‘भंगार’मध्ये पानोपानी ऊर्जा भरली आहे; ती कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही
ग्रंथनामा - झलक
डॉ. सुनीलकुमार लवटे
  • ‘भंगार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 02 March 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक भंगार Bhangar अशोक जाधव Ashok Jadhav

‘भंगार’ हे अशोक जाधव यांचं आत्मकथन नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा संपादित अंश...

.............................................................................................................................................

अशोक जाधव यांचं ‘भंगार’ हे रूढ अर्थांनी त्यांचं आत्मचरित्र आहे; पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे. पत्रा, लोखंड, बाटल्या, प्लास्टिक असं लोकांनी नको म्हणून उकिरड्यात टाकलेलं गोळा करणं, ते भंगारवाल्याला विकणं आणि त्यावर गुजराण करणारे हे लोक. या समाजाच्या स्त्रिया नि मुलं खांद्याला ‘खंदाडी’ - म्हणजे मोठी झोळी - पोतं अडकवून, कचरा-कोंडाळे उपसत विकाऊ वेचण्याचं काम करतात. मुलं भंगार वेचून शिवाय भीकही मागतात आणि पुरुष मात्र पालात दारू ढोसत शिवीगाळ करत, लोळत दिवस काढतात. भिकेतून भूक भागवायची नि भंगारातून आलेल्या पैशांतून छाटण, मस्काडं (मटण) खायचं नि दारू ढोसायची हे या पुरुषांचं काम! हे करत असताना ज्या माऊलीनं पहाटेपासून दिवस बुडेपर्यंत अंग कुजेपर्यंत कष्ट केले, तिच्याबद्दल त्यांच्या मनात सहानुभूतीचा लवलेशही नसतो. उलट, दारूचा अंमल वाढेल तसा ते त्या बापडीचा उद्धार करत राहणार नि उशिरा का आली म्हणून संशय घेत बदडणारही.

अशा पालात जन्मलेला अशोक भंगार गोळा करायला, भीक मागायला जाता-येता शाळा, शाळेत जाणारी मुलं पाहतो नि शाळा शिकायचं मनावर घेतो. अशोकचा शाळेला जायचा हट्ट म्हणजे त्याच्या बापाच्या दृष्टीनं पोराचं बिघडणं. ‘मे साळा शिकवारो’ (मी शाळेत शिकणार!) असं पालाआडून दबकत अशोक म्हणतो, नि लुळ्या बापाचं पित्त खवळतं नि तो बायकोवर खेकसतो, “रांडं, तुझ्यापायी पोर बिगडलंया, भंगार वेचाय, भीक मागाय तुझा बा जानार काय?’’ या कलगीतुऱ्यानं घरचा संवाद संपतो नि अशोक चोरून शाळेला जातो. त्याची निष्ठा पाहून गुरुजीच पालावर येऊन बापाला समजावतात नि मग अशोकचं शाळा शिकणं रुळावर येतं; ते पण भंगार, भीक गोळा करतच.

अशा अशोकचं शिकणं. त्याचं बी.ए., बी.एड्. होणं, शिक्षक होणं, शिक्षक होऊन जळी-स्थळी विद्रोह करणं खरं वाटत नाही. गोसावी समाज परंपरेनं घेरलेला. जातपंचायत या समाजाचं सर्वोच्च न्यायालय. तेथील पंच म्हणजे ‘पंच परमेश्वर’. त्यांच्या जिभेवर येणारा शब्द म्हणजे कायदा. जो पैसे देईल त्याच्या बाजूनं न्याय. या पंचायतीत स्त्रीची किंमत शून्य. पंचायत कुणाच्याही लग्नाची कधीही सुपारी फोडू शकतं. स्त्रीवर कोणीही संशय व्यक्त करू शकते. निवाड्यात स्त्रीस कधीच विचारलं जात नाही. तक्रार आली की, ती खरीच समजली जाते. स्त्री म्हणजे पापी हे गृहीतच. नवरा मनाला येईल तेव्हा स्त्रीला सोडचिठ्ठी देणार. जातपंचायत आपल्या मर्जीनं तिचा ‘धारूच्यो’ करणार. म्हणजे दंड भरून घेऊन दुसऱ्या पुरुषाच्या स्वाधीन करणार. इतकंच नव्हे, तर जातपंचायतीच्या मनात आलं की, ती ईर्ष्येवर कोणत्याही स्त्रीस ‘उभायत’ ठरवू शकते. स्त्री ‘उभायत’ ठरली, की तिला आयुष्यभर कुणीही नांदवून घेत नाही. ती विवाहित राहते. गळ्यात मंगळसूत्र असतं, पण तिला नवऱ्याच्या घरी नांदता येत नाही. ती आकर्षक दिसू नये, तिच्याकडे कुणाची नजर जाऊ नये, म्हणून तिनं दातवण लावून दात मुद्दामहून काळे करून घ्यायचे, या नि अशा अनेक डागण्या देणारा हा समाज.

