साक्षीभाव आणि तटस्थता असलेलं ‘रसाळ’ पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मोहिनी पिटके
  • ‘लोभस : एक गाव, काही माणसं’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ व मलपृष्ठ
  • Fri , 15 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama शिफारस लोभस – एक गाव काही माणसं Lobhas - Yak Gav kahi Manansa सुधीर रसाळ Sudhir Rasal राजहंस प्रकाशन Rajhans Prakashan

ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचं ‘लोभस : एक गाव, काही माणसं’ हे पुस्तक अलीकडेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. त्याचं हे रसग्रहण. आपल्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन परंपरांचा वारसा अभिमानानं जपणारा आणि तिथले मराठीभाषक यांच्याविषयीचं हे पुस्तक नावाप्रमाणेच ‘लोभस’ आहे.

.............................................................................................................................................

आयुष्य एका रेषेत कधीच चालत नाही. अगदी सामान्य माणसाचं आयुष्य घेतलं तरीही ते अनेक अतर्क्य, अनपेक्षित, कधीतरी सुबक तर बहुश: धक्कादायक वळणवाटांनी भरलेलं असतं. कुणी नात्याचे तर बरेचशे बिननात्याचे, तरीही दृढ बंधाने बांधलेले सखे सोबती भेटतात. कुणी गावातील, कुणी समविचारी, कुणी नवी वाट दाखवणारे... कुणी जगण्याचा अर्थ न सांगता आचरणातून उलगडून दाखवणारे... कुणी आपल्या बौद्धिक, सांस्कृतिक अस्मितांची जोपासना करून त्यांना डोळस वळण लावणारे. काहींमुळे जीवन ससुह्य होते आणि काहींमुळे असह्यही. पण आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक निश्चित घाट मिळतो. यात आपले आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक आणि आपल्याला चटका देणाऱ्या व्यक्तीही अंतर्भूत असतात.

पण ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या ‘लोभस : एक गाव- काही माणसं’ या रसाळ पुस्तकात अशा व्यक्तींचं चित्रण केलं आहे, ज्या व्यक्ती विद्वान, सुसंस्कृत, समाजशील आणि लोकाभिमुख आहेत. अशी व्यक्तिमत्त्वं आता विरळाच. माणसाच्या जीवनाची ही गोष्ट फक्त रंजकच नसते, तर मनुष्य स्वभावाचे कंगोरे पुढे ठेवणारी असते. आपला परिसर आपल्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग बनून जातो.

रसाळ मराठवाडा भागातील. त्यावेळी मराठवाडा निजाम अमलाखाली होता. इथले लोक म्हणायचे- ‘आम्ही दोन-दोन पारतंत्र्यात खितपत पडलो आहोत. एक ब्रिटिश सरकारचं आणि दुसरं निजामाचं.’ मा. नरेंद्र चपळगावकर यांनीही त्यांच्या ‘संस्थानातील माणसं’ या पुस्तकात अशीच भावना प्रकट केली आहे.

भाषा उर्दू, इस्लामी पोशाख, रीतीरिवाज इस्लामी. इथले लोक एका विचित्र संघर्षाला तोंड देत होते. ‘औरंगाबाद - महाराष्ट्रातली दिल्ली’ या लेखात ही परिस्थिती कथन केली आहे. हे शहर खरं सुधारलं ते हैद्राबाद अॅक्शननंतर. आता तर त्याचं मराठवाडेपण लोपलं आहे असं लेखक म्हणतात.

रफिक झकेरिया, बाबासाहेब परांजपे, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या अथक, सक्रिय प्रयत्नांचं फळ मराठवाड्याला मिळालं. पण औद्योगिक प्रगती नव्हती. त्यामुळे सांस्कृतिक प्रगती खुंटली. लो. टिळकांनी हैद्राबाद आणि औरंगाबाद इथं गणेशोत्सव सुरू केले. जे गणपती पूर्वीपासून बसवले जात असत, त्यांना परवानगी असे. तेव्हाचे विनोदी लेखक वा. य. गाडगीळ यांनी ‘कदीम गणपती आणि जरीद गणपती’ (पुरातन गणपती आणि नवा गणपती) असा विनोदी लेखच लिहिला होता.

