सन्मानानं मरण्याच्या हक्काचं काय करायचं?
पडघम - राज्यकारण
एम. आर. मसानी
  • इरावती-नारायण लवाटे दाम्पत्य आणि त्यांच्याविषयी दै. लोकसत्तामध्ये २० फेब्रुवारी २०१८ रोजी आलेली बातमी
  • Thu , 22 February 2018
  • पडघम राज्यकारण इच्छामरण सन्मानाने मरण्याचा हक्क Right to Die with Dignity इरावती लवाटे Iravati Lavate नारायण लवाटे Narayan Lavate

तब्बल चाळीसेक वर्षं अंथरुणावर खिळून असलेल्या अरुणा शानभागचा १८ मे २०१५ रोजी मृत्यू झाला. तेव्हा इच्छामरणाची किंवा काटेकोर शब्दांत सांगायचं तर ‘सन्मानाने मरण्याचा हक्क’ (Right to Die with Dignity)ची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. खरं तर अशा स्वरूपाच्या चर्चेला ऐंशीच्या दशकापासूनच सुरुवात झालेली आहे. २९ मे १९८१ रोजी मुंबईमध्ये ‘दी सोसायटी फॉर दी राईट टू डाय विथ डिग्निटी’ या संस्थेची स्थापना एम. आर. मसानी यांनी केली. 

या आठवड्यात दै. लोकसत्तामध्ये २० फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या नारायण व इरावती लवाटे या दाम्पत्याची बातमी प्रकाशित झाली. त्यानुसार गिरगावातील झावबावाडीत राहणाऱ्या लवाटे या वृद्ध दाम्पत्यानं इच्छामरणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवलं असून येत्या ३१ मार्चपर्यंत इच्छामरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.  

या अशा बातम्या आपल्याला काही काळ विचलित करत असतीलही. पण आपली तात्पुरती हळहळ वा तात्पुरती आर्थिक वा इतर स्वरूपाची मदत हा त्यावरचा उपाय नाही. लवाटे दाम्पत्यानं व्यक्त केलेल्या इच्छामरण वा सन्मानानं मरण्याच्या हक्काविषयी चर्चा करण्याची गरज आहे. त्यानिमित्तानं ‘दी सोसायटी फॉर दी राईट टू डाय विथ डिग्निटी’ या संस्थेचे अध्यक्ष एम. आर. मसानी यांनी २३ ऑक्टोबर १९८४ रोजी लिहिलेल्या निवेदनाचा संपादित भाग…

.............................................................................................................................................

‘मरणाचा हक्क’ (Right To Die) या प्रश्नाकडे बरा न होणारा (Incurable) असाध्य रोग (Terminal IIness) या एकाच दृष्टिकोनातून पाहणे ही भूमिका फारच संकुचितपणाची आहे, असे मला वाटते. या प्रश्नाकडे याहीपेक्षा व्यापक विस्तृत दृष्टीतून पाहण्याची गरज आहे. माणसाचे सर्व प्रश्न केवळ सरकारच सोडवू शकते अशी एक हवा सर्वच राजकीय पक्षांनी या देशात हेतुपूर्वक, जाणूनबुजून निर्माण केली आहे; पण मानवी जीवन हे इतके वैयक्तिक आणि विविधस्तरीय (Multi-Dimensional) आहे की, त्याच्या सर्व समस्या सोडवणे ही गोष्ट भांडवलशाही, समाजवादी, साम्यवादी आणि वैयक्तिक अथवा लष्करी हुकूमशाही यापैकी कोणत्याही पद्धतीच्या सरकारच्या सर्वस्वी आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. माणसाचा मृत्यू आणि मरणविषयक परिस्थिती ही एक अशीच वस्तुस्थिती आहे. यासाठी आपल्याला जगावयाचे आहे किंवा नाही, मरावयाचे असेल तर केव्हा मरावयाचे, त्यासाठी कोणते साधन वापरावयाचे या बाबतीतला निर्णय घेण्याचे, त्याची अंमलबजावणी करण्याचे आणि त्यासाठीचे साधन मिळवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य, एकवीसपेक्षा ज्याचे वय कमी नाही, अशा प्रत्येक व्यक्तीला असले पाहिजे असे मला वाटते.

