‘अपना बाजार’ हा सामूहिक कर्तृत्वाचा आविष्कार ठरला
ग्रंथनामा - झलक
प्रा. पुष्पा भावे
  • ‘अपना बाजारची गोष्ट’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 31 August 2018
  • ग्रंथनामा Granthanama झलक अपना बाजारची गोष्ट Apna Bazarchi Gosht गजानन खातू Gajanan Khatu

‘अपना बाजारची गोष्ट : सहकार चळवळीतला आगळा प्रयोग’ हे गजानन खातू यांचं ‘अपना बाजार’च्या निर्मितीची गोष्ट सांगणारं पुस्तकं लवकरच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ सामार्जिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश...

.............................................................................................................................................

गिरणगावात उभ्या झालेल्या ‘अपना बाजार’चे यश हा देशातील सहकारी चळवळीतील एक चमत्कार म्हणावा लागेल. या चमत्काराची कथा अत्यंत सरलपणे गजानन खातू यांनी निवेदन केली आहे.

कोणत्याही भूभागात एखादी अशी संस्था निर्माण होणे आणि विकसित होणे, यामागे सांस्कृतिक वातावरण आवश्यक असते. कार्यकर्त्यांची फळी तयार असणे अपरिहार्य असते. नायगाव परिसरात अनेक वर्षे असे वातावरण होते. पण गजनान खातू यांनी ‘अपना बाजार उभारताना’ असे पहिले प्रकरण लिहिताना अपना बाजारच्या इमारत बांधणीपासून प्रारंभ केला आहे. आधी प्रत्यक्ष अपना बाजारविषयी बोलून नंतर ते त्यात गुंतलेल्या माणसांविषयी बोलतात.

२९ मार्च १९६८ रोजी नायगावमध्ये संस्थेनं पहिलं डिपार्टमेंट स्टोअर ‘अपना बाजार’ नावाने सुरू केलं, असं सांगून खातू अपना बाजारचे वास्तुवर्णन करतात. या वर्णनात डिपार्टमेंट स्टोअरच्या रचनेविषयी उपयुक्ततावादी विश्लेषण आहे. रघुवीर तळाशिलकर यांच्या नेपथ्याची संवेदनाक्षम नोंद आहे. तशीच बी. डी. डी. चाळीत टाक्यांवर पडणाऱ्या पावसाच्या सरींची नोंद आहे. आणि चिपळूणच्या घरातून परशुरामाच्या डोंगरात पडणारा धुवाधार पाऊस डोळ्यात साठला होता, त्याची सय आहे. केबिनच्या खिडक्या काचेच्या तावदानाच्या केल्या होत्या आणि उन्हासाठीही पडदा न लावता व्हॅनिशियन ब्लाईंड लावले होते, त्यातून पावसाचे अखंड दर्शन होई. स्वत:ला होणारे परिसरदर्शन आणि ग्राहकांना होणारे बाजारदर्शन दोन्हीचे वर्णन शेजारीशेजारी येते.

‘अपना बाजार’मधील एकवीस विभागांची रचना, ग्राहकांच्या गरजा, मानसिकता आणि मालाची ने आण याचा विचार मांडला गेला आहे. हा विचार मांडताना ‘स्टोअर उभारणीचे महत्त्व’ या विभागात इमारतीची आखणी स्टोअरच्या यशामध्ये किती महत्त्वाची असते, हे नंतरच्या काळात माझ्या लक्षात आले असे म्हणून शिववैभव ग्राहक संस्थेचे भवनीशंकर रोडवरील डिपार्टमेंट स्टोअर चांगल्या वस्तीत, चांगल्या लोकेशनवर असून अपयशी कसे ठरले ते खातू सांगतात. आर्किटेक्टचरच्या शिक्षणात डिपार्टमेंट स्टोअर इमारतीचा समावेश नाही असा मूलभूत मुद्दा मांडतात. त्याची अन्य उदाहरणेही देतात.

खातू अपना बाजारची उभारणी होताना क्रॉम्पटनमधून आले. भव्य कारखान्यातून पत्र्याच्या शेडमध्ये येताना वाईट वाटले नाही. कारण की, सारी आपली माणसे होती. क्रॉम्पटनमधले कामगारविरोधी वातावरण त्यांना कधीच पटले नव्हते. आपल्या विचारांच्या क्षेत्रात यायला मिळाले याचाही आनंद होता.

.............................................................................................................................................

