अभिव्यक्ती (अजून तरी) अपरिपक्व, दिशा चाचपडतेय, पण भवितव्य मात्र उज्ज्वल!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 18 April 2018
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama

पुढील आठवड्यात, २४ एप्रिल रोजी ‘अक्षरनामा’ या मराठीतल्या पहिल्यावहिल्या डिजिटल डेली फीचर्स पोर्टलला दीड वर्षं पूर्ण होईल. आजवर जवळपास दोन हजार लेख; सॅनिटरी नॅपकिन, बाबरी मशिद, म. गांधी, वाचक दिन, महिला दिन, नोटबंदी, गुजरात निवडणूक २०१७ अशा विविध विषयांवरील विशेषांक; निखिल वागळे, प्रवीण बर्दापूरकर, संजय पवार, कमलाकर सोनटक्के, कुंदा प्रमिला नीळकंठ, अमोल उदगीरकर, अविनाश कोल्हे, श्रीकांत कुलकर्णी, सायली राजाध्यक्ष, चिंतामणी भिडे या मान्यवरांसोबत राजा कांदळकर, किशोर रक्ताटे, हिनाकौसर खान-पिंजार, अक्षय शेलार यांसारख्या तरुण लेखकांचं सातत्यपूर्ण लेखन आणि अनेक कळीच्या प्रश्नांवर निर्भीड भूमिका हे ‘अक्षरनामा’चं वैशिष्ट्य राहिलं आहे. हीच परंपरा यापुढेही अधिक नेमकेपणानं चालू राहील...

.............................................................................................................................................

जागतिकीकरणानंतर ‘ज्ञान’ हे ‘पॉवर फिनॉमेनन’ झालं, पण आज माहिती-तंत्रज्ञान हे ‘पॉवर फिनॉमेनन’ झालं आहे. विशेषत: गेल्या सात-आठ वर्षांत. ‘ब्रुटली फेअर’ असा लौकिक असलेल्या ‘इकॉनॉमिस्ट’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या ६ मे २०१७च्या अंकाची ‘The world’s most valuable resource is no longer oil, but data’ या लांबलचक शीर्षकाची मुखपृष्ठकथा प्रसिद्ध झाली आहे. तिचं शीर्षक सांगतं की, कालपर्यंत जगात सोनं, हिरे-मोती यांच्यापेक्षाही ऑईल हे मौल्यवान होतं, पण आता त्याची जागा ‘डाटा’नं घेतली आहे. आणि हे केवळ युरोप-अमेरिकेतच नाही, किंवा चीन-जपानमध्येच नाही, तर दक्षिण आफ्रिकेतल्या गरीब देशांपासून भारतातल्या दुर्गम म्हणाव्या अशा खेड्यांपर्यंत सर्वत्र ‘डाटा’ दिवसेंदिवस अधिकाधिक मौल्यवान, अधिकाधिक जीवनावश्यक होतो आहे.

म्हणजे ‘माहितीचा महाकाय ढिगारा’ हे आजचं आपल्या सर्वांचं वर्तमान वास्तव आहे. घटना पाहता पाहता व्हायरल होतात. पण माहितीच्या ढिगाऱ्यातून नेमकी घटना समजून घेणं अनेकदा शक्य होत नाही, ते झालं तर त्यातल्या वस्तुस्थितीविषयी नक्की कुणाला सांगता येत नाही. सत्याची एखाद-दुसरी बाजू समजून घेण्यासाठी मोठे प्रयास पडतात. त्यामुळे अनेकदा सामान्यांपासून सुशिक्षितांपर्यंत आणि बुद्धिजीवींपासून बुद्धिवाद्यांपर्यंत सर्वच जण गोंधळ, संभ्रम यांच्या आवर्तात किंवा नको इतक्या माहितीच्या सोसाट्यात सापडलेले दिसतात.

