साडेमाडे नेमाडे
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
संपादक अक्षरनामा
  • भालचंद्र नेमाडे
  • Sat , 28 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April Bhatchandra Nemade

२३ एप्रिल हा जगभर ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

काही महिन्यांपूर्वी कादंबरीकार, समीक्षक आणि कवी डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य अकादमी या राष्ट्रीय पातळीवरील साहित्यसंस्थेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर महाराष्ट्रातल्या काहींना असुरी आनंद झाला. त्यांनी आपल्या भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खाजगीत, प्रसारमाध्यमांकडे आणि सोशल मीडियावर व्यक्त केल्या. त्या पार्श्वभूमीवर नेमांड्यांविषयी...

.............................................................................................................................................

मराठीच्या अभिजाततेची चर्चा चालू असताना आणि त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने साहित्य अकादमीकडे पाठवलेला असतानाच २०१५ साली डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ‘ययाती’कार वि. स. खांडेकर, ‘विशाखा’कार कुसुमाग्रज आणि यंत्रयुगाचा पुरस्कार करणारे विंदा करंदीकर या त्रिमूर्तीनंतर नेमाडे यांना ज्ञानपीठ या भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे अतिशय उचित झाले. नेमाडे यांच्यामुळे मराठीतील ज्ञानपीठ त्रिकोनाला चौथा कोन मिळून तो समभूज कोनात बदलला.

नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्याविषयी आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. सलमान रश्दी यांनी ‘ग्रम्पी ओल्ड बास्टर्ड’ असा उल्लेख करत नेमाडे यांच्याबद्दल ट्विट केले आणि वादंगाला तोंड फुटले. गंभीर मुद्दा होता\आहे तो नेमाडे यांच्याविषयी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप यावर तेव्हापासून सुरू असलेल्या चर्चेचा. त्यावरून नेमाडे हे अनेकांचे प्रात:स्मरणीय तिरस्काराचा विषय आहेत, हे सिद्ध होते.

वारेमाप पूर्वग्रह आणि अनेकांच्या द्वेषाचे धनी असलेले नेमाडे हे मराठी साहित्यात तरी एकमेव असावेत. ही गोष्ट खरी आहे की, नेमाडे आपल्या फटकळ बोलण्याने अनेक मराठी साहित्य-सारस्वतांचा अहम् सतत दुखावत असतात. ‘कथा हा वाङ्मयप्रकार नाही’, ‘साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे’, अशा शेरेबाजीने ते मराठी साहित्य शारदेच्या अंगणात अधूनमधून बॉम्बस्फोट करत असतात. लेखक म्हणून आपले दुकान बंद होण्याची भीती नेमाडे यांना नसली तरी मराठीतल्या बहुतांश साहित्यिकांना असते. त्यामुळे त्यांच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्यांना नेमाडे पचनी पडत नाहीत.

नेमाडे यांच्याविषयी साहित्याच्या आणि साहित्याबाहेरच्या जगात ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ आहे, ती याचमुळे. यातून वाद, टीका, कौतुक, हेटाळणी आणि द्वेष याच गोष्टी नेमाडे यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. अलीकडच्या काळात त्यांना अजून जोर आला आहे. ‘नेमाडेपंथी दहशतवाद’, ‘नेमाडे यांचाही लेखकराव झाला’ यासारखी टीका तर त्यांच्यावर वीस-पंचवीस वर्षांपासूनच केली जात आहे. त्यातून त्यांच्या कादंबऱ्याही सुटलेल्या नाहीत.

२०१० साली नेमाडे यांची ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीची यथायोग्य आणि यथाशक्ती समीक्षा करण्यात कुणालाही यश आलेले नाही. नेमाडे यांच्या नावाचीच कावीळ झालेली असल्याने ते शक्यही नाही.

‘हिंदू’ या भारतीय जनमानसाला व्यापून टाकणाऱ्या संकल्पनेची पुनर्तपासणी करून तिची पुनर्मांडणी करणाऱ्या ‘हिंदू’ चतुष्ट्यमध्ये नेमाडे यांनी जो व्यापक पट उभा केला आहे, तो केवळ आणि निव्वळ स्तिमित करणारा आहे. पण हिंदूकडे आपली वैयक्तिक मते, राग-लोभ, पूर्वग्रह, संस्कार यापलीकडे जाऊन पाहू शकेल असा आवाका मराठी समीक्षकांकडे नाही. ‘‘‘हिंदू’ धर्म नावाच्या चमत्कारिक चीजेला विविध अंगांनी भिडणाऱ्या आणि अभ्यासाचा पाया आणि वास्तवाची चौकट न सोडता सिद्ध झालेली ही कलाकृती सध्या तरी एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल’’, असे लोकव्यवहाराचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणतात.

