‘लस्ट स्टोरीज’ : फक्त ‘वासना’ नव्हे, तर नातं, प्रेम, लैंगिकता यांच्या बहुपेडी कथा 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘लस्ट स्टोरीज’ची पोस्टर्स
  • Sat , 23 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie लस्ट स्टोरीज करण जोहर Karan Johar अनुराग कश्यप Anurag Kashyap झोया अख्तर Zoya Akhtar दीबाकर बॅनर्जी Dibakar Banerjee

‘लस्ट’, ‘वासना’... हे तसे साधे शब्द. फक्त ते मुख्यतः लैंगिक जीवनाशी संबंधित आहेत, इतकंच. आणि सेक्स, लैंगिक भावना आदि गोष्टी आपल्याकडे ‘टॅबू’ अर्थात निषिद्ध मानल्या जातात. त्यामुळे त्यांचा सार्वजनिक ठिकाणी उल्लेख करणं नजरा उंचावणारं ठरतं. ‘कामसूत्र’ जगाला सांगणाऱ्या भारतातल्या या गोष्टी येथील जनमानसाची दांभिक प्रवृत्ती अधोरेखित करण्यासाठी पुरेशा आहे. 

सद्य परिस्थितीत या बाबी\घटना अगदी संस्कृती ते देशप्रेम अशा गोष्टींशी जोडल्या गेलेल्या आहेत. अगदी चित्रपट, नाटक इत्यादी माध्यमांशीही या बाबी आणि त्यांच्या अनुषंगानं येणाऱ्या सेन्सॉरशिपशी जोडल्या गेल्या आहेत. कदाचित यामुळेच ‘बॉम्बे टॉकीज’ (२०१३) या चित्रपटाचा सीक्वेल असलेला ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याच्या निर्मात्यांनी ‘नेटफ्लिक्स’ हे चित्रपट व मालिकांचं ‘ऑनलाईन स्ट्रीमिंग’ करणारं माध्यम निवडलं यात नवल नाही. 

तसं पहायला गेलं तर ‘लस्ट स्टोरीज’ हा अँथॉलॉजी अर्थात एका समान धाग्यानं बांधून ठेवलेल्या चार लघुपटांचं संकलन असलेला चित्रपट वासना, सेक्स, लैंगिक वर्तन इत्यादी गोष्टींशी निगडीत आहे असं नाही. कारण यातील पात्रं, प्रत्येक लघुपटातील घटना आणि मध्यवर्ती विषय स्त्रियांचं लैंगिक आयुष्य आणि समागम यांना न मिळणारं महत्त्व, किंबहुना या गोष्टींकडे केलं जाणारं दुर्लक्ष, अशा बऱ्याच विषयांना हात घालतात. 

एक वेंधळा कॉलेजवयीन मुलगा, ज्याचं राज कपूरवर प्रेम आहे आणि एक कॉलेजमधील प्राध्यापिका, जिला रफी आवडतो. सुरुवातीच्याच दृश्यात ती मध्यरात्री शांतपणे पहुडलेल्या मुंबईमधील रस्त्यावर गाडीतून जात असताना रफी ऐकत, आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे. व्हॉट अ पेअर इट इज! 

कश्यपची ही शॉर्ट फिल्म (आणि त्यातील नायिका) पत्नी, प्रेयसी किंबहुना आयुष्यात असलेली कुठलीही स्त्री म्हणजे स्वामित्व हक्क दर्शवण्याची आणि जोपासण्याची वस्तू आहे, या भावनेवर भाष्य करणारी किंबहुना त्यावर टीका करणारी आहे. मात्र त्यात हळूहळू या नायिकेचं, कालिंदीचं (राधिका आपटे) तेजसबाबत (आकाश ठोसर) पझेसिव्ह होत जाणं, हे एक प्रकारे पझेसिव्हनेस टाळता येणं कसं शक्य नाही किंवा प्रेमाच्या ओघात त्यात कशी अतिरेकी वाढ होते, याचंही चित्रण करणारं आहे. 

शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यातील संबंधांबाबत बातमी वाचल्यावर तेजसचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणारी, शेवटी आपली चूक लक्षात आल्यावरही स्वतःचा बचाव करू पाहणारी आणि तेजसला त्याच्या दुसऱ्या प्रेयसीलाही राज कपूरची गाणी ऐकवली होती का, असं विचारणारी कालिंदी म्हणजे राधिकाच्या अभिनयाचा मूर्त सोहळा आहे. अर्थात कश्यपच्या या शॉर्ट फिल्मची अतिरिक्त लांबी आणि फोर्थ वॉल ब्रेक करणं जरा खटकतं. मात्र तरीही ती या चार शॉर्ट फिल्मच्या गराड्यात शोभते, हेही तितकंच खरं. 

झोया अख्तरची शॉर्ट फिल्म ही तिच्या ‘टू द पॉइंट’ भाष्य आणि दिग्दर्शनाच्या पातळीवर या अँथॉलॉजीमधील सर्वोत्तम आहे यात शंकाच नाही. मुंबईतील एक बॅचलर आणि त्याच्या घरातील मोलकरीण यांच्यातील संबंधांच्या माध्यमातून अख्तर वर्ग, जाती यांच्यातील संघर्ष समर्थपणे रेखाटते. आपल्यात आणि अजितमध्ये (नील भूपालम) केवळ लैंगिक संबंध वगळता भावनिक पातळीवर इतर काही घडणं शक्य नाही हे माहीत असताना त्याला स्थळ म्हणून पाहायला (किंबहुना दाखवायला) घरी आलेल्या कुटुंबासमोर आणि त्याच्या संभाव्य भावी पत्नीसमोर उद्ध्वस्तपणे वावरणाऱ्या ‘सुधा’ या ‘बाई’च्या रूपातून भूमी पेडणेकर तिची आजवरची कदाचित सर्वोत्तम कामगिरी करते. 

सुधाच्या घरातून बाहेर जाऊन नंतर दुसऱ्या दिवशी परत येण्याच्या कृतीत कट्स न दाखवता केवळ कॅमेरा पॅन करून ती म्हणजे त्या फ्लॅटचा अविभाज्य घटक आहे, याखेरीज तिचं आयुष्य कसं त्याभोवती फिरणारं आहे, अशा प्रकारचं भाष्य करण्यात अख्तर यशस्वी होते. 

शेवटी पेडणेकर आणि रसिका दुग्गल यांचं दृश्य म्हणजे अभिनयाचा सोहळा आहे. त्यांच्यातील संवाद आणि त्यांचं मिठाई खाण्याचं शेवटचं दृश्य यांना तर ‘नीरज घायवान’च्या ‘ज्यूस’ या शॉर्ट फिल्ममधील शेवटच्या फ्रेमइतकंच महत्त्व आणि गहन अर्थ आहे. 

दिबाकर बॅनर्जीची शॉर्ट फिल्म अलीकडे अधिक सामान्य पातळीवर विचार केला जातो (किंबहुना केला जावा) अशा विवाहबाह्य संबंधाविषयी आहे. रीनाचं (मनिषा कोईराला) सुधीरशी (जयदीप अहलावत) अफेअर सुरू आहे. जो खरं तर तिच्याच पतीचा कॉलेजपासूनचा मित्र आहे. इतकंच काय तर तीदेखील त्यांच्याच कॉलेजमध्ये होती, असा नात्यांचा गुंता यात आहे. 

सुधीरच्या बीच हाऊसवर आपला वेळ घालवत असलेल्या या दोघांच्या आयुष्यात त्या रात्री सलमानच्या (संजय कपूर) येण्यानं अनपेक्षित वळण मिळतं. आणि बॅनर्जीचा कॅनव्हास आणखी मोठा होऊन या तिघांमधील संवाद आणि विसंवादाच्या रूपातून तो या कथेला आणखी फुलवतो. ज्याला ‘वुडी अलन शैली’ला समांतर असलेल्या संवादांची आणि अहलावत, कपूर आणि कोईराला यांच्या तितक्याच सक्षम परफॉर्मन्सची जोड आहे. 