या दृष्टीने विचार करायला उपयुक्त ठरेल असे मला वाटते म्हणून मी माझी स्वत:ची परिस्थिती या ठिकाणी सांगणार आहे; पण हे केवळ माझ्याच परिस्थितीचे दिग्दर्शन करणारे, माझ्याच समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले निवेदन आहे, असे मात्र कृपा करून समजू नये. यासारख्या परिस्थितीत जीवन जगावे लागल असणारे कितीतरी लोक असतील. हा प्रश्न के‌वळ माझ्या एकट्याचा नाही आणि तसा विचार केला तर बहुतेक समस्या आणि खास करून मृत्यू आणि तत्संबंधी परिस्थिती ही समस्या ही केवळ कोणा एका व्यक्तीपुरतीच मर्यादित नाही. या प्रश्नाचे हे अंग मी माझ्या स्वत:च्या संदर्भात मांडत आहे इतकेच. केवळ या दृष्टीनेच या माझ्या निवेदनाकडे पहावे.

मी आठ वर्षांचा असताना माझी आई वारली आणि मी बारा वर्षांचा असताना माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आणि त्यानंतर लग्न न केल्यामुळे मी माझ्या लहानपणापासून एकट्यानेच राहत आहे. त्यामुळे एकट्याने राहणे ही गोष्ट मला अनोखी नाही आणि वयाची पंचावन्न वर्षं पूर्ण होईपर्यंत या रीतीने जीवन जगण्यात मला कोणतीही अडचण आली नाही, कारण तोपर्यंत मी आजारी असा कधी पडेलोच नाही. मात्र १९७६च्या सप्टेंबर महिन्यात माझ्या डाव्या गालावर खालच्या बाजूला निर्माण झालेल्या गाठीसाठी (Tumour) मला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. ही गाठ वरवरची (Superficial) होती हे खरे, पण त्या घटनेपासून माझ्या जीवनाच्या शेवटच्या कालखंडाला सुरुवात झाली असे मी समजतो; कारण त्यानंतर क्रमाक्रमाने दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, प्रोस्ट्रेट ग्लँडची शस्त्रक्रिया या झाल्या. तसेच दोन्ही पायांचे तळवे, कंबर या ठिकाणी सतत दुखत असते. हाताच्या बोटात काही प्रमाणात थरथर निर्माण झाली असल्यामुळे लिहिताना मला बराच त्रास होतो आणि शिवाय वेळही खूपच लागतो. माझी स्मरणशक्ती मला काही प्रमाणात दगा देऊ लागली आहे. वास घेण्याच्या क्षमतेत उल्लेखनीय प्रमाणात कपात झाली आहे. ऐकण्याच्या क्रियेत काहीशी कमतरत आली आहे. पूर्वी मला उत्कृष्ट आणि गाढ झोप लागत असे, पण आता केवळ अडीच-तीन तास झोप मला येते. याशिवाय इतर बारीकसारीक तक्रारी कितीतरी आहेत. या पुढील काळात हे सर्व वाढणारच आहे आणि या खेरीज अधिक त्रासदायक नवीन कटकटीही निर्माण होणार आहेत, यात कोणतीही शंका नाही. माणसाला आपल्या मरणाची वेळ ‌ठरवण्याचे आणि साधन निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे माझे, माझ्या वयाच्या तिसाव्या वर्षापासून, मत आहे; पण त्या वेळी तो केवळ वैचारिक पातळीवरचा एक विचार होता, पण आता मात्र, सध्या माझी जी शारीरिक अवस्था झाली आहे. त्यामुळे, तो विचार माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनून गेला आहे.

