‘‘तूर विकावी लागेल! दुसरं काही नही...’’
ग्रंथनामा - झलक
अशोक कौतिक कोळी
  • ‘रक्ताळलेल्या तुरी’चं मुखपृष्ठ
  • Fri , 29 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक रक्ताळलेल्या तुरी Raktalalelya Turi अशोक कौतिक कोळी Ashok Kautik Koli

अशोक कौतिक कोळी यांची ‘रक्ताळलेल्या तुरी’ ही नवी कादंबरी नुकतीच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाली आहे. कापूस पिकवणारा एक शेतकरी शासनाच्या हमीभावामुळे तुरीचं पीक घेतो. या तुरीच्या पिकावर मुलीचं लग्न, मुलाची सायकल आणि हजार देणेकरांचं देणं असं सगळं अवलंबून असतं. या तुरीच्या विकण्यावरून एका कुटुंबाची होणारी फरपट या कादंबरीत मांडली आहे. त्यातील हा काही भाग...

.............................................................................................................................................

अशानं अशी बितली होती मुकुंदावर!

काय करावं आन् काय करू नाही, ह्याबाबतीत काही एक नव्हतं कळत त्याला. त्याला नाही की त्याच्या घरच्यांना नाही. सारेच कसे भांबरे भूत झाले होते. डोळ्यांतील आसवंही आटले होते. डोळ्यांतून आसवं नाहीत, की ओठातून शब्द नाहीत... सारंच कसं संपल्यासारखं... काही नव्हतं जगण्यासारखं... जीव तेवढ्यात तेवढा होता अडकलेला...

तेवढीच थोडीफार धुगधुगी होती. तुरीच्या गाड्यांसोबत तीही अडकलेली.. नाही तर केव्हा स्मशानात रूपांतर झालं असतं त्या घराचं.. नाही तरी घराचं घरपण नव्हतंच राहालेलं आताशा त्याच्या. गावात किंमत ठरली होती ना घरादारात त्यांना. गल्लीतील कुत्रंही हुंगत नव्हतं. जवळचे मानसं दूर गेले होते. कुणीही त्यांना जवळ घ्यायला तय्यार नव्हतं.

उसनवारी, पासनवारी सोडा- प्रेमानं कुणी बोलायला तय्यार नव्हत! गरिबी ठाण मांडून बसली होती घरात त्यांच्या म्हणून नव्हते का बोलत शेजारी? का गावभर झालेल्या कर्जाबद्दलच्या बेइज्जतीमुळे? कशानं काही कळायला मार्ग नव्हता.

सुरुवातीला कापड दुकानदारानं उचललं होतं हत्यार बेइज्जतीचं! उधारी ठेव म्हणत होता. घराच्या लक्ष्मीची इज्जत झाकायलासुद्धा साड्या नव्हत्या दिल्या त्याने. एका साडीवर सुनंदाचं दिवस काढनं सुरू होतं. फाटलेली साडी, तुटलेला संसार सांभाळून घेत होती. एक तेवढी तुरीची आशा लागलेली होती तिला. मुलीप्रमाणे वाढवलेली तूर पांग फेडेल आपले, ह्याबाबत खात्री होती तिला. जुगू-जुगू संसार होती करत.

किराणा दुकानदारानेही लगोलग नाकाबंदी करून टाकली होती. उधारीवर सामान द्यायचं बंद करून टाकलं होतं. त्या दिवसापासून बिगर तेलामिठाचा स्वयंपाक खात होते. बिगर दुधाचा चहा पीत होते. साखर, चहा संपल्यावर तोही बंद झाला होता. पुढे चालून उपाशी राहायची वेळ आली होती. एक वेळचं जेवन कसं तरी खात होते. त्यासोबत प्यायला पाणीही आता हक्काचं उरलं नव्हतं. घरपट्टी भरली नाही म्हणून ग्रामपंचायतीनं नळ बंद करून टाकला होता. डॉक्टरनं दवाखाला बंद करून टाकला होता.

