‘श्यामची आई’ - गेली ८० वर्षे मराठी जनमानस प्रभावित करणारे पुस्तक
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
राम जगताप
  • ‘श्यामची आई’ची मुखपृष्ठे
  • Fri , 03 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama बुक ऑफ द वीक Book of the Week श्यामची आई Shyamchi Aai साने गुरुजी Sane Guruji

साने गुरुजींच्या आई यशोदाबाई यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता काल, २ नोव्हेंबर रोजी झाली. साने गुरुजींनी आपल्या या आईच्या स्मृती ‘श्यामची आई’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केल्या आहेत. ‘श्यामची आई’मधील श्याम म्हणजे स्वत: साने गुरुजी. प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात – “गेल्या शंभर वर्षांत असे पुस्तक झाले नाही… मराठी जनमानसावरील ‘श्यामची आई’ या पुस्तकाइतका दुसऱ्या कुठल्याही पुस्तकाचा प्रभाव मराठी मनावर झाला नाही…” अशा या अलौकिक पुस्तकाची ही निर्मितीकथा.

.............................................................................................................................................

‘पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे, आठवावे आणि वाटावेही’ अशी साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या केली आहे. ती त्यांच्या सर्वच लेखनाला लागू पडते. त्यातही गुरुजींचे सर्वांत आवडते पुस्तक होते, ‘श्यामची आई’. या पुस्तकाला तर ही व्याख्या अगदीच समर्पक आणि यथायोग्य वाटते.

साने गुरुजींनी आपल्या उत्तर आयुष्यातील १९३० ते १९५० या वीस वर्षांपैकी तब्बल सहा वर्षं सहा महिने हा काळ धुळे, नाशिक, जळगाव आणि येरवडा येथील तुरुंगात काढला. याच काळात त्यांनी बरेचसे लेखन केले. १७ जानेवारी १९३२ ते ऑक्टोबर ३३ हे एकवीस महिने गुरुजी नाशिकच्या तुरुंगात होते. तिथेच त्यांनी दररोज रात्री आपल्या सहकाऱ्यांना आधी आईच्या आठवणी सांगितल्या. मग त्यांच्या आग्रहावरून त्या लिहून काढल्या. ते पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’. या पुस्तकातील ३६ रात्री साने गुरुजींनी ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी १९३३ या पाच दिवसांतल्या चार रात्रींत लिहून काढल्या. उरलेल्या नऊ रात्री मात्र त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर लिहिल्या. मात्र पुस्तक करताना त्यातील तीन रात्री त्यांनी वगळून फक्त ४२ रात्रींचेच पुस्तक केले. त्या तीन रात्रींमध्ये कोणत्या आठवणी होत्या, हा प्रश्न कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा आहे. पण त्याविषयी गुरुजींनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि इतरत्रही काहीही खुलासा केलेला नाही. 

साने गुरुजींचे नाव पांडुरंग असले तरी त्यांचे घरगुती नाव पंढरीनाथ होते. पण त्यांना स्वत:ला मात्र ‘राम’ हे नाव अधिक आवडत असे. पुढे ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिताना गुरुजींनी ‘श्याम’ हे नाव घेतले. कारण त्यांच्या आईचे नाव ‘यशोदा’ होते. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी याविषयी एके ठिकाणी नमूद केले आहे. पुढे ‘श्याम’ या नावानेच गुरुजींनी इतरही काही लेखन केले. 

‘श्यामची आई’चे हस्तलिखित साठ-सत्तर लोकांनी वाचले, ऐकले, असे साने गुरुजींनीच लिहिले आहे. त्यातले एक होते यशवंतराव चव्हाण. दयार्णव कोपर्डेकर यांचा गुरुजींशी चांगला परिचय होता. साने गुरुजींनीच कोपर्डेकरांचे लग्न ठरवले होते. हे कोपर्डेकर आणि यशवंतराव चव्हाण शालेय मित्र. चव्हाणांची कोपर्डेकरांनी साने गुरुजींशी ओळख करून दिली होती. दयार्णव कोपर्डेकर ‘सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला’च्या प्रचारासाठी फिरते विक्रेते म्हणून काम करत होते. जळगाव, इंदूर, देवास, उज्जन, रतलाम, बडोदे, सोलापूर, अकोला, अमरावती अशा अनेक ठिकाणी फिरून त्यांनी पुस्तकांची विक्री केली होती. कोपर्डेकरांनी आपले ‘श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशित करावे, अशी साने गुरुजींची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हस्तलिखिताच्या वह्या कोपर्डेकरांकडे दिल्या. त्या त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना ‘हे पुस्तक प्रकाशित करावे का?’ यासाठी वाचायला दिल्या. त्याविषयी चव्हाणांनी लिहिले आहे, ‘‘श्यामची आई वाचत असताना अनेक वेळा माझे डोळे पाणावून आले... साने गुरुजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथंबून गेलेले व आईच्या प्रेमाने ओसंडून चाललेले होते.’’ चव्हाणांनी कोपर्डेकरांना हे पुस्तक त्वरेने प्रकाशित करण्याची सूचना केली, पण काही कारणाने कोपर्डेकरांना ते शक्य झाले नाही. 

मग, ‘श्यामच्या आई’ची पहिली आवृत्ती अमळनेरच्या जगन्नाथ गोपाळ गोखले यांनी प्रकाशित केली. त्यावर दासनवमी शके १८५७ असा उल्लेख आहे. किंमत आहे एक रुपया. या पुस्तकाचे मुखपृष्ठही गुरुजींच्या नागेश पिंगळे या विद्यार्थ्यांने तयार केले आहे. या पुस्तकावर मात्र पां. स. साने असा उल्लेख आहे. हे पुस्तक अमळनेरहून प्रकाशित झाले असले तरी त्याची छपाई मात्र पुण्यातल्या लोकसंग्रह छापखान्यात झाली.

‘श्यामची आई’ प्रकाशित झाल्यावर काही महिन्यांनीच गुरुजींच्या ‘पत्री’ या कवितासंग्रहावर इंग्रज सरकारने बंदी आणली. हा संग्रह पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या लोकसंग्रह छापखान्याने छापला होता. त्यामुळे त्यांच्याकडे इंग्रज सरकारने दोन हजार रुपयांचा जामीन मागितला, तो त्यांनी भरलाही. पण आपल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला नाहक भुरदंड बसला, याचे साने गुरुजींना फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे सर्व हक्क ५०० रुपयांमध्ये अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकण्याचा निर्णय घेतला. 

१६ ऑक्टोबर १९३६ रोजी झालेला हा करार मोठा मजेशीर आहे. अनाथ विद्यार्थी गृहाने गुरुजींना पुस्तकावर दहा टक्के मानधन देण्याची तयारी दाखवली होती, पण ते त्यांना नको होते. म्हणून मग गुरुजींना कराराच्या आधी ५० रुपये आणि उरलेले ४५० रुपये करार झाल्यानंतर दिले. पण त्याच वेळी संस्थेला देणगी म्हणून गुरुजींकडून १०० रुपये घेण्यात आले. म्हणजे त्यांच्या हातात अवघे ४०० रुपयेच पडले. त्याबदल्यात गुरुजींनी ‘श्यामच्या आई’चे तहहयात हक्क देऊन टाकले. त्यात भाषांतराच्या हक्काचाही समावेश होता. हा करार करून गुरुजी घरी आले खरे, पण त्यांना खूप वाईट वाटले. आपले अतिशय आवडते पुस्तक त्यांना नाइलाजास्तव विकावे लागल्याची निराशा त्यांना लपवता आली नाही. हताशपणे ते सहकाऱ्यांना म्हणाले, ‘आज मी माझ्या आईला विकून आलो’. 

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

मराठीमधले रांगा लावून लोकांनी विकत घेतलेले पहिले पुस्तक म्हणजे लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’. ‘गीतारहस्य’ विक्रीसाठी तयार असल्याची जाहिरात १५ जून १९१५ च्या ‘केसरी’च्या अंकात प्रकाशित झाली. ती वाचून सकाळपासूनच लोकांनी केसरी वाड्यासमोर रांगा लावल्या. ‘गीतारहस्या’ची सहा महिन्यातच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. तेव्हापासून या ग्रंथाचे गेली १००हून अधिक वर्षे सातत्याने पुनर्मुद्रण होत आहे.

विनोबा भावे यांनी १९३० मध्ये ‘गीताई’ लिहिले. ‘गीताई’च्या १९३२ पासून आतापर्यंत जवळपास अडीचशे आवृत्त्या निघाल्या, सुमारे ५० लाख प्रती विकल्या गेल्या. विनोबांनीच १९३२ मध्ये धुळ्याच्या तुरुंगात ‘गीता प्रवचने’ दिली, ती साने गुरुजींनी लिहून घेतली. त्याचे पुस्तक १९४५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाच्याही आत्तापर्यंत ४०हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय देशी-परदेशी मिळून पंचवीसेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्या सर्वांचा विचार केला तर या पुस्तकाच्या सुमारे पंचविसेक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. 

क्लिक करा - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

.............................................................................................................................................

या तीन पुस्तकानंतर आवृत्त्या, विक्री आणि प्रभाव या तिन्ही बाबतींत ‘श्यामची आई’चा नंबर लागतो. आजवर ‘श्यामची आई’च्या साठहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्याचा हिंदी अनुवाद १९४० मध्येच झाला. त्यानंतर दोन इंग्रजी अनुवाद झाले. त्यातला एक पुणे विद्यार्थी गृहाने प्रकाशित केला तर दुसरा भारतीय विद्या भवनने. याशिवाय कानडीमध्येही अनुवाद झाला. ‘चित्ररूप श्यामची आई’ ही कॉमिक्स आवृत्तीही प्रकाशित झाली. डॉ. मु. ब. शहा यांनी ‘संवादरूप श्यामची आई’ लिहिले तर प्रभाकर ठेंगडी यांनी ‘श्यामची आई’चे नाट्यरूपांतर केले.

‘श्यामची आई’च्या पहिल्या आवृत्तीवर दासनवमी शके १८५७ असे छापलेले असल्याने ही आवृत्ती १९३५ सालीच प्रकाशित झाली, असा ढोबळ अंदाज केला जातो आणि तोच गृहीत धरला जातो. अनाथ विद्यार्थी गृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केल्यावर पहिल्या आवृत्तीचे साल १९३५ असेच छापले. ते अजूनही तसेच छापले जाते. खरी गोष्ट अशी आहे की, शके आणि इसवीसन या दोन कालगणनांमध्ये ७८ वर्षांचा फरक असतो. पण शके ही भारतीय कालगणना असल्याने त्याच्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये होते. त्यामुळे शकेच्या सालामध्ये इंग्रजी महिन्यांचा मार्च-एप्रिल ते मार्च-एप्रिल हा काळ येतो. मग दासनवमी शके १८५७ चे इसवीसनामध्ये अचूक वार, तारीख, महिना आणि साल काय येईल, याचा साने गुरुजींची पुतणी सुधा बोडा यांनी बराच शोध घेतला. त्यांनी जुन्या पंचांग तज्ज्ञांकडून सारे पडताळून घेतले, तेव्हा ‘श्यामची आई’ची अचूक तारीख १६ फेब्रुवारी १९३६ आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे चालू वर्ष ‘श्यामची आई’चे ८१ वर्ष आहे. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3344

.............................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......