यथार्थवादी भारतीय चित्रकलेच्या अभ्यासकाला या पुस्तकाची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही!
ग्रंथनामा - झलक
दीपक घारे
  • ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 01 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक दीपक घारे Deepak Ghare कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे रावबहादूर म. वि. धुरंधर

रावबहादूर म. वि. धुरंधर यांच्या ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या जे. जे. कला महाविद्यालयाचा सुरुवातीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं काल मुंबईत प्रकाशन झालं. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला समीक्षक प्रा. दीपक घारे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित भाग.

.............................................................................................................................................

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध आधुनिक सामाजिक, राजकीय विचारांच्या दृष्टीने महत्त्वाचा कालखंड मानला जातो. याच काळात वास्तुकला, चित्रकला अशा कलेच्या क्षेत्रांतही बरेच बदल घडून आले. कलाविचारांचा प्रभाव व भारतीय कलावंत व कारागिरांची एकोणिसाव्या शतकातील परिस्थिती यातून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची निर्मिती झाली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून सुरू झालेल्या या कलापरंपरेचा १८९० नंतरचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर रावबहादूर म. वि. धुरंधर यांचं ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ हे आत्मकथन वाचायलाच हवं. यथार्थवादी भारतीय चित्रकलेच्या अभ्यासकाला या पुस्तकाची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे कलाविषयक मराठी आणि इंग्रजी लेखनात या पुस्तकाचा संदर्भ अनेकदा दिला जातो. चित्रकलेशी संबंधित समकालीन चित्रकारांचा, शिल्पकारांचा, तसंच जे.जे.मधील शिक्षकांचा यात उल्लेख आलेला आहे. शिल्पकार म्हात्रे यांनी विद्यार्थिदशेत केलेल्या ‘मंदिरपथगामिनी’ या शिल्पाची हकीकत त्यात आहे. जे. जे.मधला एकेचाळीस वर्षांचा प्रत्यक्षदर्शी आणि विश्वसनीय असा इतिहासच या आत्मकथनातून येतो.

लेखकांच्या जन्मापासून ते अखेरपर्यंतच्या सगळ्या घटना सांगणारं हे आत्मचरित्र नाही. आयुष्यातील बऱ्या-वाईट सत्यघटना सांगून आप्तेष्टांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा फक्त जे. जे.मधील कारकीर्दच लिहिण्याचा निर्णय धुरंधरांनी घेतला. जनरल नानासाहेब शिंदे यांचं ‘एका शिपायाचे आत्मवृत्त’ हे पुस्तक वाचून धुरंधरांना प्रेरणा मिळाली आणि ८ जानेवारी १८९० ते ३१ जानेवारी १९३१ पर्यंतची इत्थंभूत हकीकत धुरंधरांनी या आत्मवृत्तात मांडली. हे सर्व सत्य अनुभव आहेत असं धुरंधरांनी सुरुवातीच्या निवेदनातच सांगितलं आहे. या हकीकतीमध्ये जे. जे.चा अभ्यासक्रम, तिथलं वातावरण, तिथली कला-निर्मिती याबद्दल सविस्तर माहिती आहे आणि धुरंधरांची विद्यार्थिदशेपासून प्रतिष्ठित चित्रकारापर्यंतची होत गेलेली यशस्वी वाटचालही आहे. चित्रकलेवरील निष्ठा, कौटुंबिक जिव्हाळा आणि निवेदनातला प्रांजळपणा, यामुळे हे आत्मकथन रंजक आणि उद्बोधक झालं आहे.

शिवाय या आत्मकथनाला काही पत्रांची, छायाचित्रांची जोड दिलेली आहे. शेवटी तर अनेक समकालीन चित्रकारांची छायाचित्रं दिलेली आहेत. त्यातली काही प्रसिद्ध नावं सोडली तर इतरांची माहितीही आज उपलब्ध नाही. आत्मवृत्ताच्या दृष्टीनं या जंत्रीवजा संदर्भ साहित्याला फारसं महत्त्व नसलं तरी त्या काळचा दस्तऐवज म्हणून त्याला निश्चितच वेगळं महत्त्व आहे. अनुभवाची सत्यता आणि महत्त्वाच्या घटनांची, व्यक्तींची नोंद असाही एक उद्देश या आत्मवृत्तामागे दिसतो. धुरंधरांच्या या दृष्टिकोनामुळे या पुस्तकाला एक विश्वासार्हता प्राप्त झालेली आहे.

