‘सल्तनत-ए-खुदादाद’ : धर्मवेड्या, जमातवादी प्रचारास ठोस आव्हान देणारा ग्रंथ
ग्रंथनामा - झलक
राम पुनयानी
  • सरफराज अहमद लिखित ‘सल्तनत-ए-खुदादाद’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 04 May 2018
  • ग्रंथनामा झलक सल्तनत-ए-खुदादाद Saltanat-E-Khudadad टिपू सुलतान Tipu Sultan

सरफराज अहमद लिखित ‘सल्तनत-ए-खुदादाद’ या महत्त्वाची पुस्तकाची चौथी आवृत्ती नुकतीच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ अभ्यासक राम पुनयानी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

सरफराज अहमद लिखित ‘सल्तनत-ए-खुदादाद’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशित होत आहे. दोन वर्षांत या पुस्तकाचा महाराष्ट्रात विक्रमी खप झाला आहे. अलीकडच्या काळात धर्मवेड्या समाजात फूट पाडणाऱ्यांच्या हातचं फुटीर शस्त्र ठरत चाललेल्या इतिहास-लेखनशास्त्राच्या मर्यादांच्या खूप पलीकडे जाणारा, अत्यंत सखोल संशोधनाचा दर्जा असणारा हा ग्रंथ आहे.

धर्माधिष्ठित राष्ट्रवादाची उभारणी करू पाहणाऱ्या धर्मवादी राजकीय शक्ती नेहमीच इतिहासाचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करत आलेल्या आहेत. या प्रवृत्तीची सुरुवात वसाहतिक कालखंडात झाल्याचं दिसून येतं. राजाचा धर्म चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवून आपलं विभाजनवादी इतिहासलेखन पुढे आणलं. हाच कित्ता धर्मवादी राष्ट्रवाद्यांनी उचलून आपल्या राजकीय कार्यक्रमाला सोयीस्कर पद्धतीनं विकसित करून वापरण्यास सुरू केलं. गंमतीची बाब म्हणजे भारतीय इतिहासकार त्याच कालखंडाकडे दोन्ही धर्मांच्या राजांमधील फक्त सत्ता संघर्ष म्हणून पाहतात. 

धर्मवादी इतिहास लेखन प्रवाहातील पहिला महत्त्वाचा प्रयोग म्हणजे जेम्स मिल लिखित ‘भारताचा इतिहास’ (‘हिस्ट्री ऑफ इंडिया’) होय. खरं तर भारताला कधीही भेट दिलेली नसतानाही,  तत्कालीन भारतीय नागरी सेवाद्वारे भारतात प्रशासकीय आधिकारी म्हणून जाऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींसाठी जेम्स मिलनं हा इतिहास लिहिला. त्यानं त्याच्या कल्पनेप्रमाणे (सोयीनं) भारतीय इतिहासाची हिंदू कालखंड, मुस्लीम कालखंड आणि ब्रिटिश कालखंड अशी विभागणी करून टाकली. तसा तर ‘हिंदू’ हा शब्द आठव्या शतकात वापरात आल्याचं दिसून येतं. त्यावेळी वेगवेगळ्या राजांची अनेक राज्यं वेगवेगळ्या प्रदेशात असलेली दिसून येतात.

इथं एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, त्या-त्या राज्यात राजाचा धर्म हा राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी नसे. आणि राजकीय सत्तेच्या अनुषंगानेच इतर धर्मीय राजांबरोबर संबंध व तह स्थापित होत असत. मिलच्या पुस्तकातून हिंदू आणि मुस्लीम हे स्वतंत्र आणि एकजिनशी समूह आहेत, असं ध्वनित केलं आहे. यावरून असं भासतं की, जसं काही या काळात एका धर्माच्या राजांची दुसऱ्या धर्माच्या राजांशी युद्धं व संघर्ष चालत होता. त्यासाठी हेतूतः संपूर्ण चित्र दडवून सोयीचे भाग निवडून संपूर्ण इतिहास सादर करत असल्याचा भास निर्माण केला जात असल्याचं दिसतं. त्यासाठी काही मंदिरांची तोडमोड किंवा काही धर्मांतरं (संदर्भ गाळून), त्यामागची वस्तुस्थिती व हेतू दडवून सांगितली जाताना दिसतात. 

