ओळख १०० भारतीय वनस्पती शास्त्रज्ञांची
ग्रंथनामा - आगामी
अ. पां. देशपांडे
  • ‘शंभर वनस्पती शास्त्रज्ञ’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 15 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama आगामी शंभर वनस्पती शास्त्रज्ञ अ. पां. देशपांडे मराठी विज्ञान परिषद

विज्ञानलेखक अ. पां. देशपांडे यांनी संपादित केलेले आणि पंडित पब्लिकेशन, सावंतवाडी प्रकाशित केलेले ‘शंभर वनस्पती शास्त्रज्ञ’ हे पुस्तक उद्या कुडाळ येथे मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाची ही प्रस्तावना...

.............................................................................................................................................

सध्या ५२ व्या वर्षात वाटचाल करणारी मराठी विज्ञान परिषद ही संस्था मराठीतून विज्ञान प्रसार करण्यासाठी नाना प्रकारचे कार्यक्रम करत असते. त्यात विज्ञान विषयांवर विविध भाषणे, परिसंवाद, वार्षिक अधिवेशने, मुले वयात येतात तेव्हा त्यांच्या शरीरात आणि मानसिकतेत घडून येणाऱ्या बदलांवर कार्यक्रम, गच्चीवर कुंड्या ठेवून त्यात घरगुती बारीक केलेला ओला कचरा घालून त्यावर भाज्या आणि फळे पिकवण्याचा कार्यक्रम, सौर ऊर्जेची उपकरणे बनवायला शिकवणे, घरगुती टाकाऊ वस्तूंचा वापर करून बनवलेल्या प्रारूपातून विज्ञान संकल्पना शिकवणे, पाठ्यपुस्तकातील संकल्पना समजण्यासाठी संकल्पना विकसन अभ्यासक्रम घेणे, विज्ञान संशोधन करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापकांना व विद्यापीठातील प्राध्यापकांना प्रोत्साहन देणे, मासिक विज्ञानपत्रिका व छोट्या पुस्तिका छापणे हे व इतर अनेक.

त्यातील एक आणखी महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दैनिकात सदर चालवणे. आजवर मध्यवर्ती संस्थेने व परिषदेच्या विभागांनी नाना वर्तमानपत्रांत अशी सदरे वर्षा-दोन वर्षासाठी चालवली. पण दै. ‘लोकसत्ता’त २००६ साली सुरू झालेले सदर ३१ डिसेंबर २०१७ रोजी बारावे वर्षे सलगतेने पुरे करत आहे. दरवर्षी वेगळा विज्ञान विषय घेऊन ३०-३२ लेखकांचा गट या सदरात वर्षभर जवळजवळ २५० लेख लिहितो. लोकसत्तेच्या संपादकांना हे सदर आवडते, कारण याला लाभणारी वाचकांची संख्या प्रचंड आहे.

ग्रामीण शाळात हे सदर रोज प्रार्थनेनंतर सार्वजनिकरीत्या वाचले जाते. बरेच विद्यार्थी याची कात्रणे काढून ती चिकट बुकात चिकटवतात. आयआयटी, पवई तेथील प्रा. श्याम आसोलेकर यांनी तर तीन वर्षांपूर्वी चालू असलेल्या रसायनशास्त्राच्या सदरातील चार लेख कापून आपल्याजवळ ठेवले आहेत. ते म्हणतात, ती माझ्या पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतात.

यापूर्वीची वैद्यक आणि अभियांत्रिकीवरील संपूर्ण सदरांची पुस्तके दोन प्रकाशकांनी प्रसिद्ध केली आहेत. संपूर्ण सदर नाही, पण त्याचा काही भाग या पुस्तकाच्या निमित्ताने प्रसिद्ध होत आहे, याचा मला आनंद होत आहे.         

वर्ष २०१६ सालचा विषय होता वनस्पतीशास्त्र. त्यात लिहिणाऱ्या लेखकांचे लेख तपासण्यासाठी तज्ज्ञ म्हणून प्रा. शरद चाफेकर, प्रा. चंद्रकांत लट्टू आणि प्रा. नागेश टेकाळे यांनी काम केले. या सदरात आम्ही फळझाडे, फुलझाडे, भाज्या, पिके, औषधी वनस्पती, वाळवंटी प्रदेशातील वनस्पती, पाणथळ जागेतील वनस्पती, डोंगर उतारावरील वनस्पती अशा नाना तऱ्हेच्या वनस्पतींची माहिती तर दिली आहेच, पण ४२ वनस्पतीशास्त्रज्ञांची माहितीही दिली. ही माहिती दर शुक्रवारी दिली. हे सगळे शास्त्रज्ञ भारतीय होते, तीनच अपवाद. गॅम्बल, कूक आणि गार्सिआ डा आर्टा या परदेशी शास्त्रज्ञांचा. पण त्यांची कारकीर्द भारतातच घडल्याने त्यांची चरित्रे यात समाविष्ट केली आहेत.

हे सदर कोकणातील कणकवलीचे निसर्गप्रेमी श्री. वामन पंडित नियमितपणे वाचत होते. त्यांनी चार वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानफुलांच्या माहितीसाठी छायाचित्रांची प्रदर्शने भरवली आहेत. हे प्रदर्शन भरवत असताना त्याला भेट देणाऱ्या लोकांसाठी ते निसर्ग, पर्यावरण आणि वनांविषयीच्या साहित्याचे अभिवाचनही करतात. त्यांनी ‘१०० वेलीफुले’ असे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याची पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्तीही बाजारात सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना या सदरात येणाऱ्या वनस्पतीशास्त्रज्ञांची माहिती पुस्तकरूपाने प्रकाशित करावी असे वाटले.

पण या सदरात फक्त ४२ चरित्रेच प्रसिद्ध झाली. वामन पंडित यांनी पूर्वी १०० वेलीफुलांचे पुस्तक प्रकाशित केल्याने त्यांना १०० वनस्पतीशास्त्रज्ञांची चरित्रे हवी होती. त्यांचा उत्साह एवढा होता की, त्यांनी याबाबत मला पहिले पत्र १ ऑगस्ट २०१६ रोजी लिहिले आणि वर्तमानपत्रातील सदर ३१ डिसेंबर २०१६ ला संपता त्यांना हे पुस्तक प्रसिद्ध करायची इच्छा होती. पण त्याला आम्ही कमी पडलो, कारण ही चरित्रे लिहिणारे जवळ जवळ सर्व लेखक निवृत्त झाले असले तरी निवृत्तीनंतर त्यांच्या अंगावर इतकी विविध कामे येऊन पडली आहेत की, ही १०० चरित्रे पुरी करता करता सप्टेंबर २०१७ उजाडला.

त्यानंतर १६, १७, १८ डिसेंबर २०१७दरम्यान वामन पंडितांच्या कणकवली गावाजवळच्या कुडाळ येथे मराठी विज्ञान परिषदेचे ५२वे वार्षिक अधिवेशन भरवायचे ठरले. ही चरित्र जशी या लेखकांनी लिहिली तशी या संपूर्ण प्रकल्पासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान विभागातील अधिकारी श्रमीती सुचेता भिडे यांनी खूप मोठे सहाय्य केले. त्यासाठी त्यांचे खास अभिनंदन आणि आभार. मराठीतील हे पुस्तक या क्षेत्रातील पहिलेच असल्याने अभ्यासक आणि वाचक त्याचे सहर्ष स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4426

.............................................................................................................................................

लेखक अ. पां. देशपांडे मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......