हा सगळा ‘डाटा’ स्मार्ट फोन, टॅब, संगणक, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांद्वारे आपल्या पुढ्यात रिचवला जातो आहे. त्याला मोठा वाचकवर्ग लाभतो आहे. यातूनच ऑनलाईन माध्यमांचा जन्म झाला. तसं पाहायला गेलं तर ‘द हूट’ हे भारतीय पत्रकारितेचा समाचार घेणारं पोर्टल २००१मध्ये सुरू झालं. ‘न्यूज लाँड्री’ किंवा ‘द क्विंट’ ही नावं त्यानंतरची. पण ही पोर्टल्स अनियतकालिकासारखी आणि विशिष्ट विषयाला वाहिलेल्या मासिकासारखी होती. त्यामुळे खऱ्या अर्थानं ऑनलाईन पत्रकारिता सुरू केली ती ‘फर्स्ट पोस्ट’, ‘अल्ट न्यूज’, ‘स्क्रोल’ आणि ‘वायर’ यांनी. या पोर्टल्सचा दबदबा, प्रभाव प्रस्थापित मुद्रित माध्यमांपेक्षाही वेगानं वाढतो आहे.

यामागचं सरळ कारण आहे भारतातल्या तरुणांची वाढती संख्या. २०१२ साली पलाश कृष्ण मेहरोत्रा यांचं ‘द बटरफ्लाय जनरेशन’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भारतातील जवळपास अर्धी लोकसंख्या ही २५ वयोगटाच्या आत आहे. २०२०पर्यंत भारतातील सरासरी वयोमान हे २९ असेल. त्याच वेळी जपानमध्ये हे प्रमाण ४८, उत्तर युरोपमध्ये ४५ आणि अमेरिका व चीनमध्ये ३७ असेल. ‘कोलंबिया जर्नालिझम रिव्ह्यू’मधल्या ताज्या लेखानुसार २०२१पर्यंत भारतातील जवळपास ६४ टक्के लोकसंख्या ही २० ते ३५ या वयोगटादरम्यानची असेल. म्हणजे भारत हा पूर्णपणे तरुणांचा देश होत आहे. या तरुणांची माध्यमं नवी आहेत. त्याच्या हातात स्मार्ट फोन आहे, तो दिवसात दोन तासांपेक्षा अधिक वेळ फेसबुकवर, त्यापेक्षा जास्त वेळ व्हॉटसअॅपवर घालवतो आणि साधारणपणे तेवढाच वेळ वेगवेगळी अॅप, पोर्टल्स पाहण्यासाठी देतो.

या भारतीय तरुण वर्गाला कॅप्चर, एंगेज करण्यासाठी ऑनलाइन माध्यमांमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे. वर उल्लेख केलेली इंग्रजी पोर्टल्स किंवा इतर प्रादेशिक भाषांमधली पोर्टल्स, अॅप्स ही या वर्गाला प्राधान्यानं नजरेसमोर ठेवून चालवली जातात.

पण भसभसा माहिती तुमच्या पुढ्यात ओतणं हेच बहुतांशी इंग्रजी आणि इतर प्रादेशिक पोर्टल्सचं अजूनही प्रधान वैशिष्ट्यं आहे. त्यामुळे जो प्रकार मराठी ई-बुक, ऑनलाईन नियतकालिकं, मोबाईल बुक यांच्याबाबतीत आहे, तोच ऑनलाईन माध्यमांबाबतही. बहुतेकांचं धोरण कॉपी-पेस्ट करणं किंवा पुरेशा तयारीनिशी या माध्यमांचा वापर न करणं, याच प्रकारचं राहत आलं आहे. त्यामुळे मराठीसारख्या प्रादेशिक माध्यमांमध्ये ऑनलाईन माध्यमांचा पुरेसा बोलबोला झालेला नाही. जे आहेत त्यांचं स्वरूप हौस, आवड या पलीकडे किंवा ‘जे जे प्रस्थापित, ते ते ताज्य’ या धारणेपलीकडे जायला तयार नाही.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि ‘अक्षरनामा’वरील लेखांबाबत अपडेट रहा.

 क्लिक करा - https://play.google.com/store/apps

.............................................................................................................................................