अन्य साम्राज्यवाद्यांप्रमाणेच ब्रिटिशांनीसुद्धा ‘फोडा आणि झोडा’ म्हणजेच विभाजनवादी राजकारणाची खेळी केल्याचं दिसून येतं. भाषा, वांशिकता, किंवा अन्य असाच एखादा मुद्दा त्यांनी वापरला असता. मात्र त्यांनी दक्षिण आशयायी राजकारण प्रदेशात प्रभावी व संवेदनशील असणाऱ्या धर्मवाद या मुद्याचा उपयोग करून घेतल्याचं दिसून येतं. भरीस भर म्हणजे त्यांचा मुस्लिमांबद्दलचा तीव्र आकस (पूर्वग्रह) जोडीला होता. तो दोन कारणांनी होता. एक म्हणजे त्यांना मोठ्या प्रदेशावर सत्ता असणाऱ्या मुस्लीम राज्यकर्त्यांच्या मुकाबल्यात जनसमर्थन मिळवणं आवश्यक होतं.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिशांना असं वाटत होतं की, १८५७ च्या बंडात मुस्लिमांचा विशेष मोठा सहभाग होता. खरं तर मुस्लीम आणि हिंदू यांचा यांचा संयुक्त सहभाग या बंडात होता. व औपचारिक पातळीवर त्याचं नेतृत्व शेवटचा मुगल बादशहा बहादूरशहा जफरनं केलं होतं. एवढी एक सबब ब्रिटिशांना १८५७ च्या घटनेनंतर मुस्लिमांवर सुडचक्र सुरू करण्यास पुरेशी होती. ती त्यांनी पुरेपूर वापरली. 

यासाठी अनेक ग्रंथाद्वारे वगैरे पुढे आणलेला मुद्दा म्हणजे मुस्लिमांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले हा आणि त्या पार्श्वभूमीवर मग हिंदूसाठी मुक्तीदायी ब्रिटिश शासन हे हिंदूंच्या मनावर बिंबवण्याचा प्रकल्पच जणू राबवला. त्या काळी राज्यांचे नियम वेगळेच होते. म्हणजे कायद्याचे जनक व अंमलबजावणी करणारेही राजे तसेच असत. न्याय त्यांच्या शहाणपणाच्या प्रमाणात व त्यांच्या लहरीनुसार ठरत असे, असं चित्र रंगवल्याचं दिसून येतं. याचप्रमाणे हिंदूंचं इस्लामीकरण (सुरुवातीला सामाजिक सहवासातून व सुफी संतांच्या मानवीयतेच्या शिकवणूकीद्वारे) हे तलवारीच्या धाकानं घडवून आणल्याचं रंगवलं गेलं. जिंकलेला राजा युद्ध हरलेल्या हिंदू राजाचा कसा छळ करतो, असा एखादा सुचा किस्सा वापरून मुस्लीम राज्यकर्ते कसे क्रूर व अन्यायी होते, असं मांडलं गेल्याचं दिसतं. याच्याच जोडीला मंदिरांचा विध्वंस... आणखी एक अन्याय केल्याचं मांडलं गेलं. काही वेळेला मंदिरात असलेल्या प्रचंड संपत्तीच्या भांडारामुळे किंवा क्वचित प्रसंगी पाराभूत राजाच्या मानभंग करण्याच्या उद्देशानं मंदिर उद्ध्वस्त करण्याची काही कृत्यं हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्माच्या राजांकडून घडत असत. यामुळे इथल्या खऱ्या बहुमित्र परंपरा, हिंदू-मुस्लिमांमधील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सामंजस्य अशा अनेक स्तरावरील हिंदू-मुस्लीम राजांच्या दरबारातील परस्पर सहभाग, या सकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचं दिसतं. 

