संमेलनाध्यक्ष देशमुखांच्या भाषणाची बातमी मराठी वर्तमानपत्रांनी कशी दिली?
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 19 February 2018
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan ९१ वे साहित्य संमेलन बडोदा लक्ष्मीकांत देशमुख Laxmikant Deshmukh

१६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ९१वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा इथं पार पडलं. तिथल्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या आवारात झालेल्या या संमेलनाचे पडसाद वर्तमान महाराष्ट्रात फारसे उमटले नसले तरी ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक\साहित्यिक इतिहासात नक्कीच उमटतील अशी सोय संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात करून ठेवली आहे. त्यांनी केंद्र-राज्य सरकारला केवळ चार नव्हे तर जवळपास पाचेक हजार शब्दांचे खडे बोल सुनावले आहेत. १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उदघाटन झालं. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी दोन घोषणा केल्या. एक, मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार. दोन, पुढील वर्षापासून साहित्य संमेलनासाठी सरकारकडून ५० लाख रुपये देण्यात येतील. या दोन्ही घोषणा महत्त्वाच्याच आहेत. पण याच व्यासपीठावरून या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य-केंद्र सरकार पुरस्कृत सॅन्सॉरशिप, त्यांच्याकडून कलावंत-साहित्यिकांचं होणारं दमन, समाजकंटकांचा उच्छाद आणि त्याविषयी केंद्र-राज्य सरकारांची अळीमिळी गुपचिळी यांविषयी सणसणीतपणे सुनावण्याचं धाडस दाखवलं. ‘राजा, तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजेस.’ असं खणखणीत विधान देशमुखांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलं. त्यांच्या भाषणातलं हे विधान हेडलाइनच्या दर्जाचं होतं. पण एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गमजा करणाऱ्या मराठी वर्तमानपत्रांपर्यंत ते नीट पोहोचलं नाही. दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे १७ फेब्रुवारीच्या त्यांच्या अंकातल्या पहिल्या पानावरच्या हेडलाइनमध्ये त्याला कसं स्थान मिळालं याची ही झलक...

.............................................................................................................................................

दै. ‘लोकमत’मधील पहिल्या पानावरची बातमी डावीकडे, तर उजवीकडे पान तीनवरील उर्वरित बातमी. देशमुख यांच्या ‘राजा, तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजेस.’ या विधानाचा उत्तरार्ध पहिल्यावर आणि पूर्वार्ध-उत्तरार्ध आतल्या पानावर लोकमतनं दिला आहे. याशिवाय संपादकीय पानावर ‘आजचे आपले अस्वस्थ वर्तमान’ हा संमेलनाध्यक्ष देशमुखांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश छापला आहे. तो मराठीतल्या इतर कुठल्याही वर्तमानपत्रानं एवढ्या मोठ्या आकारात छापला नाही. बातमीच्या शीर्षकातली गंमत जाणीवपूर्वक केली आहे की, अनवधानानं घडली आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही. पण ‘राजा, तू चुकत आहेस’ हे बातमीचं शीर्षक पहिल्या पानावर दिलं असतं तर ते जास्त योग्य राहिलं असतं.

.............................................................................................................................................

दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडून हल्ली फारशा अपेक्षा कोणी ठेवत नाही. पण संमेलनाध्यक्षांच्या भाषणाची हेडलाईन करून या वर्तमानपत्रानं काहीसा अनपेक्षित धक्का दिला असंच म्हणावं लागेल. ‘राजा, तू चुकत आहेस’ इतकी स्वच्छ, स्पष्ट, थेट आणि परखड हेडलाईन आणि ‘संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे परखड बोल’ असं उपशीर्षक म.टा.ला द्यावंसं वाटलं यातच सगळं काही आलं. शिवाय संपादकीय पानावर देशमुखांच्या भाषणाचा साताठशे शब्दांचा संपादित अंशही दिला आहे. त्याला शीर्षक दिलंय - ‘जे खुपतं, ते निर्भयपणे लिहावं’. लोकमतनंतर म.टा.नंच संमेलनाध्यक्षांची यथोचित दखल घेतली आहे.

.............................................................................................................................................