शास्त्रीय संगीत, भाषणे यांचे कार्यक्रम सरकारकडून संमती घेतल्यावरच केले जाऊ शकत. कार्यक्रमाला सीआयडी हजर असे. आता औरंगाबाद कॉस्मॉपॉलिटन झालं आहे. आपल्या वडिलांविषयी लिहिताना रसाळ सांगतात की, त्यांना चित्र, संगीत, नाट्य, साहित्य, हॉकी या क्षेत्रांत फार रस होता. पण त्यात त्यांना फारसं काही करता आलं नाही. हस्ताक्षर, बासरीवादन, चित्रकला याही गोष्टी त्यांना आवडत. विद्यार्थ्यानं गादीवर झोपू नये, कोणतंही काम करण्यात कमीपणा मानू नये, असं त्यांचं मत होतं.

‘आगरकरी वळणाचे वडील’ असं रसाळ वडिलांविषयी म्हणतात. ते, वा.रा.कांत आणि वसंतराव धारवाडकर यांनी प्रतिभा प्रकाशन सुरू केलं आणि त्यातर्फे ‘रुद्रवीणा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्यांचे वडील शिक्षकी पेशाला व्रत मानत. मुलाला त्यांनी सांगितलं, ‘तू हा पेशा आपणहून निवडला आहेस. या व्रताचा भंग होऊ देऊ नको. पैशाच्या आणि उच्च पदाच्या मोहात पडू नकोस.’

अमोघ वक्तृत्व, विलक्षण खर्जातील घनगंभीर आवाज असणारे विद्वान, सुसंस्कृत भगवंतराव देशमुख यांच्याविषयी लिहिताना रसाळ एक बोलकं उदाहरण देतात. भगवंतरावांचा ‘आलोक’ हा ललितनिबंधसंग्रह शिकवायचा होता. रसाळ म्हणाले, ‘तुम्हीच तो शिकवा.’ पण भगवंतराव म्हणाले, ‘मी तो वस्तुनिष्ठपणे शिकवू शिकवू शकणार नाही.’ रसाळांनी शिकवताना काही त्रुटीही दाखवल्या. विद्यार्थ्यांनी भगवंतरावांकडे तक्रार केली. तरीही त्यांनी रसाळांचीच बाजू उचलून धरली. असे वरिष्ठ आणि शिक्षक विरळाच!

भगवंतराव अतिशय सावध विधानं करत. दोषदिग्दर्शनापेक्षा लेखनाची बलस्थानं शोधत. त्यांचा एक तास बुडाला तरी विद्यार्थी हळहळायचे.

रसाळांचे मित्र म्हणजे नाना, मा. नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. गो.मा.पवार. अशा समविचारी आणि मानसिक शिस्तीत काढलेल्या रसाळांचं व्यक्तिमत्त्व लोभस झालं. भाषेचा डौल, बाज, तिची शुद्धता या गोष्टींना आता काही महत्त्वच उरलं नाही. म्हणून आज जे हिंदाळलेलं आणि आंग्लाळलेलं मराठी आपण ऐकतो, त्याचा जाब विचारायला कुणी भगवंतराव उरलेले नाहीत.

म. भि. चिटणीस हे ग्रीक परंपरेतील शिक्षक होते, असं रसाळ म्हणतात. मराठी शिकवत असूनही इतर अनेक ज्ञानशाखांचे सखोल ज्ञान त्यांना होतं. त्याच्या साहाय्यानं आपल्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांगानं समृद्ध करण्याची त्यांची तळमळ आणि हातोटी अपूर्व होती.

दै. ‘मराठवाडा’चे अनंत भालेराव आपल्याभोवती मित्रनिष्ठांची मांदियाळी बाळगून होते. सत्यान्वेषी, प्रत्यक्ष मुलाशीही मतभेद झाले तरी आपल्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहणारे अनंतराव समाजप्रबोधनाचे व्रत घेतलेले पत्रकार होते.

उदारमतवादी नरेंद्र चपळगावकर, सौजन्यशील गो. मा. पवार यांच्याविषयी लिहिताना रसाळांची लेखणी विशेष खुलते. डॉ. पवार यांच्या विनोदाच्या मूलगामी स्वरूपाविषयीचं चिंतन अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

अगदी वा.लं.सारखे सुप्रतिष्ठ समीक्षक आपल्यातल्या शिक्षकाला विसरत नाहीत. ते म्हणत – ‘इतकी वर्षं शिकवतोय, पण प्रत्येक वेळी वर्गावर जाताना मी तणावाखाली असतो.’ प्राध्यापकाला असा ताण आवश्यक असतो. ज्ञानवंत असण्याचा आव आणता येत नाही. रसाळ त्यांच्या शिकवण्याला ‘कुलाचाराविधी’ असं म्हणतात. वर्षानुवर्ष त्याच त्या फाटक्या, जीर्णजर्जर झालेल्या नोटस काळजीपूर्वक वापरणाऱ्या व्यवहारी शिक्षकांची खेदपूर्वक आठवण होते. वा.लं. एखाद्या विषयावर शिकवून झाला की, त्या नोटस फाडून टाकत. नव्यानं अभ्यास, नवं चिंतन, नवी वाङ्मयसमज.