आणि दुसरीकडे ब्राम्हणी जन्माधारीत विषमतावादी परंपरापासून पूर्णतः भिन्न असणाऱ्या उदार, समतावादी महान हिंदू परंपरेकडे दुर्लक्ष करून ब्रिटिशांनीसुद्धा अशा ब्राह्मणी धर्मालाच इथल्या खऱ्या हिंदूधर्माच्या जागी मानलं. तसंच मुस्लीम जमातवादी शक्तींनीही ब्रिटिशांनी मुस्लीमांकडेच राज्य परत सोपवलं पाहिजे, कारण ब्रिटिशांपूर्वीच हे मुस्लीम राज्यच होतं अशी भूमिका घेतली. तर दुसरीकडे हिंदू जमातवाद्यांनी असा धोशा लावला होता की, मुस्लीम व त्यांच्याच जोडीला पुढे ख्रिश्चन हे परकीय असून हा देश हिंदूंचा असल्यामुळे देशाची सत्ता ही हिंदूंकडेच सोपवली पाहिजे.

मुस्लीम जमातवादी इतिहास मुस्लीम राज्यकर्त्यांचं उदात्तीकरण करण्याचा खेळ करून पाकिस्तानात स्थान पक्कं करत आहे, तर भारतात हिंदुत्ववादी इतिहासलेखन गेली काही दशकं मुस्लीम शासकांचं दानवीकरण करून हिंदुत्ववादी इतिहास प्रस्थ माजवताना दिसत आहे. जमातवादी शक्ती नेहमी इतिहासातील घटनांचा वापर त्यांच्या राजकारणासाठी करून घेताना दिसतात. त्याच सूत्रांद्वारे भूतकाळातील मुस्लीम शासकांचीच प्रतिनिधी आजच्या मुस्लीम समाजाला ठरवून आजचे हिंदू हे त्या मुस्लीम शासकांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंचे वंशज आहेत, असं मांडून मुस्लिमांचं दानवीकरण करण्यात येत आहे.

हा भूतकाळ आज अल्पसंख्याकांवर (विशेषतः मुस्लीम) वर केल्या जाणाऱ्या अत्याचारांच्या पुष्ट्यर्थ पुढे केला जातो आहे. याचाच आधार घेऊन मंदिर उदध्वस्तीकरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न म्हणून राम मंदिराचा मुद्दा उचलला गेला आहे. हिंदूंच्या ध्रुवीकरणासाठी, संघटीकरणासाठी त्यांच्या भावनिक उद्रेकाला वात लावून मग हिंसाचार घडवण्यासाठी बाबरी विध्वंस घडवला गेला. इतिहासातील काही मुस्लीम राज्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांची रस्त्यांना दिलेली नावं बदलून टाकण्याचं सत्र सुरू केलं आहे. (उदा. औरंगजेब) अगदी अकबराचं नाव दिलेला रस्ताही या हिंदुत्ववाद्यांचं लक्ष्य होऊ घातला आहे. मात्र त्यांचा त्यांचा सरदार मानसिंह याचं नाव मात्र प्रचलित ठेवलं जाणार आहे. 

उत्तर भारतातील अनेक घटनांचा प्रभाव जमातवादी इतिहासलेखनावर पडला आहे. या इतिहासलेखनाचा मुख्य गाभा हा हिंदू मंदिरांचा विध्वंस, मुस्लीम शासकांनी घडवलेली. हिंदूंची धर्मांतरं आणि त्यांनी हिंदू स्त्रियांवर केलेले अत्याचार राहिला आहे. राणी पद्मावतीचा जौहार आणि सैन्याद्वारे स्त्रियांवर केलेले अत्याचार हे मुस्लिमांनी केले, अशी भावनोद्रेकी मांडणी करण्यात येते. खरं तर कोणत्याही सैन्याने कोणत्याही धर्मावरच्या स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराची असंख्य उदाहरणं इतिहासात असतानाही जमातवादी इतिहासशास्त्र आपल्या विशिष्ट हेतूला पोषक घटना फक्त निवडून भूतकाळात सर्वथा तसंच घडत होतं असा सूर लावलेला दिसतो.

महाराष्ट्रात या पद्धतीनं शिवाजीचं उदात्तीकरण केल्याचं दिसतं, तर टिपू सुलतानला मात्र अनेक विवादात अडकवून टाकलेलं दिसतं. हजारो ब्राह्मणांना शस्त्राच्या धाकानं मुस्लीम केल्याच्या गोष्टी रंगवून लिहिल्याचं दिसतं. विशेषकरून अलिकडच्या काळातच टिपू सुलतानच्या अत्याचाराच्या घटनांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खरं तर ऐकीव भाकड गोष्टींशिवाय या घटनांचा ठोस संदर्भ कुठेही उपलब्ध नाही. कर्नाटकातील काँग्रेस पक्षीय सरकारनं टिपू सुलतानच्या २६५ व्या जयंतीनिमित्त (१० नोव्हेंबर २०१६) मोठा सोहळा आयोजित केला. त्याविरोधात तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी छेडलेल्या आंदोलनात तीन लोक मृत्युमुखी पडले होते. 

