हिंसेच्या पोटातून वर आलेली मुलं फुटबॉलच्या वेडानं जग जिंकायला निघाली आहेत!
पडघम - क्रीडानामा
राहुल माने
  • फिफा वर्ल्ड कप २०१८
  • Sat , 30 June 2018
  • पडघम क्रीडानामा फिफा वर्ल्ड कप २०१८ FIFA World Cup 2018

सहा खंड, २०९ संघ, ८६८ सामने, २४५४ गोल्स, प्रत्येक सामना प्रत्येकी २.८३ गोल्स आणि त्यातून ३२ संघ पात्र असा चांगला बाज आणि साज असलेली जागतिक फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा आता भरपूर जोमामध्ये आहे. संपूर्ण जगाचा सहभाग असणारा एवढ्या मोठ्या प्रमाणात खेळला जाणारा हा एकमेव खेळ असेल. प्रचंड स्पर्धा, जीवघेणा राष्ट्रवाद, अति-प्रमाणातील सेलिब्रिटी खेळांडूची भक्ती, जाहिराती-प्रक्षेपण हक्क, फिफाला मिळणारे व्यावसायिक हक्क याची प्रचंड धुळवड, यजमान देशात विश्वचषकाच्या माध्यमातून स्वताचे सत्ता-स्थान पक्के करण्याची संस्कृती जगभरात रुळली आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेमधील, ब्राझीलमधील आणि त्याआधी जपान-कोरिया येथील विश्वचषकही अपवाद नव्हते.

विश्वचषकाच्या माध्यमातून स्थानिक/देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचं नियोजनसुद्धा केलं जातं. पण यापलीकडे जाऊन या व प्रत्येक विश्वचषकामध्ये आपली राजकीय विचारधारा, सांस्कृतिक इतिहास आणि सामाजिक परिचय यांच्या अस्मितांचे निखारे फुलवण्याचा प्रयत्न होतो, हेही समजावून घ्यावं लागेल. १९९४ मधील विश्वचषकामध्ये सेल्फ-गोल केलेला कोलंबियाच्या आंद्रे एस्कोबारचा नंतर त्याच्या देशामध्ये परतल्यावर खून झाला होता, यावरून या प्रकरणाचा किती खोलवर परिणाम होतो हे कळून येईल.

जेव्हा २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पार पडली, तेव्हा त्या देशाची  प्रतिमा सुधारण्यास प्रचंड मदत झाली. अनेक दशकांपासून संपूर्ण जगामध्ये वर्णभेदी राजवटीमुळे दक्षिण आफ्रिका बदनाम झाली होती. त्यामुळे आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा आफ्रिका खंडामध्ये होत असल्यामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अर्थानं या स्पर्धेला अतिशय महत्त्व होतं. ‘धिस टाईम फॉर आफ्रिका’ असं या स्पर्धेचं ब्रीदवाक्यच होतं. (आणि उदघाटन सोहळ्यात शकिराचं या नावाचं गाणंही!) या स्पर्धेमुळे आफ्रिका खंडातील देशांच्या विकासाचा मुद्दा प्रामुख्यानं समोर आणण्याचा, तसंच वर्णद्वेषाबद्दल जागृती करून यासंदर्भात ऐतिहासिक चुकांचं प्रायश्चित घेण्यासाठी एक प्रकारे सार्वजनिक मनोभावना वाढीस लावण्यासाठी विविध गाणी, मोहिमा आणि जाहिराती यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. यावेळी रशिया आपली जागतिक प्रतिमा सुधारण्यासाठी विश्वचषकाचा खुबीनं वापर करून घेत आहे!  

मागील काही वर्षांमध्ये आफ्रिका खंड युद्ध, अंतर्गत बंडाळी, दुष्काळ, परकीय आक्रमण, तसंच वांशिक संघर्ष यांनी पोखरून निघाला होता. फक्त आफ्रिका खंडापुरतंच ते मर्यादित नाही. संपूर्ण जगभरच आशिया, अमेरिका, युरोपमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादानं मागील काही वर्षांत परत डोकं वर काढलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या राखेतून युरोपियन युनियन आणि जगातील इतर अनेक देश वर आले. परंतु नव्वदच्या दशकामध्ये पश्चिम आशिया, पूर्व युरोप, तसंच उत्तर आफ्रिका तेथील युद्धांमुळे लाखो निर्वासित देश सोडून गेले. यामध्ये युगोस्लाव्हियात वांशिक बंडखोरी आणि युद्ध झाल्यामुळे त्याचं सात देशांमध्ये विभाजन झालं आणि तेथून नागरिक विविध देशांमध्ये गेले. सिरीया, टर्की, जॉर्डन, कुवेत, इराक, ईस्ट तिमोर, नायजेरिया, सुदान, लिबिया, इथियोपिया अशा अनेक देशांमध्ये झालेल्या अस्थिरतेमुळे निर्वासितांची फौज तयार झाली आणि ते जगात जिथं आसरा मिळेल तिथं जाऊन वसले.

