा तर आहेच, शिवाय आमच्यातील चांगुलपणा, मांगल्य, शुद्धता आणि पावित्र्याची महन्मंगलता वाढवणारा आहे. आमचं दररोजचं जगणं-मरणं, जीवनशैलीपासून तू अनभिज्ञ असण्याचं कारण नाही. कारण या चराचरसृष्टीचा तू त्राता आहेस, सुखकर्ता व दु:खहर्ता आहेस. आमचं रडं ऐकण्यासाठी तुझ्यावर प्रत्येक वेळी यायलाच पाहिजे असं काही बंधन नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शासकीय समितीचे सदस्य जसे फिल्ड व्हिजिट करतात, तसं औपचारिक बंधनही तुझ्यावर नाही. माध्यमकर्ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन  ‘आँखो देखा हाल’ म्हणून दिसत नसलेलं वास्तव दाखवतात. असल्या ग्राऊंड रिॲलिटीचीही तुला काळजी नाही. आमच्या अस्तित्वाचा प्रेरक असल्यामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी तुला खास घटनास्थळी जायची गरजच नाही. विश्वनियंता असल्यामुळे या घडामोडींची इत्थंभूत माहिती तुला असणारच ना. त्यासाठी हे गणनायका, तुला फसव्या ग्राऊंड रिपोर्ताजची ददात कशाला भासेल?

‘भेटीलागी जिवा’ म्हणणाऱ्या आम्हा भक्तांच्या मांगल्याप्रति असणारी समाधी कायम रहावी म्हणून तू येतोस आमच्याकडे आणि काही दिवस आमच्यातलाच होऊन जातोस. तू महागणपती, चराचरपती, गणनाथ आहेस हे वेदांमधून ऋषी-मुनींनी सांगितलेलं आहे. संतश्रेष्ठांनी आपल्या ओवी, अभंगातून आमच्या मनावर बिंबवलेलं आहे. शरीरातील छत्तीस तत्त्वांचा आणि अखिल मनुष्यगण समूहाचा अधिपती असणारा तू बुद्धीचाही प्रणेता आहेस, मग जरा आम्हा मर्त्य समूहाची वैचारिक दिशा सांभाळण्याची जबाबदारी तुझीच आहे हे जाणतो आम्ही.

पारतंत्र्यात अठरापगड जातींतील ऐक्य घडवून आणण्यासाठी, त्यांच्यात परदास्याच्या शृंखला तोंडण्याची उमेद जागवण्यासाठी घराघरांतील सजावटीत विराजमान तुला गल्ली-चौकांत येण्याची विनंती करण्यात आली. तूसुद्धा यामागचा सदाचार ओळखून आमच्या सार्वजनिक उत्सवात सहभागी व्हायला लागलास आणि आजवर आमचा आनंद द्विगुणित करत आहेस. चौसष्ट कलांचा दाता असल्यामुळे विद्येचं, बुद्धीचं व विचारांचं दायित्व तुझ्याकडेच जातं. त्यामुळे हे लंबोदरा, आमच्यात अकरा दिवसांपुरतं आलेलं सामंजस्य, तादात्म्य पावण्याचा एकात्मिक सूर इतर वेळी कसा काय हरवतो? ते आम्हाला सांग बाप्पा.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

क्षणभंगुर आयुष्यातील जात, पंथ, संपत्तीच्या मोहमाया गळून तुझ्या भक्तीपुरतेच एकत्र येणाऱ्या आम्हा पामरांच्या ठायी निर्माण होणारा निरक्षीरविवेक इतर वेळी जातो तरी कुठे? या दिवसांत मनात निर्माण झालेला सम्यक भाव, उदारमतवाद, संवेदनशीलता आम्ही कुठे गहाण टाकतो नंतर, हे आता तुलाच शोधावं लागणार आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचे दुष्परिणाम हे इतर वेळी आमच्या कानीकपाळी सतत पडत असतंच. म्हणून आम्ही तू आलास की, डॉल्बीच्या भिंती उभारून एवढा गोंगाट करतो की, हे पर्यावरणवाले काय सांगताहेत, हे तू जाईपर्यंत आम्हाला ऐकूच येत नाही. आम्ही राहतो त्या धरेचं आरोग्य सांभाळण्यासाठी ही विघ्नं आम्हीच दूर करायची असतात, हे तू सांगितलेलं विसरलो नाही आम्ही. तुझ्या येण्यामागील, आमच्यात वास्तव्य करण्यामागील प्रयोजन थोडं हरवलं आहे का? तुझ्यामुळे जगणाऱ्या आमच्या गणसमूहातील सद्सद्विवेक, संवेदनशील मनाची वैचारिक जडणघडण तुझ्यासमोरच्या मोदकाप्रमाणेच संकुचित होत चालली आहे का, अशी शंका येते.

आमच्या बुद्धीला ताण देण्याची, आमच्या वागण्याला सदाचाराची, आमच्या मनाला संवेदनशीलतेची जोड देणारा ‘सन्मुख चहूकडे तो एक देवाधिदेव’ तूच आहेस ना रे बाबा. मग आमच्या दररोजच्या जगण्यातील विवेक वाढव रे नियंत्या.

आपल्यासारखेच इतरही मानव असून त्यांनाही आपल्याप्रमाणेच त्यांच्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार असतो, हा विचार आम्हा उपद्रवमूल्यकारक, उचापतखोर जनांमध्ये निर्माण कर रे बाप्पा आणि जातीय अस्मितांच्या विखारात हरवत चाललेली मानवता वृद्धिंगत करून आमचा सूर निरागस व्हावा, एवढाच आशीर्वाद दे रे बाबा गणनायका. 

.................................................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

vishal pawar

Sat , 15 September 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......