स्वतःला ठामपणे प्रस्थापित करत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मानसी होळेहोन्नुर
  • ‘निळ्या दाताची दंतकथा’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 17 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama मराठी पुस्तक निळ्या दाताची दंतकथा Nilya Datachi Dantakatha प्रणव सखदेव Pranav Sakhadeo

प्रणव सखदेव हे नाव खूप जणांकडून ऐकलं होतं. मराठीतला नव्या दमाचा, नवे काही प्रयोग करणारा लेखक म्हणून. त्यामुळे उत्सुकता होती. त्यातूनच ‘मी निळ्या दाताची दंतकथा’ हा कथासंग्रह वाचायला घेतला. माझ्या मते कथासंग्रह हा प्रवासात वाचायला सोपा प्रकार. म्हणजे तुम्ही एक कथा वाचून, त्यातून बाहेर पडून दुसरी कथा परत वाचू शकता. कादंबरीतून असं लगेच बाहेर पडता येत नाही. कादंबरी निवांत पचवायची असते, त्यावर विचार करायचा असतो. रवंथ करतात तसं! त्यामुळे मी हा कथासंग्रह एका प्रवासात वाचायला घेतला. पूर्ण प्रवासात या निळ्या दातानं मला उत्तम साथ दिली.

जेव्हा मी ‘निळ्या दाताची दंतकथा’ वाचायला घेतला, तेव्हा प्रणव सखदेव या व्यक्तीबद्दलची माझी पाटी पूर्ण कोरी होती. याचा मला वाचताना अर्थातच फायदा झाला. नऊ कथा असलेल्या या संग्रहात प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीची आहे. प्रत्येक विषय वेगळा, त्यातली वातावरण निर्मिती वेगळी आहे. प्रणव खूप छान आजचे संदर्भ, आजचे विषय घेत कथा रंगवतो. लेखन आजच्या काळातलं असलं तरीही त्यात अति इंग्रजीचा वापर नाही. आजीच्या गोष्टी जशा एकातून दुसरी हलकेच फुलत येते, तशाच आहेत प्रणवच्या गोष्टी. म्हणजे वाचताना आपण काही आडाखे बांधत असतो, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळंच समोर येतं आणि आपण अवाक होतो. 

‘हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा’ ही या संग्रहातली पहिली कथा. नावावरून अंदाज बांधता येतो, कथेत काय असेल याचा. आणि कथा त्याच मार्गानं जाते. आपला आडाखा चुकत नाही. आजच्या काळात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही, तिथं आपली ओळख तरी कशी शाबूत राहील? पण मुळात प्रश्न आहे आपली ओळख म्हणजे काय? फोन नंबर, नाव, पत्ता, बँकेची माहिती, आवडीनिवडी सगळंच एका चुटकीसरशी उपलब्ध होऊ शकतं. त्यामुळे जर आपली ओळखही चोरली गेली तर त्यात नवीन काय आहे? भविष्यात होऊ घातलेल्या या वास्तवावर प्रणवनं ‘आजच’ लिहिलं आहे. 

‘पंख असलेल्या माणसाची गोष्ट’ ही गोष्ट सायफाय किंवा मिथक म्हणावी असा मला प्रश्न पडला. देव, दानव यांच्याबद्दलच्या आपल्या धारणांचा नव्यानं विचार करायला लावते ही गोष्ट. ‘कतरा कतरा जिते हैं लोग’ मात्र इतर कथांपेक्षा वेगळी आहे. म्हणजे कौटुंबिक कथेसारखी, पण तरीही स्वतःचं वेगळेपण दाखवणारी. 

‘शे उ वा ची अखेरची गोष्ट’ म्हणजे जणू आपल्यालाच कोणीतरी भविष्याचा आरसा दाखवत आहे अशी आहे. शेवटच्या उरलेल्या वाघाची ही  गोष्ट, पण शेवटच्या उरलेल्या कोणत्याही प्राण्याची. त्यात प्रामाणिक माणूस, विचारी माणसू अशा दुर्मीळ होत चाललेल्या प्राण्यांची गोष्ट म्हणूनसुद्धा सांगता येईल. 

यातल्या इतर कथांचा उल्लेख किंवा त्याबद्दल लिहिलं नाही याचं साधं कारण म्हणजे त्या मला तितक्याशा भावल्या नाही.

संग्रहाचं नाव असलेली ‘निळ्या दाताची दंतकथा’ ही कथा मला सगळ्यात जास्त आवडली आणि बराच काळ डोक्यात घुमत राहिली. ही कथा मला खरं तर लघुघु कादंबरी वाटते (लघु कादंबरी किंवा दीर्घ कथा ६०-७० पानांची तरी असते, पण ही कथा २७ पानांची आहे म्हणून लघुघु कादंबरी. या कथेचा आवाका खूप मोठा आहे.). हिटलरच्या जर्मनीपासून सुरू होणारी ही गोष्ट थेट आपल्या दारापर्यंत कधी येऊन पोहोचते कळत नाही. मुळात जागतिकीकरणानं देशादेशांमधल्या भिंती कधीच गळून पडल्या आहेत. एका देशाच्या अस्थिरतेचे परिणाम फक्त त्या देशापुरते उरलेले नाहीत. ते शेजारच्याच नव्हे तर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असणाऱ्या देशावरही होऊ लागले आहेत. त्यामुळे ‘निळ्या दातांची दंतकथा’ ही फक्त दंतकथा राहत नाही. (इथं दंतकथेवर श्लेष केला आहे. दाताची कथा आणि ज्या गोष्टीचं मूळ माहीत नाही, पण तरीही खरी वाटते ती कथा.). 

प्रणवच्या गोष्टी त्यामुळेच मला फक्त एका वर्गासाठीच्या, एखाद्या काळासाठीच्या वाटल्या नाहीत. त्या ही सगळी परिमाणं ओलांडून स्वतःला ठामपणे प्रस्थापित करत स्वतःची ओळख निर्माण करतात.  

ज्या दिवशी मी पहिल्यांदा या कथा वाचत होते, तेव्हाच मी एका स्त्री लेखिकांच्या परिसंवादाला गेले होते. त्यातल्या इंग्रजीमधून लिहिणाऱ्या काही लेखिकांचा अभ्यास, मतं बघून मला हसूच आलं. आणि त्याच वेळी हेही जाणवलं की, प्रादेशिक भाषांमध्ये खूप दर्जेदार साहित्य लिहिलं जात आहे. वेगळा विचार करण्याचं आणि ते मांडण्याचं स्वातंत्र्य, धाडस या भाषांमध्ये आहे. पण दुर्दैवानं ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हे समृद्ध साहित्य अनुवादित झालं नाही तर फक्त एकाच भाषेत अडकून पडतं. 

प्रणव जसा इतर भाषांमधलं साहित्य अनुवाद करून मराठीत आणतो, तसंच त्याच्या कथा, साहित्य इतर भाषांमध्ये जावं, यासाठी त्याला शुभेच्छा.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2523

.............................................................................................................................................

लेखिका मानसी होळेहोन्नुर या कायम वाचक आणि अधूनमधून लेखिका आहेत.

manasi.holehonnur@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......