अशानं अशी नाकेबंदी करून टाकली होती त्यांची. चहासाठी दूध मिळत नव्हतं की गिरणीवाला पीठ दळून देत नव्हता. एक एक करून त्यांच्या जगण्याच्या वाटा बुजवल्या जात होत्या. कोणत्याही परिस्थितीत मोकळा श्‍वास घेता येत नव्हता. त्यामुळे पुरते जेरीस आले होते. एवढे की भुकेकंगाल, शब्दकंगाल झाले होते. भावना पुरेपूर दबून गेल्या होत्या. आर्थिक, जैविक नाकेबंदीसोबतच भावनिक कोंडीही पुरेपूर झाली होती. अंगावरचे फाटलेले कपडे कुणी शिवून द्यायला तयार नव्हतं, की शेरभर दाने कोणी उगवत नव्हतं. अशानं अशामुळे पुरती कोंडी झाली होती त्यांची.

आपल्याच घरात परके झाले होते. आपल्याच गावात पोरके झाले होते. घर तर एखाद्या छावनीसारखं वाटतं होतं. छळछावनी झाली होती घराची... अंधारकोठडी वाटत होती. कोण्या जन्माचं पाप फेडत व्हते कान्नू? अंधारकोठडीत जन्मठेप झालेली होती त्यांना.

बाहेर बहिष्कार होता. तोंड दाखवायला जाग नव्हती... तर आत घरात अंधारकोठडी... वीजबिल न भरल्यामुळे घरातला वीजपुरवठा केव्हाच कट झालेला होता. त्यामुळे यातना, उपेक्षेची अंधारकोठडी अशानं असे भोगत होते.

आपल्याच घरात चोर झाले होते. आपल्याच गावात अपराधी म्हणून जगत होते. अशी कोणती शिक्षा भोगत होते? कशानं काय अपराध घडला होता त्यांच्याकडून? कशानं काही नव्हतं कळत. कोणत्या अपराधाबद्दल शिक्षा भोगतोय, याबद्दलही विचारायची सोय नव्हती. कोणाला म्हणून विचारणार होते?

काही काही नव्हतं कळत... कोन्हाला विचारायची सोय नव्हती, बाहेर तोंड दाखवायलाच जागा नव्हती, विचारणार तरी कोन्हाला व्हते? आत्ता तर प्रत्येकाची भीती वाटू लागली होती त्यांना. कुणाविषयी विश्वास नव्हता वाटत. करायला जावे काय, आन् उलटे व्हावे पायऽ! अशानं अशीच परिस्थिती होती त्यांची.

जिथे हात टाकावा, तिथून तो पोळून येत होता. हातोपायी खोड, दोन्ही डोये फोड! अशी गत झाली होती. तूर इकडून तिकडून पेरली, त्यात देनेदार असे भंडावून सोडत व्हते. घरीदारी त्यांच्या छळाने वैतागलेलं मुकुंदाचे कुटुंब...

असं वाटत व्हतं मुकुंदाले, की नाहक पेरली साली आपन्हं तूर! तूर तर पिकली पन जिवाले घोर लावून बसली. नाही पिकती तेवढं चांगलं झालं असतं. अशानं असा घोर लागला नसता जिवाले... तोंड लपवत फिरनं पडलं नसतं... आपल्याच गावात आपण अपराधी ठरलो नसतो. घराची अशी छळछावणी झाली नसती.

खरी होती मुकुंदाची गोष्ट! तो एकटाच मेटाकुटीला आला होता आसं नव्हतं. सगळं घरदार घानीमानी फिरत व्हतं. सगळ्यांनाच तो त्रास होता. धड जगताही येत नव्हतं आन् मरताही येत नव्हतं. त्यांचं एकमेकाला आधार देणं सुरू होतं. एकमेकाला जगण्याचं काम सुरू होतं. मुकुंदा लेकरंबाळं, बायको आई-वडिलांचे मन धरत होता. त्यासाठी छोटीमोठी धडपड करत होता. त्यातही म्हणावे तसे यश येत नव्हते. त्यामुळे जास्त मेल्याहून मेल्यासारखं होत होतं त्याला. कुटुंबप्रमुख म्हणून सपशेल अपयशी ठरत व्हता. त्याच्या त्या विचाराने नैराश्य वाढतच होतं मनावरचं त्याच्या. अशा अवस्थेत मुकुंदाने मान टाकू नये म्हणून सुनंदा, यशोदाबाई होत्या प्रयत्न करत. घरातले इतर सदस्यही ताण वाढवत नव्हते मनावरचा त्याच्या, प्रसंगी मन मारून जगत होते, उपासतापास सहन करत होते.

