व्यावसायिक नीतीमत्ता आणि स्पर्धेशी झगडणाऱ्या कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजन मांडवगणे
  • ‘पाऊल वाजे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 09 March 2018
  • ग्रंथनामा शिफारस पाऊल वाजे Paaul Vaaje विवेक गोविलकर Vivek Govilkar

विवेक गोविलकर यांची ‘द टेकओव्हर’ ही कॉर्पोरेट जगातल्या कथानकावर आधारित पहिली इंग्रजी कादंबरी. त्यानंतर त्यांनी ‘युनायटेड आयर्न अँड स्टील’ ही मराठी कादंबरी लिहिली. एका फाउंड्रीतल्या कामगारांच्या आणि व्यवस्थापकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या त्यांच्या कादंबरीला ‘कोमसाप’चा २०१७-१८चा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. नुकतंच त्यांचं तिसरं पुस्तक ‘पाऊल वाजे’ (कथासंग्रह) मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालं आहे.

गोविलकर यांनी आयआयटी, मुंबई या संस्थेतून अभियांत्रिकी प्रशिक्षण घेतल्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ आयटी क्षेत्रात नोकरी केली. कामानिमित्त जगभर प्रवास केला. काही वर्षं त्यांचं अमेरिका आणि युरोपमध्येही वास्तव्य होतं. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला असल्यानं त्यांच्या बहुतेक कथा कॉर्पोरेट कल्चरमधल्या आहेत.

‘पाऊल वाजे’ या संग्रहात एकंदर सहा कथा आहेत. त्यातील ‘इन्व्हेस्टमेंट’ ही कथा ग्लास-सीलिंग हा विषय हाताळते. आज सर्व क्षेत्रांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं काम करत आहेत, असं आपण म्हणतो. काही अंशी ते खरं असलं तरी अनेक क्षेत्रांमधे स्त्रियांना सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना त्यांना एका अदृश्य अडथळ्याचा (ग्लास-सीलिंग) सामना करावा लागतो. अजूनही जगभरातल्या बड्या कंपन्यांच्या सीईओ पदावर किंवा बोर्डावर स्त्रिया अल्पसंख्येनंच आढळतात. आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना अधिक जास्त परिश्रम घ्यावे लागतात. ऑफिसातले सहकारी आणि घरचे लोकही कळत-नकळत, प्रत्यक्ष किंवा छुपा विरोध करतात. या कथेची नायिका सई ऑफिस आणि घर, या दोन्ही आघाड्यांवर लढताना दिसते. अशा लढ्यामध्ये कठीण निर्णय घ्यायचे प्रसंग पावलोपावली येत राहतात. आणि त्या प्रत्येक निर्णयाची किंमत तिला चुकवावी लागते. 

आयटी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्यानंतर, बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय झालं. असे अनेक लोक, भारतीय कंपन्यांमार्फत युरोप आणि अमेरिकेतल्या कंपन्यांपर्यंत पोहचले. यावर उपाय म्हणून, भारतीय कंपन्यांनी कोणालाही कामावर घेण्यापूर्वी, प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक आणि पूर्वानुभवाची पार्श्वभूमी, एखाद्या व्यावसायिक संस्थेच्या मदतीनं तपासून घ्यावी, असा आग्रह अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी धरला. उमेदवारांनी आपल्या अर्जात दिलेली शिक्षण आणि अनुभव या विषयीची माहिती त्यांच्या दाव्याप्रमाणे आहे की नाही, हे विद्यापीठ आणि आधीच्या कंपन्यांशी अधिकृतरीत्या संपर्क साधून पडताळून पाहावं, अशी त्या संस्थांकडून अपेक्षा असते. ‘बॅकग्राउंड चेक’ या कथेची अनामिक आणि अदृश्य नायिका या व्यवस्थेचा वापर स्वतःची वैयक्तिक उद्दिष्टं साध्य करण्यासाठी करते. कथानकाच्या दृष्टीनं मध्यवर्ती असलेली दोन पात्रं प्रत्यक्षात कधीच समोर येत नाहीत. त्यांच्याभोवती फेर धरणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवेदक ही कथा पुढे नेतो.

दोन मित्रांमध्ये येणाऱ्या वितुष्टाच्या कथा यापूवी येऊन गेलेल्या आहेत. ‘मित्र’ ही अभि आणि दत्ता या मित्रांची आणि त्यांच्यात निर्माण होणाऱ्या वैराची कथा, आजचा काळाच्या संदर्भात आहे. लोकप्रिय चित्रपट आणि साहित्यात वापरून गुळगुळीत झालेल्या मार्गानं न जाता, ती आजच्या नीतीमूल्यांच्या संदर्भातल्या शक्यतांचा शोध घेते. कथेचा निवेदक स्वतःकडे ‘तू’ या द्वितीय पुरुषी कर्त्याच्या भूमिकेत अलिप्तपणे बघायचा प्रयत्न करतो.

याही कथेला ऑफिसमधल्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे. हे राजकारण सर्वांच्या कार्यालयीन आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहतं. दोन मित्र म्हणून एकत्रितपणे काय काय करता येईल याच्या मर्यादा, त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतच त्यांच्या लक्षात आलेल्या असतात. व्यावसायिक जगात केवळ पुढे जाण्यासाठीच नाही, तर टिकून राहण्यासाठीसुद्धा या राजकारणाचा खेळ त्यांच्यासाठी अपरिहार्य बनतो. याची तार्किक परिणती ही मैत्री तुटण्यात होते.