टिपू सुलतानला त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे मान्यता मिळाली नाही, अशी खंत प्रसिद्ध नाटककार गिरीश कार्नाड यांनी व्यक्त केली आहे. टिपू जर हिंदू असता तर शिवाजीराजांना जसा मान महाराष्ट्रात मिळतो, तसा मान टिपूला मिळाला असता. कार्नाड पुढे असेही म्हणतात की, बंगळुरु विमानतळाला टिपूचं नाव देणं औचित्याचं ठरलं असतं. मात्र टिपू कन्नडद्वेष्टा होता, त्यानं दरबारी भाषा म्हणून पर्शियनचा वापर केला होता, असं तुणतुणं भाजपनं सुरू ठेवलं आहे. त्या काळी त्या परिसरात राजदरबारी भाषा म्हणून पर्शियनचा वापर सर्रास होत असे. खरं म्हणजे टिपूनं राज्यकारभारात पर्शियनच्या वापराबरोबरच कन्नडचाही वापर वाढवण्याचे अधिकृत प्रयत्न केले होते, ही वस्तुस्थिती आहे. आरएसएस कंपूनं टिपूचं नाव ट्रेनला देण्यासही विरोध केला आहे. या अपप्रचारामुळे टिपूची प्रतिमा धर्मद्वेष्टा अशी ठसवण्यात येत आहे. टिपूनं आपल्या सैन्याधिकाऱ्यांना पत्रं लिहून काफिरांना नष्ट करून टाकलं पाहिजे अशी आज्ञा दिली होती (ही पत्रं ब्रिटिशांच्या ताब्यात आहेत.), असा अपप्रचार केला जात आहे. याचप्रकारे लंडनमध्ये विजय मल्ल्यांनी टिपू सुलतानची आठ इंची तलवार लिलावात विकत घेतली. तेव्हा असाच गदारोळ करण्यात आला. वेळोवेळी अशा कुरापती उकरून काढून धर्मवेड्यांनी गोंधळ घालण्याच्या कृत्यांचा मोठाच सुकाळ माजला आहे. 

मग टिपू सुलतान खरा कसा होता? हैदर आणि टिपू सुलतान यांचे युद्धशास्त्रातील योगदान स्पष्ट करणारे सुस्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्या लढायांबाबतच्या तपशीलवार नोंदी उपलब्ध आहेत. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्धात क्षेपणास्त्रांचा (अग्निबाणाचा) वापर केलेला दिसून येतो. त्यांची ब्रिटिशांविरोधातील युद्धं अविस्मरणीय आहेत. ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवादी विस्तार हैदर टिपू या जोडीनं मोठ्या ताकदीनं रोखला होता. पवित्र स्थळांच्या विध्वंसासारख्या घटनांना टिपूच्या धार्मिक धोरणात बिलकूल स्थान नव्हतं. उलटपक्षी त्यानं राजकीय निष्ठा मिळवण्यासाठी का होईना, पण अनेक हिंदू मठांना आर्थिक अनुदान दिल्याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत. ब्रिटिशांना कडवा विरोध करत राहिल्यामुळेच ब्रिटिशांनी टिपूची प्रतिमा धर्मांध करून त्याचं विकृत दानवीकरण केलं आहे. 

सरफराज अहमद यांच्या पुस्तकानं विकृतीच्या ढिगाऱ्यातून खरा टिपू शोधून काढण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. अत्यंत नेटक्या, नेमक्या व ठोस संदर्भाच्या आधारानं टिपूचं व्यक्तित्व, कार्य,  राज्यकारभार, धोरणं, दृष्टिकोन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व महत्त्व जाणणं, यांसह आपल्या राज्याच्या विस्ताराबरोबरच सुस्थीर शासन, शांततापूर्ण प्रजाजीवन याबाबत तो कसा दक्ष व व्यापक क्षमतांचा धनी होता याचे अनेक पदर उलगडून दाखवले आहेत.