त्या समाजाच्या जातपंचायतीच्या विरोधात अशोक जाधव दंड थोपटतात, ते स्वत:च्या लग्नापासून. आपल्या मर्जीनं नि आपल्या शर्तीवर लग्न करून दाखवून जातपंचायतीची मिरासदारी मोडीत काढतात. गोसावी समाजात शिक्षणास विरोध.त्यात मुलीचं शिक्षण म्हणजे मृगजळच. पण अशोक जाधव गोसावी समाजाचे आपल्या भागातील पहिले पदवीधर. आपल्या बहिणीलाही ते पहिली डॉक्टर बनवतात.

अशोक जाधवांचा पुरुषार्थ इथं संपत नाही. खरं तर इथं तो सुरू होतो, असं म्हणायला हवं. ते आपल्या गोसावी समाजबांधवांचं संघटन करतात. नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून आपल्या समाजाचं अस्तित्व, महत्त्व राजकीय पटलावर नोंदवतात. समाजाची पतसंस्था काढतात. भंगाराची खंदाडी जाते नि टेम्पो येतो.

‘भंगार’ वाचताना गोसावी समाजाचा कायाकल्प करणारा एक चित्रपट वाचकांच्या मनापुढे झरझर सरकत राहतो. त्या अर्थानं ‘भंगार’ आत्मचरित्र हे समांतर विकसित होत समाजचित्र जिवंत करतं.

चित्रपटाचा कॅमेरा दृश्याचा फोकस नि फ्रेम ठरवत असतो. ती दृष्टी असते दिग्दर्शकाची नि त्या छायाचित्रकाराची, कॅमेरामनची. ‘भंगार’ आत्मचरित्राचा फोकस अशोक जाधव यांचं व्यक्तिगत जीवन, चरित्र, चारित्र्य नाही. फ्रेम आहे गोसावी समाजाचं जिणं नि जगणं. पण अशोक जाधवांनी आपल्या या आत्मचरित्रात फ्रेमलाच फोकस केल्यानं त्यांचं जीवन गौण होऊन जातं. ही त्यांची स्वेच्छा पसंती नसते. एखाद्या कार्यकर्त्यास समाज बदलाचा एकदा का घोर लागला की, मग तो स्वत: विसर्जित होतो. ‘स्व’ऐवजी ‘पर’चा वेध, समष्टीचा गोफ विणण्याचं कार्यकर्त्याचं वेड त्याचं जीवन व चरित्र सामूहिक, सामुदायिक आणि सामाजिक करून टाकतं. त्या अर्थांनी ‘भंगार’ हा दलित, वंचित साहित्यप्रवाहातील लेखनाचा व्यवच्छेदक प्रयोग होय.

ही कलाकुसर अशोक जाधव यांनी केली नसून, ती झाली आहे. त्यामुळे या आत्मकथनात सर्वत्र एक प्रकारची प्रांजळता पसरलेली वाचकांना अनुभवायला मिळते. सुखवस्तू समाजाला स्वत:च्या आत्मरत जीवनातून जागं करण्याची विलक्षण ताकद ‘भंगार’मधील भीषण वास्तवात भरलेली आहे. ती भीषणता तुम्हास केवळ अस्वस्थ करत नाही तर अंतर्मुख करून या वंचित समाजाप्रती काही करण्याची कार्यप्रेरणा देते. ती प्रेरणा हेच या आत्मकथनाचं यश होय.

मराठी साहित्यात यापूर्वी ‘बलुतं’, ‘उपरा’, ‘उचल्या’, ‘कोल्हाट्याचं पोर’, ‘अक्करमाशी’ अशी अनेक आत्मचरित्रं आली. त्यांनी आपापल्यापरीनं डोंबारी, कैकाडी, कोल्हाटी अशा समाजांच्या व्यथा वेशीवर टांगल्या आहेत. ‘भंगार’ हे आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढं ठेवतं. गोसावी समाजाचं भटकं जीवन, तीन दगडांची चूल, तीन थामल्यांवर (काठ्यांवर) उभी पालं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना, कोंडाळ्याचे तीन भागीदार (माणूस, कुत्रं नि डुक्कर), जातपंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं. मुलांचं जन्मत: नि जन्मभर वंचित जगणं, हे सारं शब्दबद्ध करणारं ‘भंगार’ वाचकाला गोसावी समाजाचं भंगारपण समजून घ्यायला भाग पाडतं.