अशानं अशा वेळी नीलेश आला होता, कुठून आला होता, कसा आला होता... कळायला मार्ग नव्हता, बरोबर शेवटच्या क्षणी आला होता, तो, जणू त्याच्या हातचं शेवटचं पाणी पिण्यासाठी शेवटच्या घटिका मोजत होता मुकुंदा!

नीलेश आल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता. कोणीही त्याला वाईट, वंगाळ बोललं नव्हतं, की तुच्छतेनं पाहिलं नव्हतं. क्षणात त्यांचा त्याच्याविषयीचा राग गळून पडला होता. जो तो नीलेशसाठी हात पसरू लागला होता. मनोमन याचना करू लागला होता, ‘वाचव रेऽ भोऽ आम्हालेऽ...’ यशोदाबाई बोलली होती,

‘‘पाहा रे भावू नीलेशऽ! मुकुंदा कसा झाला...’’

‘‘काय झालं? काम्हू आसा बसला रेऽ भोऽ सुतक पडल्यावानी?’’

मुकुंदा एक नाही की दोन बोलत नव्हता. डोळ्यात म्हणा का शरीरात कुठलं प्राण उरलं नव्हतं त्याच्या. मात्र एक झालं होतं. नीलेशच्या येण्याने मन बहरलं होतं त्याचं. थोडीफार हालचाल करू लागला होता. किलकिल्या डोळ्यांनी पाहू लागला होता.

तेवढ्यानं आशा जागी झाली होती. नीलेशच्या येण्याने आशेची तिरीफ डोकावली होती जणू त्या घरात, तेवढ्याने बर्‍याकरता बरं वाटलं होतं.

नीलेश कोणी परका आहे, आसं वाटलंच नव्हतं. तसा तर परका नव्हताच तो. भावकीतलाच होता त्याच्या. बांदाशेजारी बांद जमिनीचा त्यांचा. शिवाय नीलेश-मुकुंदाची मैत्री होती चांगली. मध्यंतरी काही कारणांनी दुरावा होता त्यांच्यात. आजमातर नेमक्या वेळेला नीलेश आलेला होता.

नीलेशला अशानं असा पाहून गहिवर दाटून आला होता मुकुंदाचा. त्यानिमित्ताने आसवं आली होती डोळ्यांत आन् बोलही फुटले होते,

‘‘कसं काय समजलं तुल्हे...’’

‘‘कशाचं’’

‘‘आमच्या घरात सुतक पडल्याचंऽ!’’

‘‘काही तरीच काय बोलतू हायेस मित्राऽऽ येडा झाला का तू...’’

त्यांच्यतील अशा संवादानं पुन्हा बांद फुटले. सुनंदासह यशोदाबाई रडू लागल्या होत्या. मुकुंदाच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. मुलंही भेदरून गेली होती.

सुरुवातीला फुटलेले बांद मोकळे होऊ दिले. त्यानंतर निलेश बोलला होता,

‘‘वेड्यासारखे वागू नका! वेड्यासारखे करू नका. शांत रहा आधी...’’

‘‘...................’’

‘‘काही झालं नि तुम्हाले... कशाचे सुतक पडीन...’’

‘‘काहून मंग लोक आमच्याशी अशी वागून राहाले?’’

‘‘कशे?’’

‘‘बहिष्कार टाकल्यावानी... कोन्ही आमच्याशी बोलत नाही... कोन्ही आमच्या मदतीले धावून येत नाही...’’

‘‘कोन्ही उधार द्यू नि राहालं आम्हाले गावातून... कशानं काय गुन्हा झाला बरं आमचा?’’

‘‘बरं! कर्जबाजारी आम्हीच हायती का... आमच्याच घरावर जप्ती काहून? आमचं नळ कनेक्शन कसं काय बंद झालं? आमच्याच घरात अंधार कसा काय पसरला?’’

अशानं आसं, तशानं तसंऽ! तशानं तसंच का, अशानं असंच का? अशानं असा संताप करत होते. नीलेशजवळ! आपल्या भावना मोकळ्या करत होते.