धर्म नावाच्या गोष्टीला थेटपणे भिडणारी ही कादंबरी भारतीय समाजजीवनातील स्त्रीशोषणाच्याही अनंत पैलूंचा वेध घेते. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रियांचे शोषण एकाच वेळी किती पातळ्यांवर होते, याविषयी आजवर एकाच काय पण सर्व ग्रामीण साहित्यिकांना सांगता आले नाही, ते नेमाडे यांनी ‘हिंदू’च्या पहिल्याच भागात नेमकेपणाने सांगून टाकले आहे. पण ते समजून न घेता ‘हिंदू’ला स्त्रीविरोधी, दलितविरोधी ठरवण्यात काहींनी आघाडी घेतली आहे. नेमाडे यांना ठोकूनच काढायचे एवढाच एककलमी कार्यक्रम राबवायचे ठरवल्यानंतर यापेक्षा वेगळे काही घडूही शकत नाही.

‘हिंदू’चे तीन भाग अजून प्रकाशित व्हायचे आहेत. पण पहिल्याच भागाने त्यांना ज्ञानपीठाचा  दावेदार केले होते. त्यानुसारच हे घडले असल्यामुळे नेमाडे यांना मिळालेला पुरस्कार ही अजिबात अनपेक्षित किंवा धक्कादायक बातमी नव्हती. पण तसे मराठी साहित्यातील धुरंधर किती मनमोकळेपणाने मान्य करतील तर ना! ‘सतत वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे आहेत नेमाडे’ असे ‘लेबल’कार ‘नेमाडे यांनी हा पुरस्कार दिल्लीत लॉबिंग करून मिळवला आहे’, असा आरोप करण्यापर्यंत काहींची मजल गेली होती.

‘कोसला’ या सलग तीन पिढ्यांमध्ये प्रभाव टिकून असलेल्या कादंबरीने नेमाडे यांना ‘विसाव्या शतकाला सर्वोत्कृष्ट कादंबरीकार’ असा बहुमान दिला. ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार असा प्रवास केलेल्या नेमाडे यांनी कादंबरी या वाङ्मयप्रकाराचीही समीक्षा केली आहे, मोजक्याच पण वेगळ्या कविताही लिहिल्या आहेत. त्यांनी ‘देशीवादा’ची मांडणी केली, तशीच साहित्य अकादमीसारख्या संस्थेत सक्रिय राहून संस्थात्मक कामही केले आहे.

चांगला लेखक आपल्यानंतर चार-दोन चांगले लेखक घडावेत, यासाठी प्रयत्नशील असतोच. नेमाडे यांच्या कादंबऱ्यांनी आणि त्यांच्या इतर लेखनाने तशी सोय करूनच ठेवली आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या, त्यांना प्रमाण मानणाऱ्या ‘नेमाडेपंथीय’ नावाच्या लेखकांच्या दोन पिढ्या मराठी साहित्यात काही चांगले पायंडे पाडू पाहात आहेत.

खरे म्हणजे नेमाडे यांची चिकित्सा त्यांच्या लेखनावरून केली जायला हवी. पण त्याविषयी न बोलता त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले म्हणजे मूळ मुद्दा बाजूला पडतो आणि गदारोळ उडतो. तोच उडवून देण्यात सध्या अनेकजण धन्यता मानत आहेत. पण त्यांची ही बोंबाबोंब अरण्यरुदन ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. या साऱ्या प्रकारावर नेमाडे नेहमीप्रमाणे शांत राहत आले आहेत. आणि हेच या टीकाखोरांच्या पोटशूळामागचे खरे कारण आहे. नेमाडेविरुद्धच्या बोंबाबोंब आंदोलनामुळे नेमाडे यांचे साहित्यातील योगदान आणि ‘हिंदू’ची यथोयोग्य समीक्षा या गोष्टी बाजूला पडल्या आहेत.

वैयक्तिक दुगाण्या झाडायला अभ्यासाची, व्यासंगाची गरज नसते. ते सप्रमाण सिद्ध करायला मात्र कष्ट करावे लागतात. तो न करता सारमेय संप्रदायाचा कित्ता गिरवणे हा सोपा पर्याय असतो. त्यातून आपला आवाज मोठा होता असला तरी ते स्वत:चेच चारित्र्यहनन करण्यासारखे असते. नेमाडे यांच्या विरोधकांकडे नेमक्या याच तारतम्याची वाणवा आहे.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ranveer bhalepatil

Wed , 07 November 2018


vishal pawar

Sat , 05 May 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......