श्रीकृष्ण तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाने त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला
ग्रंथनामा - झलक
डॉ. सदानंद मोरे
  • ‘या सम हा’ या डॉ. सदानंद मोरे यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 16 March 2018
  • ग्रंथनामा झलक या सम हा Ya Sama Ha डॉ. सदानंद मोरे Sadanand More श्रीकृष्ण Krushna

आंतरविद्याशाखीय अभ्यास असलेले मराठीतले नामवंत लेखक डॉ. सदानंद मोरे यांनी योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र इंग्रजीत लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने नुकताच प्रकाशित झाला आहे. पूर्णिमा लिखिते यांनी हा मराठी अनुवाद केला असून तो मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या पुस्तकाला मोरे यांनी लिहिलेले हे मनोगत संपादित स्वरूपात...

.............................................................................................................................................

श्रीकृष्ण हे भारताच्या इतिहासातील सर्वांत प्रभावशाली व आकर्षक व्यक्तिमत्त्व. अभ्यासजड विचारवंतांपासून नृत्यगानलुब्ध रसिकांपर्यंत सर्वांसाठी ‘वेधवंती’ ठरलेल्या, कृष्णाने अर्जुनाला केलेल्या ‘भगवद्गीता’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या उपदेशाने हिंदू धर्माच्या प्रधान प्रमाणग्रंथाचे स्थान पटकावले. तर त्याच्या चरित्रावर आधारित असलेला ‘भागवतपुराण’ नावाचा ग्रंथ वैष्णवांच्या संप्रदायासाठी अधिष्ठानग्रंथ ठरला. तत्त्वज्ञान आणि कला यांच्यात चिरंतन द्वंद्व असल्याचे प्लेटोचे मत सर्वज्ञातच आहे. तथापि, कृष्णाच्या आयुष्यात याच काय, पण इतरही अनेक द्वंद्वांचा निरास झाल्याचे दिसून येते.

माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळे व वारकर्‍यांचे उपास्यदैवत पंढरपूरचा श्री विठ्ठल म्हणजे द्वारकेहून आलेला कृष्णच असल्याची वारकर्‍यांची श्रद्धा असल्यामुळे, कृष्ण ही व्यक्ती व गीता हा ग्रंथ या दोन्ही गोष्टींचा परिचय मला बालवयातच झाला. वडील श्रीधरअण्णांच्या ग्रंथसंभारातून ज्ञानेश्‍वरी, गीतारहस्य, यथार्थदीपिका, गीताई, असे गीतेसंबंधीचे ग्रंथ वाचायला मिळाले. महादेवभाई देसाईंचे ‘Geeta According to Gandhi’ वाचले, त्याचप्रमाणे विवेकानंदांचे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग हे गीतेशी संबंध असणारे ग्रंथही वाचले. हे वाचन चालू असतानाच ‘प्रसाद’ मासिकाचा कृष्णचरित्रावरील विशेषांक वाचला. भारताचार्य चिंतामणराव वैद्य आणि बाळशास्त्री हरदास यांची कृष्णचरित्रेही वाचायला मिळाली. कॉलेजात गेल्यावर इरावती कर्वे, आनंद साधले, शं. के. पेंडसे, प्रेमा कंटक यांनी लिहिलेली पुस्तके वाचली. हे वाचन चालू असताना अण्णांशी चर्चा ही नित्याचीच बाब होती. याच दरम्यान महानुभाव पंथात प्रचलित असलेले श्रीचक्रधर निरूपित श्रीकृष्णचरित्र व डॉ. वि. रा. करंदीकरलिखित ‘भगवद्गीतेचे तीन टीकाकार’ हा तौलनिक अभ्यासावर आधारित ग्रंथही वाचायला मिळाला. याच काळात आचार्य रजनीश गीतेवर आणि कृष्णावर काही वेगळी मांडणी करत होते. ती काही प्रत्यक्ष ऐकली, काही वाचली. आचार्यभक्त विष्णुशास्त्री बापट, टिळकभक्त ज. स. करंदीकर, तसेच पं. श्री. दा. सातवळेकर यांची भाष्येही याच काळात वाचनात आली.

