‘संजू’: या चित्रपटामुळे संजय दत्तची प्रतिमा उजळेल आणि रणबीर कपूरच्या कारकिर्दीला ‘संजीवनी’ मिळेल!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘संजू’चं पोस्टर
  • Sat , 30 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie संजू Sanju राजकुमार हिरानी Rajkumar Hirani रणबीर कपूर Ranbir Kapoor संजय दत्त Sanjay Dutt

अभिनेता संजय दत्त. अभिनेता सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा मुलगा. ‘डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर’ होतो, तसा ‘अभिनेत्याचा मुलगा अभिनेता’ होतो. अनेकदा. त्याच न्यायानं संजय दत्त हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर नायक म्हणून झळकला. मात्र अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द तशी फारशी गाजली नाही. तो गाजला तो एका वेगळ्याच कारणामुळे. पडद्यावरील ‘हिरो’ वास्तवात खलनायक बनला आणि देशद्रोही कारवायात सामील झाला. एरव्ही मोठ्या पडद्यावर नायक म्हणून देशद्रोही गुंडांना यमसदनास पाठवणारा स्वतःच एक ‘देशद्रोही गुंड’ म्हणून समाजात त्याची ख्याती झाली. त्यामुळे त्याच्या अभिनय कारकिर्दीला कलंक तर लागलाच, शिवाय त्याच्या त्या बेधडक वागण्यामुळे ‘वादग्रस्त अभिनेता’ म्हणून तो ओळखला जाऊ लागला. प्रसारमाध्यमांनी एक अभिनेता म्हणून त्याला जेवढी प्रसिद्धी दिली नसेल, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कुप्रसिद्धी त्याला या प्रकरणात दिली. मात्र त्याच्या या रहस्यमय जीवनामागील नेमकं वास्तव होतं तरी कोणतं? त्याची कहाणी ‘संजू’ या राजकुमार हिरानींच्या नवीन हिंदी चित्रपटात सांगण्यात आली आहे.

हा चित्रपट अर्थातच संजय दत्तचा चरित्रपट आहे. त्याच्या जीवनातील अगदी महत्त्वाच्या प्रकरणावर आधारित ही कहाणी आहे. निर्माता विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी नेहमीप्रमाणे ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेत ही  कहाणी रंगतदार करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा नायक अभिनेता रणबीर कपूरनं हुबेहूब ‘संजय दत्त’ उभा केल्यामुळे  ही कहाणी चांगलीच उठावदार झाली आहे.

अभिनेता सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा मुलगा म्हणून वावरताना संजू किती बिनधास्तपणे जीवन जगत होता, हे दाखवताना तो अंमली पदार्थाच्या आहारी कसा गेला आणि त्याला या विळख्यातून वाचवण्यासाठी स्वतः सुनील दत्त यांनी कोणकोणते प्रयत्न केले, तसंच ‘रॉकी’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या अवघ्या तीन दिवस आधी अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं झालेलं निधन, मात्र आपण जरी या जगात नसलो तरी ‘रॉकी’चा प्रीमिअर रद्द करू नये म्हणून त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी, हे सारं चित्रपटाच्या पूर्वार्धात पाहायला मिळतं. त्यानंतर बाबरी मशीद पडल्यानंतर देशात विशेषतः मुंबईत झालेल्या दंगलीत समाजविघातक शक्तींना सामील असल्याचा (प्रामुख्यानं ‘एके-४६ रायफल’ जवळ बाळगल्याचा, तसंच आरडीक्सचा साठा असल्याचा ट्रक घरात असल्याचा) त्याच्यावर झालेला आरोप, मग ‘टाडा’खाली झालेली अटक आणि भोगावा लागलेला तुरुंगवास या सर्व गोष्टी पाहावयास मिळतात.

अर्थात संजय दत्त यांच्या जीवनातील या महत्त्वाच्या घटना पाहताना त्याच्या त्यावेळच्या वर्तणुकीचं कोणत्याही प्रकारे समर्थन करण्याचा खटाटोप दिग्दर्शकानं केलेला नाही हे चित्रपट पाहताना जाणवतं. त्यामुळे संजय दत्त यांची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाईफ’ करण्याचा प्रयत्न दिसून येत नाही. वास्तवात जे काही घडलं, तेच सांगण्याची काळजी घेतली आहे.

या चित्रपटाद्वारे संजय दत्तच्या वर्तनाची भलावण करण्यात आली नसली तरी काही प्रसंगात या ‘संजू’ला सहानुभूती मिळण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे ‘खलनायक’ चित्रपटात संजय दत्त याच्यावर चित्रित झालेलं ‘नायक नहीं, खलनायक हूं मैं ’ हे गाणं या चित्रपटाच्या बाबतीत“खलनायक नहीं, नायक हू मैं ’ असं परावर्तित होऊ शकतं. 