आज कायदाविषयक जी परिस्थिती अस्तित्वात आहे, त्यामुळे या स्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताही वैध मार्ग मला उपलब्ध नाही. मात्र काही गोष्टी मी निश्चित केल्या आहेत आणि दुसऱ्या काहींचा विचार चालू आहे. मला कर्करोग झाल्यास त्यावर कोणतीही उपाययोजना न करता मरणाला सरळ सरळ समोरे जावे असा एक विचार माझ्या मनात घोळत आहे; कारण कर्करोग बहुधा कायमचा बरा करता येत नाही, फार फार तर मरणाचा दिवस काही मुदतीपर्यंत पुढे ढकलता येतो, अशी आपल्या आजच्या वैद्यकीय ज्ञानाची स्थिती आहे, अशी बऱ्याच लोकांची आहे त्याप्रमाणे माझीही समजूत आहे. शिवाय त्या आणि इतर बऱ्याच रोगांवरची उपचार पद्धती अतिशय खर्चाची आहे, ती मला परवडण्यासारखी नाही आणि सवलतीच्या दराने अगर मोफत उपचार देत असतील त्या ठिकाणी जाणे हे मला आवडणार नाही, कारण कोणतीही सेवा अगर वस्तू कमी दराने अगर फुकट देण्याची अगर घेण्याचीही साम्यवादी आणि समाजवादी पद्धत सध्या लोकप्रिय आहे, तिला माझा तात्त्विक आणि वैचारिक पातळीवर विरोध आहे. या ठिकाणी हे सांगावयास हरकत नाही की, मी रेशनकार्ड काढलेले नाही आणि येथून पुढेही कधी ते न काढण्याचा माझा निश्चय आहे. पुढे केव्हा खुल्या बाजारात धान्य वगैरे मिळण्याचे पूर्णत: बंद झाले तर फळे आणि भाजीपाला यावरच निभावून नेण्याचा माझा विचार आहे. फळे आणि भाजीपाला तरी सरकारी नियंत्रणाच्या कचाट्यातून सुटतील असा माझा कयास आहे.

अशा या परिस्थितीत माझ्या सारख्यांना मात्र एकच मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे मर्मांतिक सल्लेखनाच्या मार्गाचा अवलंब करण्याचा. पण या मार्गाने जाण्यासाठी ज्या निश्चयाची आणि धैर्याची आवश्यकता असते, त्या दृष्टीने मी कसोटीला उतरेन किंवा नाही याबद्दल आजमितीला तरी मी स्वत:सुद्धा साशंक आहे; पण तशीच परिस्थिती उदभवली तर एखादा क्षुद्र किडासुद्धा संकटाशी मुकाबला करायला तयार होतो, या वस्तुस्थितीचा मला आधार वाटतो.

मला मरण केव्हा येणार या विचाराने मी चिंताग्रस्त नाही, तर ते कशा रीतीने येणार या विचाराने माझ्या मनात घर केले आहे. मला योग्य वाटेल त्या क्षणाला माझे जीवन काही मिनिटांच्या अवधीत झटपट संपवण्याचे एखादे साधन जर मला उपलब्ध असते, तर आज आहे तशी माझी मानसिक अवस्था झाली नसती आणि मग मी माझी इच्छा आहे तोपर्यंत बेफिकिरीने जगू शकलो असतो. जून स्पेन्सर चर्चिल आणि ऑर्थर कोएत्सलर हे त्यांना जगण्यासारखे वाटत होते तोपर्यंत जगले, याचे कारण म्हणजे ज्या वेळी जीवन संपवणे हे योग्य असे त्यांना वाटले, त्या वेळी ते संपवण्याचे हुकमी साधन त्यांना उपलब्ध होते हे होय.

मला असणारी आणखी एक काळजी म्हणजे मी जर आणखी दहा-पंधरा वर्षे जगलो, तर माझ्या जमाखर्चाची तोंडमिळवणी मी कशी करू शकणार ही होय. माझी आर्थिक परिस्थिती उत्तम नाही हे मी वर सांगितले आहेच. खरे सांगायचे तर आजसुद्धा काही प्रमाणात मी भांडवल खाऊनच जगतो आहे आणि सतत होणाऱ्या चलनवाढीमुळे हा प्रश्न प्रत्येक वर्षी अधिकाधिक बिकटच होत जाणार आहे. बेदरकार पद्धतीने केलेली तुटीची अर्थव्यवस्था, अनुत्पादक खर्चात सतत होत असलेली भयानक वाढ, समाजवाद आणि समाजकल्याण यांच्याबद्दलच्या चुकीच्या आणि कालबाह्य कल्पनांतून निर्माण झालेली अवास्तव आर्थिक धोरणे, सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या हव्यासाचा सरकारच्या ध्येयधोरणांवर झालेला परिणाम, जवळजवळ सर्वच राज्य आणि मध्यवर्ती सरकार यांची दिवाळखोरसदृश अवस्था या सर्व कारणांचा आणि परिस्थितीचा परिणाम म्हणून मला तर अशी भीती वाटते की, नजीकच्या भविष्यकाळात आपण झंझावती चलनवाढीच्या (Hyper Inflation) कालखंडात प्रवेश करून आजच्या जगातील चलनवाढीच्या क्षेत्रातील पुढारी असे ज्यांचे सार्थ वर्णन करता येईल, त्या इस्त्राएल आणि अर्जेंटिना या देशांच्या गोटात दाखल होऊ.