परिणामी केवळ ‘डाटा’ उपलब्ध करून देत राहणं, हेच मराठीतल्या ऑनलाईन माध्यमांचं हुकमी वैशिष्ट्यं बनलेलं आहे. मात्र ऑनलाईन माध्यमात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल आणि काहीएक प्रमाणात ‘करेक्टिव्ह फॅक्टर’ म्हणून भूमिका निभवायची असेल तर ‘डाटा’च्या पुढे जाण्याची नितांत गरज आहे. घटना (Fact), वास्तव (Reality) आणि सत्य (Truth) या निकषांवर प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करू पाहणाऱ्या पोर्टल्सची आवश्यकता आहे, हे ओळखून ऑक्टोबर २०१६मध्ये ‘अक्षरनामा’ हे मराठीतलं पहिलंवहिलं डिजिटल डेली फीचर्स पोर्टल आम्ही सुरू केलं. त्याला पुढच्या आठवड्यात दीड वर्ष पूर्ण होईल. या काळात ‘अक्षरनामा’नं फीचर्स पोर्टल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहेच, पण ऑनलाईन मराठी माध्यमं केवळ ‘डाटा’च्या पलीकडे गेली तर किती मोठी संधी आहे, हेही सिद्ध केलं आहे.

या सव्वा वर्षांत ‘अक्षरनामा’चं काम करताना काही गोष्टी ठळकपणे नजरेत भरतात. त्यातील पहिली म्हणजे मराठीमध्येही ऑनलाईन माध्यमाला उज्ज्वल भवितव्य आहे. ऑनलाईन वाचणाऱ्यांची संख्या प्रचंड वेगानं वाढते आहे. मात्र हा वाचक तुलनेनं ‘तरुण’ आहे. त्यामुळे त्याची अभिव्यक्तीही तरुण आहे. ज्याला आपण ‘परिपक्वतेच्या दिशेनं वाटचाल करू पाहणारा वाचक’ असं म्हणू शकतो. दुर्दैवानं या तरुण वाचकाला वाचायला काय आवडेल, याचा विचार मात्र फारसा गांभीर्यानं केला जाताना दिसत नाही.

त्याचं एक मुख्य कारण आहे नव्या माध्यमाचा विचार नव्या पद्धतीनं करायला हवा, हे साधं लॉजिक बहुतेक जण लक्षात घ्यायला तयार नाहीत. टीव्ही मालिकांचे निर्माते जसे ‘विकतं ते पिकतं’ किंवा ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायानं मालिकांचा रतीब घालतात, तसाच काहीसा प्रकार मराठी ऑनलाईन माध्यमांच्या बाबतीत होतो आहे. त्याला वाचक नाही, असं नाही. पण त्या वाचकाशिवायचा एक मोठा वाचकवर्ग आहे, ज्याला राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृती, खेळ यांसारख्या विविध गोष्टींमध्ये रस आहे. तेवढंच नाही तर त्याला फक्त ‘फॅक्ट’ जाणून घेण्यापेक्षाही त्यातली ‘रिअॅलिटी’ आणि त्यामागचं ‘ट्रुथ’ जाणून घेण्यात जास्त स्वारस्य आहे. ती त्याची भूक आहे. कारण त्याच्यासमोर केवळ ‘डाटा’ ओतण्याचं काम अनेकांकडून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. त्यातल्या योग्यायोग्यतेची निवड करून, त्यांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करणारं लेखन त्याला हवं आहे. टीव्ही पाहताना प्रेक्षकाच्या हातात जसा रिमोट असतो, तसा सोशल मीडिया किंवा अॅप्स, ऑनलाईन पोर्टल्स पाहताना वाचकाच्या हातात क्लिकचं बटन असतं. चुटकीसरशी तो तुम्हाला मागे टाकून पुढे जातो. या वाचकाला एंगेज करायचं असेल, त्याला तुम्हाला हव्या त्या विषयांपर्यंत न्यायचं असेल तर तुम्हाला चांगला कंटेट चांगल्या प्रकारे द्यावा लागेल.

