“एकूणात समाज म्हणून आज आपण अधिक मुक्त आहोत” : रामचंद्र गुहा
ग्रंथनामा - रामचंद्र गुहा @ 60
सोमक घोषाल
  • रामचंद्र गुहा
  • Sun , 29 April 2018
  • रामचंद्र गुहा @ 60 रामचंद्र गुहा Ramchandra Guha

सकाळचे नऊ वाजलेत आणि बेंगळुरूमधील सेंट मार्क्स रोडवरचं कोशीज नुकतं कुठे उघडलं आहे. तरीही माझे पाहुणे, लेखक-इतिहासकार रामचंद्र गुहा आणि मी असे आम्ही दोघं आधीच तिथे पोहोचलो आहोत आणि पार डाव्या कोपऱ्यातलं टेबल पकडून बसलो आहोत. शहराच्या या लाडक्या उपहारगृहामधली ही जागा गुहा यांच्या खास आवडीची आहे असं त्यांनीच मला एका ई-मेलमध्ये सांगितलं होतं.

“मी १९६३ साली कोशीजमध्ये पहिल्यांदा आलो, याचा अर्थ ५० वर्षांहून अधिक काळ मी या जागेला भेट देतोय. अर्थात सत्तरच्या दशकापासून मी इथं नियमितपणे येऊ लागलो.” वेटरला इशारा करता करता ते सांगतात. आम्ही ऑर्डर देतो. त्यांच्यासाठी पोच्ड एग्ज ऑन टोस्ट आणि माझ्यासाठी फ्राइड एग्ज. आणि अर्थातच, कॉफी.

गणेश चतुर्थीचा दिवस आहे. म्हणजे कर्नाटकात सार्वजनिक सुट्टीचा दिवस. या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये एक सकाळ निवांतपणे घालवावी हा आमचा मनसुबा बघता बघता धुळीला मिळतो. काही मिनिटांतच सारी जागा मोठ्या आवाजात बडबड करणाऱ्या कुटुंबांनी, आरडाओरड करत दंगा घालणाऱ्या हट्टी मुलांनी, हातात पुस्तकं आणि चुकूनमाकून गिटार घेतलेल्या तरुण मंडळींनी आणि नजरेसमोर उलगडत चाललेल्या या साऱ्या नजाऱ्याकडे विमनस्क नजरेनं पाहणाऱ्या काही थोड्या एकांड्या माणसांनी भरून जाते. 

गुहा यांची सर्वसामान्य सकाळ नेहमीच कामानं सुरू होते (‘अर्थात त्याआधी नाश्ता’) जी दुपारपर्यंत लांबते. दुपारीही ते आणखी दोन-तीन तास लिहितात, पण हे लिखाण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत क्वचितच चालतं. संध्याकाळी या वाचनासाठी, संगीत ऐकण्यासाठी किंवा टीव्हीवर टेस्ट मॅच पाहण्यासाठी राखीव असतात.  

गुहा सांगतात, त्यांचा हा दिनक्रम अनेक वर्षांपूर्वी, त्यांची मुलं लहान असतानाच सुरू झाला. विशेषत: त्यांची मुलगी प्लेस्कूलमध्ये जाऊ लागली तेव्हा. “१५ ते २० वर्षांपूर्वी मी संपूर्ण वेळ कामाचाच विचार करत असे.” ते सांगतात, “मध्यरात्री एखादी कल्पना सुचली तर तेव्हाच उठून मी ती टिपून ठेवायचो. तेव्हा तर मी रात्रीच्या जेवणानंतरही माझ्या स्तंभासाठीचा लेख सुरू केला असता, पण आता नाही.” तरीही गुहा यांच्या डोक्यात कामाचा विचार पूर्णपणे तेव्हाच बंद असतो, जेव्हा एकतर ते सुटीवर असतात किंवा टेस्ट मॅच बघत असतात. (“अलीकडे संपूर्ण पाच दिवसांचा सामना बघणं मला थकवून टाकतं”) एवढे अपवाद सोडले तर त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा कामाचा दिवस असतो. रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस... कशामुळेही यात फरक पडत नाही. “या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर माझं काम हेच माझं जगणं आहे.” ते पुढे म्हणतात.