पुढे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात एम.ए. करत असताना प्रा. मो. प्र. मराठे या मनस्वी विद्वानाच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. त्यांची गीतेवरील व्याख्याने ऐकत असतानाच, गीतेसंबंधी वेगळ्या विचारांचा प्रबंध लिहिता येईल, हे लक्षात आले. त्यानुसार ‘The Geeta : A Theory of Human Action’ या शोधप्रबंधाचे लिखाण झाले. या प्रबंधाला त्या वर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट पीएच.डी. प्रबंध’ यासाठीचा ‘गुरुदेव रानडे-दामले’ पुरस्कारही मिळाला. पूर्वाचार्यांनी गीतेवर लिहिलेल्या भाष्यांमधून आपापल्या आध्यात्मिक सिद्धान्तांना बळकटी आणली. त्यासाठी त्यांना प्रस्थानत्रयी या संकल्पनेचा उपयोग झाला. या प्रक्रियेने स्वत: अर्जुनाने उपस्थित केलेला प्रश्‍न बाजूला राहिला व गीतार्थाचा संकोच झाला, असे माझे निरीक्षण होते. गीतेचा संबंध महाभारताच्या कथनाशी येतो आणि गीतेचा पहिला अध्याय गीता आणि महाभारत यांना जोडणारा सेतू आहे. पहिल्या अध्यायात अर्जुनाने उपस्थित केलेला कर्मासंबंधीचा प्रश्‍न गीतार्थाची संदर्भचौकट उभी करतो व तिच्या मर्यादेतच गीतेचा अर्थ लावला पाहिजे, असे प्रतिपादन माझ्या प्रबंधात आहे. त्यानुसार लावलेला अन्वयार्थ अर्जुनाच्या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर ठरला पाहिजे, या दिशेने ‘मी असा गीतार्थ काय असेल’ याची मांडणी प्रबंधातून केली.

पदवी मिळाली, पण जिज्ञासा संपली नाही. ज्या महाभारताच्या कोंदणात गीतार्थाचा तेजस्वी हिरा शोभतो, त्या महाभारताचा आधार मी ठायी ठायी घेतला होताच. पण याच महाभारतात कृष्णाचे चरित्र प्रसंगोपात काही प्रमाणात आले आहे. उरलेले चरित्र महाभारताचाच परिशिष्टवजा भाग असलेल्या हरिवंशात आलेले आहे. याशिवाय, विष्णु, वायू, भागवत, पद्म वगैरे पुराणांमधूनही कृष्णचरित्र आढळते. माझ्यापुढे प्रश्‍न असा उपस्थित झाला, की या सार्‍या पसार्‍यातून कृष्णाचे खरे चरित्र कसे उभे करता येईल? आणि मुख्य म्हणजे, गीतार्थ शोधताना जर महाभारताचा आधार घ्यावा लागतो, तर याचीच दुसरी बाजू म्हणजे, महाभारतातील कृष्णचरित्राची मांडणी करतानाही गीतेचा आधार घ्यायला पाहिजे.

कृष्णाचा गीतोपदेश ज्या महाभारतात येतो, त्याच महाभारतात कृष्णचरित्राची पुरेशी झलक बघायला मिळते. कालदृष्ट्या महाभारत हे श्रीकृष्णाच्या चरित्राचे सर्वांत प्राचीन व म्हणून सर्वांत विश्‍वसनीय साधन होय. ते आधारभूत धरून त्यानुसार त्याच्या प्रकाशातच इतर साधनांनी पुरवलेली कृष्णचरित्राची सामग्री तपासून घेतली पाहिजे. ती जर महाभारतामधील चरित्रगाभ्याशी सुसंगत असेल, तर स्वीकारली पाहिजे व जेथे ती तशी जुळत नाही, तेथे नाकारली पाहिजे.