ही दै.“सकाळ’च्या पहिल्या पानावरील बातमी. यात मुख्य हेडलाईन जरी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी पंतप्रधानांकडे आग्रह धरणार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची असली तरी दुसरी हेडलाईन ही संमेलनाध्यक्ष देशमुखांच्या अध्यक्षीय भाषणाविषयीची आहे. आणि ही बातमीही नेमकेपणानं लिहिली आहे. ‘सकाळ’नं देशमुखांच्या भाषणाचा संपादित अंश मात्र छापला नाही.

.............................................................................................................................................

दै. ‘प्रहार’कडून हल्ली कुणाला फारशा अपेक्षा नसतात. मात्र संमेलनाध्यक्षांच्या भाषणाची सर्वांत मोठी वा सविस्तर (पान एक व दोन मिळून) बातमी प्रहारनं छापली आहे. पहिल्या पानावरच्या हेडलाईनमध्ये ‘राजा, तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजेस.’ हे देशमुखांचं विधान न घेता त्यांनी देशमुखांनी मांडलेल्या पुरस्कारवापसीच्या विधानाची हेडलाईन केली आहे. मात्र प्रहारनंही देशमुखांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश छापला नाही.

.............................................................................................................................................

राज्यात सत्तेत राहूनही सतत राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारवर दुगाण्या झाडणाऱ्या शिवसेनेचं मुखपत्र म्हणजे ‘सामना’. त्यामुळे ‘सामना’नं देशमुखांच्या भाषणाचा फ्लायर करायला हवा होता. पण पहिल्या पानावर नेमकी अर्धा पान जाहिरात असल्यानं ‘सामना’नं मास्टरहेडच्या शेजारी संमेलनाच्या बातमीचं फक्त शीर्षक-उपशीर्षक देऊन पान पाचवर सविस्तर बातमी दिली आहे. याशिवाय सामनानं देशमुखांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंशही संपादकीय पानावर दिला आहे. त्याला शीर्षक दिलंय - ‘आजचे आपले अस्वस्थ वर्तमान’.

.............................................................................................................................................

गोव्याहून प्रकाशित होणाऱ्या दै. ‘गोमान्तक’च्या पहिल्या पानावरची हेडलाइन मुख्यमंत्र्याच्या वाढीव निधीविषयीची असली तरी पान दोनवर जी उर्वरित बातमी दिली आहे, त्यात शेवटी ‘राजा, तू चुकलास, तू सुधारलं पाहिजे’ या नावानं संमेलनाध्यक्षांच्या भाषणाची छोटीशी चौकट दिली आहे. त्यात थोडक्यात देशमुख काय म्हणाले हे दिलं आहे.

.............................................................................................................................................

विचारी जनांसाठी, बुद्धिवंतांसाठी वैचारिक खाद्य पुरवत असल्याच्या संपादकीय पानांच्या स्वत:च्या वर्तमानपत्रात एकेक पान जाहिरात करणाऱ्या आणि महाराष्ट्रात आजही काही प्रमाणात आपला आब राखून असलेल्या दै. ‘लोकसत्ता’मधली ही पहिल्या पानावरची हेडलाईन. या बातमीचा उर्वरित भाग पान १४वर प्रकाशित झाला. तिथं मात्र संमेलनाध्यक्ष देशमुख काय म्हणाले याची छोटीशी चौकट करून तिला ‘सुसंस्कृततेचा संकोच’ असं निरर्थक शीर्षक दिलं. लोकसत्तानं देशमुखांच्या अध्यक्षीय भाषणाची ना बातमीतून दखल घेतली, ना त्यांच्या भाषणाचा संपादित अंश छापून, ना अग्रलेखातून. एरवी केंद्रातल्या व राज्यातल्या भाजप सरकारवर, समाजातील अनेक कळीच्या प्रश्नांवर उद्वेगानं, तिटकाऱ्यानं आणि काही प्रमाणात त्राग्यानं लिहिणाऱ्या लोकसत्तानं संमेलनाध्यक्षाला आम्ही मोजत नाही, हेच एकप्रकारे दाखवून दिलं. आम्ही सरकारवर टीका करू, पण इतरांनी आमच्यापेक्षाही स्पष्ट भाषेत केली असेल तर त्याची दखलही घेणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेश या बातमीतून जातो. पण त्याची फिकीर लोकसत्ताकारांना असेलच याची खात्री नाही.