नीलेश काही कोन्ही अधिकारी व्यक्ती नव्हता. सरकारी अधिकारी नव्हता, की गावातला कोणी पदाधिकारी.... सरपंच, पोलीस पाटील वगैरे... यापैकी कोणीही नव्हता तो. तरीही त्याच्याजवळ सगळं सांगत होते. मनात साचलेलं होत फक्त.

बर्‍याच दिवसांपासून अशानं अशी कोंडी सुरू होती त्यांची. छळछावणी सुरू होती. कोणीही जवळ फिरकून नव्हतं त्यांच्या, ना त्यांना कोणी उभं करत होतं. त्यामुळे जास्तच कोंडमारा होता झालेला. त्याचा निचरा नीलेशपुढे असा होत होता.

नीलेशही ऐकून घेत होता सगळं. त्यांचं ऐकून घेण्यासाठी आला होता जणू तो. अशानं असा दाखवत होता. समझदारीनं वागत होता. एकरूप होऊन ऐकून घेत होता सगळं. एक एक शब्द साठवून घेत होता.

बोलू दिलं त्याने त्यांना सगळं... ओकू दिलं मनातलं... सगळं सगळं रितं झाल्यावर बोलला.

‘‘हे सगळं थांबू शकतंऽ! एका झटक्यात सुटका हू शकते तुमची ह्या सगळ्यांतून...’’

‘‘कशी काय त्ये?’’

‘‘काहीस नही! एका झटक्याचं काम हाये.’’

‘‘काय काम हाये, सांग तर खरं...’’

‘‘त्येवढ्यासाठीच तर आलो हाये मी!’’

अशानं अशी गुगली टाकली होती नीलेशने! आला होता कशासाठी आन काय सांगत होता. मुकुंदाला आणि त्याच्या घरच्यांना वाटलं होतं आला असेल हा सहज... काय परस्थिती आहे काय नि... सुखदुःखाच्या गोष्टी करायला... आपलं सांत्वन करायला.

तो तर देवदूत निघाला होता. खरोखरच शेवटच्या क्षणी तोंडात पाणी टाकायला आला होता. जीव वाचवायचा म्हनत होता. सगळ्या जाचातून सुटका करायचा म्हनात होता. देवदूतापेक्षा कमी नव्हती त्याची भूमिका त्यामुळे.

नीलेशच्या अशा वक्तव्यामुळे मुकुंदासह सगळ्यांचेच डोळे विस्फारल्या गेले होते. कशानं काय सांगू लागला हां? काय आहे मनात याच्या? जाणून घेत बोलला होता मुकुंदा,

‘‘कशानं काय शक्य हाये हे, सगळं?’’

‘‘सगळं शक्य हायेऽ!’’

‘‘काय... काय...?’’

‘‘तुमच्या मुलीचं लग्न ठरल्यापरमानं परमिला ताईच्या मुलासोबत होऊ शकतं...’’

‘‘कसं काय त्ये? देनेदार छाताडावर उभे आहेत आमच्या...’’

‘‘त्यांचाही बंदोबस्त होऊ शकतो!’’

हे, तर फारच अद्भुत वाटत होतं मुकुंदाला. कशानं काय सांगू राहाला हां? आपली टर उडवायला तर नाही आला? बाकीचेही घरातले संशयाने पाहू लागले. मागे एकदा याच्या नादी लागून गळफास होता घेतला मुकुंदानं. मरता मरता वाचला होता. आत्ता पुन्हा कुठला डाव खेळायला आला हां? -अशानं आसं वाटू लागलं त्यांना.

 

ताबडतोबीनं घराबाहेर घालवावसं वाटत होतं त्यांना नीलेशला. पन तसं नव्हते करू शकले. दिवस खराब आलेले होते त्यांच्यावर. पडतीचा काळ होता. पडतीचा म्हणण्यापेक्षा शेवटाचा. शवेटच्या घटका मोजन्याचं काम चाललं होतं. असा वेळेला नीलेश आलेला होता. आला तर आला दिलासा देण्याच्या गोष्टी करत होता.