‘समकालीन सामाजिक चळवळी - संकल्पना - स्वरूप - व्याप्ती’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

खातू सांगतात सुरुवातीच्या काळातील पुष्कळशा बैठका अपना बाजारच्या इमारतीत व्हायच्या. आजूबाजूला बांधकामाच्या साहित्याचा ढिगारा, त्यात एक टेबल टाकून अवतीभोवती माणसे बसायची. आजूबाजूची गर्दी गडबड, गोंधळ आणि ढिगाऱ्याचा कोणाला त्रास होत नसे. उलट आपल्या संस्थेची इमारत उभी रहातेय याच आनंदात सगळे असत. या बैठकीत कार्यकर्ते असत, तसेच आर्किटेक्ट मलिक आणि कॉन्ट्रॅक्टर वडगामा असत. एका बाजूला प्लो प्लंबिंगची चर्चा चाले, तर दुसऱ्या बाजूला अपना बाजारच्या व्यवस्थापनाची. संस्थेचे अध्यक्ष दादा सरफरे कधी काय प्रश्न विचारतील त्याचा नेम नसे. ते कधी प्रश्न विचारत आहेत आणि कधी फिरकी घेत आहेत तेही कळत नसे.

या काळात मी इमारतीपेक्षा कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केलं असं खातू सांगतात. कारण त्यांच्याशी जमलं तर माझा निभाव लागणार होता. एक तर त्यांच्या दृष्टीने बाहेरचा क्रॉम्प्टनमधून आल्याने हुशारी दाखवणारा, शिवाय एकदम पाचशे रुपये पगारावर ठेवलेला, मुख्य म्हणजे किरकोळ व्यवसायाचा शून्य अनुभव असलेला एकूण पांढरा हत्ती. त्यामुळे माझ्यासारख्याला त्यांनी स्वीकारणे सोपे नव्हते. हे म्हणताना खातूंना मात्र विविध कार्यकर्त्यांची अनुभवसंपन्नता आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञता दिसत होती.

२९ मार्च १९६८ रोजी अपना बाजारचे उद्घाटन धूमधडाक्यात झाले. भोईवाडा मैदानावर खास पेंडॉल उभारण्यात आला. सहा हजार सभासदांना निमंत्रण गेले. ‘नयन तुझे जादूगार’ या नाटकाचे तीन प्रयोग आणि चौथ्या दिवशी सिनेसंगीताचा बहारदार खुला कार्यक्रम झाला. गिरणगावातल्या आपल्या सभासदांबद्दल प्रेम, आपुलकीतून कार्यकर्ते राबराब राबले त्याला तोड नाही. हे केवळ पैसे खर्च करून होणार नव्हते. अपना बाजार इमारत ही संस्थेच्या प्रत्येक सभासदाचे आणि प्रत्येक नायगावकराचे अभिमानाचे प्रतीक बनले ते उगाच नाही. एवढी प्रचंड सभासद संख्या असली तरी कार्यकर्ते बहुतेक सर्वच सभासदांना व्यक्तिश: ओळखत होते. अपना बाजारचा किती जबरदस्त प्रभाव असावा? उद्घाटनानंतर तीन दिवस स्टोअर बघायला दिवसभर रांगा लागल्या होत्या. काही वेळेला या रांगा हिंदमाता सिनेमापर्यंत जात एवढ्या मोठ्या होत्या. एवढ्या गर्दीला नियंत्रित करायला, देखभाल करायला सेवकांबरोबर अनेक कार्यकर्ते रजा घेऊन रात्रंदिवस राबत होते.

हा पहिला उत्साह छान होता, पण अपना बाजार आंबेडकर रस्त्यावर नव्हते. नायगावचा परिसर चाळींचा, गिरणगावात संपामुळे तणावाचे वातावरण असे, हिंदु कॉलनी, पार्शी कॉलनी जरा दूरच. अशा वेळी ग्राहक सातत्याने कसे मिळवायचे हा प्रश्नच होता. एक प्रयोग म्हणून दादर रेल्वेस्थानकावरून फिरती बससेवा सुरू केली. पाच रुपयाचे कूपन घेऊन अपना बाजारात यायचे आणि खरेदी करायची. सामानासकट दादरला पोहोचण्याची व्यवस्था. ही व्यवस्था ग्राहकांना आवडली, पण ती फारशी यशस्वी झाली नाही. कारण दादरहून अपना बाजारला जाऊन यायला जो वेळ लागे तो अधिक वाटे. त्यामुळे तीन महिन्यांनी ही सेवा बंद करावी लागली, पण त्यामुळे जाहिरात मात्र झाली.

