गुजरातमध्ये भाजप भयग्रस्त आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सुस्त!
पडघम - गुजरात निवडणूक २०१७
धनंजय कर्णिक
  • नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी
  • Mon , 11 December 2017
  • पडघम गुजरात निवडणूक २०१७ Gujarat Elections 2017 नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi भाजप BJP काँग्रेस Congress

गुजरात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागेपर्यंत काँग्रेस पक्षात मरगळ आलेली होती. परंतु गुजरातचं वातावरण तापू लागलं आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व लोकांमध्ये झिरपू लागलं. त्यानंतर भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्या. खरं तर भाजपचा थिंकटँक या बाबतीत सतत सजग असतो. त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत ‘शहजादा ते पप्पू’ अशी राहुल गांधी यांची टिंगलटवाळी सोशल मीडियातून सातत्यानं केली. त्याच राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेची दखल घेऊन त्यांना आपल्या व्यूहरचनेत आणि कार्यपद्धतीत बदल करणं भाग पडलं. व्हॉटस्अॅप, ट्विटर आणि फेसबुकवरची त्यांची भाषा बदलू लागली आणि एक नवी चर्चा सुरू झाली. ती चर्चा पारंपरिक माध्यमांच्या आधारे न केली जाता, व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमातून संदेश फिरवून केली जाऊ लागली. त्यात सर्वांत लक्षणीय संदेश होता की, ‘आहे का पर्याय, मोदींना?’ मग त्या नावात बदनामीचे धनी झालेले लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग, नीतिशकुमार अशांची नावे घेऊन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांचा मोदींना पर्याय कसा होऊ शकत नाही, अशी चर्चा सुरू केली गेली. ही चर्चा केली जाण्याला काही कारण नव्हतं.

मोदींची लोकप्रियता तोपर्यंत आकाशाला गवसणी घालणारी आहे, असा आभास निर्माण करण्यात भाजपची प्रचार यंत्रणा यशस्वी ठरलेली होती. परंतु अचानक त्यांच्या या भूमिकेला छेद देणाऱ्या घटना घडू लागल्या. मोदींच्या सभांना प्रचंड गर्दी होत असल्याच्या बातम्या पेरल्या जाऊ लागल्या. पण सोशल मीडियावर मात्र लोक सभा सोडून जात असल्याच्या क्लिप्स व्हायरल होऊ लागल्या होत्या. राहुल गांधी यांच्या भाषणाच्या क्लिप्स आतापर्यंत विनोद निर्माण करण्यासाठी वापरल्या जात होत्या, त्याच आता लोक गंभीरणे पाहू लागल्याचं भाजपच्या लक्षात येऊ लागलेलं होतं. भाजपच्या गोटात भयशंका तयार होण्याची ती सुरुवात होती.

आता मोदींना काँग्रेसवर हल्ला करण्यासाठी एक मुद्दा हवा होता. तो मणिशंकर अय्यर यांनी पुरवला. वास्तवात त्यांचं विधान मोदींची फार नालस्ती करणारं नाही. ते जे काही बोलतात, ज्या पद्धतीनं सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडतात त्याचा विचार केला तर ‘नीच किस्म का आदमी’ हे मोदींचं वर्णन त्यांनी फार मनाला लावून घेण्यासारखं नाही, परंतु हात-पाय आपटायला, आकांडतांडव करायला आणि आपल्या जातीच्या हीनपणाचा मुद्दा उचलून धरून सहानुभूती मिळवायला जर कोणी साधन शोधत असेल तर हे उत्तम कारण होतं.

राहुल गांधी यांना गुजरातमध्ये मिळणारा प्रतिसाद हा भाजपच्या नेत्यांना अस्वस्थ करण्यासाठी पुरेसा आहे. काँग्रेसला गुजरात निवडणुकीत कितपत यश मिळेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. परंतु एक गोष्ट नक्की आहे की, भाजपचा पाय सध्या खोलात आहे. नेते सैरभैर झालेले आहेत. राजकोटमध्ये मुख्यमंत्री रुपाणीच्या मोटारसायकल रॅलीची लोकांनी ज्या प्रकारे हुर्यो केली, त्यावरून कोणत्याही राजकीय पक्षाच्या पोटात धस्स होईल, अशी स्थिती आहे.