या पुस्तकाचा संदर्भ दृश्यकलेच्या इतिहासाच्या संदर्भात बरेचदा दिला जातो. आबालाल रहिमान, शिल्पकार म्हात्रे, सॉलोमन यांची कारकीर्द, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टवर आलेलं गंडांतर, दिल्ली डेकोरेशन यांबद्दलची माहिती या पुस्तकाच्या निमित्तानं प्रथम ग्रंथबद्ध झाली. जे. जे.चा अभ्यासक्रम, त्यात झालेले बदल याचीही माहिती धुरंधरांनी दिलेली आहे.

जे. जे.ची स्थापना कला आणि कारागिरीचं शिक्षण देण्यासाठी झाली. कालांतरानं चित्र, शिल्प विषयांना प्राधान्य देण्यात आलं आणि त्यातून व्यक्तिचित्रं, प्रसंगचित्रं, निसर्गचित्रं या प्रकारात प्रावीण्य मिळवणारे चित्रकार निर्माण झाले. धुरंधर शिकले, त्या काळात रेखांकनातील कौशल्य विकसित करण्यावर भर होता. त्यामुळे फ्री-हँड, पर्स्पेक्टिव्ह, शेडिंग फ्रॉम कास्ट (पुतळ्यावरून रेखांकन करणं), फॉलीएज (पानाफुलांचं रेखांकन करणं) असे विषय होते. या अभ्यासक्रमातून इमारतींच्या सुशोभिकरणाला लागणारं अलंकरणात्मक काम करणाऱ्या क्राफ्ट्समन्सची निर्मिती होण्याचीच शक्यता अधिक होती.

मानवी देहाची चित्रं काढण्याचा अभ्यास सुरुवातीला ग्रीक, रोमन पुतळ्यांवरून केला जात असे. नंतर लाइफ स्टडीसाठी मॉडेल बसवण्यात येऊ लागलं. कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी जे. जे.मध्ये न्यूड क्लास सुरू केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं मानवी देहाचं चित्रण सुधारलं आणि त्याचा चांगला परिणाम एकूणच चित्रनिर्मितीवर दिसून आला. त्यानंतर म्युरल क्लास सुरू करण्यात आला. धुरंधरांनी या साऱ्या घडामोडींबद्दल लिहिलेलं आहे.

या पुस्तकातील लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा म्हणजे जॉन ग्रिफिथ्स आणि ग्लॅडस्टन सॉलोमन. बॉम्बे स्कूलच्या इतिहासात या दोघांनाही महत्त्व आहे. ग्रिफिथ्स यांनी केलेलं सर्वांत महत्त्वाचं काम म्हणजे विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या अजिंठा चित्रांच्या प्रतिकृती. सुमारे बारा वर्षं हे काम चाललं होतं. पेस्तनजी बोमनजी यांचा या कामात मोठा सहभाग होता. धुरंधरांनी अजिंठा टूरचा किस्सा आपल्या आत्मवृत्तात सांगितला आहे. १८९५ मध्ये विद्यार्थ्यांची अभ्यास सहल अजिंठ्यास गेली होती. तेव्हा ग्रिफिथ्स यांनी धुरंधरांना अजिंठा गुंफांचा पॅनोरमा (विहंगम दृश्य) काढण्यास सांगितलं. टेकडीच्या कड्यावर जाऊन ते चित्र काढायचं होतं. ग्रिफिथ्स यांनी सोबतीला चार भालेवाले दिले होते. कडाक्याच्या थंडीत त्या एकांत जागी धुरंधरांनी तीन दिवस काम केलं. एके दिवशी दुपारी बारा वाजता वाघाची आरोळी ऐकू आली. धुरंधरांची भीतीनं गाळण उडाली आणि चित्र अर्धवट पुरं करून ते परतले. मुंबईला आल्यावर ग्रिफिथ्स त्यांच्यावर रागावले आणि कृतक कोपानं म्हणाले, “तुला वाघानं खाल्लं असतं, तरी काही कमी झालं नसतं! जा आता, मी ते पुरं करीन.” एवढं बोलून ते हसले.

