‘रंगवाचा’साठी हाक घालतो आहे, प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
वामन पंडित
  • ‘रंगवाचा’ या त्रैमासिकाची मुखपृष्ठे
  • Fri , 05 January 2018
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो रंगवाचा Rangwacha वामन पंडित Waman Pandit

‘रंगवाचा’चा चौथा अंक १५ नोव्हेंबरला प्रकाशित झाला. हे त्रैमासिक सुरू करण्यागची माझी भूमिका मांडण्याचा प्रेमळ आग्रह ‘अक्षरनमा’चे राम जगताप यांनी गेले दोन-तीन महिने सतत सुरू ठेवला म्हणून हे थोडेसे...

सावंतवाडीच्या महाविद्यालयात असताना म्हणजे ६७-६८ ते ७०-७१ या वर्षांमध्ये ‘नाटक’ याविषयी अभ्यासपूर्ण जाण यायला सुरुवात झाली. त्यापूर्वी म्हणजे अगदी लहानपणापासून नाटकाविषयी कुतूहल/आकर्षण होतं, जे प्रत्येक मराठी (त्यातही कोकणातील) माणसाला बहुधा जन्मजातच असतं.

सावंतवाडीत ‘थिएटर युनिट’चा सदस्य झालो आणि नाटकाची चहूबाजूने जाण वाढायला लागली. तालमी करण्यातला उत्साह, त्यासाठी घ्यावयाला लागणारे श्रम, शिस्त, सादरीकरणाचा विचार, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, ध्वनी यांचे महत्त्व जाणवू लागले आणि त्याचवेळी दस्तऐवजीकरणाची गरज जाणवू लागली. कारण खूप चर्चा व्हायच्या नाटक आणि संबंधित लोकांबद्दल, किस्से सांगितले जायचे, पण यातील लिखित स्वरूपात फारच कमी आहे हेही जाणवायचे.

कणकवलीत आधी नोकरी आणि मग व्यवसायानिमित्त स्थायिक व्हायचे ठरताना ‘नाटक’ या विषयाने मोहवलेल्या आणखी समविचारी मित्रांची साथ मिळाली आणि ‘नाथ पै एकांकिका स्पर्धा’ आोजित करण्याचे ठरवले. यालाच अनुसरून मग ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ची स्थापना केली. नाथ पै एकांकिका स्पर्धा यंदा चाळीस वर्षांची झाली. त्याचा इतिहास आणि प्रतिष्ठानबद्दल लिहायचे तर तो वेगवेगळ्या दीर्घ लेखांचा विषय आहे.

पण चार दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात काम करत असताना अगदी सुरुवातीला करत असणारी दस्तवेजीकरणाची गरज अधिक तीव्रतेने भासत गेली. रंगभूमी आणि विशेषत्वाने मराठी रंगभूमीचे भूत-वर्तमान-भविष्य याविषयी काही सांगणारे, नोंद घेणारे माध्यम उपलब्ध नाही याची खंत वाटू लागली. तत्कालीन वर्तमानपत्रांत नाटकाची परीक्षणे, काही तत्सम माहिती येत असे, पण गेल्या दोन दशकांत तीही कमी-कमी होऊ लागली. या क्षेत्रांतील अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठांशी याविषयी बोलत होतो. ‘तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, असे काहीतरी असायलाच हवे’पासून ‘हल्ली छापील माध्यम वाचतो कोण?’, ‘याची गरजच नाही’ इथपर्यंत प्रतिक्रिया ऐकाला मिळायच्या. त्यामुळे असे काही नियतकालिक निघायचे तर स्वत:लाच त्यात लक्ष घालावे लागेल हे निश्चित होत होते.

मला वाटणाऱ्या तीव्र गरजेचा जाहीर उच्चार मला मिळालेला ‘वसंत सोमण पुरस्कार’ स्वीकारताना (२००५) केला आणि बोलतच राहिलो, जिथे-जिथे संधी मिळेल तिथे. ‘तन्वीर पुरस्कार’ (२०१३) स्वीकारतानाही हे मनोगत कळकळीने मांडले.

