सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शन
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रा. लतिका जाधव
  • ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २)’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 05 January 2018
  • ग्रंथनामा Granthanama शिफारस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन Mahrshi Vitthal Ramji Shinde रा. ना. चव्हाण R. N. Chavhan

‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २)’ या रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकाचं प्रकाशन २ जानेवारी २०१८ रोजी कोल्हापुरात झालं. या पुस्तकाविषयी...

.............................................................................................................................................

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांचं अलौकिक कार्य व कर्तृत्व अभ्यासकांना समजावं या दृष्टीनं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. (कै.) रा. ना. चव्हाण यांनी शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक व राजकीय कार्यक्रमांसाठी केलेलं हे लेखन सूत्रबद्धपणे त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी एकत्र करून अभ्यासकांची सोय केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासात केवळ काही ओळींत शिंदे यांची भलावण केलेली दिसून येते. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाकडे जनसामान्य व अभ्यासक यांचं फारसं लक्ष वेधलं गेलं नाही असं वाटतं. प्रस्तुत पुस्तकातून चव्हाण यांनी सुबोध शैलीत लिहिलेले शिंदे यांच्यावरील लेख वाचताना त्यांच्या कर्तृत्वाला निश्चितच उजाळा दिला गेला आहे. एक प्रकारे चव्हाण यांनी आपल्यासाठी सूक्ष्मपणे महत्त्वाच्या अशा कालखंडाचा इतिहास नोंदवल्याची जाणीवदेखील जागी होते.      

या पुस्तकास डॉ. रणधीर शिंदे यांची अतिशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात एकूण बावीस लेख व परिशिष्टात खूप महत्त्वपूर्ण असे संदर्भ जोडलेले आहेत. शिंदे यांच्या हस्ताक्षरातील पत्रव्यवहारदेखील परिशिष्टात दिला आहे. त्यामुळे कित्येकांना अज्ञात असलेला शिंदे यांच्या कर्तृत्वाचा आलेख या पुस्तकातून स्पष्ट होताना दिसतो.

अभ्यासकांना आजच्या काळात हे पुस्तक वाचून एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्मातील धार्मिक सुधारणा व धर्मचिकित्सा याविषयी होत असलेल्या घुसळणीचा ध्वनी-प्रतिध्वनी अनुभवता येईल. हिंदू धर्म चातुर्वर्ण्याच्या चौकटीत अडकलेला व स्त्रियांना कनिष्ठ लेखणारा अशी एकोणिसाव्या शतकातील हिंदू धर्माची वस्तुस्थिती होती. याविरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी लढा सुरू केला. ते ‘सती प्रथेला आळा’ घालण्यात यशस्वी झाले. इथून ब्रिटिश अमदानीत अतिशय चिवटपणे कायद्यानं धर्मसुधारणा करण्याचा लढा समाजसुधारकांनी सुरू केला. हिंदू धर्मातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, ‘अस्पृश्योद्धाराचे धोरण’ महात्मा फुले यांनी स्वीकारलं. शिंदे यांनी वरील दोन समाजसुधारकांच्या धोरणांना पुढे नेण्याचं कार्य निष्ठेनं आयुष्यभर केलेलं दिसून येतं.

शिंदे यांनी विद्याव्यासंगातून आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्यामुळे असं म्हटल्यास वावगे ठरू नये. शिंदे जेव्हा पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायला आले, त्यावेळी ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर प्राचार्य होते. याविषयी पुस्तकात एक संदर्भ दिसतो, “आगरकर अज्ञेयवादी होते. मिल-स्पेन्सर यांचा आगरकरांवर प्रभाव होता. विठ्ठलरावांनी देखील मिल स्पेन्सर वाचले व तेही अज्ञेयवादी झाले. अज्ञेयवादावर त्यांनी एक निबंधही लिहिला होता. पण पुढे परंपरागत भागवत धर्माचे संस्कार बलवान ठरले.” (पृ. १९)

शिंदे यांचा त्याच काळात रानडे-भांडारकर यांच्या ‘प्रार्थना समाजा’शी संबंध आला. त्यांनी काळाची पावलं जाणून घेऊन पुरोगामित्वाकडे वाटचाल सुरू केली. १८९८ मध्ये त्यांना बी. ए.ची पदवी मिळाली. पुण्यातील समाजसुधारक, विचारवंत यांच्याशी ते जोडले गेले. धर्म हा त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला. १९०१ मध्ये त्यांनी मँचेस्टर ऑक्सफर्ड येथे ‘कॉलेज ऑफ थिऑलाजी’मध्ये प्रवेश घेऊन सर्व धर्माचे तौलनिक अध्ययन व तौलनिक भाषाशास्त्र यांचं अध्ययन केलं. युरोपातील मिशनरी लोक दुर्बल व वंचित घटकांसाठी ज्या समर्पित भावनेनं कल्याणकारी योजना राबवताना त्यांना दिसले. ते बघून पुढे त्यांच्या जगण्याचं राष्ट्रीय उद्दिष्ट त्यांना ठरविता आलं, असं म्हणता येईल. त्यांना ब्राह्मो समाजदेखील त्याकाळात तितकाच महत्त्वाचा वाटत होता. परदेशात असताना त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्या ब्रिस्टलमधील समाधीला भेट दिली अशी महत्त्वाची नोंद चव्हाण करतात.