मोठाच दिलासा देण्याचे शब्द फुटत होते त्याच्या तोंडून. लहान तोंडी मोठा घास तर घेत नाही ना हा? का आपली मजाक घेत असेल? अशानं असी शंका बळावनं साहजिक होती त्याच्याबद्दल. होताच तसा बेफिकीर, उडाणटप्पू तो.

आसं आसलं तरी व्यवहारी बी होता म्हना तो! वेळप्रसंग पाहून वागत होता. त्यातूनच त्याने आपला विकास साधलेला होता. आपल्या व्यवहारचातुर्याचा पुरेपूर फायदा करून घेतलेला होता त्याने. मुकुंदाचं आकंठ बुडनं पाहवलं नव्हतं त्याच्याकडून. वाईट, वंगाळ काहीही घडू नये म्हणून सरसावलेला होता पुढे.

मुकुंदाला, त्याच्या घरादाराला मरू द्यायचं नव्हतं नीलेशला. गेल्या वर्षीची आपल्या हातून झालेली चूक सुदरवायची ही संधी चालून आली होती त्याला. ही संधी त्याला अर्थातच एका व्यक्तीने उपलब्ध करून दिलेली होती. त्याच्या संमतीनेच तो मुकुंदाच्या घरी आलेला होता. सर्व जाचातून सुटका करू इच्छित होता त्याची.

तशानं तसा प्रस्ताव त्याने शिंदे कुटुंबीयांसमोर ठेवला होता. त्याच्या अशा प्रस्तावानं डोळे दिपून जाणं साहजिक होतं त्यांचं. शंका, कुशंका, नाना प्रश्नांचं मोहळ उठणं साहजिक होतं. तशान तसे हबकून गेले होते, दबून गेलेले होते. दबलेल्या अवस्थेमुळेच ऐकून घ्यावं लागत होतं त्यांना. नीलेश पुढे सांगत होता,

“हे पहा ऽ! सगळं व्यवस्थित होईल... तुमच्या मनासारखं सगळं...लोकं बी बोलतील तुमच्याशी आन लग्न बी धूमधडाक्यात होईल.”

“उधरी, देनेदारांचं काय?”

“त्येच्हा बंदोबस्त ताबडतोबीनं व्हईन! कोन्ही सायबडा म्हना का बांडाभुरका- मास्तरडा फिरकणार नि तुमव्ह्या दारापुढी...उधारी मांध्याले नही की कर्जवसुलीसाठी नही...”

“.........”

“कोन्ही फिरकणारच नही तुमव्ह्या घराकडी. कोन्ही वाकडा नजरनं पाहाणार नही. कोन्हाचा बहिष्कार म्हना का काही राहणार नाही...”

“.........”

“पयल्ह्यासारखं जाते टवटवीत टमाट्यासारखे हून जासान तुम्ही...निराशा म्हना का अपमान, आसपास भटकणार नही तुमच्या... पहिल्यासारखं गुबगुबीत गोबीसारखं हून जाईन घर तुमचं...’’

‘‘कशानं काय व्हनार हाये पण हा बदल? कोण करणार हाये?’’

‘‘तूर तुमची!’’

‘‘ते तं रांगेत लावलेली हाये. सरकारी तूर खरेदी केंद्रावर. नंबर लागून तूर विकली की करणार आहोत आम्ही यातल्या काही गोष्टी...’’

‘‘काही म्हणजे कोणत्या?’’

- यावर उत्तर कुठे होतं मुकुंदाजवळ! तूर सरकारी खरेदी केंद्रावर उभी होती, ही गोष्ट खरी होती. मात्र त्यातून मिळणार्‍या पैशांतून काय काम करावं? हा मुकुंदासमोरचा मोठा गहन प्रश्‍न होता. मुलीचं लग्न करावं का देनेदारांची देनी द्यावी? अशानं अशा तिठ्यावर तो उभा होता. सगळं कुटुंब त्याच्या झळा सोसत होतं, होरपळून निघत होतं. नेमका असा अवघड, जीवघेणा प्रसंग सोडविण्याचा प्रस्ताव नीलेशने ठेवलेला होता.