नव्या तंत्रज्ञानाच्या लढाया नव्या सर्जनशील कल्पनांनी लढाव्या लागतात, हे लक्षात घ्यायला हवं. पण मराठीमध्ये बहुतेकांचं नेमकं याचकडे दुर्लक्ष होत आहे. ते मुद्रित माध्यमांचाच फॉर्म्युला ऑनलाईन माध्यमांत वापरताना दिसतात. त्यामुळे मराठी ई-बुक म्हणजे छापील पुस्तकाची पानं स्कॅन करून केलेली पीडीएफ अशी जी अवस्था निर्माण झालीय, तसाच काहीसा प्रकार ऑनलाईन माध्यमांच्या बाबतीतही होताना दिसतो आहे.

दुसरी गोष्ट आहे ती ऑनलाईन माध्यमातील वाचकवर्गाच्या वयोगटाची. आणि त्याच्या आस्थाविषयांची. हा वाचक माहिती-तंत्रज्ञानाबरोबर वाढत असला, त्याच्या जातीय-धार्मिक-सांस्कृतिक अस्मिता अजून काहीशा टोकदार असल्या तरी त्याला केवळ ‘लोकल’ गोष्टींमध्येच स्वारस्य आहे असं नाही. पण बहुतेक मराठी ऑनलाईन माध्यमं हे नीटपणे किंवा पुरेशा स्वच्छपणे लक्षात घेताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पोर्टल्सना ‘प्रादेशिक’ किंवा ‘विशिष्ट समूहासाठी’ अशा मर्यादा पडतात. ती जितक्या लवकर ‘ग्लोबल’, खरं तर ‘ग्लोकल’ होतील तितकं त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे.

तिसरी गोष्ट आहे केवळ फेसबुकवर कुठला विषय चर्चेचा होतो आहे किंवा वृत्तवाहिन्यांवर कुठली ब्रेकिंग न्यूज केली जाते आहे, त्यांचीच माहिती कॉपी-पेस्ट करणं हा प्रकार म्हणजे या माध्यमाचं बलस्थान नीटपणे जाणून न घेतल्याचं लक्षण आहे. तुम्हाला निवड करावीच लागते, तुमचा वाचकवर्ग कोण आहे याचं भान ठेवावंच लागतं आणि त्याच्या दृष्टीनं अधिक हितावह काय आहे, हेही सतत पाहावं लागतं. केवळ स्कूप करत राहून किंवा केवळ गॉसिप्स वाटतील अशा घटना-घडामोडी देत राहून आपण ‘डाटा’मध्ये अधिक भर घालण्यापलीकडे काहीच करत नाही आहोत, हे लक्षात घ्यायला हवं.

चौथी गोष्ट म्हणजे या माध्यमाचा वेग अतिप्रचंड आहे. कुठलीही घटना व्हायरल झाली की, तिच्याविषयीची कमी-अधिक माहिती थोड्याफार फरकानं ढिगानं तुमच्या पुढ्यात ओतली जाते. अशा वेळी केवळ माहितीची सत्याअसत्यता जाणून घेऊन ती आहे तशी पुढ्यात ठेवणं आणि शक्य तितक्या लवकर तिचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करणं, ही ऑनलाईन माध्यमाची सर्वांत मोठी गरज आहे. अफवा या वाऱ्याच्या वेगानं पसरत राहतात, त्यांची पाहता पाहता वावटळ बनते. त्यामुळे तुमच्याकडे प्रत्यक्ष वास्तव आणि त्यामागचं सत्य असूनही तुम्ही या माध्यमाचा वेग पकडू शकला नाहीत, तर त्याचा काहीएक उपयोग होत नाही.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी पुस्तक परीक्षणं, पुस्तकांतील संपादित अंश प्रकाशित होतात.

ती पुस्तकं ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

.............................................................................................................................................

आत्मस्तुतीचा दोष पत्करून काही ‘अक्षरनामा’ची उदाहरणं सांगता येण्यासारखी आहेत. मराठा मोर्चाविषयी सतत या नाही तर त्या टोकाची चर्चा होत असताना आम्ही त्याविषयीचे अभ्यासपूर्ण लेख, तेही तुलनेनं तरुण लेखकांकडून लिहून घेतले. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भीमा-कोरेगावच्या घटनेविषयी ‘अक्षरनामा’नं जवळपास आठवडाभर रोज वेगवेगळे लेख छापून या घटनेची सर्वांगीण चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. एका वेळी दहा-दहा हजार वाचक पोर्टल पाहत होते. त्यामुळे काही काळ पोर्टल क्रॅशही झालं होतं. तोच प्रकार सॅनिटरी नॅपकिन, बाबरी मशिद, म. गांधी या विषयांवरील विशेषांकांच्या वेळीही घडला. तरुणांना अशा विषयांत किती स्वारस्य असणार, या समजाला खोडून काढण्याचं काम या विशेषांकांनी केलं आहे.