ग्राहकांचा ओघ निर्माण व्हायला मदत झाली ती बोनस स्टॅम्प्स् योजनेची. त्यावेळी रामन कंपनीने रामन बोनस स्टॅम्प्स् काढले होते. दुकानदारांनी रामन कंपनीकडून बोनस स्टॅम्प्स् खरेदी करून ग्राहकांना द्यायचे. आणि ते गोळा करून त्यांनी रामन कंपनीकडून फुकट बक्षीस घ्यायचे अशी योजना होती. अपना बाजारच्या व्यवस्थापकांनी विचार केला आपण स्वत:च स्टॅम्प्स् का काढू नयेत? खरेदीवर बोनस स्टॅम्प्स् देणे सुरू झाले ते लावायला पुस्तक दिले जाई. ते भरल्यावर त्या किमतीची वस्तू खरेदी करता येई. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ग्राहक जास्त खरेदी अपना बाजारमध्ये करू लागले. ग्राहकांच्या भेटी वाढल्या, घरी आलेल्या पाहुण्यांनाही घेऊन येऊ लागले. खरेदी मोठी केली तर त्यावर लगेच भेट मिळे. ही योजना पंचवीस वषें चालली. रामन कंपनीला मात्र त्यांची योजना बंद करावी लागली. शिवाय सर्व स्टॅम्प्स् वापरले जात नसत. त्याचा एक फंडही तयार झाला.

अशाच प्रकारे ‘विजयी भांडी योजना’ चालू केली. दर महिन्याला पाच रुपये जमा करायचे, वर्षअखेर साठ रुपयांची भांडी मिळायची. शंभर ग्राहकांचा गट केला जाई, दर महिन्याला एक क्रमांक काढला जाई. त्यामुळे ज्याचा पहिल्या महिन्यात नंबर लागे त्याला पाच रुपयात साठ रुपयाची भांडी मिळत आणि शेवटच्या महिन्यात ज्याचा नंबर लागे त्याला सत्तर रुपयांची वस्तू मिळे.

या योजनेमुळे पाच रुपये भरण्यासाठी ग्राहक अपना बाजारला येऊ लागले. त्या निमित्ताने स्टोअरमध्ये फिरू लागले. ग्राहकांचा वावर अपना बाजारमध्ये सुरू झाला.

एक विश्वासार्ह ग्राहक संस्था म्हणून अपना बाजारची प्रतिमा उभी राहू लागली. याला केवळ संस्थेच्या विक्री योजनाच कारण झाल्या असे नाही. शासनाचा फार मोठा हातभार त्याला लागला. सत्तरीच्या दशकातील टंचाईचा काळ होता. अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असे. अशा वेळी शासनाला हस्तक्षेप करावा लागे. खास सवलतीच्या दरात वस्तू पुरवठा करण्याची योजना आखण्यात येई. मग ती जादा साखर असो, डालडा असो की तेल, आटा, रवा असो. अशा वेळी हे काम ग्राहक सहकारी संस्थांकडे सोपवण्यात येई. अपना बाजार हे काम उत्साहाने अंगावर घेई. यात नफा फारसा नसे. उलट कटकट फार. लोकांच्या रांगा लागत. भांडणे लागत. पुरवठाही अपुरा येई. पण तरीही आम्ही हे काम घेत असू. कारण ग्राहकांच्या सोयीसाठी धडपड करावी हे संस्थेचे ध्येय होते. अपना बाजारमध्ये उत्तम व्यवस्था असते, हे कळल्याने ग्राहकांच्या झुंडी नायगावला येत.

अशा वितरणात कधी काय अंगावर येईल सांगता येत नसे. १९७० मध्ये सरकारने स्वस्त मिठाईची योजना सुरू केली. अपना बाजारने मिठाई बनवण्यापासून विकण्यापर्यंत जबाबदारी घेतली. घाटकोपरला एक हॉल भाड्याने घेऊन दोन-तीन वर्षे हा उद्योग करून चौदा रुपये किलोने मिठाईचे बॉक्स विकण्यात आले. ग्राहकांची झुंबड उडाली.