ग्रिफिथ्स यांची दुसरी आठवण अशीच भावपूर्ण आहे. सकाळच्या वर्गात शिक्षकांनी कामात दिरंगाई केल्याबद्दल तक्रार केल्यामुळे ग्रिफिथ्स जरा जास्तच रागावून धुरंधरांना बोलले होते. त्याचा ‘सांत्वनरूपी उ:शाप’ म्हणून ग्रिफिथ्स दुपारच्या वर्गात आले आणि धुरंधरांच्या मागे येऊन उभे राहिले. ‘दॅट्स व्हेरी गुड’ असं कामाचं कौतुक करत बरोबर आणलेलं लिओनार्दो दा व्हिंचीचं चरित्र वाचायला देत म्हणाले, ‘हे काळजीपूर्वक वाचून पाहा, म्हणजे काम करण्याची निरंतर स्फूर्ती येऊन तुझा अभ्यास वाढेल.’ ग्रिफिथ्स सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना दिलेल्या निरोप समारंभाच्या वेळी ग्रिफिथ्स भावनावेगानं बोलू शकले नाहीत, सर्वांची अंत:करणं भरून आली आणि विद्यार्थिनी तर रडूच लागल्या असं धुरंधरांनी नमूद केलं आहे. धुरंधर रावबहादूर झाल्यानंतर ग्रिफिथ्स यांनी जे पत्र लिहिलं आहे, तेही सौहार्दपूर्ण आहे.

सर्वच इंग्रज अधिकारी चांगल्या स्वभावाचे होते असं नाही. इंग्रज अधिकाऱ्यांमधील हेवेदावे, संशयी वृत्तीचे नमुनेही धुरंधरांनी दिले आहेत. कलाशिक्षक व चित्रकार आगासकरांनी सेसिल बर्न्स यांचं उत्तम व्यक्तिचित्र केलं. त्यासाठी सिटींग देऊन सुधारणा करण्याच्या मिषानं बर्न्स यांनी ते चित्र ब्रशनं निकामी करून ठेवलं. शिवाय एक हिंदी चित्रकार आपलं व्यक्तिचित्र प्रदर्शनात ठेवत आहे, हे कमीपणाचं समजून बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात ते लावलं जाणार नाही अशी बर्न्स यांनी व्यवस्था केली. स्वत: सॉलोमन यांनाही ब्रिटिश शासनातील संबंधितांच्या राजकीय डावपेचांचा त्रास झाला. पण धुरंधरांचं आत्मकथन वाचून शेवटी संस्कार उरतो तो कलामंदिराचा आणि त्यात व्रतस्थपणे आणि आत्मीयतेनं काम करत राहिलेल्या कलाशिक्षकांचा.

सर्वांत अधिक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन. त्यांच्या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. भारतीयत्व जपणारी कलाचळवळ मुंबईत सुरू झाली ती प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्यामुळे. जे. जे.च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या म्युरल्सच्या कामामुळे जे. जे.ला नाव मिळालं. वेम्बले, लंडन येथील प्रदर्शनात इंडियन रूम भारतीय कलाकृतींसह सादर करून भारतीय कलेचा पाश्चात्त्यांना परिचय करून दिला गेला तो सॉलोमन यांच्याच काळात. या निमित्तानं सॉलोमन यांनी ‘रिव्हायव्हल ऑफ इंडियन आर्ट’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं.

सॉलोमन यांच्यावर संकटंही अनेक आली. प्रशासकीय आणि धोरणात्मक अशा दोन्ही प्रकारची ही संकटं होती. १९२१ मध्ये स्कूल ऑफ आर्ट दुसरीकडे हलवून ती जागा लिलावात काढावी असा मुंबई सरकारचा प्रस्ताव होता. या विरोधात स्कूल ऑफ आर्टची बाजू मांडण्यास धुरंधरांनी सर्वतोपरी मदत केली आणि हा प्रस्ताव हाणून पाडण्यात आला. १९३२ मध्ये थॉमस रिपोर्टचा आधार घेऊन स्कूल ऑफ आर्ट बंद करण्याचा घाट घालण्यात आला, पण नामदार जयकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभा बोलावण्यात येऊन हा निर्णय लोकांनी सरकारला मागे घ्यायला लावला.

