‘मनमर्ज़ियाँ’ : चांगला आहे, पण ‘खूप’ चांगला नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘मनमर्ज़ियाँ’चं पोस्टर
  • Sat , 15 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मनमर्ज़ियाँ Manmarziyan अनुराग कश्यप Anurag Kashyap अभिषेक बच्चन Abhisekh Bachchan तापसी पन्नू Taapsee Pannu विकी कौशल Vicky Kaushal

इस फिल्लम दा हिरो कौनसा? विक्की कौशल! ना जी ना. बच्चन दा पुत्तर! ना जी ना. वो बंदा तो सिर्फ अॅक्टिंग करने वास्ते इस फिल्लम में काम करता दाऽऽस्सी. कि होया, तापसी पन्नू, दी अपनी कुडी, इस फिल्लम दी हिरोईन होकर भी हिरो नई जी. बस एकही नाम सामने आयेसी. वो है अपना म्युजिशियन अमित त्रिवेदी. कमाल का बंद है जी. क्या वड्डीया गान्ने बनाता है. इस फिल्लम जे कौनसे भी गाने सुनिए, मन में बैठ जाने हैं जी. एक सो एक गानों की लाइन लगवा देनी है जी. भई, पुरी फिल्लम में येही एक बात है, जो थिएटर के बाहर भी दिमाग से निकलती नहीं. हाँ हाँ, मेन्नू पता है ये कश्यपजी की फिल्लम है. ठण्ड रखियो आप. उनके बारे में भी बोलेंगे लेकिन त्रिवेदीजी आहाहा...

चलो, कश्यपजी के बारे में भी कुछ कहते है.

अमृतसरमध्ये राहणारे विक्की संधू (विक्की कौशल) व रुमी बग्गा (तापसी पन्नू) हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. दररोज सकाळी तिच्या रूममध्ये एकमेकांवरचं प्रेम उधळून लावायला ते कधीही चुकत नाहीत. हे चोरटं नातं तिच्या बहिणीला माहिती असतं. विक्की हा अमृतसरच्या एका बारमध्ये डीजेचं काम करणारा. आजच्या काळातला मुलगा. रुमी आई-वडिलांचं छत्र हरवलेली जमदग्नीचा अवतार. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलं-मुली जशी बंडखोरी करत असतात, त्याचंच एक उदाहरण म्हणजे रूमी. तिला वाटत असतं विक्कीचं तिच्यावर खूप प्रेमय. तोही तिचा हा गैरसमज दूर करत नाही. परिस्थिती बदलते, जेव्हा रूमीची काकू दोघांना रंगेहाथ पकडते. तिचं चटकन लग्न लावून मोकळं व्हावं असं काकू म्हणते. पण रूमी म्हणते लग्न करणार तर विक्कीशी. त्याला घरी रीतसर मागणी घालण्यासाठी ‘ये’ म्हणते. तो येत नाही. ती म्हणते ‘पळून जाऊ’. ते जातात पण विक्कीची तयारी नसते. रूमी वापस येते व घरच्यांनी ठरवलेल्या राजबीर उर्फ रॉबी भाटिया (अभिषेक बच्चन) या बँकर मुलासोबत लग्नाला तयार होते.

अनुराग कश्यप हा सध्याचा श्रेष्ठ दिग्दर्शक आहे असं त्याच्या चाहत्याचं म्हणणं असतं. तो उत्तम दिग्दर्शक आहे याबाबत कुणाचंच दुमत नसावं. त्यानं ‘देव डी’ व ‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखे दोन उत्तम सिनेमे दिले आहेत. याचा अर्थ तो श्रेष्ठ ठरतो असं नाही. त्याच्या सिनेमात सीरिअसनेस असतो, जो सध्याच्या दिग्दर्शकांमध्ये कमी प्रमाणात आढळतो. तसंच बॉक्स ऑफिसवर आपली फिल्म किती जादू करेल याकडे तो फारसा लक्ष देत नसावा. कारण ‘दॅट गर्ल इन यलो बुट्स’सारखा सिनेमाही तो बनवतो, तर दुसरीकडे ‘मुक्काबाज’. यात त्यानं जातीय मुद्दा मांडलाय. किंवा गेल्या शतकातल्या सर्वोत्तम असणार्‍या ‘सत्या’चं त्यानं सह-लेखन केलंय. त्याच्या सिनेमात असणारं हिंसेचं प्रमाण हे नि:संशय इतर हिंदी सिनेमांच्या तुलनेत जास्त असतं. तरीही तो श्रेष्ठ आहे असं तडकाफडकी निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.