एकवेळ अशी होती की, अपना बाजारला प्रत्येक रुपया महत्त्वाचा होता. त्यातून नवनवे उद्योग करण्याची कार्यकर्त्यांची हौसही होती. त्यातून पाठ्यपुस्तक मंडळाच्या शालेय पुस्तकांचे वितरणाचे काम संस्थेने स्वीकारले. पुस्तके गोरेगावच्या डेपोतून नायगावला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गोडाऊनमध्ये आणणे आणि मग नायगावला त्याचे वितरण करणे ही ढोरमेहनत होती. दिवस पावसाळ्याचे असत, पुस्तके भिजू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागे. कर्मचारी ही सारी कामे उत्साहाने करीत. खर्च जाऊन वीस-पंचवीस हजार निव्वळ नफा झाला तरी खूप वाटे. अशी कामे अशा योजना चालू असत.

बसस्टॉपवर अपना बाजारची जाहिरात सुरू केली. वेगवेगळ्या सणानिमित्त सजावट आणि योजना यांची रेलचेल असे.

अपना बाजारमधील भावाविषयी अनपेक्षितपणे तक्रारी येऊ लागल्या. जुन्या सिझनमधील मालाचे भाव आणि नव्या सिझनमधील मालाचे भाव यातल्या तफावतीचा प्रश्न आला. त्यातून ग्राहक शिक्षणासाठी ‘अशी भेसळ, अशी चलाखी’ नावाचे प्रदर्शन भरवले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि नंतर ‘महानगर’ मध्ये ग्राहक शिक्षणाची सदरे चालवली गेली.

अपना बाजार चालवताना कोणते ग्राहक येतात याची चर्चा होई. त्यात तरुणांचा सहभाग कमी दिसे. यातून जे. जे. मधल्या तरुण चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवावे असा विचार पुढे आला. या प्रदर्शनाच्या कल्पनेला तरुण चित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रकार ओके, रघुवीर तळाशिलकर यांचे साहाय्य मिळाले. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी उद्घाटन केले. अशा उपक्रमातून खरोखरीच नवी पिढी अपना बाजारशी किती जोडली गेली त्याचे मोजमाप करता येणार नाही. खातू म्हणतात तसे अपना बाजारमुळे डाळ, तांदळापलीकडचे उद्योग करता आले. असाच मॅजेस्टिक बुक डेपोच्या कोठावळेंबरोबर पुस्तक प्रदर्शन आणि स्वाक्षरी महोत्सवाचा कार्यक्रम होत असे. कामगार विभागातले लोक, गृहिणी प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तके चाळत असत.

अपना बाजारचे विक्रीक्षेत्र मोठे होते. त्यामुळे वेगवेगळ्या योजनांसाठी त्याचा उपयोग होत असे. सुद्दढ बालक स्पर्धा, समतोल आहार योजना असेही उपक्रम चालू असत.

औषधविभाग फोर्टमध्ये चालू झाल्यावर अकबरअलीच्या भावाशी स्पर्धा चालू झाली आणि त्यानंतर खोराकीवालांनी खूप वाद घालूनही, अपना बाजारच्या स्वस्त औषधांवर मात करता न आल्याने अकबरअलीची औषधविक्री बंद केल्याची घटनाही घडली.

अपना बाजार केवळ कार्यकर्त्यांच्या आणि सेवकांच्या मेहनतीने यशस्वी झाला असे नाही. आधुनिक व्यवस्थापकीय तंत्राचा वापर त्यामागे होता. प्रकल्प अहवाल बनविणे, त्यातला Business Efficiency हा प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असे. मालमांडणी, मालसाठा नियंत्रण आदी गोष्टींचा विचार होत असे. अनेक समित्या, उपसमित्या काम करत असत. गाड्यांच्या व्यवस्थेवर करडी नजर ठेवली जाई.

अपना बाजारने उत्पादन क्षेत्रात पदार्पण करायचे ठरवले. त्याची सुरुवात मसाला कारखाना काढून केली. सुरुवातीला वडाळा उद्योग भवनमधील एका गाळ्यात असणारा कारखाना नंतर तळोजाच्या स्वतंत्र इमारतीत हलवला.