हा झाला फक्त चरित्रलेखनाचा मुद्दा; पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. ज्याने गीता सांगितली व अर्जुनाला कर्म करण्याचा उपदेश केला, त्या कृष्णाचे स्वत:चे चरित्र त्याने केलेल्या उपदेशाशी, म्हणजे गीतेशी कितपत सुसंगत आहे, हे पाहण्याचा. तसे केले, तर निष्पन्न होणारे कृष्णचरित्र हे नेहमीचे चरित्र न राहता, कृष्णाचे सैद्धांतिक किंवा वैचारिक चरित्र ठरेल!

त्यासाठी गीतेच्या तत्त्वज्ञानाची महाभारताच्या संदर्भात मांडणी करायचे काम पीएच.डी.च्या प्रबंधाने केलेले होतेच. त्या तत्त्वज्ञानाला महाभारतात इतरत्र आढळणार्‍या कृष्णोक्तींची जोड दिली म्हणजे कृष्णाचे तत्त्वज्ञान समग्रपणे मांडले गेले, असे होईल. तेव्हा आता या तत्त्वज्ञानाच्या पायावर कृष्णाचे चरित्र सिद्ध करायचे.

या खटपटीची फलनिष्पत्ती काय असेल? - कृष्णाची उक्ती आणि कृती म्हणजेच वाणी आणि करणी यांच्यामधील अन्योन्य संबंधावर प्रकाश पडेल. कृष्णाच्या ज्या कृतींना ‘कृष्णकारस्थाने’ म्हणून तेव्हापासून हिणवण्याची प्रथा आहे, त्यांच्यामागचे तात्त्विक अधिष्ठान काय होते, याचे उत्तर देता येईल.

असो. मराठे सरांशी विचारविनिमय करून हा शोधप्रकल्प यूजीसीकडे ‘करिअर अवार्ड’ या फेलोशिपसाठी पाठवला. तो मंजूर झाला. त्यानुसार तीन वर्षे संशोधन करून सिद्ध झालेला इंग्रजी ग्रंथ म्हणजे ‘Krishna : The Man and his Mission.’

मराठे सर आज आमच्यात नाहीत. त्यांनी जे काही दिले, त्याचे मूल्य करणे कठीण आहे. ते ऋण वाचेने उत्तीर्ण होण्यासारखे नाहीच.

कृष्णाकडे ईश्‍वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याचे चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्‍वराचे, त्याच्या कृतीचे अनुकरण करणे मनुष्याच्या शक्तीबाहेर आहे, असे समजून त्याला देव्हार्‍यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजाअर्चा करण्यातच धन्यता मानली जाते. याउलट ‘तो तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली’ तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारूपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसर्‍यात तो अनुकरणीय आदर्श बनतो.

महाभारतातील कृष्णाचा वावर हा राजनीतिनिपुण मुत्सद्दी या रूपात आहे; पण त्याची ही मुत्सद्देगिरी विधिनिषेधशून्य राजकारण्याची नसून धर्माची, म्हणजे नैतिक मूल्यांची चाड बाळगणार्‍या तत्त्ववेत्त्याची आहे. हे तत्त्वज्ञान म्हणजे केवळ आत्मानात्मविवेकाचे नसून कर्माचे तत्त्वज्ञान आहे, विशेष करून राजकीय तत्त्वज्ञान आहे. डावपेच खेळत प्रतिस्पर्ध्यावर मात करणे, एवढ्यापुरतीच त्याची नीतिकल्पना मर्यादित नाही.

या संदर्भात भारतीय परंपरेतील धर्म आणि नीती यांची चर्चा अर्थपूर्ण ठरते. सुदैवाने भारतातील राजनीतीच्या विचारांची परंपरा प्रदीर्घ आहे. तिला शुक्रबृहस्पतीपासून शिवकाळातील ‘आज्ञापत्र’कार रामचंद्रपंत अमात्यांपर्यंतचा इतिहास आहे. महाभारत हे तर राजनीतीच्या सिद्धान्तांचे जणू भांडारच आहे. महाभारताने वर्णिलेल्या राजकीय विचारवंतांमध्ये कृष्ण सर्वश्रेष्ठ आहे.