या चित्रपटात तशी मोजकीच प्रमुख पात्रं आहेत. तरुणपणी अंमली पदार्थाच्या विळख्यात त्याला अडकवणारा त्याचा मित्र झुबीन मिस्त्री (जिम सर्भ), दारू आणि अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या संजूला चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करणारा अमेरिकेतील त्याचा खरा मित्र कमलेश (विकी कौशल), संजूचे वडील अर्थात सुनील दत्त (परेश रावल) याशिवाय संजूची पहिली गर्लफ्रेंड रूबी (सोनम कपूर), संजूची आई नर्गिस (मनीषा कोईराला), संजूची पत्नी मान्यता (दिया मिर्झा) आणि लेखिका असलेली विनी (अनुष्का शर्मा) यांची पडद्यावरील उपस्थिती दखल घेण्याजोगी आहे.

यांपैकी अर्थातच सुनील दत्त यांची भूमिका ‘संजू’च्या दृष्टीनं फार महत्त्वाची ठरली आहे. दारू आणि अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या संजूला ताळ्यावर आणण्यासाठी एक बाप या नात्यानं त्यांनी केलेले प्रयत्न, तसेच मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात एक आरोपी म्हणून संजूला अटक झाल्यानंतर झालेली मानहानी बाजूला सारून त्याला वाचवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, या गोष्टी साहजिकच कथेचा मुख्य गाभा बनल्या आहेत. याशिवाय ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात सुनील दत्त यांनी संजय दत्तच्या वडिलांचीही भूमिका केली होती. त्या चित्रपटाचा हवाला देऊन ‘संजू’मध्ये वडील-मुलामधील प्रत्यक्षात असलेले हळुवार नातेसंबंध दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यावरून सुनील दत्त यांचं मोठेपणही दृगोच्चर झालं आहे. 

रणबीर कपूरनं ‘संजू’च्या मुख्य भूमिकेत अक्षरशः धमाल उडवून दिली आहे. त्याची चालण्याची, बोलण्याची स्टाईल ही अगदी संजय दत्तसारखी आहे. तो ही भूमिका जगला आहे, असंच म्हणावं लागेल. कमलेश या त्याच्या मित्राच्या भूमिकेत विकी कौशलनंही प्रभावी अभिनय केल्यामुळे त्याचीही भूमिका चांगली लक्षात राहते. परेश रावल यांनीही सुनील दत्त यांची भूमिका खूपच समजून-उमजून केली आहे.

वास्तविक या चित्रपटात एक व्यक्ती म्हणून कोणीही ‘खलनायक’ नाही, मात्र लाक्षणिक अर्थानं या चित्रपटात प्रसारमाध्यमांना ‘खलनायक’ करण्यात आलं आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तबाबत नेहमीच प्रश्नार्थक बातम्या प्रसिद्ध करून त्याला हेतुपुरस्सर ‘लक्ष्य’ करण्यात आलं, हे चित्रपटात काही प्रसंगांद्वारे सांगण्यात आलं आहे. स्वतः संजय दत्त आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रपटाच्या शेवटी चित्रित केलेलं खास गाणंही त्याला बळकटी देणारं ठरलं आहे.   

या चित्रपटामुळे संजय दत्तची प्रतिमा कदाचित आणखी उजळू शकेल. रणबीर कपूरच्याबाबतीत बोलायचं झाल्यास अलीकडे त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप होत असताना ‘संजू’मुळे त्याच्या अभिनय कारकिर्दीला ‘संजीवनी’ मिळेल, हे मात्र नक्की. त्यामुळे या चित्रपटाचा संजय दत्त आणि रणबीर कपूर या दोघांनाही चांगला फायदाच होणार आहे, यात शंका नाही. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

meera k

Fri , 06 July 2018

श्रीकांत ना. कुलकर्णी हे पूर्वी लोकसत्तेत चित्रपट समीक्षा लिहीत असत, तेच का? संजय दत्तचे जीवन रहस्यमय आहे, हा साक्षात्कार कुलकर्णी सरांमुळेच आम्हाला झाला. अर्धा लेख कथा सांगण्यात खर्ची घातलेला आहे. उर्वरित लेखात चार-दोन सामान्य निरीक्षणे नोंदवून झाली यांची सिनेपत्रकारिता! परत कधीही सरांचा लेख वाचणार नाही, हे नक्की.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......