कारखाना तळोजाला हलवला खरा, पण त्यामुळे वाहतूक खर्च वाढला. त्याचबरोबर ऑक्ट्रॉयचा भुर्दंड पडू लागला. पण महानगरपालिकेकडे अर्ज करून ऑक्ट्रॉयपासून सुटका करून घेतली. बाजारात बेडेकर, कुबल, बादशहा असे मातब्बर स्पर्धक होते. त्यामुळे आकर्षक वेस्टन, पोस्टर्स, जाहिराती अशी संपूर्ण तयारी करावी लागली. सुरुवातीला अपना बाजारचे सहकार मसाले हे एकमेव उत्पादन अॅगमार्क केलेले असल्याने, सहकार मसाल्यांना बाजारपेठेत प्रवेश मिळाला. परंतु मसाल्यातील घटक, त्याचे रंग, प्रत याची काळजी घेणे सोपे नव्हते. मिर्ची दळताना घेण्याची काळजी होती. मग प्रत्यक्ष बेडगीला घाऊक मिर्ची विक्रीच्या बाजारपेठेशी संपर्क साधावा लागला. मिर्चीप्रमाणेच हळदीच्या पेवाशी संबंध साधावा लागला. सहकार व्यवहारात खूप सूक्ष्म हुशारीने व्यवहार करावे लागले.

असाच अपना बाजारचा डाळ मिलचा प्रकल्प नफ्यात गेला. पण हे यश वाटते तितके सहज प्राप्त झाले नव्हते प्रक्रिया उद्योग सुरू करायचे ठरवले. अपना बाजारची धान्य दुकाने आणि डिपार्टमेंट स्टोअरमध्ये डाळी कडधान्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होई. त्यामुळे डाळ मिल प्रकल्प अहवाल  तयार करण्यात आला. तो करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक मिळाले ते महंमद खडस यांचा. त्यांचा दाणे बाजारातील रामचंद ऍण्ड कंपनीतील भागीदार व घाऊक बाजारात अन्नधान्याच्या व्यवहारातील तज्ज्ञ म्हणून मोठा नावलौकिक. महंमद भाईनी डाळ मिल उभारायला मदत करायचे मान्य केल्यावर पुढील वाटचाल करणे सोपे झाले. तरी डाळ मिल उभारायचे ठरल्यापासून, मशिनरी घेण्याचा निर्णय होईंपर्यंत दीड वर्षाचा काळ गेला. डाळ मिल पहिल्या वर्षापासून फायद्यात गेली. कारण चांगला उतारा व उत्तम प्रत.

याशिवाय खातू ज्याला नसते उद्योग म्हणतात ते लोणची, साबणचुरा, स्वरभारती ट्रान्झिस्टर अशा अनेक अपना बाजार ब्रँडच्या वस्तू बाजारात आणल्या. तसेच कॅन्टीन चालवण्याचा उद्योगही केला. के. ई. एम. साठी जेवण पुरवण्याचा उद्योग केला. पण हे सारे विशिष्ट काळापुरतेच चालले. तर काही वेळा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत. उदाहरणार्थ बकऱ्याचे मटण निर्यात करण्याची योजना, पण चौकशीअंती या योजना फसव्या निघत. पण अपना बाजारच्या टीमची सावधानता या साऱ्याला पुरून उरत असे.

या अपना बाजारच्या गोष्टीचा शेवटचा भाग त्यातील टीमविषयीच आहे. कार्यकर्त्यांतून आलेले अधिकारी प्रमुख सदस्य होते. खातू लिहितात क्रिकेट टीमप्रमाणे प्रत्येकाची संस्थेच्या कामात वैशिष्ट्यपूर्ण व वेगळी भूमिका होती. पदाधिकारी आणि प्रमुख अधिकारी यांचा अनेक वर्षांचा दोस्ताना होता. म्हणून कार्यालयाबाहेर त्यांचा अरेतुरेचा संवाद असे. तिथे अपना बाजारातील पदांचे काही देणेघेणे नसे.  

अपना बाजारमधील कार्यकर्त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते राजकीयदृष्ट्या कायम एकत्र राहिले. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, नाथ पै ही यांची दैवते.

देशातील सर्व सार्वजनिक संस्था, सहकारी संस्था कुणा ना कुणा व्यक्तीच्या नावाने ओळखल्या जातात. पण ‘अपना बाजार’ असा कुणाच्या नावाने ओळखला जात नाही. ‘अपना बाजार’ ओळखला जातो तो अपना बाजार म्हणूनच. ‘अपना बाजार’ हा सामूहिक कर्तृत्वाचा आविष्कार ठरला आहे. भारतातील साधनहीन बृहत् समाजाला सामूहिकतेने काय करता येणे शक्य आहे याचा वस्तुपाठ समोर ठेवला.

.............................................................................................................................................

'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4520/Apna-Bajarchi-Gosht-

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......