.............................................................................................................................................

दै. ‘दिव्य मराठी’च्या अौरंगाबाद आवृत्तीच्या पहिल्या पानावरची ही हेडलाईन. या बातमीचा उर्वरित भाग पान दोनवर प्रकाशित झालाय. पहिल्या पानावरच्या या बातमीत संमेलनाध्यक्ष देशमुख काय म्हणाले याचा साधा उल्लेखही नाही. दुसऱ्या पानावर कोपऱ्यात ‘अभिव्यक्ती, सांस्कृतिक स्वातंत्र्य उपभोगता यावे’ या शीर्षकाची छोटीशी चौकट दिलीय. ती पटकन लक्षातही येणार नाही अशा बेतानं. पण मुख्यमंत्र्यांची बातमी पान एकपेक्षा दुप्पट मोठी आहे. एवढंच नव्हे तर या पानावर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याची बातमी जवळपास अर्धा पान आहे. तीही सुरुवातीला. दिव्य मराठीनं देशमुखांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंशही छापला नाही. एकंदर ‘दिव्य मराठी’ची ‘दिव्यदृष्टी’ कुठल्या ‘कृपादृष्टी’कडे वळलेली आहे, हे पुरेसं बोलकं आहे.

.............................................................................................................................................

दै. ‘पुढारी’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या पहिल्या पानावरची ही हेडलाईन. या बातमीचा यापेक्षा दुप्पट आकाराचा भाग पान सातवर प्रकाशित झालाय. त्यात एक परिच्छेद संमेलनाध्यक्ष देशमुखांच्या वाट्याला आला असून त्यातील देशमुखांची विधानं अशी - “साहित्य हे धर्म आणि विज्ञानाप्रमाणे सत्याचा शोध घेण्याचे साधन आहे. मानवी कल्याण हाच साहित्याचा उद्देश आहे. साहित्यिक जितका महत्त्वाचा आहे, तितकाचा वाचक महत्त्वाचा आहे. मात्र इंटरनेट, टीव्ही यामुळे वाचनाचा वेळ कमी होत आहे. ही वाचनसंस्कृती वाढवली पाहिजे. त्याकरिता विद्यार्थिदशेतच त्यांची पुस्तकांशी मैत्री वाढेल, असे उपक्रम सरकारने राबविले पाहिजेत. तालुका पातळीवर विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलने भरवली पाहिजेत.” देशमुखांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंशाचा उल्लेख मात्र पहिल्या पानावरच्या बातमीत केलाय. ते भाषण संपादकीय पानावर घेतलं असून त्याला शीर्षक दिलंय - ‘लिहिते राहा, व्यक्त होत राहा’. हा भागही बातमीसारखाच चतुराईनं संपादित केला आहे.

.............................................................................................................................................

ही दै. ‘पुण्यनगरी’च्या मुंबई आवृत्तीच्या पहिल्या पानावरची हेडलाईन. यात ना मराठी भाषेविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले याचा उल्लेख आहे, ना संमेलनाध्यक्ष काय म्हणाले याचा. संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंशही पुण्यनगरीनं छापला नाही.

.............................................................................................................................................

‘राष्ट्रीय ठेवा’ असा अभिमान बाळगणाऱ्या दै. ‘केसरी’च्या पहिल्या पानावरच्या हेडलाइनमध्ये संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा उल्लेख नाही. संपादकीय पानावर मात्र त्यांच्या भाषणाचा संपादित अंश छापला आहे. त्याचं शीर्षक आहे ‘वाचन संस्कृती वाढविण्याचे प्रयत्न व्हावेत’. म्हणजे देशमुख यांनी अगदी किरकोळ वाटाव्यात अशा उपाययोजना ज्या संदर्भात सुचवल्या आहेत, तोच भाग घेतला आहे.

.............................................................................................................................................

पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या दै. ‘प्रभात’च्या पहिल्या पानावरच्या हेडलाइनची तऱ्हाही ‘केसरी’पेक्षा वेगळी नाही. देशमुखांच्या भाषणाचा वृतान्तही प्रभातनं छापला नाही.

............................................................................................................................................