अलीकडे एकट्याने अगर दुकट्याने राहणाऱ्या वृद्ध माणसाचे खून होण्याचे प्रकारही घडू लागले आहेत आणि येथून पुढे अशा खुनांचे प्रमाण वाढतच राहील, अशी फार मोठी शक्यता आहे. म्हाताऱ्या माणसाचा खून करणे ही फारच सोपी गोष्ट आहे. एका दृष्टीने विचार करता हेही चांगले आहे; कारण चोर, दरोडेखोर यांच्याकडून जखमी होणे आणि पैसाअडका, मौल्यवान वस्तू त्यांनी घेऊन जाणे, यापेक्षा खून झालेला काही वाईट नाही.

हे सर्व वाचून लोकांना कदाचित असे वाटण्याचा संभव आहे की, मी ज्याचा मानसिक समतोल ढळला आहे असा एक हताश, उदास झालेला माणूस आहे. पण तशी वस्तुस्थिती मुळीच नाही. आजसुद्धा जीवन जगण्यावर माझे मनस्वी प्रेम आहे; माझ्या जगण्यात दु:खापेक्षा आनंदाचे प्रमाण खूपच अधिक आहे. बऱ्याच वृद्ध माणसांना वेळ कसा घालवावयाचा याची चिंता असते. मला ही अडचण कधीच येत नाही, उलट खरे सांगावयाचे तर मला वेळ पुरत नाही. लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. त्यामुळे दिवसाचा बराच भाग माझा वाचनात जातो. मला बागेची आवड आहे. निवडक चित्रपट आणि नाटके मी पाहतो. मरणाचा हक्क, स्त्रीमुक्ती, निसर्ग संतुलन, लोकसंख्यावाढ, जीवनाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह या आणि अशासारख्या ज्या काही विषयांत मला रस आहे, त्यासंबंधी वाचन मी करतो आणि या संबंधीच्या कार्यक्रमात माझ्या कुवतीनुसार भागही घेतो. आठवड्यातून एक-दोनदा रमीही खेळतो. माझा व्यवसाय कायद्याचा. सरकारच्या तथाकथित समाजवादी धोरणाच्या स्टीमरोलरमुळे जरी तो सध्या मोडकळीला आलेला असला तरी मी अजूनही अधूनमधून काही प्रमाणात सट्टा करतो. हे सर्व खरे असले तरी शरीरप्रकृतीच्या दृष्टीने जेव्हा परिस्थिती येथून पुढे अधिकाधिक बिघडेल (आणि ती तशी बिघडणारच) आणि जगण्याच्या क्रियेत आनंदापेक्षा दु:खाचे प्रमाण वाढेल अथवा जगण्यात फक्त दु:खच शिल्लक उरेल, त्या वेळी काय करावयाचे?

नैसर्गिक प्रकारांनी मरण येण्याचे जे प्रकार आहेत त्यापैकी माझ्या मताने सर्वोत्तम प्रकार म्हणजे हृदयविकाराच्या अतिशय तीव्र झटक्यामुळे येणारे झटपट मरण, पण यात वाईट गोष्ट ही आहे की असे मरण घडवून आणणे ही आपल्या हातची गोष्ट नाही. मला जर असे मरण आले तर मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजेन. माझे आतापर्यंतचे आयुष्य फारसे यशस्वी झाले आहे असे मी मानत नाही; पण जर मला मृत्यू, जेव्हा केव्हा येईल तेव्हा, झटपट आला तर माझे आयुष्य यशस्वी झाले असेच मी समजेन, कारण ज्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगले.

(मसानी यांचा हा लेख नोव्हेंबर १९८५ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सन्मानाने मरण्याचा हक्क’ या विनायक लिमये यांनी लिहिलेल्या आणि त्यांनीच प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेतला आहे.)

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......