या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं शून्यापासून सुरुवात केली. कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यापासून ते जिल्ह्याजिल्ह्यांत, तालुक्यातालुक्यांत साधनसुविधा पोहोचवण्यापासून सर्वच गोष्टी त्यांना प्राथमिक स्तरापासून कराव्या लागल्या. भाजपची इलेक्ट्रॉनिक मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत घडी बसलेली होती. त्यामानानं काँग्रेस पक्षाची तयारी काहीच नव्हती. खूप उशीरा काँग्रेसनं आपला आयटी सेल कार्यान्वित केला. त्यांनीही सावकाश, परंतु विचारपूर्वक भाजपच्या प्रचार तंत्राला उत्तर द्यायला सुरुवात केली. 

राहुल गांधी अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांच्या तिथल्या भाषणाची खिल्ली उडवण्याचा नेहमीचा भाजप प्रचारयंत्रणेचा प्रयत्न फारसा जमला नाही. याचं कारण राहुल गांधी यांनी आपल्या भाषण करण्याच्या पद्धतीत बदल केलेला होता. त्यांची देहबोलीही लक्षात येण्याइतपत बदलली होती. परंतु हा त्यांच्यात झालेला बदल त्यांच्या पक्षातील लोकांना कितपत पेलणारा आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे.

आपल्या प्रचाराच्या भाषणात मोदींवर कोणत्याही प्रकारची पातळी सोडून टीका केली जाणार नाही, याची खबरदारी जरी राहुल गांधी घेत असले तरी तशी काळजी भाजपच्या नेत्यांकडून घेतली जाण्याची सुतराम शक्यता नाही, नव्हती. त्यातून भरीस भर म्हणून भयकंपित झालेला काहीही करून समोरच्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतो, तसाच काहीसा प्रकार भाजपकडून घडू लागल्याचं दिसतं. तरीही त्यांनी सोनिया गांधी यांची अवहेलना करणारी वक्तव्यं नव्यानं केली केली नाहीत. पण राहुल गांधी त्यातून वाचू शकले नाहीत. त्यांच्या धर्माचा मुद्दा भाजपेयींनी जोरात लावून धरण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फुसका ठरला हा भाग वेगळा. परंतु त्या वादाच्या दरम्यान नेहरू हे मुस्लिम होते. त्यांनी काश्मीर शेख अब्दुल्ला यांना आंदण दिलं. सोनिया गांधी या मुळात इटालियन माफियाशी संबंधित होत्या, अशा स्वरूपाच्या संदेशांचा प्रसार करण्याचा परिपाठ भाजपच्या आणि विशेषतः रा.स्व.संघाच्या लोकांनी सोडला नाही.

राहुल गांधी यांना मिळणाऱ्या प्रतिसादानं भाजपचे लोक किती अस्वस्थ झाले याचा अंदाज त्यांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, उत्तर प्रदेशातील मंत्री आणि महाराष्ट्रातील साधनसामग्री यांचा जो ओघ गुजरातकडे वळवला गेला त्यावरून कळू शकतं.

याउलट काँग्रेसनं आपल्या नेत्यांना या काळात गप्प बसवण्याची खबरदारी घेतली. महाराष्ट्रातून ज्यांना गुजरातेत पाठवलं, त्यापैकी बहुतेक सर्व मवाळ प्रकृतीचे होते. ज्यांनी स्वतः होऊन जायला हवं अशांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. परंतु ते परंपरेनं कातडीबचाऊ असल्यानं ते गुजरातकडे फिरकलेही नाहीत. शिवाय तिथं हाती घबाड लागण्याची शक्यताही नव्हती. सातवांनी तिथं मार खाल्ल्यानंतरही तोंड उघडलं नाही, हे लक्षणीय आहे.

गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्यं अनेक वर्षांपासून मुळात एकच होती. ती १९६० साली वेगवेगळी झाली. परंतु त्यांच्यातील सांस्कृतिक दुवे अद्याप होते, तसेच आहेत. त्यामुळे तिथं जे काही घडतं, त्याचे पडसाद इथं महाराष्ट्रात उमटतात. कदाचित त्याचा उलटा प्रवास होतही नसेल. परंतु महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात एकतरी गुजराती मूळ सांगणारं कुटुंब असतं. महाराष्ट्रातील सहकाराची चळवळ उभी करण्यात वैकुंठभाई मेहतांसारखा माणूस गाडगीळ आणि विखे पाटलांच्या बरोबरीनं राबला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेण्याची गरज आहे. याचं कारण तिथं होणाऱ्या निवडणुकांचा विचार इथल्या काँग्रेस पक्षाला आतापासून करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांना फार अवकाश नाही. हां हां म्हणता कर्नाटकातील निवडणुका येतील. तिथली काँग्रेसची तयारी बरीच बरी आहे. 