१९०४ मध्ये ते शिक्षण व विविध यात्रा करून हिंदुस्थानात परतले. इथं आल्यावर त्यांनी कोणतीही सरकारी नोकरी स्वीकारली नाही. त्यांच्या मते ब्राह्मोसमाज व सत्यशोधक समाज तत्त्वत: भिन्न नव्हते. त्यांनी महात्मा फुले यांच्या समतावादी तत्त्वांचा पुरकार केला. ब्राह्मोसमाज हा अखिल भारतीय म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला. सर्व धर्मांचं ऐक्य, स्वतंत्रता, देवाचं ऐक्य, मानवांची समता व ऐक्य हे मुद्दे ब्राह्मो समाजाला पायाभूत होते म्हणून महर्षी वि. रा. शिंदे ब्राह्मसमाजी झाले. महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यानच्या काळात अस्पृश्यतेच्या निवारणासाठी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी संघर्ष केला. त्यांचे तत्कालीन महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी जगातील व भारतातील उदारधर्मविषयक चळवळीची व संस्थांची माहिती संग्रहित करणारी ‘थिईस्टीक डिरेक्टरी’ (१९१२) केली.

महर्षी शिंदे यांना जातिव्यवस्थेमुळे दलितांचं जगणं हलाखीचं झालं आहे याची जाणीव होती. त्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांनी १९०६मध्ये मुंबई इथं ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना केली. त्याअगोदर १८५१-५२ मध्ये महात्मा फुले यांनी ‘अतिशूद्रांना शिक्षण देणारी मंडळी’ म्हणून संस्था सुरू केली होती. महात्मा फुलेंच्या या शाळेचा पुढे सरकारी शाळेत समावेश करण्यात आला. महर्षी शिंदे यांनी ही शाळा व नाना पेठेत सात एकर जागा घेऊन ‘अहिल्याश्रम’ ही संस्था उभारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वानंतर या कार्याची गरज उरली नाही, हे लक्षात घेऊन पुढे १९२३ मध्ये या संस्थेतून ते मुक्त झाले. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नावर सखोल अभ्यास व चिंतन करून ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ लिहिला.

देशाच्या राजकारणाचं चित्र स्पष्ट होत होते, त्यावेळी त्यांनी ‘राष्ट्रीय मराठा संघ’ स्थापन केला. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकून ‘गांधी-नेहरूप्रणित काँग्रेसमध्ये जाण्याविषयी त्यांनी बहुजनांना सुचवलं. महात्मा गांधीचं नेतृत्व जाणून घेऊन ते स्वातंत्र्यलढ्यातही सामील झाले. १९३२ मध्ये त्यामुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षादेखील भोगावी लागली.

महर्षी शिंदे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या नोंदी या लेखसंग्रहातून रा. ना. चव्हाण करताना आढळतात. शिंदे यांनी स्थापन केलेल्या वाई ब्राह्मसमाजाविषयी केलेला पत्रव्यवहार या पुस्तकात छापला आहे, तोही महत्त्वाचा आहे. चव्हाण यांना महर्षींचा सहवास व साहचर्य लाभल्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा अन्वयार्थ मांडण्यात साक्षेप दिसून येतो.

चव्हाण यांनी आपल्या लेखांतून महर्षींचा मराठा समाजाबद्दल असलेला रोखठोकपणादेखील व्यक्त केला आहे. शिंदे अखेरपर्यंत ब्राह्मोसमाज व सत्यशोधक समाज यांच्या तत्त्वांना महत्त्व देत होते. त्यांच्या रूपानं व्रतस्थ जीवन जगणाऱ्या विचारवंत व सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शन हा लेखसंग्रह घडवतो.

या पुस्तकाच्या वाचनातून तत्कालीन सुधारणावादी, धार्मिक व राजकीय घटनांचं स्पष्टीकरण होतं. या पुस्तकाची परिशिष्टं अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करताना दिसतात. पुस्तक निर्मितीसाठी संपादकांनी परिश्रम घेतले आहेत.

.............................................................................................................................................

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २) - रा. ना. चव्हाण,

संपादक व प्रकाशक - रमेश चव्हाण, पुणे, मूल्य – ४५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4340

.............................................................................................................................................

लेखिका प्रा. लतिका जाधव वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स इथं अध्यापन करतात.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.         

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......