नीलेशच्या अशा वागण्या-बोलण्याचा अचंबा वाटत होता त्यांना आणि अप्रूपही वाटत होतं. तो पुढे बोलला होता,

‘‘माझं कधी आयकलं तुम्हीनं तर सगळे प्रश्‍न सुटता तुमचे...’’

‘‘नाही आयकलं तर?’’

‘‘गुंता आझून वाढत जाणार आहे. तुमच्या गळ्याभोवतीचा फास आणखीनच आवळला जाणार आहे.’’

‘‘..................’’

‘‘काय करावं लागेल आम्हाला यातून सुटण्यासाठी?’’

‘‘तूर विकावी लागेल! दुसरं काही नही...’’

‘‘त्ये तर करतोच आहे आम्ही... तूर, सरकारी केंद्रावर उभी आहे आमची...’’

‘‘हेच तर चूक झाली तुमचीऽ!’’

‘‘नुस्ती देनेदारांची रीघ नही, चहूबाजूनं कोंडी केल्या गेली तुमची...’’

‘‘म्हणजे उधारीवाले, बँकवाले, तलाठी, ग्रामसेवक, दुकानदार, डाक्टर, दवाखाना, गिरणीवाला, वायरमन...’’

‘‘तुमचा मावसभावू शांताराम मास्तरसुद्धाऽ!’’

‘‘एवढे सम्दे कशे काय तुटून पडले आमच्या घरावर?’’

‘‘तुरीमुळे!’’

‘‘तुरीमुळे कशे काय?’’

नीलेश सारखा कोड्यात बोलत होता. बोलत होता का मजाक करत होता? कशानं काही कळत नव्हतं त्याचं. एक मात्र होतं, त्याच्या बोलण्यातून तळमळ दिसून येत होती. विश्‍वास ठेवा माझ्यावर... आत्ता फसविणार नाही मी तुम्हाला... असा भाव डोळ्यांतून पाझरत होता त्याच्या!

शिवाय दुसरा कुठला पर्यायही नव्हता दिसत मुकुंदासमोर... एकमेव तुरीची आवक होती... तूर बाजारात उभी होती... आन् तिच्याविषयी नीलेश घरी सांगत होता,

‘‘तूर बाजारात नेवून चूक केली तुम्हीनंऽ!’’

‘‘यात कसली चूक? सरकारी खरेदी केंद्रावर तूर नेण्यात कसली चूक?’’

‘‘हांऽ! चूक झाली तुमची...’’

‘‘काय कर्‍याले पायझे व्हतं मंग?’’

‘‘बंडूशेठले विकून टाकायला पायझे व्हती तूर!’’

‘‘का?’’

‘‘एवढ्या यातना, उपासमार, अपमान, अवहेलना, कुचंबना, बहिष्कार-काहीही भोगावलं लागलं नसतं तुम्हाला...’’

‘‘म्हणजे ह्या सगळ्यामागे बंडूशेठ व्हता?’’

‘‘व्हता नि; हाये!’’

‘‘कसा काय?’’

‘‘तुम्हीनं बंडूशेठच्या साम्राज्याले तडा देण्याचा प्रयत्न केला. उधारीवर बी-बियानं, खत मटरेल घेतलं नाही त्याच्याकडून आन् मालही त्याला विकला नाही. म्हणून त्याचं पित्त खवळलं.’’

‘‘मीन्हं काय केल्हं पन त्येचं वाईट?’’

‘‘दुष्टचक्र भेदण्याचा प्रयत्न केला न्!’’

‘‘......................’’

अशानं आसं समजल्यावर आझूनच हापकून गेला मुकुंदा...

कशानं काय करावं आन् काय नाही...आत्ताच्या आत्ता जमिनीने वाट मोकळी करून द्यावी आपल्याला... आन त्यात अंतर्धान पावावे... नाही तर घर तरी कोसळून जावे आंगावर आपल्या...

अशानं आसं वाटू लागलं त्याला... आत, पुन्हा आत, खचून जावू लागला... आपलेच हातपाय आतमध्ये खेचून घेत, गोगलगायसारखा आपल्याच कोशात निघून गेला.

.............................................................................................................................................

रक्ताळलेल्या तुरी - अशोक कौतिक कोळी,

लोकवाङ्मय गृह, मुंबई, मूल्य - २०० रुपये.

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4436

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......