आणि आताचे तथाकथित फेबुवरचे कवी-लेखक औद्धत्यानं विचारतात- कोण केशवसुत? कोण कुरुंदकर, कोण मे. पुं. रेगे आणि कोण सोपानदेव चौधरी? अशा वेळी त्यांची किव करण्यावाचून आपण दुसरं काही करू शकत नाही.

पूर्वसुरींच्या खांद्यावर बसूनच आपलं नवं जग न्याहाळू शकतो. शिक्षक, लेखक, कलावंत, समाजप्रबोधनकार या सर्वांवर या पूर्वसुरींचं ऋण असते. ते मान्य करण्यात कसला कमीपणा आहे?

व्यक्तिचित्रण करताना लेखणीला स्वातंत्र्यही द्यावं लागतं आणि संयमही पाळावा लागतो. पण असं करताना सत्यापलाप होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. फक्त वैयक्तिक अनुभवातून तयार झालेली मतं प्रकट करणं योग्य नाही, हे स्वत:ला पटवावं लागतं.

साक्षीभावानं आणि तटस्थतेनं त्या व्यक्तीच्या गुणांचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. त्यात भक्तिभाव नसावा. त्या व्यक्तीचे दोषही आक्रमक, विखारी न होता दाखवता आला पाहिजे, पूर्वग्रह नसावेत. एकच व्यक्ती वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या व्यक्तींशी विविध पद्धतीनं रिअॅक्ट होत असते. पण व्यक्तिचित्रण करणाऱ्याला हे सगळे संवेदनशीलपणे टिपून घ्यावं लागतं. मन सहसंवादी ठेवावं लागतं.

सुधीर रसाळ यांच्या या पुस्तकाचं शीर्षक ही अन्वर्थक असंच आहे. माणसाची गुणग्राहकता आणि ऋजुता किती सर्वसमावेशक आहे, हे त्यांच्या लेखनातून कळतं. नीरक्षीरविवेक त्यांच्या लेखणीत किती आहे हे त्याच्या सादरणीकरणातून, शैलीतून शब्दकळेतून कळून येतं.

त्यांनी लिहिलेल्या व्यक्तींमध्ये काहीच उणेपण नाही असं नाही. पण त्यातूनही शेवटी मनावर ठसतं, ते त्यांचं उबदार स्नेहशील, संस्कारी, विद्याप्रेमी, अन्यायाचा सक्रिय सामना करण्याचं धाडस. इतिहास अशा माणसांनी घडत असतो. मानवी संस्कृतीचा प्रवाह गतिमान राहतो तो यांच्यामुळेच!

अस्सल वाङ्मयाभिरुची जपणारे, वाङ्मयाबद्दल नवा विचार मांडणारे, साहित्य व मानवी आयुष्य यांचं अतूट नातं आपल्या लिखाणातून, अध्यापनातून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणारे ज्ञानव्रती या पुस्तकात पाहायला मिळतात.

हे पुस्तक तपशीलवार असलं तरी फापटपसारा नाही. त्यातला ‘मी’ बळेबळे घुसवला गेलेला नाही. तो सहजच लिखाणात येतो. नेटकं, नेमकं लिखाण असं या पुस्तकाबद्दल म्हणता येईल.

आपला प्रदेश, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती यांविषयी उत्कट प्रेम असणारे आणि ती कळकळ सामान्य लोकांत संक्रमित करणाऱ्या या व्यक्ती आहेत.

अशा व्यक्तींचं आपल्यावर मोठंच ऋण असतं. त्यातून उतराई होण्याचं मनातही आणू नये. या ऋणातच राहण्यातच सुख असतं. वय वाढतं आणि मग मागे वळून पाहताना उमगतं की, आपलं आयुष्य श्रीमंत करणारी ही माणसं हे आपलं ‘गोत’ आहे. मनाच्या तारा अशा ठिकाणी झंकारून उठतात, अगदी त्यांच्या आठवणीसुद्धा आयुष्यावरची आपली श्रद्धा पुनर्स्थापित करण्यासाठी पुरेशा असतात.

लेखकाला हे विशालहृदयी समंजस मैत्र फार मोलाचं वाटतं. माणसांशी जडणाऱ्या अशा बंधापेक्षा अधिक महत्त्वाचं ते काय!

 या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4294

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......