गुहा यांच्या मते कुटुंबानं दिलेल्या असामान्य पाठबळामुळे त्यांनी २० वर्षांपूर्वी बेंगळुरूमध्ये रहायला येण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच समाजातील विचारवंतांच्या फळीतील एक प्रमुख नाव म्हणून ओळख मिळवणं त्यांना शक्य झालं.  

गुहा यांच्या पत्नी सुजाता केशवन सुप्रसिद्ध ग्राफिक डिझायनर आणि रे अँड केशवन या फर्मच्या सहसंस्थापक आहेत, तर त्यांचा मुलगा आणि मुलगी आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. “भारतामध्ये विवाहित पुरुषांवर येणारी नेहमीची कौटुंबिक दडपणं मला टाळता आली. याबाबतीत मी भाग्यवान आहे.” ते म्हणतात, “आणि माझ्यासारख्या माणसाला राहण्यासाठी बेंगळुरू हे अगदी आदर्श ठिकाण आहे.”

या शहरातलं हवामान बहुधा झळझळीत असतं. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ  दिल्लीसारख्या शहरांपेक्षा खूपच कमी आहेत. रोज प्रवासाची दगदग करावी लागणार नसेल तर बेंगळुरू हे राहण्यासाठी तसं सुशेगात आणि आरामशीर शहर आहे. गुहा यांच्याप्रमाणे घरून काम करणाऱ्या व्यक्तीला तर आणखी चांगलं काम करण्याची मोकळीक त्यामुळे मिळते.

“बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या तामिळींची आमची ही चौथी पिढी” ते सांगतात, “हे माझं दुसरं गावच आहे.” बेंगळुरूमधील तामिळ म्हणजे गुहा यांच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईतील गुजराती मंडळींसारखे आहेत. “तुम्हाला वाटत असतं की तुम्ही या शहराचे आहात, पण तुम्ही इथले नाही हे तुम्हाला सतत सांगितलं जात असतं.”

डेहराडूनमध्ये जन्मलेल्या आणि तिथंच लहानाचे मोठे झालेल्या गुहा यांच्या सर्व उन्हाळी सुट्ट्या मात्र बेंगळुरूमधील मोठ्या कुटुंबांमध्ये जायच्या. ते इथं क्रिकेट खेळण्यासाठी सतत येत राहिले, एम.ए. आणि पीएच.डी.च्या दरम्यानचं एक वर्ष त्यांनी इथंच घालवलं. “इथं बेंगळुरूमध्येच राहणाऱ्या सुजाताच्या प्रेमात पडलो,” ते सांगतात, “कामाच्या दृष्टीनं खरं तर दिल्ली हा राहण्यासाठी अधिक चांगला पर्याय होता, पण १९९४ साली आम्ही इथं रहायला येण्याचा निर्णय घेतला.”

दोघांसाठीही तो एक सर्वोत्तम निर्णय ठरला. केशवन यांना इथल्या आयटी आणि बँकिंग क्षेत्राकडून भरपूर कामं मिळू लागली आणि गुहा यांना दिल्लीतील जीवनपद्धतीच्या दडपणाशिवाय काम करण्याचं स्वातंत्र्य. पण गेल्या दोन दशकांच्या काळात बेंगळुरूमध्येही बरेच बदल झालेले त्यांनी पाहिले आहेत.