‘मनमर्ज़ियाँ’ सकृतदर्शनी खूप चांगला सिनेमा आहे असं वाटायची शक्यता आहे. तो चांगला आहे, पण खूप चांगला नाही. याची कथा ‘वो सात दिन’शी साधर्म्य साधणारी आहे. निदान कथेचा आलेख, पात्रं व त्यांनी घेतलेले निर्णय यात साधर्म्य आहे. पण हा वेगळा ठरतो तो कनिका ढिल्लनच्या लिखाणात आणि कश्यपच्या खतरनाक सफाईदार दिग्दर्शनात. मला वाटतं ही त्याची पहिलीच पटकथा असावी, जी त्यानं लिहिलेली नाही. त्याच्या सिनेमात संवादांना जे महत्त्व असतं, ते इथं पण आहे. संवादांमधून त्रिमिती पात्रं उभी करायची त्याची हातोटी इथं ढिल्लननी जशीच्या तशी उचलली आहे. त्यामुळे पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत ढिल्लनची लेखणी तळपत राहते. अनुरागला दिग्दर्शनाच्या जागा शोधून कुठे चमत्कार करू असं वाटायला लावते. तरीही तो सुरुवातीच्या गाण्यात दोन नाचणार्‍या जुळ्या मुलींना पार्श्वभूमीला ठेवून परिणाम साधतोच, तेही अमृतसरसारख्या मोठ्या शहरात. त्यासाठी त्याला पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत.

मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा आशय फिका पडायला लागतो. पात्रांच्या वागण्याचा व ते पुढे काय करतील याचा अदमास यायला लागतो. तसंच पारंपरिक भारतीय कुटुंबाची चौकट वास्तववादी पद्धतीनं घेतल्यामुळे तिला आकार कसा द्यायचा, हे ना कश्यप लक्षात घेतो ना ढिल्लन. त्यामुळे एका टप्प्यावर टॅग लाईननुसार ‘लव्ह इज नॉट कॉम्प्लिकेटेड बट पिपल आर’ असं म्हणणारी ही कथा कॉम्प्लिकेटेड होत नाही. कारण कथेनं शोधलेला सोपा शेवट. हा शेवट टॅगलाईनला कुठेही अनुसरत नाही.

विक्की, रॉबी व रूमी हे तिघेही कॉम्प्लिकेटेड आहेत, कारण ते आजच्या भारतीय सामाजिक चौकटीत सापडणार्‍या तरुणांचे प्रतिनिधित्व करतात. ते एकाच वेळी आधुनिक व पारंपरिक आहेत. ते प्रॅक्टिकली विचार करणारे आहेत. त्यांना आपल्या आजूबाजूला लोक कसे वागतात व त्यांच्याशी आपण कसं वागायला हवं हे माहिती असतं. त्यामुळे ते त्याचे काय परिणाम होतील याचा कसलाही विचार करत नाहीत. असं वागण्यानं आपण बंडखोर होतो असं त्यांना वाटतं. पण ही बंडखोरी ‘राईज अबव्ह द रेस्ट’ ठरत नाही. ती त्याच चौकटीत स्वतःचं अस्तित्व शोधायला लागते. इथंच कश्यप-ढिल्लन फिके पडायला लागतात. त्यांनी सोप्या उत्तराचा आग्रह धरला नसता, तर नक्कीच हा सिनेमा उत्तम झाला असता.

आशयात फिका पडत असला तरी अभिनयाच्या मुख्य विभागात मात्र पैकीच्या पैकी गुण घेतो. सर्वच अभिनेत्यांचा पटकथेला साजेसा अभिनय सिनेमाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. त्यातही अभिषेक बच्चनचा अभिनय प्रौढ व समंजस आहे. पन्नू व कौशल मुळातच मुख्य नायक-नायिका. त्यांची निवड करून दिग्दर्शकानं अर्धी बाजी मारली आहे. दोघांच्या अभिनय प्रोफाईलमध्ये अजून एका चांगल्या सिनेमाची वर्णी लागलीय. अमृतसरचं सौंदर्य मात्र अप्रतिम टिपलंय ते सिनेमॅटोग्राफर सिल्व्हेस्टर फोन्सेका यांनी. पात्रांची ओळख करून देताना सुरुवातीला दिसणारं अमृतसर निव्वळ अप्रतिम, सोबत काश्मीरदेखील.

वर म्हटल्याप्रमाणे या सिनेमाचा खरा हीरो आहे अमित त्रिवेदी. तो आजच्या घडीला उत्तम संगीतकार आहे हे सांगणं न लगे. यातील ‘एफ फॉर फ्यार’, ‘ध्यानचंद’ ही श्रवणीय गाणी या वर्षीच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी ठरावीत. इतर गाणीही पटकथेला पूरक आहेत. ही गाणी निव्वळ पडद्यावर बघायला किंवा ऐकायला झकास आहेत असं नाही, तर थिएटरबाहेरसुद्धा नेहमी सोबत करणारी आहेत.

अशा सगळ्या उत्तम गोष्टी हाताशी असताना कथेच्या शेवटाकडे तात्पुरतं, सोपं उत्तर म्हणून बघणं चित्रपटाच्या मुळाशी आलंय. तसं नसतं तर कश्यपनं आतापर्यंत जे उत्तम सिनेमे दिले आहेत, त्यांच्यात याचीही वर्णी लावता आली असती. पटकथेतल्या आवडत्या गोष्टींकडे आकर्षित होण्यापेक्षा कथेच्या आत काय आहे आणि त्यातून आपण मोठा आशय मांडू शकू का याचा विचार करणं गरजेचं होतं. निदान कारकिर्दीच्या या टप्प्यावर तर कश्यपनं तो करायला हवा.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......