या सर्वांमध्ये युगोस्लाव्हियाचा विशेष उल्लेख करावा लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर वांशिक आणि धार्मिक सीमांच्या आखणीवर युगोस्लाव्हियाची निर्मिती झाली. परंतु अंतर्गत सत्तासंघर्ष, सामुदायिक-प्रादेशिक अस्मिता आणि धार्मिक द्वेष यामुळे हा विसंगतीनं भरलेला देश एकत्र राहू शकला नाही. प्रचंड हिंसाचार आणि हत्याकांड यानंतर त्या ठिकाणी बोस्निया आणि हर्जेगोवेनिया, क्रोएशिया, मासेडोनिया, मोन्टेनिग्रो, सर्बिया आणि स्लोव्हेनिया या देशांची निर्मिती झाली. येथील गरीब, हिंसाग्रस्त आणि दु:खी लोक युरोपमधील विविध संपन्न देश जसे जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, फ्रान्स या देशांमध्ये गेले. तिथं सुरक्षितरीत्या आपलं आयुष्य जगण्यास सुरुवात करू लागले. आणि हळूहळू पाश्चिमात्य संस्कृतीची जी काही प्रमुख मानचिन्हं - ज्यामध्ये खेळ हा सामाजिक-सांस्कृतिक महोत्सावासारखी तिथं साजरा केला जातो - त्यामध्ये सहभागी होऊ लागली.

या प्रकारे खेळामध्ये सहभागी होऊन यशस्वी झालेली काही प्रमुख नावं सांगता येतील. उदा. झिनेदिन झिदान (उत्तर अल्जिरीया ते फ्रान्स), झालाटन इब्राहिमोविच (बोस्नियाचे मुस्लीम ते स्वीडन), इव्हान रकीटीक (क्रोएशियन कुटुंब ते स्वीटझर्लंड), नाणी (केप व्हर्डे या आफ्रिकेतील देशातून पोर्तुगाल), मुअम्बा (आफ्रिकेतील झैरे ते इंग्लंड).   

मागील काही फुटबॉल विश्वचषक स्पर्धांमध्ये आफ्रिकन आणि आशियन मूळ असलेले अनेक खेळाडू युरोपमधील अनेक संघांमध्ये होते, पण त्यांची संख्या एक प्रकारे अपवाद म्हणावा किंवा अतिशय गुणवान असलेले परंतु त्यांना वगळून संघाचं भलं होणार नाही, अशा मजबुरीनं समाविष्ट असलेले ते खेळाडू होते. असं म्हणता येणार नाही की, ते पूर्णपणे त्या देशाच्या मातीमध्ये मिसळले होते, परंतु ते नक्कीच त्या देशाच्या राष्ट्रध्वजाखाली एकत्र येऊन खेळले. त्यामुळे एक महत्त्वाचा संदेश त्यातून सगळ्या जगामध्ये दिला. त्यामध्ये बरेचशे खेळाडू हे अनेक वर्षांपूर्वी युरोपमध्ये येऊन स्थायिक झालेल्या पालकांची मुलं होती. परंतु या विश्वचषकामध्ये एक निर्णायक बदल या परिस्थितीमध्ये झाला आहे.

युरोपमध्ये वर्षभर क्लब-पातळीवरील अनेक स्पर्धा चालू असतात. ला-लिगा, चॅम्पियन्स लीग, युएफा लीग, प्रीमियर लीग, युरोपा लीग, बुंडेसलीगा अशा अनेक स्पर्धांची नावं घेता येतील. याव्यतिरिक्त लॅटिन अमेरिका, रशिया, अमेरिका या व इतर अनेक ठिकाणी लीग सामने खेळले जातात. त्यामध्ये या मूळच्या आफ्रिकन, आशियन आणि युद्धकालीन निर्वासित कुटुंबांच्या मुलांचा दबदबा आहे. यामध्ये कोणी योगायोग शोधण्याचा प्रयत्न करेल, कोणी त्यांच्या शारीरिक सामर्थ्यांचं यश दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण यातील सर्वांत मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की, हिंसेच्या पोटातून वर आलेली मुलं ही गोळीच्या आकर्षणानं आपल्या जीवनाची दिशा ठरवताना दिसत नाहीत, तर ती सर्व फुटबॉलच्या वेडानं जग जिंकायला निघाली आहेत.