“कोशीजच्या भोवतालची सगळी इको-सिस्टीमच आता नाहिशी झाली आहे.” त्या हरवलेल्या भूतकाळाचं चित्र मनानं नजरेसमोर पुन्हा जिवंत करत ते सांगतात. “कोशीजच्या वर ब्रिटिश काउन्सिलची लायब्ररी होती. त्या काळाच्या मानानं ती एक खूपच चांगली लायब्ररी होती. रस्त्याच्या पलिकडे व्हरायटी न्यूज नावाचा वर्तमानपत्रं आणि मासिक विकणारं एक अतिशय चांगलं दुकान होतं. इथून शंभरेक यार्डांच्या अंतरावर देशातल्या सर्वोत्तम पुस्तकांच्या दुकानांपैकी एक असं प्रिमियर बुकशॉप होतं आणि माझ्यासारख्या क्रिकेटवेड्यासाठी कोशीजच्या जवळच असलेली चिन्नस्वामी स्टेडिअम आणि कब्बन पार्क या जागा हे आणखी दोन आकर्षणबिंदू होते.”

वर्तमानात या शहराची घडी अनेक अंगांनी विस्कटत जाऊन त्याजागी सार्वत्रिक अनागोंदी पसरत चालली असूनही गुहा बेंगळुरूला आपलं शहर मानतात. “माझा नवा लेखसंग्रह ‘डेमोक्रॅट्स अँड डिसेंटर्स’ कोशीजला समर्पित आहे.”

१६ लेखांचा संग्रह असलेलं हे पुस्तक गुहा यांच्या विविधांगी आवडीनिवडींना सामावून घेणारं आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये राजकारण आणि समाज या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. गेली अनेक वर्षं गुहा यांच्या संशोधनाचा विषय राहिलेल्या आदिवासींच्या प्रश्नांवरचं प्रदीर्घ चिंतन या लेखामध्ये आहे. यानंतरचा निबंध– पाकिस्तान, चीन आणि श्रीलंका या भारताच्या शेजारी देशांकडे तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहणारा आहे.

“यात मी दोन बाबी समोरासमोर मांडल्यात. उदाहरणार्थ भारतीयांकडून काश्मिरींना दिली जाणारी तिरस्करणीय वागणूक आणि श्रीलंकेकडून तामिळींना दिली जाणारी वागणूक” ते सांगतात.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये एरिक हॉब्सवम, अमर्त्य सेन, यू.आर. अनंतमूर्ती, आंद्रे बेटील अशा सामाजिक विचारवंतांची व्यक्तिचित्रणं रेखाटलेली आहेत. यात फक्त क्रिकेटचा विषय वगळण्यात आला आहे, ज्यावर गुहा यांनी आजवर विपुल लिखाण केलं आहे.

“आजकाल मी क्रिकेटवर फारसं लिहीत नाही, पण कसोटी सामन्यांची बित्तंबातमी जरूर ठेवतो.” आपली क्रिकेटबद्दल लिहिण्याची शैली आता पुराणी झाली असं ते म्हणतात. “ज्यांनी टीव्हीवर खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पाहिलेलं नाही, अशा वाचकांवर ते लिखाण अवलंबून होतं. म्हणजे सत्तरच्या दशकातल्या (ई.ए.एस.) प्रसन्ना यांच्या खेळीचं एकही चित्रकरण उपलब्ध नसताना त्याबद्दल मनोरंजक पद्धतीनं लिहिणं यात आव्हान होतं.”

आशिष नंदी यांनी क्रिकेटवर लिहिलेल्या एका पुस्तकामुळे आपल्याला या खेळाबद्दल लिहिण्याची स्फूर्ती मिळाली ही गोष्ट ते मान्य करतात. “मला एरवी त्यांचं लिखाण आवडतंच. विशेषत: गोडसे आणि गांधीबद्दलचे त्यांचे निबंध. पण त्यांनी लिहिलेलं क्रिकेटवरचं पुस्तक वाचून मला धक्काच बसला. त्यात औषधालाही विनोद नव्हता.” गुहा सांगतात, “क्रिकेटविषयी कुणी इतक्या निरसपणे, कौतुक आणि गंमतीजंमतींशवाय कसं काय लिहू शकतं असं मला वाटलं. त्यातूनच हे काम आपणच अंगावर घेण्याचं निमित्त मला मिळालं.”