कृष्ण जसा नीतिनिपुण आहे, तसाच तो धर्मज्ञसुद्धा आहे. किंबहुना, धर्म आणि नीती यांच्या मर्यादा जाणून घेऊन त्यांचा समन्वय करणे व तोही धर्माच्या रक्षणासाठी, हे त्याचे जीवनव्रतच आहे. त्याची सर्व कर्मे याच उद्देशाने प्रेरित झालेली असतात. तथापि, त्याची धर्माची संकल्पना ग्रांथिक, यांत्रिक वा साचेबद्ध नाही. धर्म मानवाला शक्य असलेल्या कर्मांचे सार्वत्रिक वर्गीकरण उपलब्ध करून देतो. तथापि, धर्माच्या या ठोकळेबाज संकल्पनेला चिकटून राहिले, तर धर्म व धर्माचरण करणारे लोकच संकटात येण्याची शक्यता असते. अशा वेळी धर्माला अपवाद करून केलेले कर्म समर्थनीय ठरते. हीच नीती. सुदैवाने कृष्णाच्या नीतीची ही संकल्पना प्रसिद्ध काश्मिरी पंडित क्षेमेंद्र याने स्पष्ट केली आहे. नीती म्हणजे अमला प्रज्ञा आणि सूक्ष्म दृष्टी. नीतीच्या साहाय्याने धर्माच्या वैश्‍विक चौकटीला अपवाद करण्याची स्थळे दिसू लागतात. या अर्थाने ती सूक्ष्म दृष्टी आहे; पण या सूक्ष्म दृष्टीवर अमला, म्हणजे विशुद्ध, पक्षपातविरहित प्रज्ञेचे नियंत्रण असेल, तर तिचा दुरुपयोग करण्याचा मोह होत नाही व अंतिमत: ती धर्माशी सुसंगत व धर्मास पूरक ठरते.

अपवादात्मक परिस्थिती ओळखून तिच्यात वरकरणी अधर्म वाटणारे; परंतु अंतिमत: धर्म ठरणारे कृत्य म्हणजे महाभारताच्या भाषेत योग. कृष्ण हा धर्मज्ञ, नीतिज्ञ आणि योगेश्‍वर आहे.

प्रचलित तत्त्वधारांचा यथोचित उपयोग करून कर्म न करण्यापेक्षा, म्हणजे अकर्मापेक्षा, कर्म करणे कसे समर्थनीय आहे, हे कृष्ण दाखवून देतो. धर्माचा आधार घेत कर्माचे समर्थनीय व असमर्थनीय असे गट होतात. मात्र, नीतीच्या साहाय्याने अपवादभूत परिस्थिती ओळखून धर्माच्या चौकटीला छेद देणे कसे समर्थनीय ठरते, हेही तो दाखवून देतो.

मुख्य मुद्दा म्हणजे, कृष्ण या प्रकारचा उपदेश ‘परोपदेशे पांडित्यम्’ या पद्धतीने अर्जुनाला करून नामानिराळा होत नाही. त्याच्या स्वत:च्या आयुष्यात तो अशाच प्रकारची कर्मे करून धर्माचे रक्षण करत राहिला.

कृष्णाच्या या वैचारिक वा सैद्धांतिक चरित्राची मांडणी करताना जरूर तेथे भारतीय आणि पाश्‍चात्त्य परंपरांमधील प्राचीन-अर्वाचीन ग्रंथांचा आधार घेण्यात आलेला आहे. भारतीय परंपरेमध्येसुद्धा केवळ वैदिक साधनांवर अवलंबून न राहता बौद्ध-जैनादि अवैदिक साधनांचाही उपयोग करून घेतलेला आहे.

अशा प्रकारचे वैचारिक चरित्र लिहिले जाण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. त्यासाठी स्वतंत्र पद्धतिशास्त्र विकसित करावे लागले.

सुबुद्ध वाचक ग्रंथाची योग्य ती दखल घेऊन महाकवी भवभूतीची प्रसिद्ध उक्ती निरर्थक ठरवतील, अशी आशा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4398

.............................................................................................................................................

लेखक डॉ. सदानंद मोरे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असून मराठीतील आंतरविद्याशाखीय अभ्यास असलेले नामवंत लेखक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......