तत्पूर्वी मी काढलेल्या एका आवाहनाला अल्प प्रतिसाद (रु. १०००/- चे आजीवन पालकत्व) मिळाला होता. दरम्यान रंगकर्मी अतुल पेठे यांनी या नियतकालिकाला सुचवलेले ‘रंगवाचा’ हे नाव निश्चित केले होते. ज्येष्ठ भारतीय रंगकर्मी कवालम पणीक्कर यांच्या सन्मानाप्रित्यर्थ अमोल पालेकर यांनी पुण्यात त्यांच्या नाटकांचा महोत्सव आोजित केला होता. या महोत्सवात कै. पणीक्करांच्या हस्ते आणि अमोल पालेकर यांच्या उपस्थितीत ‘रंगवाचा’ या नावाचे अनावरण केले आणि पुन्हा रसिकांना पालकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यावेळी अमोल पालेकर यांनी असा अंक निघाला तर पहिल्या अंकाच्या प्रकाशनाच्या वेळी रु. १,००,००० (रु. एक लाख) देण्याचे आश्वासन दिले. कार्यालय व्यवस्थापन, मजकूर संकलन, मुद्रण आदी सर्व व्यवस्था देऊन एखाद्या कुशल रंगकर्मी संपादकाच्या नेतृत्वाखाली हे नियतकालिक काढावे असाही प्रयत्न करून पाहिला, पण प्रतिसाद मिळाला नाही.

५०-६० जणांनी दिलेले रु. १००० हजार परत करावेत आणि ही कल्पना सोडून द्यावी असा एकदा निकराचा विचार केला. पण ते मनाला पटेना. मग कणकवलीतूनच याचे प्रकाशन करावे हे निश्चित केले. उत्तम व्यासंगी, अभ्यासू मित्र डॉ. विद्याधर करंदीकर यांनी संपादकाची जबाबदारी स्वीकाराची तयारी दर्शवली आणि फेब्रुवारी २०१७मध्ये (हे प्रायोगिक नाट्यमहोत्सवाचे वर्ष असणार होते.) ‘रंगवाचा’चा पहिला अंक प्रकाशित करण्याचे निश्चित केले. जुळवाजुळव करायला सुरुवात केली आणि अचानक ऑक्टोबरमध्ये डॉ. करंदीकर यांचे निधन झाले. पण आता माघार घेणे म्हणजे पुन्हा ‘रंगवाचा’ लांबणीवर पडले असते म्हणून निर्धाराने ठरलेली वेळ पाळायचे ठरवले.

आणि अखेर १३ फेब्रुवारी २०१७ रोजी ‘रंगवाचा’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन अमोल पालेकर (पालेकर यांनी आश्वासित केलेले रु. १,००,००० रुपये लगेच दिले.) यांच्या हस्ते आणि नसिरुद्दीन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात साजरे झाले.

आता चार अंक प्रकाशित झाले असताना आपल्याला पाहिजे तितक्या गुणवत्तेचे अंक निघतात असे नाही. ही गुणवत्ता आणखी वाढवता यावी यासाठी प्रयत्नशील आहे. आजीवन पालकत्व स्वीकारणारी सदससंख्या ३००च्या घरात गेली आहे. पण नाट्यक्षेत्राकडून (व्यासायीक/हौशी/समांतर) पाहिजे तितका उत्साही, कृतीशील प्रतिसाद मिळत नाही याची खंत आहे. प्रत्येक अंकात त्यासाठी वारंवार आवाहन करतो आहे. अनेकांना लेखनाची विनंती करतो आहे. जाहिराती मिळाव्यात, आर्थिक घडी नीट बसावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. हे काम आपले समजून याला आणखी प्रतिसाद मिळत राहिला, सदस्य संख्या १००० (महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या आणि नाट्यरसिकतेच्या मानाने ही अगदी अल्प संख्या आहे.) तरी व्हावी म्हणून प्रयत्न करतो आहोत. ‘अक्षरनामा’च्या माध्यमातूनही पुन्हा हाक घालतो आहे. प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

.............................................................................................................................................

संपर्कासाठी पत्ता – रंगवाचा, संपादक वामन पंडित, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, ४८४, वार्ड नं. २, संस्थेचे विविध कलासंकुल, गणपती मंदिरामागे, बिजलीनगर, कणकवली – ४१६ ६०२, जि. सिंधुदर्ग. मो – ९४४४ ०५४७४४

वेबसाईट - www.acharekarpratishthan.org

.............................................................................................................................................

लेखक वामन पंडित ‘रंगवाचा’ या त्रैमासिकाचे संपादक आहेत.

vasprangwacha@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......