गुहा यांचं क्रिकेटवरचं प्रेम एखाद्या दर्दी क्रिकेटप्रेमीहून अधिक गहिरं आहे. त्यांचे एक लाडके मामा बेंगळुरूमधील काही सर्वोत्तम क्रिकेट क्लब्सपैकी एका क्लबचा कारभार तब्बल ६० वर्षं चालवत होते. “लहानपणी झालेल्या एका दुखापतीमुळे ते प्रत्यक्षात अव्वल दर्जाचा खेळ खेळू शकले नाहीत” गुहा आपल्या मामांबद्दल सांगतात, “आपल्या राहून गेलेल्या महत्त्वाकांक्षा मी पूर्ण करेन अशी आस त्यांना होती.”

वयाच्या ११व्या वर्षापासून ते २१ वर्षांचे होईपर्यंत रामचंद्र गुहा शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून क्रिकेट खेळले, “मी ऑफ-ब्रेक बॉलर होतो. तसा बरा खेळायचो, पण काही खास प्रतिभा नव्हती त्यात.” ते सांगतात. “माझ्या कॉलेजच्या टीमध्ये असलेले अरुण लाल आणि किर्ती आझाद यांनी पुढे कसोटी क्रिकेटपर्यंत मजल मारली.” गुहा अभ्यासक आणि सामाजिक बुद्धिवंत बनले. खरं तर त्यासाठी क्रिकेटचंच निमित्त झालं, हा एक योगायोगच.

वैज्ञानिक मंडळींच्या कुटुंबात जन्म आणि विज्ञानात बऱ्यापैकी गती असल्यानं गुहा यांनी कॉलेजमध्ये विज्ञानशाखाच निवडावी अशी कुटुंबातील सगळ्यांची अपेक्षा होती. पण या योजनेत गफलत असल्याचं त्यांच्या मामांनी ताडलं. सायन्सची प्रॅक्टिकल्स दुपारभर चालायची. म्हणजे ती क्रिकेटच्या सरावामध्ये अडथळा बनणार होती.

“मी काय शिकायचं हे घरच्यांनी माझ्यावर सोडलं असतं तर मी इंग्रजी साहित्य निवडलं असतं.” गुहा सांगतात, “माझं नेहमीच एक दांडगं होतं. शाळेचं मासिक मी संपादित करायचो, पण आजोबांचं मन दुखवायला मी खूपच घाबरत होतो.” मग गुहा यांनी तडजोड म्हणून अर्थशास्त्र निवडलं. (‘एक स्युडो-सायन्स’) पण पहिल्या आठवडाभरातच त्यांना कळून चुकलं की, “हा विषय आणि त्याचा हा विद्यार्थी यांचं सूत काही जुळणार नाही.” एम.ए. सुरू असताना त्यांच्या वाचनात व्हेरीअर एल्विन यांचं लिखाण आलं आणि त्यांच्या मनाला समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राची ओढ लागली. याच ओढीतून त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकातामधून पर्यावरणवाद हा विषय घेऊन पीएच.डी. केली.

तेव्हापासून गेली दोन दशकं गुहा राजकारण आणि इतिहासावर पुस्तकं, निबंध आणि स्तंभलेखन करत आहेत. हजार शब्दांचे लेख आणि हजार पानांचे ग्रंथ बहुदा सारख्याच सहजतेनं लिहीत आहेत. इसाया बर्लिन नावाच्या तत्त्वज्ञानं अस्तित्त्वाच्या या विरोधाभासी तऱ्हांचं वर्णन करण्यासाठी एक रूपक सांगितलं आहे. स्वत:ला वर्तमानात बुडवून घेत अनेक गोष्टी एकाच वेळी ग्रहण करणारे मन हे एखाद्या धूर्त कोल्ह्याप्रमाणे असतं असं ते म्हणाले होते. दुसऱ्या प्रकारची बुद्धी हेजहॉग नावाच्या प्राण्याप्रमाणे दुरून परिस्थितीकडे पाहणारी असते. विचारप्रवर्तक लेखक आणि इतिहासकार म्हणून जगताना गुहा यांनासुद्धा विचार आणि लिखाणाच्या दोन पद्धतींमध्ये ताळमेळ ठेवावा लागतो.  