सॉलोमन आणि धुरंधर यांच्यातलं नातं दृढ होत गेलं, ते या कसोटीच्या आणि आनंदाच्या प्रसंगांत धुरंधरांनी मनापासून जी साथ दिली त्यामुळे. १९१९ मध्ये प्रिन्सिपॉल म्हणून सॉलोमन प्रथम आले तेव्हा धुरंधर या माणसाशी आपलं कितपत जुळेल याविषयी साशंक होते. पण लवकरच दोघांचं गोत्र जुळलं आणि सहकारी, सल्लागार, सहृदय आणि कलावंत या नात्यानं धुरंधर आणि सॉलोमन यांच्यात प्रेमादराचं वेगळं नातं निर्माण झालं. धुरंधरांनी जी पत्रं छापली आहेत, त्यांत सॉलोमन यांनी लिहिलेल्या पत्रांची संख्या सर्वाधिक आहे. या पत्रांमधून कधी अधिकारी या नात्यानं विनंतीवजा सूचना आहेत, कधी सल्ला विचारलेला आहे, कधी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. रावबहादूर किताब मिळाल्यानंतर पाठवलेल्या अभिनंदनाच्या पत्रात चारच ओळी आहेत, पण त्यातून धुरंधरांबद्दलची आपुलकी शब्दाशब्दातून व्यक्त होते. सॉलोमन आणि धुंरधर यांच्या व्यक्तिगत संबंधांइतकीच सॉलोमन यांना भारतीय कलेबद्दल आपुलकी होती आणि भारतीयत्व जाणून घेण्याच्या दृष्टीने धुरंधर हे महत्त्वाचा दुवा होते, हेही इथं लक्षात घ्यायला हवं.

धुरंधरांनी आपल्या आत्मकथनामध्ये अंबिका या त्यांच्या कन्येचा उल्लेख केला आहे. अंबिका धुरंधर या जे. जे.मध्ये विद्यार्थिनी होत्या आणि स्त्री चित्रकार म्हणून त्या नावारूपाला आल्या. १९३१ मध्ये पदविका अभ्यासाम पूर्ण करून त्यांनी परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला. जे. जे.मध्ये धुरंधरांच्या काळात शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या फारच कमी होती. धुरंधरांच्या वर्गात तीन विद्यार्थिनी होत्या. मिस कामा, नाझर व डायमलर. या तिघीही ‘मठ्ठ डोक्याच्या’ होत्या आणि शिक्षक व विद्यार्थ्यांकडून त्या करेक्शन व काम करवून घेत असं धुरंधरांनी नमूद केलं आहे! या व्यतिरिक्त एक अत्यंत खटपटी विद्यार्थिनी म्हणून मिस बाईआई पालनकोट हिचा उल्लेख येतो. धुरंधरांच्या काळातल्या कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या स्त्रिया मुख्यत: दोनच. अंबिका धुरंधर आणि अँजेला त्रिंदाद.

धुरंधर यांनी पेंटिंग्जव्यतिरिक्त दिनदर्शिका, पोस्टर्स, पुस्तकांची-मासिकांची मुखपृष्ठं यासाठीही चित्रं केली. राजा रविवर्मा यांच्याप्रमाणे धुरंधरांची चित्रं मुद्रित स्वरूपात घरोघरी पोचली. रेल्वेसाठी त्यांनी पोस्टर्स केली. या पुस्तकात धुरंधरांनी संपादक मित्रांचा परिचयदेखील दिला आहे. त्यात शं. वा. किर्लोस्कर, ‘विविधवृत्त’ साप्ताहिकाचे रा. का. तटनीस, ‘विसमी सदी’चे संपादक महंमद अल्लारखीया शिवजी यांचा समावेश आहे. या सर्वांसाठी धुरंधरांनी आपली चित्रं दिली. ग्रिफिथ्स यांच्या ‘मोनोग्राम ऑन कॉपर अँड ब्रास पॉटरी’ लेखासाठी धुरंधरांनी जवळपास शंभर चित्रं काढली होती. सी. ए. किंकेड यांच्या ‘डेक्कन नर्सरी टेल्स’, ‘टेल्स ऑफ किंग विामादित्य’ या पुस्तकांसाठी त्यांनी चित्रं काढली. ‘मेघदूत’, उमर खय्यामच्या रुबाया यांसाठीही धुरंधरांनी चित्रं करून दिली. पुस्तकात शेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी यांचा उल्लेख आला आहे. धुरंधर यांनी शेठ मावजी यांना जे. जे.च्या ग्रंथालयातील पुस्तकं वाचायला दिली असा सेसिल बर्न्स यांनी वृथा संशय घेतला होता तो किस्साही पुस्तकात आहे. या शेठ मावजींसाठी धुरंधरांनी पौराणिक विषयांवर शेकडो चित्रं काढली व शेठजींनी ‘सुवर्णमाला’ या मासिकात ती प्रसिद्ध केली. धुरंधरांचं हे उपयोजित कलेतील काम स्वतंत्रपणे अभ्यासावं इतकं महत्त्वाचं आहे. त्या काळात अभिजात कला आणि उपयोजित कला असा भेद केला जात नव्हता. धुरंधर हे महाराष्ट्रातील उपयोजित कलेच्या क्षेत्रात काम करणारे आद्य चित्रकार म्हणावे लागतील.

‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’मध्ये आलेला जे. जे. आणि पर्यायानं बॉम्बे स्कूलचा आलेला इतिहास पाहिला आणि म. वि. धुरंधर यांचा चित्रकार, कलाशिक्षक म्हणून झालेला व्यक्तिगत प्रवासही पाहिला. आज आपण जेव्हा हे पुस्तक वाचतो तेव्हा त्याबद्दल काय वाटतं? एकतर त्याची रचना, पुस्तकाच्या शेवटी दिलेली छायाचित्रं, पत्रव्यवहार आणि गौरवग्रंथात असावीत तशी धुरंधरांच्या चाहत्यांनी केलेली पद्यरचना हा घाट आता कालबाह्य झालेला आहे. पण या घाटामुळे ग्रंथबद्ध झालेली माहिती ही धुरंधरांचा काळ, त्यांचे समकालीन चित्रकार आदी समजून घेण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. धुरंधरांनी साऱ्या घटना तारीखवार आणि नेमकेपणानं दिलेल्या आहेत. त्यामुळे एक संदर्भग्रंथ म्हणून त्याचं मोल मोठं आहे. अन्यथा ग्रिफिथ्स, सॉलोमन अशा महत्त्वपूर्ण व्यक्तींची माहिती, त्यांची छायाचित्रं अन्यत्र कुठे मिळाली असती? त्या काळच्या कलाशिक्षणाचा एक दस्तऐवज म्हणून त्याचं महत्त्व वादातीत आहे.

धुरंधरांची भाषा आजच्या काळाच्या तुलनेत थोडीशी भाबडी, आदबशीर आणि लीन वाटली तरी त्यातल्या भावनेच्या ओलाव्यामुळे ती आपल्याला चटकन भावते. धुरंधर हे बालगंधर्वांच्या युगातले असल्यानं बालगंधर्वांच्या भाषेची इथं आठवण होते. धुरंधर यांच्या अंगी विनोदबुद्धी असल्यानं त्यांच्या निवेदनात रंजकता आली आहे. स्वत:च्या फजितीचे प्रसंगही त्यांनी निर्मळपणे सांगितले आहेत. धुरंधरांच्या व्यक्तिमत्त्वातला भारदस्तपणा आणि आब त्यांच्या या आत्मकथनाच्या शैलीत पुरेपुर उतरलेला आहे.

हे पुस्तक वाचत असताना आपण व्हिक्टोरियन संवेदनशीलतेवर पोसलेल्या, ब्रिटिशांच्या वासाहतिक साम्राज्यातल्या स्वप्निल जगात वावरत आहोत असं वाटत राहतं. आपण आपल्या कलानिर्मितीत मग्न राहावं, कलासक्त राज्यकर्त्यांची मर्जी संपादन करावी आणि समाजात चित्रकार म्हणून मान्यता मिळवावी इतकंच उद्दिष्ट या काळातल्या चित्रकारांसमोर होतं. भोवतालचं जग झपाट्यानं बदललं तरी धुरंधर मात्र या जगातच कायम राहिले. ‘कलामंदिर...’ हा त्याचा बिनतोड पुरावा आहे.

या पुस्तकाची इतक्या वर्षांमध्ये नवी आवृत्ती निघालेली नव्हती. विस्तृत टिपांसह आता ती प्रकाशित होत आहे.

.............................................................................................................................................

‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4521/Kalamandiratil-Ekechalis-Varshe

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......