गोसावी समाजाची स्वत:ची अशी भाषा, बोली आहे. ती कुठल्याच मान्य सूची व सर्वेक्षणात नोंदलेली नाही. ती हिंदी, मराठी, मारवाडी, राजस्थानी, गुजराती, असा साऱ्यांचा मेळ घेत स्वत:चं स्वतंत्र रूप, शब्दकळा घेऊन येते. थारो, मारो, खादो अशी ओकारान्त क्रियेची ही बोली. शिव्या आणि शाप, शौर्य आणि क्रौर्य, परंपरा आणि अंधश्रद्धा यांच्या परिघातलं हे जीवन मात्र संभावित, संभ्रांत समाजपरिघाबाहेरचं, गावकुसाबाहेरचं, गावापलीकडचं. गोसाव्यांची वस्ती म्हणजे पोलिसांसाठी हक्काचं संशयित गुन्हेगार मिळण्याचं ठिकाण. मानव-अधिकारांचा मागमूस नसलेलं हे जग जातपंचायतीच्या वात्याचक्रात (वादळात) सतत भरडलं जाणारं.

‘भंगार’ आत्मचरित्र जातपंचायतीविरोधी ‘लढा’ होय. ते जातपंचायतीच्या आणि खरं तर, जातव्यवस्थेच्या समूळ उच्चाटनाची मागणी करतं. त्या अर्थानं सामाजिक न्यायाच्या संदर्भात ‘भंगार’ हा वंचितांचा टाहो आहे. जानू, होबडी, मोरनी, बायना, भरत्या, सांबा, केर्‍या, आळंद्या, बारीबुढा ही सारी पात्रं नावानं नवी, तसंच त्यांच्या ओळखीही नव्या. खंडोबा, सितला, मरीआई, लक्ष्मी यांची भक्ती करत रंगीबिरंगी झेंडे उभे करत वस्ती दर वस्ती नवं जीवन सुरू करणारं हे जग रोज नवा प्रपंच मांडतं. त्या अर्थानं यांचं जीवन खरंच विंचवाच्या पाठीवरचं बिऱ्हाड होऊन जातं.

‘भंगार’ आत्मचरित्र अनेक प्रश्न उभे करतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत अशोक जाधवांनी स्वत:चा घेतलेला शोध, स्वत: शोधले-मळलेली वाट हे सारं वाचत असताना प्रश्न पडतो की अनुवंश, परिस्थिती या गोष्टी मोठ्या, की माणसास लागलेला अंतरीचा शोध? विकास नावाची गोष्ट भौतिक समृद्धीतून येते की आत्मविकासाच्या ध्यासातून? स्त्री-पुरुष भेदाचे नष्टचर्य संपून स्त्री माणूस केव्हा होणार? माणसास कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था... तिथं कल्याणकारी, विकासगामी नियोजन असतं का? मानवाधिकार, समानता, माणुसकी या गोष्टी इतर तुलनेनं प्रगत समाजांच्या नजरेत ‘माणूस’ नसलेल्या समाजास, वर्गास - मग ते दलित, वंचित, अनाथ, उपेक्षित कोणीही असो - केव्हा मिळणार? जातपंचायत नि जातव्यवस्था आपणांस त्यांचं खरंच समूळ उच्चाटन करायचं आहे का? या नि अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करणारं हे आत्मकथन म्हणजे दलित, वंचितांनी प्रस्थापित व्यवस्थेला विचारलेला जाबच आहे.

अशोक जाधव यांनी अल्पवयात जे कार्य केलं, लेखनात जी प्रगल्भता दाखवली, ती पाहिली की वाटतं, संस्कार, वळण सारं व्यर्थ. श्रेष्ठ तो स्वत:चा विवेकी शोध नि समाजाचा पुनर्शोध! या सर्वांबद्दल त्यांचं मन:पूर्वक कौतुक नि अभिनंदन! मराठी वाचक ‘भंगार’ वाचतील तर त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाहीत. ती ऊर्जा या पुस्तकात पानोपानी भरली आहे; ती उद्या कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4301

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......