“मला दोन प्रकारच्या प्रेरणांमध्ये समतोल राखावा लागतो. साप्ताहिक स्तंभलेखन सुरू असतानाच मोठ्या प्रकल्पावर कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्यासाठी वेळेचा सलग तुकडा राखून ठेवावा लागतो.” ते सांगतात. “कधीकधी मी काही लेख आधीच लिहून त्यांचा साठा करून ठेवतो जेणेकरून पुस्तकाच्या कामात संपूर्ण लक्ष घालण्यासाठी काही वेळ मोकळा मिळावा. अर्थात काही वेळ एखादा तातडीचा विषय निघतो आणि त्यावर मला तितक्याच तातडीने भाष्य करावं लागतं.”

‘इंडिया आफ्टर गांधी’ (‘गांधींनंतरचा भारत’) हा महाग्रंथ म्हणजे गुहा यांचं एकमेव असं पुस्तक आहे, ज्याची कल्पना त्यांना स्वत:ला सुचलेली नाही. त्यांचे लिटररी एजंट पीटर स्ट्रॉस यांनी ते काम गुहा यांना कमिशन केलं. स्ट्रॉस त्यावेळी लंडनमध्ये मॅकमिलन प्रकाशन संस्थेत काम करत होते. पुस्तकाचा आवाका प्रचंड असल्यानं गुहा यांना ते पूर्ण करण्यासाठी आठ वर्षं लागली. त्यातली अनेक वर्ष तर नेहरू मेमोरिअल लायब्ररीमधील जुने संदर्भ शोधून काढण्यात, लोकसभेतील वादविवाद, मासिकं आणि वर्तमानपत्रांची हजारो पानं धुंडाळण्यातच गेली. “वयाच्या चाळिशीत ते जमून गेलं. आता ५८ व्या वर्षी अशा प्रकारचं थकवणारं काम हाती घेण्याइतकी ऊर्जा माझ्यात नाही.”

गुहा आपला थोडा वेळ ट्विटरसाठीही बाजूला काढतात. गुहा वापरत असलेलं ते एकमेव समाजमाध्यम आहे.

“तुमचं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक उपयुक्त माध्यम आहे. तुम्हाला आवडलेल्या इतरांच्या लेखनाची शिफारसही तुम्ही इथं करू शकता. उदाहरणार्थ मुकुल केशवन ट्विटरवर नाहीयेत. पण मला वाटतं की, ते एक उत्कृष्ट स्तंभलेखक आहेत. त्यामुळे त्यांनी काही नवं लिहिलं की, मी त्यांचं ते लिखाण पोस्ट करतो.” ट्रॉल्सबाजीकडे गुहा फारसं लक्ष देत नाहीत. “तसंही मी ट्विटरवर फारच अधूनमधून असतो. त्यामुळे कुत्सित शेरेबाजी मला चालून जाते.” ते सांगतात. “पण महिलांना या वृत्तीचा जबरदस्त फटका बसतो. सागरिका घोष किंवा बरखा दत्त किंवा अल्पसंख्य समाजातून आलेल्या राणा अय्युबसारख्या स्त्रियांना सर्वाधिक अश्लाघ्य शेरेबाजीला सामोरं जावं लागतं.”