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ ही संपूर्ण देशात काँग्रेस पक्षावर आलेल्या किंकर्तव्यमूढतेचंच प्रतिबिंब आहे. आपापसातील भांडणं तर गेली तीस-चाळीस वर्षं त्याच पातळीवर चालू आहेत. त्यातील मोहरे कदाचित बदललेले असतील. त्या काळातील दादा गट, निष्ठावंतांचा सवतासुभा किंवा दरबारी राजकारणाची परंपरा हे सर्व यथायोग्य व पूर्वीच्याच पद्धतीनं सुरू आहे. त्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा संघटनद्वेषी माणूस राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तब्बल पाच वर्षं ‘लाभल्या’नं संघटना उभी राहण्याची जी काही शक्यता होती, तीही संपुष्टात आलेली आहे. अशोक चव्हाण यांना कसं आणि कोणत्या खड्ड्यात घालता येईल याचं नियोजन करण्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेचून एकेका नेत्याला नेस्तनाबूत कसं करता येईल, याची आखणी करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आपला सारा वेळ वाया घालवलेल्या माणसाला आजही राज्याच्या राजकारणात ठेवण्यात काय औचित्य आहे, हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला अनाकलनीय आहे.

गुजरात राज्यात काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे, हे जसजसं स्पष्ट होऊ लागलं तसतसे बासनात बांधून ठेवलेले बंद गळ्याचे कोट बाहेर येऊ लागले. पृथ्वीराज चव्हाण यांचा राहुल गांधी यांच्या बरोबरचा फोटो सोशल मीडियावर झळकल्यानंतर तर काँग्रेसचा गुजरातमध्ये विजय हा क्षितिजावर दिसू लागल्याची चुणूक होती. असे अनेक मोहरे सातव वगैरे सारख्यांना बाजूला सारून आता पुढे सरसावतील. मार खायला तुम्ही आणि मलिदा खायला आम्हीच. कारण काय तर माझे आईबाप कै. इंदिराजींच्या पायावर लोळण घेत असत आणि राज्यातील इतर काँग्रेस नेत्यांचं खच्चीकरण करत असत. हीच माझी खानदानी कमाई. या भांडवलावर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष उभारण्याची मनिषा बाळगली जात राहिल तोपर्यंत, काँग्रेसचं काही खरं नाही.

.............................................................................................................................................

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जे काही केलं, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करावीच लागेल. ते करताना तिथं जसं जुन्या आणि जाणत्या काँग्रेसी मुरब्बी नेत्यांना दूर ठेवून प्रचारयंत्रणा राबवली, तशीच रणनीती इथंही राबवावी लागेल. त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागेल. इथंही लोकांच्या मनात नाराजी आहे. शेतकरी हताश झालेला आहे. नोटाबंदीनं घायाळ झालेला आहे. शेतमालाच्या भावाचा प्रश्न सुटलेला नाही. तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्न आ वासून उभा आहे. फडणवीसांची गाजरं संपत आलेली आहेत. याचा सर्वंकष विचार विरोधी पक्षांनी म्हणजे ‘कायमस्वरूपी आपणच सत्तेत राहू’ अशा भ्रमात राहणाऱ्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना करावाच लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतं, त्याचे पडसाद देशभरात उमटतात, याचं भान गेल्या सरकारच्या काळात सुटलेलं होतं. कारण मुख्यमंत्री मराठी नाव असलेले, परंतु हयात महाराष्ट्राच्या राजकारणाबाहेर घालवलेले होते. त्यांची नाळ दिल्लीतच पुरलेली होती. त्यांना सरळ करावं लागेल. मतदारांना विश्वासात घ्यावं लागेल. भाजपच्या आश्वासनातला फोलपणा लोकांसमोर मांडावा लागेल. मुख्य म्हणजे लोकांशी नव्यानं संवाद प्रस्थापित करावा लागेल. अन्यथा महाराष्ट्रातील मतदार त्यांना माफ करणार नाहीत. अगदी गुजरातमध्ये भाजपनं मार खाल्ला तरीही.

.............................................................................................................................................

लेखक धनंजय कर्णिक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

dhananjaykarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......