लातूरहून प्रकाशित होणाऱ्या दै. ‘एकमत’ हे ‘पुरागामी विचारांचे’ अशी टॅगलाईन मिरवते. त्याच्या पहिल्या पानावर फक्त संमेलनाच्या उदघाटनाचं छायाचित्र आहे आणि दोन ओळींची कॅप्शन. पान दोनवर बातमी आहे. त्यात ‘लेखक कलावंतांनी समाजाचा आवाज बनावा’ अशी समंलनाध्यक्षांच्या भाषणाची छोटीशी बातमी आहे. संपादकीय पानावर ‘ठेकेदारांची वार्षिक जत्रा’ या शीर्षकाचा अग्रलेख असून त्यात साहित्यिकांवर दुगाण्या झाडल्या आहेत.

............................................................................................................................................

बैळगावहून प्रकाशित होणाऱ्या दै. ‘तरुण भारत’च्या पहिल्या पानावरची ही हेडलाइन गमतीशीर आहे. त्यात संयुक्त महाराष्ट्राविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं. ते एका परीनं आणि या वर्तमानपत्राच्या दृष्टीनं उचितही म्हणता येईल. पण याच बातमीत संमेलनाध्यक्ष देशमुखांच्या अध्यक्षीय भाषणाची जी चौकट दिलीय ती मात्र तितकीच आश्चर्यकारक आहे. तिचं शीर्षक आहे - ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठाही स्वीकारा’. देशमुखांच्या भाषणातला तरुण भारतला कुठला मुद्दा बातमीमूल्य वा सर्वाधिक महत्त्वाचा वाटला तर तो हा. या वर्तमानपत्रानं संपादकीय पानावर देशमुख्यांचा अध्यक्षीय भाषणाचा दै. लोकमतसारखाच विस्तृत अंश दिला असला तरी ते अतिशय हुशारीनं संपादित केलं आहे. त्यात देशमुखांनी सरकार पुरस्कृत, सरकारची मूकसंमती असलेल्या सेन्सॉरशिपविषयी, दंडेलीविषयी जे सुनावलं आहे, त्यातला एकही मुद्दा नाही. फक्त मराठी भाषेविषयी देशमुख जे काही बोलले तेवढंच घेतलं आहे.

.............................................................................................................................................

नाशिकहून प्रकाशित होणाऱ्या दै. ‘देशदूत’मधील पहिल्या पानावरची ही हेडलाईन. संमेलनाची बातमीच ही अशी असेल तर संमेलनाध्यक्षांचं भाषण, त्यातील महत्त्वाचे मुद्दे यांना कुठून स्थान मिळणार?

.............................................................................................................................................

अकोल्याहून प्रकाशित होणाऱ्या दै. देशोन्नतीमधील ही पहिल्या पानावरची हेडलाईन. या बातमीचा उर्वरित भाग आतल्या पानावर प्रकाशित झालाय. तोही एका कॉलमच्या सात-आठ ओळींचाच आहे. संमेलनाची बातमीच ही अशी असेल तर संमेलनाध्यक्षांचं भाषण, त्यातील महत्त्वाचे मुद्दे यांना कुठून स्थान मिळणार?

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

mayur kamble

Mon , 19 February 2018

वास्तविक पाहता संमेलनाध्यक्ष खूप योग्य बोलले त्यांचं बोलण्यातून हे जाणवलं कि , हे साहित्यिक समाजाशी समाजातील वास्तवाशी बांधील असतात ते अश्या अस्वस्थ वर्तमानात जगू इच्छित नाहीत त्या मुळे हि व्यवस्था जी लोक चालवतात त्यांना वारंवार सुनावल पाहिजे आणि बदल घडवून आना हे सांगण्याचं धाडस ते दाखवतात आणि हेच लेखनाचं प्रायोजकत्व आहे त्यामुळे देशमुखांनी अतिशय उच्च अश्या साहित्यिक संदर्भानी सरकारचा समाचार घेतलेला आहे परंतु मराठी माध्यमांनी त्याची योग्य ती दखल घेतली नाही हि बाब निदर्शनास आली याची नोंद अक्षरनामा ने घेतली हि अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. हि सुद्धा समीक्षा व्हायला हवी

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......