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गुहा यांच्या नव्या पुस्तकामागचं आणखी एक सूत्र आहे. भारतात आज हे स्वातंत्र्य नक्कीच धोक्यात आहे, पण हे सर्वार्थानं खरं आहे असं सरसकट विधान करणं गुहा यांना रुचत नाही. “स्वातंत्र्य हे अनेक स्तरांवरून कार्यरत असतं. – खासगी, आर्थिक, सांस्कृतिक, बौद्धिक. आपल्याकडे ५० आणि ६० च्या दशकात जी परिस्थिती होती तिच्याशी आजच्या स्थितीची तुलना केल्यास तुम्ही कदाचित असं म्हणू शकाल की, तरुणांवर असलेली कुटुंबव्यवस्थेची घट्ट पकड आता ढिली झाली आहे. भारतीय दंडसंविधानातील ३७७ वं कलम सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं असेलही, पण आज शहरांमध्ये एलजीबीटी समाजातील मंडळी अधिक मोकळा श्वास घेत आहेत.” पन्नासच्या दशकामध्ये महिला त्यांच्या नवऱ्यानं नाहीतर वडिलांनी सांगितलेल्या पक्षालाच मत द्यायच्या. गावांमध्ये दलित वर्ग ब्राह्मणांनी सांगितलेल्या पक्षाला मत द्यायचा. ते पुढे म्हणतात. “पण याचा अर्थ असा नाही की आपण लैंगिकता, जात आणि लैंगिक प्राधान्यक्रमाच्या बाबतीत सार्वत्रिक आणि संपूर्ण स्वातंत्र्य अनुभवत आहोत.”

कलात्मक स्वातंत्र्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला हवं ते लिहिण्याचं, आपल्याला हवे तसे चित्रपट बनवण्याचं स्वातंत्र्य प्रतिगामी वसाहतकालीन कायद्यांमुळे संकोचत आहे. “भारतीय भाषांमध्ये लिहिणारे पेरुमल मुरुगन, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर अशा लेखकांनी इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांपेक्षा फार मोठी किंमत मोजली आहे.” गुहा सांगतात. “अलीकडेच रम्याच्या विरोधातील (कन्नड अभिनेत्री) देशद्रोहाच्या खटल्यात कूर्गमध्ये दाखल करण्यात आलेली याचिका दाखल करून घेण्याची गरज न्यायमूर्तींना नव्हती. हीच गोष्ट अॅम्नेस्टी इंडियाविरोधात तक्रार नोंदवून घेणाऱ्या पोलिसांनाही लागू होते.” आणि एखाद्या पुस्तकावर बंदी आणण्याच्या याचिकेवर पुरोगामी भूमिका घेत न्यायालयानं जरी अशी बंदी नाकारली तरीही त्यामुळे रस्त्यावरच्या विध्वंसापासून प्रकाशकांना संरक्षण मिळू शकत नाही.

‘इंडिया आफ्टर गांधी’ला दहा वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त निघालेल्या आवृत्तीमध्ये गुहा यांनी दोन नवी प्रकरणं आणि नवी प्रस्तावना जोडली आहे. ज्यातील बहुतांश मजकूर हा काश्मीर प्रश्नाशी संबंधित आहे. “त्यात मी सरदार पटेलांनी १९४९ साली, तेव्हा अमेरिकेत असलेलेल आपले मित्र जे. डी. बिर्ला यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. काश्मीर ही सगळ्यांसाठीच अतिशय मोठी डोकेदुखी बनल्याचं त्यांनी त्यात म्हटलं आहे. आज त्या गोष्टीला सत्तर वर्षं उलटली आहेत आणि तरीही ती डोकेदुखी तशीच आहे. ती इतक्यात बरी होण्याची चिन्हंही नाहीत.”