‘प्रोसेस ऑडिट’ ही संकल्पना चांगल्या प्रकारच्या म्हणजे नैतिक, प्रभावी आणि धोके टाळणाऱ्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असते. कंपनीतल्या एखाद्या विभागाचं काम योग्य प्रकारे चाललं आहे की नाही, हे कागदपत्रांची छाननी करून ठरवलं जातं. त्यासाठी सादर केलेली कागदपत्रं अस्सल असल्याची खात्री करून घेणं, हाही ऑडिटचा भाग असतो. कथेची नायिका निरुपमा ही हुशार, कर्तबगार आणि ‘फास्ट ट्रॅक मॅनेजर’ आहे. तिच्या मेहनतीचं चीज करणाऱ्या तिच्या बॉसविषयी तिला वाटणाऱ्या आदरापोटी, ती त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करते. आणि त्या नादात ती ऑफिसमधल्या सहकाऱ्याबरोबरचे व्यावसायिक संबंध आणि वैयक्तिक नातं यांच्यात गल्लत करते. कामासंदर्भातल्या ऑडिटमध्ये नापास होणारा तिचा आलोक हा तरुण सहकारी, तिच्याबरोबरच्या नातेसंबंधांच्या आणि विश्वासाच्या ऑडिटमध्येही नापास होतो.

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘विशाखा गाईडलाइन्स’चा कायदा बनला आणि कामाच्या जागी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्धच्या लढ्याला एक बळ मिळालं. हा कायदा भारतात लागू होण्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अमेरिका आणि युरोपच्या कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी काही नियम आणि धोरणं बनवली होती. चांगल्या उद्देशानं बनवलेल्या या नियम आणि धोरणांना, व्यावहारिक अडचणी आणि काही प्रसंगी कायद्याच्या परिभाषेत न सामावणारं वास्तव कसं चकवा देऊ शकतं, याची ‘बळी’ही कथा आहे. कायदा जाती-प्रांतांच्या भिंती जाणत नाही. पण कुटुंबातल्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक छळापासून संरक्षण करण्यात कायदा फारसा प्रभावी ठरत नाही. एका बाजूला भावनारहित कायदे-नियम आणि दुसऱ्या बाजूला कौटुंबिक ब्लॅकमेल, यात कल्पना सिंग आणि रमेश अय्यर हे भिन्न प्रांतांमधले, भिन्न जाती, भाषा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले प्रेमी भरडून निघतात.

गौरी देशपांडे या सत्तर आणि ऐंशीच्या दशकात कथा-कादंबरी लिहिणाऱ्या मराठीतल्या एक महत्त्वाच्या लेखिका. त्या वेळचे आशय, विचार आणि मांडणी, या सर्वच बाबतीतले संकेत आणि प्रथा झुगारून देणाऱ्या या लेखिकेनं त्या काळाच्या पुढे जाणाऱ्या बंडखोर नायिकेची रंगवलेली प्रतिमा मराठी वाचकांना मोहवून गेली. अनेक वाचकांनी तिच्यावर स्त्रीवादी असा शिक्का मारला. ‘एकेक पान गळावया’ या तिच्या १९८० साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातल्या पहिल्या कथेतल्या नायिकेचा मनू हा प्रियकर अमेरिकेला जातो आणि त्यामुळे तो अधिकाधिक दुरावत जातो. त्याला कथानायिकेनं लिहिलेली पत्रं म्हणजे, ‘कारावासातून पत्रे’ ही मूळ कथा.

‘पाऊल वाजे’ या संग्रहातल्या शेवटच्या, आणि कॉर्पोरेट कल्चरच्या बाहेरच्या एकमेव कथेत, कारावासातून लिहिलेल्या या पत्रांना मनूनं दिलेली उत्तरं आहेत. ही उत्तरं समीक्षात्मक पातळीवरची नसून कथेच्याच माध्यमातून दिलेली साहित्यिक पातळीवरची आहेत. या उत्तरांचं स्वरूप, वैचारिक वाद, प्रेमिकांची भांडणं, एकमेकांवर कुरघोडी करण्याची प्रवृत्ती आणि या सर्वांतून त्यांच्या प्रेमाला लागलेल्या ओहोटीची जाणीव, अशा प्रकारचं आहे.

आपल्या देशात ‘ग्लोबल वर्क कल्चर’च्या प्रवेशाला गेल्या शतकाच्या शेवटी सुरुवात झाली आणि बघता बघता आधुनिक उद्योग-व्यवसायातल्या लोकांचं आयुष्य ऑफिसच्या कामाभोवतीच आखलं गेलं. जागेपणीचा जास्तीत जास्त काळ ऑफिसमध्ये घालवणाऱ्या पिढीच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नं यावर ऑफिसमधलं राजकारण, ताणतणाव आणि जबाबदाऱ्या, या सगळ्याचा परिणाम होणं स्वाभाविक होतं. ऑफिसचे नियम आणि सहकाऱ्यांची सत्तास्पर्धा, यातून त्यांच्या आयुष्यातल्या वैयक्तिक नातेसंबंधांना वेगळे संदर्भ प्राप्त झाले. शहरी जीवनावरच्या, त्यातूनही कॉर्पोरेट जगातल्या या कथांमधल्या पात्रांचे प्रश्न हे भाषा आणि प्रांतापलीकडचे आहेत.

गोविलकर यांच्या या पहिल्याच कथासंग्रहातल्या कथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांची व्यावसायिक नीतीमत्ता आणि स्पर्धेच्या जगातला वेग यांच्याशी जुळवून घेण्याचा, तसेच नशिबाला दोष न देता आपला मार्ग स्वतः शोधायचा प्रयत्न करणाऱ्या आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4395

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......