लेखकानं हिंदुत्ववादी विचारवंत सावरकर यांच्या टिपूला धर्मांध ठरवण्याच्या कृत्याचा परखड व पुराव्याधारीत समाचार घेतला आहे. खरं तर टिपूचे तह व सहकार्याचे करार हे धर्माच्या आधारानं किंवा धर्मासाठी नव्हते, तर राजकीय कारणानं व सत्ताकारणाच्या दृष्टीनं होते, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

टिपूचे महत्त्वाचे व अत्यंत विश्वासू सहकारी हिंदू होते, हेही लेखक पुराव्यानिशी स्पष्ट करतात. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ‘धर्माच्या आधाराने परधर्मीयांना अवमानीत करू नये, त्यांना कमी लेखू नये अशी कडक ताकीद स्पष्ट करणारा टिपूचा जाहीरनामाच लेखकानं उदधृत केला आहे. त्या जाहीरनाम्यात टिपू पुढे म्हणतो, ‘‘माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या राज्याचं व प्रजेचं रक्षण मी करीन आणि ब्रिटिशांना येथून पिटाळून लावीन.’’ हे त्याच्या राज्यकारभाराचं तत्त्व होतं.

पेशव्यांनी आपल्या राज्यातील लुटलेल्या हिंदू मंदिराला टिपू सुलताननं नुकसान भरपाई दिल्याचं उदाहरण तर अत्यंत हृदयस्पर्शी आहे. टिपू शृंगेरीच्या शंकराचार्यांचा खूप आदर करत असे. त्यानं त्यांच्या मठास असंख्य देणग्या दिल्या आहेत. राजानं सर्वांना समानतेनं सोबत घेऊन चाललं पाहिजे, या तत्त्वाला धरून टिपूचं हे वर्तन आदर्शच होतं.

हा धर्मांधता प्रधान इतिहासलेखनाचा (जमातवादी इतिहासशास्त्र) विकृत खेळ आता शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांपर्यंत येऊन पोहचला आहे. मागच्या एनडीए सरकारनं (१९९८) इतिहासाचे भगवेकरण करण्याचा अत्यंत हिणकस धर्मवेडा प्रयास केला. आता मोदींच्या नेतृ्त्वाखालील सरकारद्वारे शिक्षणव्यवस्थेचा, अभ्यासक्रमाचा धर्मवादी कायापालट करून टाकण्याचे कार्य मोठ्या जोमानं सुरू आहे.

अशा विपरीत परिस्थितीत सरफराज अहमद यांचं पुस्तक या धर्मवेड्या, जमातवादी प्रचारास ठोस आव्हान देऊन खरा, संतुलित व न्यायपूर्ण इतिहास जगासमोर मांडून सामाजिक सौहार्द व एकात्मता सक्षम करण्याच अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करू शकतं. अशा प्रकारची पुस्तकं मोठ्या प्रमाणात येणं ही काळाची गरज आहे. टिपू सुलतान यांच्यासंबधानं दडवून ठेवलेल्या, सामाजिक सलोख्याच्या दृष्टीनं पोषक, इतिहासाचं वस्तुनिष्ठत्व स्पष्ट करणाऱ्या आणि त्याबरोबरच त्याच्या कालखंडाशी निगडीत अन्य महत्त्वपूर्ण बाबींवर या संशोधन दर्जाप्राप्त पुस्तकाच्या लेखनाद्वारे आमच्या ज्ञानात भर टाकण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल सरफराज शेख यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांनी घेतलेल्या प्रचंड व अविरत कष्टाचं कौतुक व सार्थ आभार मानणं आवश्यक आहे. माझी ठाम खात्री आहे की, सदर पुस्तक या क्षेत्रातील संशोधन, समीक्षा व लेखनास नक्की प्रेरणादायी ठरेल व या सदृश्य कार्य पुढे जाण्यास सहाय्यभूत ठरेल. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4284

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 10 May 2018

त्या टिप्याच्या अत्याचारांच्या अनेक कहाण्या विकिवर उपलब्ध आहेत. आणि म्हणे तो हिंदुविरोधी नव्हता. आमचे डोळे फुटले नाहीत. आम्हांस लिहितावाचता येतं. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......