इतिहासातली भूतं आज नवनवी रूप धारण करून पुन्हा आपल्या मानगुटीवर बसू लागली आहेत. कधी ती पाठ्यपुस्तकांच्या पुनर्लेखनाच्या रूपात वेडावतात तर कधी राहुल गांधींनी महात्मा गांधींच्या ‘हत्याऱ्यां’बद्दल केलेल्या विधानासारख्या वक्तव्यांतून डोकावतात. “आजकाल लोक अक्षरश: कोणत्याही विषयावर अगदी बिनधास्तपणे मतप्रदर्शन करताना दिसतात.” गुहा सांगतात, “उदाहरणार्थ राहुल गांधी आरएसएस प्रत्यक्षात काय करत आहे, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील शैक्षणिक अभ्यासक्रमावर कशा प्रकारे प्रभाव टाकत आहे यात लक्ष घालू शकले असते. – ते जास्त उपयोगी ठरलं असतं.”

गुहा यांच्या मते राजकारणातल्या मागच्या पिढीतील सर्व नेत्यांपैकी केवळ एकाच नेत्यावर हिंसक प्रतिसादाच्या भीतीशिवाय टीका केली जाऊ शकते. ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. त्यामागचं कारण स्पष्ट करताना गुहा सांगतात, “गांधीजींची निरीक्षणं ही प्रत्यक्ष अनुभवांतून सापडलेल्या तथ्यांवर आधारलेली होती.”

२०११ साली जेव्हा नरेंद्र मोदी अद्याप पंतप्रधानपदी विराजमान व्हायचे होते आणि स्वत:ला राष्ट्रीय नेत्यांच्या भूमिकेमध्ये 'रिब्रॅण्ड' करत होते, तेव्हा पुलित्झर पुरस्कार विजेते जोसेफ लेलिव्हेल्ड यांचं एक पुस्तक आलं होतं. गांधींचे एका वास्तुविशारदाशी समलिंगी संबंध असल्याचं या पुस्तकात लेलिव्हेल्ड यांनी सुचवलं होतं. या गोष्टीनं चवताळलेल्या अनेकांप्रमाणेच मोदीही पेटून उठले आणि त्यांनी गुजरातमध्ये या पुस्तकावर बंदी आणली, जिथं ते मुख्यमंत्री होते. गुहा आणि गांधीजींचे नातू गोपालकृष्ण गांधी यांनी या बंदीच्या निर्णयाविरोधात लिहिल्यानंतर केंद्र सरकारनं अशी बंदी लादली नाही. अख्ख्या देशात पुस्तकावर बंदी आणावी इतका तो गुन्हा गंभीर नव्हता.

बनिया म्हणून जन्मलेले गांधी आपल्या जातीच्या पलिकडे पोहोचले आहेत. ते मुस्लिमांची कड घेतात म्हणून अनेक हिंदूंना ते आवडत नाहीत. बंगाली माणूस सुभाषचंद्र बोस यांना आपलं मानतो, तशा पद्धतीनं गुजराती गांधीजींना कधीच आपलं मानत नाहीत. “गांधी हे एकमेव असे भारतीय आहेत, जे कोणत्याही विशिष्ट पंथाचे नाहीत. ते प्रत्येकाचे आहेत आणि कुणाचेही नाहीत.” गुहा सांगतात.

तोवर वेटरनं बिल आणून दिलेलं असतं.

.............................................................................................................................................

ही मूळ इंग्रजी मुलाखत www.huffingtonpost.in या पोर्टलवर २३ सप्टेंबर २०१६ रोजी प्रकाशित झाली आहे. मूळ मुलाखतीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘गांधींनंतरचा भारत’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3683

.............................................................................................................................................

‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4372

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद - चैताली भोगले

chaitalib6@gmail.com

.............................................................................................................................................

लेखक सोमक घोषाल HuffPost Indiaमध्ये वरिष्ठ संपादक आहेत.

 .............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 03 May 2018

“एकूणात समाज म्हणून आज आपण अधिक मुक्त आहोत” -इति श्री. गुहा. व्हेरी गुड! आता पुरस्कार वापस करणाऱ्यांविषयी श्री. गुहांची मतं वाचायला आवडतील. समविचारी कंपूविषयी ते काय भूमिका घेतात हे पाहणे रंजक व रोचक ठरावे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......