बृकिंग्स ही अमेरिकेतील मान्यवर संशोधन संस्था आहे. तिनं या निर्वासितांच्या बदलत्या रूपाचा आढावा घेतला आहे. युरोप किंवा जगभर खेळल्या जाणाऱ्या क्लब किंवा स्पर्धांमध्ये युद्ध-अशांतीमुळे स्थलांतर कराव्या लागणाऱ्या निर्वासितांबरोबरच आता एका वेगळ्या प्रकारच्या निर्वासितांचा दबदबा वाढत आहे. त्याला ते ‘आर्थिक निर्वासित’ असं म्हणतात. फुटबॉल क्लब्स हे निर्वासितांनी भरलेले आहेत आणि हे निर्वासित हिंसाग्रस्त निर्वासितांपेक्षा कितीतरी पटींनी सुखी-समृद्ध आहेत. काही निरीक्षकांच्या मतानुसार फुटबॉल हे स्पर्धात्मक राहण्यासाठी आणि त्याचा सर्वसाधारण दर्जा उंचावण्यासाठी निर्वासितांच्या गुणवत्तेचं स्वागत होणं आवश्यक आहे. त्यामुळे क्लब्सच्या आर्थिक सुबत्तेमध्ये, तसंच राष्ट्रीय संघाच्या सामूहिक कौशल्यामध्ये मोठी भर पडते!

फुटबॉलचं वेड जगभर पसरण्यात जागतिकीकरणाचा खूप जवळचा संबंध आहे. केवळ दोन देशांतील आर्थिक आणि राजकीय संबंध हेच निर्वासितांचे फुटबॉलमधील यश समजून घ्यायला अपुरे पडू शकते. त्या पलीकडे जगाच्या सांस्कृतिक प्रवाहांमध्ये जे मूलभूत बदल होत आहेत, त्याकडे आपण सूक्ष्मपणे पाहायला पाहिजे. जागतिक जीवनशैलीचं एक प्रमुख, धडधडतं व सळसळतं प्रतीक म्हणून फुटबॉलकडे आपण पाहतो. विश्वचषक स्पर्धा जेव्हा जेव्हा पार पडते, तेव्हा तेव्हा विविध अभियानं राबवली जातात. वर्णद्वेष असेल किंवा अंमली पदार्थांचा गैरवापर यांच्या विरोधात, तसंच आंतरराष्ट्रीय शांतता असेल किंवा खेळाचा दोन युद्धखोर देशांमध्ये पूल बांधण्याच्या समर्थनार्थ फुटबॉलनं नेहमीच मैदानाबाहेरील कामगिरीही अतिशय जोमानं पार पाडली आहे.

यावेळची २०१८ची स्पर्धा आता कुठे मध्यावर येऊन स्थिरावते आहे. ‘राउंड ऑफ १६’ (उपउपांत्यपूर्व फेरी) मधील संघ आता जवळपास निश्चित झाले आहेत. एक जबरदस्त उपलब्धी म्हणजे विश्वचषक पात्रता स्पर्धेमध्ये जगजेत्ते संघ बाहेर पडण्याची सुरुवात इटलीच्या अपात्रतेनं झाली होती. आता सुरुवातीच्या टप्प्यातच जर्मनी, अर्जेन्टिना, मेक्सिको, स्पेन यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. या दरम्यान क्रोएशिया, नायजेरिया, सर्बिया, स्वीडन, जपान, दक्षिण कोरिया, आईसलंड, इराण, सौदी अरेबिया, बेल्जियम, सेनेगल या देशांनी सनसनाटी कामगिरी केली आहे. प्रत्येक विश्वचषकामध्ये एखादा किंवा दुसरा संघ अपेक्षेपेक्षा जबरदस्त कामगिरी करून फुटबॉलमधील अनिश्चित जुगाराचा पुरावा देतो. पण यावेळी फुटबॉलमधील शैली, आक्रमकता, डावपेच व वेग हे प्रस्थापित युरोपियन आणि लॅटिन संघांनाही लाजवेल अशी कामगिरी वर उल्लेख केलेल्या या पूर्वी विश्वचषकामध्ये सातत्यपूर्ण उपस्थिती नसलेले संघ करत आहेत. निर्वासितांनी तर फुटबॉलचं मैदान कधीच काबीज केलं आहे. तेच निर्वासित जेव्हा युरोप किंवा जगभरच्या क्लबमध्ये खेळून आपल्या राष्ट्रीय संघातून विश्वचषकामध्ये खेळतात, तेव्हा ‘Decline of West and Rise of the Rest’ असं जे सीएनएन वाहिनीचे पत्रकार डॉ. फरीद झकारिया म्हणतात, ते अधोरेखित करावंसं वाटतं. निर्वासितांच्या यशाचं असं सेलिब्रेशन आपल्याला नक्कीच करता येईल.  

...........................................................................................................................................

लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.

creativityindian@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......