यात आपल्या जिगरी मित्रासोबत त्याच्या घरातील स्विमिंग पूलसमोर बसून सलमाननं त्याला “यार, मेरी बिवी तेरे घर में सुंदर दिखती हैं ” म्हणणं आणि त्याच्या बायकोशी असलेल्या अफेअरबद्दल आपल्या मित्राला सांगून आपलं अफेअर वाचावावं की, त्याला न सांगता आपली मैत्री वाचवून एक प्रकारे त्याचा घात करावा अशा द्वंद्वात अडकलेला सुधीर म्हणजे खरी ‘नजाकत’ आहे. 

‘अलॉअन्स’ म्हणजे स्वातंत्र्य नव्हे असं म्हणत दोघांच्या मध्यात त्रस्त झालेली रीनादेखील तिच्या जागी योग्य आहेच. अशा बऱ्याच सूक्ष्म विचारांचे अंडरकरंट्स घेऊन बॅनर्जीची शॉर्ट फिल्मही केवळ वासनेहून अधिक तरल भावना आणि विचारांचे चित्रण करते. 

करण जोहरची शॉर्ट फिल्म ही अधिक ‘फिल्मी’ स्वरूपाची आहे. मात्र तरीही ती तिचं स्वत्व जपत आणि तिला द्यायचा आहे तो संदेश देत व्यक्त होते. तेही अगदी त्यातील रेखा (नेहा धुपिया) या ग्रंथपालिकेच्या आपल्या ‘क्लीव्हेज’ला घेऊन वावरण्याच्या वृत्तीइतक्याच बेफिकीर आणि थेटपणे. 

मेधा (किआरा अडवाणी) या शिक्षिकेच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. ज्यासाठी ती तिसऱ्यांदा म्हणून पारसला (विकी कौशल) भेटायला आलेली आहे. तिच्या होकारानंतर त्यांचं लग्न होतं. सगळं सुरळीत सुरू असतं. फक्त एकाच गोष्टीची कमी असते. ती म्हणजे केवळ पाचेक सेकंदात समागमाला पोचणारा तिचा पती आणि तिला न मिळणारं समाधान. 

शेवटी आईसक्रीम खाण्यापूर्वी (पण इंटेंडेड) “औरत की हसरत सिर्फ बच्चे नहीं हैं ” असं म्हणणारी मेधा या हलक्याफुलक्या शॉर्ट फिल्मला आपला मुद्दा योग्यरित्या पोचेल अशा ठिकाणी आणून सोडते. 

जोहरनं ‘बॉम्बे टॉकीज’मध्येही त्याच्या समलैंगिकतेवरील शॉर्ट फिल्मच्या निमित्तानं त्याच्यातील दिग्दर्शकीय कौशल्याचा अनुभव करून दिला होता. इथंही तो हे साध्य करतोच. इतकंच नव्हे तर त्याच्याच एका चित्रपटातील दृश्याची खिल्ली उडवणारं एक दृश्यही समोर उभं करतो, जे थेट पाहणं योग्य ठरेल. 

‘लस्ट स्टोरीज’मध्ये पार्श्वसंगीताचा सर्वोत्तम वापर कशात असेल तर तो जोहरच्या शॉर्ट फिल्ममध्ये. आणि साऊंड डिझाइनचा योग्य वापर कशात असेल तर तो अख्तरच्या शॉर्ट फिल्ममध्ये. बॅनर्जीच्या शॉर्ट फिल्ममधील के. यू. मोहननचा कॅमेरा अख्तरच्या अल्वरो गतिएरेजच्या (Alvaro Gutierrez) कॅमेऱ्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करतो. 

पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा ‘बॉम्बे टॉकीज’च्या निमित्तानं एकत्र आलेल्या या चारही दिग्दर्शकांनी ‘सिनेमा’ला वाहिलेल्या चार शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून सिनेमॅटिक ब्रिलियन्सचा एक थक्क करणारा अनुभव करून दिला होता. ‘लस्ट स्टोरीज’च्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आधीच्या अँथॉलॉजीहून अधिक पुढचं आणि परिणामकारक पाऊल टाकलं आहे. आणि सद्य परिस्थितीत तरी याची गरज होतीच. 

टीप : ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट १५ जून रोजी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेला आहे. तो याच ‘ऑनलाईन स्ट्रीमिंग’ नेटवर्कवर पाहता येईल. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......