शेवटचा मुद्दा. ऑनलाइन माध्यमाचा वेग प्रचंड असल्यानं कमी कालावधीत अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांची गरज असते\आहे. त्याबाबतीत मराठीतील लेखक बरेच मागे आहेत. महत्त्वाचं म्हणजे लेखक सेलिब्रेटी आहे की नाही, हा मुद्दा लक्ष वेधण्यापुरताच कामी येतो. त्यानंतर वाचकाला उत्तम कंटेटच्या जोरावरच खिळवून ठेवता येतं. उत्तम कंटेट असेल तर लेखक सेलिब्रेटी आहे की, तरुण यानं काहीएक फरक पडत नाही. आणि सर्वांत शेवटचं म्हणजे ऑनलाईन वाचकाला केवळ राजकारणातच स्वारस्य नाही, त्याला समाजकारणापासून साहित्यापर्यंत, संस्कृतीपासून नाटकांपर्यंत, सिनेमा-पुस्तकं-ई-बुक-लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत, अर्थकारणापासून अनर्थकारणापर्यंत, लोकलपासून ग्लोबलपर्यंत आणि फॅशनपासून पॅशनपर्यंत अनेक विषयांत रूची आहे. काहीएक प्रमाणात गतीही आहे, हे ओळखायला हवं.

हे सर्व जेव्हा होईल तेव्हा मराठी ऑनलाईन माध्यमाला निश्चित दिशा सापडेल, तोवर या माध्यमांवरची अभिव्यक्तीही बरीच परिपक्व झालेली असेल. आणि त्याचा उज्ज्वल भविष्यकाळही सुरू झालेला असेल.

त्यामुळे अगदी स्पष्टचं सांगायचं तर मराठी ऑनलाईन माध्यमांच्या ‘कामाचं नीतीशास्त्र’ (Work Ethic) आणि ‘कार्य-संस्कृती’ (Work Culture) अजून तयार व्हायची आहे. कुठलंही शास्त्र हे तत्त्वप्रधान असतं. ती तत्त्वं जेव्हा आचरणात आणली जातात, तेव्हा त्यातून जे तयार होतं, त्याला ‘संस्कृती’ म्हणतात.

पंचवीस वर्षांनंतरही मराठीतला टीव्ही चाचपडतोच आहे, तोच प्रकार ऑनलाईन माध्यमाच्या बाबतीतही घडत असेल तर मात्र या माध्यमाची दिशा, अभिव्यक्ती आणि भविष्य ‘कॉपी-पेस्ट’ छापाचंच राहण्याची दाट शक्यता आहे. छापील पुस्तकं आणि मुद्रित माध्यमं यांना ऑनलाईन माध्यमं हा पर्याय नाही आणि या माध्यमांच्या वैभवशाली परंपरांच्या जोरावर ऑनलाईन माध्यमात तगूनही राहता येणार नाही. ऑनलाईन माध्यमाची स्वत:ची ओळख, परंपरा इतरांची ‘कॉपी’ करून निर्माण होणार नाही. त्यासाठी नवा विचार, नव्या कल्पना आणि नवी सर्जनशीलता यांची आवश्यकता आहे.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Thu , 26 April 2018

पुढील वाटचालीस शुभेच्छा....


Mahesh Phanse

Thu , 19 April 2018

अठरा महिने हा आजच्या जगात मोठा कालवधी म्हटला पाहिजे. मी आपल्या portal चा गेले काही महिने नियमित वाचक आहे. आपण प्रसिद्ध करत असलेले लेख खूपच दर्जेदार असतात. त्यातील मते दर वेळी पटली नाहीत तरी विचारांच्या मांडणीतील sincerity नक्कीच जाणवते. अक्षरनामाला पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख