तळवलकर यांचा तुच्छतावाद
दिवाळी २०१७ - तळवलकर : एक मूल्यमापन
निखिल वागळे
  • पत्रपंडित गोविंदराव तळवलकर
  • Sat , 21 October 2017
  • दिवाळी २०१७ गोविंद तळवलकर Govind Talwalkar महाराष्ट्र टाइम्स Maharashtra Times

१९९६ साली तळवलकर ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून निवृत्त झाले. त्यानंतर हा लेख दै. ‘महानगर’मध्ये प्रकाशित झाला होता. त्यामुळे या लेखातील काही संदर्भ त्यावेळचे आहेत, याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती.

.............................................................................................................................................

‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवलकर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृतपणे निवृत्त झाले आहेत. तीन दशकांहून अधिक काळ तळवलकर यांचा या वृत्तपत्राशी संबंध होता. त्यांपैकी २७ वर्षं ते संपादकपदी होते, तर शेवटचं एक वर्षं त्यांनी ‘सल्लागार संपादक’ म्हणून काम पाहिलं. एक प्रकारे हा विक्रमच असावा. वृत्तपत्राची मालकी स्वतःकडे नसताना २७-२८ वर्षं संपादकाची खुर्ची सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. अख्ख्या देशात अशी उदाहरणं क्वचितच आढळतील. या कामगिरीबद्दल तळवलकरांचं अभिनंदन केलं पाहिजे. तळवलकरांनी एवढी वर्षं संपादकपद कसं टिकवलं, त्यासाठी त्यांना काय-काय करावं लागलं हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. तो इथं अभिप्रेत नाही; पण २७ वर्षांनंतर मराठीतल्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्राचा संपादक निवृत्त होत असताना त्याच्या कारकिर्दीचं विश्लेषण होणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे निवृत्तीच्या वेळी गुणगौरवपर लेख लिहिले जातात, जुन्या दिवसांच्या आठवणी काढल्या जातात. हे करण्यासाठी बरीच माणसं तळवलकरांच्या अवतीभोवती उपलब्ध आहेत. त्यापेक्षा तळवलकरांनी या तीन दशकांच्या काळात मराठी पत्रकारितेला काय दिलं, मराठी वाचकांवर कोणता ठसा उमटविला याचं विश्लेषण झालं, तर पत्रकारितेतल्या पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग होईल.

गोविंद तळवलकर यांच्या संपादनाविषयी बोललं जातं, तेव्हा प्रामुख्यानं त्यांच्या अग्रलेखांचा आणि इतर लेखनाचा उल्लेख होतो. तळवलकरांच्या वाचनाविषयी कुतूहलमिश्रित कौतुकानं चर्चा होते. सार्वजनिक समारंभात फारसं न मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावामुळेही त्यांच्याभोवती एक वलय निर्माण झालं आहे. अग्रलेख लिहिणं हा तळवलकरांच्या विशेष आवडीचा विषय दिसतो. ‘लोकसत्ता’ दैनिकात त्यांनी पत्रकारिता सुरू केली. तेथे पहिल्याच दिवशी अग्रलेख लिहिण्याची कामगिरी संपादक ह.रा.महाजनींनी त्यांच्यावर सोपविली. तळवलकरांना या गोष्टीचं विशेष कौतुक आहे. त्यांच्या आजवर झालेल्या दोन्ही प्रकट मुलाखतींत याचा उल्लेख त्यांनी केला आहे. अग्रलेख लिहिण्याची ही हातोटी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादकपद स्वीकारल्यावर तळवलकरांच्या कामी आलेली दिसते. त्यांच्या अग्रलेखावर फिदा असणारा एक मोठा वाचकवर्ग महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांत निर्माण झाला आहे. तळवलकरांच्या अग्रलेखांची भाषा, त्यांची शेरेबाजी-टोमणेबाजी, भल्याभल्यांच्या त्यांनी उडविलेल्या टोप्या; याबरोबरच समरसून लिहिलेल्या त्यांच्या मृत्यूलेखांवरही हा वाचक बेहद्द खूश आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर नव्यानं घडलेल्या मध्यमवर्गाला तळवलकरांनी आपल्या या खमंग शैलीची चटक लावली होती.

त्यांच्या वाचनाचं प्रतिबिंबही त्यांच्या लिखाणात पडलेलं दिसतं. हे वाचन एका ठरावीक परिघात फिरणारं असलं तरी पु.ल.देशपांडेच्या पलीकडे न गेलेल्या मध्यमवर्गाच्या दृष्टीनं अफाटच होतं. ‘लंडन टाइम्स’, ‘इकॉनॉमिस्ट’सारखी नियतकालिकं या मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेरची होती. त्यामुळे या वर्गाला युरोपातली ही नियतकालिकं वाचणारा मराठी वृत्तपत्राचा संपादक थोर वाटला तर नवल नाही! तळवलकरांच्या आधी शैलीदार लिहिणारे संपादक झाले नव्हते असं नाही. अगदी टिळक, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर, शिवरामपंत परांजपे यांच्यापासून आचार्य अत्र्यांपर्यंत अनेकांना ही शैली लाभली होती. तळवलकरांच्या आधीचा काळ गाजविणार्‍या ह.रा.महाजनी, पां.वा.गाडगीळ, प्रभाकर पाध्ये यांचीही स्वतंत्र शैली होती; पण तळवलकर उठून दिसत होते ते त्यांच्या मुंबईतल्या समकालीनांमध्ये. र.ना.लाटे, विद्याधर गोखले, माधव गडकरी यांच्या तुलनेत तळवलकरांची शैली निश्चितच उजवी होती, हे कुणीही मान्य करील.

याच काळात महाराष्ट्रात इतरत्र अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, बाबा दळवी, रंगा वैद्य यांच्यासारखे संपादक आपापली कारकीर्द गाजवीत होते. यांपैकी अनंत भालेरावांना तर खास शैली लाभली होती. पत्रकारितेत येण्यापूर्वी ते राजकीय कार्यकर्ते होते आणि संतपरंपरेचा वारसा त्यांच्याकडे होता. साहजिकच महाराष्ट्राच्या अस्सल मातीला येणारा गंध त्यांच्या शैलीत जाणवायचा; पण हे सर्व संपादक होते जिल्ह्या-तालुक्याच्या ठिकाणी. तळवलकरांच्या भक्त बनलेल्या शहरी मध्यमवर्गाला त्यांचं सोयरसुतक नव्हतं. तळवलकरांचे अग्रलेख वाचकप्रिय झाले, ते या पार्श्वभूमीवर.

पुन्हा शैलीदारपणात हा वाचक इतका वाहवत गेला की, अग्रलेखाचा आत्मा असलेला मूलभूत विचार शोधण्याच्या भानगडीत तो पडलाच नाही. तळवलकरांच्या तीन दशकांतल्या अग्रलेखांत प्रामुख्यानं आढळते ती तत्कालीन घटनांवरची, व्यक्तींवरची खमंग प्रतिक्रिया. स्वतंत्र विचाराचा शोध घेतला तर हाती फारसं काही लागत नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर लिहिताना तळवलकर नेहमीच ‘टाइम्स’चे संपादक श्यामलाल आणि गिरिलाल जैन यांच्या छायेत वावरलेले दिसतात. ते स्वतःला ‘रॉयवादी’ म्हणवत असले तरी राज्यातल्या घटनांविषयी-व्यक्तींविषयी लिहिताना त्यांनी जोपासला तो निखळ तुच्छतावाद. या तुच्छतावादाचं मध्यमवर्गाला कायम आकर्षण वाटत आलं आहे. स्वतःच बनविलेल्या हस्तिदंती मनोर्‍यात बसायचं आणि जगातल्या घटनांवर शेरेबाजी करीत राहायची, ही मध्यमवर्गीय मानसिकता तळवलकरांनी मोठ्या खुबीनं जोपासली; म्हणूनच प्रतिगामी आणि पुरोगामी अशा दोन्ही प्रकारच्या मध्यमवर्गीयांना तळवलकरांचं आकर्षण कायम वाटत आलं आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले माझ्यासारखे अनेक तरुण तळवलकरांच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ बरोबर वाढलेले आहेत. या वर्गाला सकाळी चहाच्या टेबलापुरतं वृत्तपत्र लागतं आणि तेवढ्या चर्चेपुरता त्यातला अग्रलेखही असतो. जोपर्यंत मध्यमवर्गीय जाणिवांच्या कोठडीत तुम्ही बंदिस्त असता, तोपर्यंत तळवलकर हे तुम्हाला थोर संपादक वाटत असतात. एकदा का मध्यमवर्गीय जाणिवा गळून पडल्या आणि बाहेरच्या जगाची कवाडं उघडली की, तळवलकरांच्या लिखाणातला भुसभुशीतपणा, झापडं लावलेला त्यांचा दृष्टिकोन लक्षात येऊ लागतो. तळवलकरांचं कसब हे की, त्यांनी आपल्या बहुसंख्य वाचकवर्गाला मध्यमवर्गीय जाणिवांच्या कोठडीतून बाहेरच पडू दिलं नाही. त्यामुळे तळवलकरांचं वैचारिक विश्व हेच या मध्यमवर्गीयांचं विश्व झालं. तळवलकरांनी लेखणीचे फटकारे मारायचे आणि स्वतःच्याच कोशात गुरफटलेल्या वाचकांनी टाळ्या पिटायच्या असा क्रम ठरून गेला. सतत तीन दशकं हा खेळ केल्याबद्दल मात्र तळवलकरांचं अभिनंदन केलं पाहिजे. गुंगीचं हे औषध देण्याची कला सर्वच संपादकांना साधते असं नाही.

तळवलकरांच्या संपादकीय कारकिर्दीचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे कसोटीच्या वेळेला गारठून जाणं. लढाईचा प्रसंग आला की, तळवलकरांची लेखणी म्यान झाली म्हणून समजा. एरवी भल्याभल्यांना फटकारणारी ही लेखणी सत्तेच्या बडग्यापुढे वाकलेली पहिल्या दशकातच दिसली. अणीबाणीच्या काळात आविष्कार स्वातंत्र्याच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. तेव्हा आमचे बाणेदार तळवलकर बिनकण्याचे ठरले. पत्रकाराची कसोटी अशा निर्णायक क्षणीच लागत असते, असं मी मानतो. दुर्दैवानं तळवलकर या कसोटीला उतरू शकले नाहीत. आणीबाणीनंतर त्यांनी ‘आयुष्यभराची खंत’ असा लेख लिहून आपल्या मध्यमवर्गीय वाचकांची माफी मागून टाकली! या वाचकांनीही आपल्या आवडत्या संपादकाला माफ करून टाकलं! खरी गोष्ट ही की, या मध्यमवर्गीय वाचकांपैकी बहुसंख्य जण या कसोटीच्या वेळी असेच कोशात गेलेले होते. कदाचित त्यामुळेच तळवलकरांचा हा बुळबुळीतपणा त्यांना खटकला नाही. कदाचित म्हणूनच आज वीस वर्षांनंतर तळवलकरांच्या मनात या प्रश्नाबद्दलही तुच्छता दाटली असावी. पंधरवड्यापूर्वी ‘ग्रंथाली’तर्फे झालेल्या त्यांच्या प्रकट मुलाखतीत त्यांनी ती व्यक्त केली.

तळवलकरांनी लिहिल्याप्रमाणे ही आयुष्यभराची खंत असती तर एवढी मगरुरी प्रकट झाली नसती. पण तळवलकर म्हणाले, ‘तुम्ही आणीबाणीत काय केलंत, हा प्रश्न मला विचारणारे ९० टक्के लोक त्या वेळी सुखानं नोकर्‍या करीत होते.’ तळवलकरांनी यावेळी अनंत भालेराव यांच्या एका पत्राचाही उल्लेख केला. ‘तुमच्यावतीनं मी तुरुंगात गेलो आहे, वृत्तपत्र चुकीच्या माणसाच्या हाती सोपवून तुम्ही तुरुंगात येण्याची काही गरज नव्हती,’ असं पत्र अनंतरावांनी लिहिल्याचं तळवलकर म्हणाले. ‘यापेक्षा मोठ्या सर्टिफिकेटची मला गरज नाही’ असंही त्यांनी तुच्छतेनं सांगितलं. ऐकणाऱ्यांचा असा समज झाला की, अनंतरावांनी तळवलकरांना तुरुंगातून पत्र लिहिलं; पण वस्तुस्थिती अशी आहे की, तळवलकरांचा लेख प्रसिद्ध झाल्यावर अनंतरावांनी हे पत्र लिहिलं आहे. पुन्हा खासगी असलेलं हे पत्र तळवलकर आपल्या वृत्तपत्रात छापूनही मोकळे झाले. (सभ्यतेचा डांगोरा ते नेहमी पिटत असतात म्हणून हा उल्लेख आवश्यक आहे.) अनंतरावांनी पत्र पाठवलं, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला. आपल्या एका मित्राचं सांत्वन करण्याची भूमिका त्यामागे आहे. तळवलकर त्याला सर्टिफिकेट मानतात, ही त्यांच्या तुच्छतावादाची पराकोटी म्हणायला हवी.

आणीबाणीमध्ये तुरुंगात न जाताही अनेकांनी विचारस्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. पण तेही करायचं तळवलकरांनी नाकारलं. शंकरराव चव्हाणांनी दम दिल्यावर अग्रलेखाच्या जागी ते बातम्या छापू लागले. आणीबाणीविरुद्ध झगडणारी देशातली अनेक वृत्तपत्रं त्या वेळी निषेध म्हणून कोरी जागा ठेवत होती हे लक्षात घेण्यासारखं आहे; म्हणजे आपल्या मर्यादांच्या चौकटीतही तळवलकरांनी लेखनस्वातंत्र्यावरच्या आघाताचा प्रतिकार करायचं नाकारलं. अशा संपादकांना प्रतिष्ठितपणाची झुल मिळते, हा मध्यमवर्गीय ढोंगीपणाचाच भाग झाला.

कुंपणावर बसण्याची ही कला तळवलकरांनी तीन दशकांच्या आपल्या कारकिर्दीत वारंवार प्रदर्शित केली. बाबरी मशीद पडल्यानंतरची त्यांची भूमिका पाहा. निकराचा प्रतिकार करण्याची ही वेळ आहे, असं त्यांना वाटलेलं दिसत नाही. फॅसिस्ट प्रवृत्तीचा निषेध करण्याचा आपण प्रयत्न केला असं ते आपल्या निरोपाच्या लेखात म्हणतात; पण या प्रयत्नाची धार किती परिणामकारक होती हे सांगत नाहीत. अयोध्येतल्या घटनांनंतर मुंबईत झालेल्या दंगलीत मध्यमवर्गीयांचा मोठा सहभाग होता. जो वाचकवर्ग आपण तीन दशकं उदारमतवादाच्या बैठकीवरून घडवला त्यानं असं वागावं? हा तळवलकरांना आपला पराभव वाटत नाही काय? एकीकडे ‘सामना’ आणि ‘नवाकाळ’सारखी वृत्तपत्रं दंगली भडकावण्याचं काम करत होती आणि दुसरीकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’सारखं उदारमतवादी वृत्तपत्र निष्प्रभ ठरलं होतं. हा इतिहास ताजा आहे. अशा कसोटीच्या वेळेलासुद्धा तुमचा वाचकवर्ग काही भूमिका घेणार नसेल तर तुमच्या लेखणीचा उपयोग काय, असा प्रश्न तळवलकरांना विचारला तर ते तुच्छतापूर्वक हसण्यापलीकडे काही करू शकणार नाहीत.

‘महाराष्ट्र बुद्धिवादी आहे असं मला वाटत नाही; कारण हिटलरचं तत्त्वज्ञान सांगणार्‍या पुढार्‍यांच्या पाठीशी गर्दी होते आहे’ असंही तळवलकर या मुलाखतीत म्हणाले! तीन दशकं संपादक म्हणून बुद्धिवादी परंपरा जोपासण्याचं तुमचं कर्तव्य नव्हतं काय, असा प्रश्न यावर विचारता येईल. हिटलरचा विचार सांगणारे पुढारी वाढविण्यामागे ही कुंपणावरची भूमिका कारणीभूत आहे. तळवलकर त्यामधून सुटू शकत नाहीत. ठाकरे आणि शिवसेना मोठी होण्यात महाराष्ट्रातल्या तळवलकरांसारख्या तथाकथित उदारमतवाद्यांचा मोठा हातभार लागला आहे. ‘महानगर’वरच्या हल्ल्याच्या वेळचा तळवलकरांचा अनुभव तर मी विसरू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ते या आविष्कारस्वातंत्र्याच्या लढाईत उतरायला तयार नव्हते. उलट, राज्याराज्यांतून आलेल्या प्रतिष्ठित संपादकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी काही काळ केलं. शेवटी, आपलं काही चालत नाही हे पाहून, निखिल चक्रवर्तींसारखे ज्येष्ठ पत्रकार आल्यावर ते त्यात सामील झाले. वारं कुठच्या बाजूला आहे, हे पाहून कुंपण सोडण्याची मध्यमवर्गीय वृत्ती तळवलकरांनी इथंही दाखविली आहे.

तळवलकरांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की, प्रबोधनाच्या हेतूनं आपण पत्रकारितेत आलो नाही. हौस म्हणून या व्यवसायात आलो. तीन दशकं संपादक म्हणून काढल्यावर एका प्रतिष्ठित संपादकानं इतक्या उथळपणे बोलावं ही महाराष्ट्रातल्या आजच्या पत्रकारितेची शोकांतिका आहे. आपल्या लिखाणाचे राजकीय, सामाजिक परिणाम काय होत आहेत याचा हिशोब मांडण्याचा प्रयत्न तळवलकरांनी गेल्या तीन दशकांत एकदाही केला नाही यावर कोण विश्वास ठेवील? आता मी प्रबोधन करतो, असं म्हणून कुणी लिखाणाला बसत नाही; पण लिखाण करताना अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्याचा संपादकाचा प्रयत्न असतो. अधिकाधिक वाचकांना आपले विचार पटावेत असं त्याला वाटत असतं. हा सगळा केवळ हौसेचा भाग असं म्हणायचं असेल तर एकपात्री करमणुकीचे प्रयोग करणारा कलावंत आणि संपादक यात फरक उरत नाही.

कदाचित, याच भूमिकेतून तळवलकरांनी महाराष्ट्रातल्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळींचा दुस्वास करण्याची भूमिका घेतली असावी! कार्यकर्ता म्हटला की, अंगावर पाल पडल्यासारखे भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटायचे. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या लिखाणातही सतत पडलं. एकीकडे एसेम जोशींसारख्यांना आदरस्थानी ठेवायचं आणि दुसरीकडे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना हिणकस वागणूक द्यायची हा दुटप्पीपणा तळवलकरांनी सतत केला. गेल्या तीन दशकांत महाराष्ट्रात अनेक चळवळी झाल्या. बाबा आढावांचा ‘एक गाव एक पाणवठा’, युक्रांदची विविध आंदोलनं, अंधश्रद्धाविरोधी चळवळ, गेल्या दीड दशकातली नामांतराची चळवळ अशा अनेक चळवळी सांगता येतील. बहुजन समाजाला नवी क्षितिजं याच काळात गवसली; पण तळवलकरांच्या लेखणीमुळे यांपैकी किती चळवळींना चालना मिळाली, हे शोधलं तर हाती फारसं काही लागत नाही. गेल्या दशकात जगभर मानवी हक्कांच्या आणि पर्यावरणाच्या चळवळीनं मूळ धरलं आहे; पण तळवलकरांनी नेहमीच्या पद्धतीनं या दोन्ही चळवळींना तुच्छतापूर्वक वागणूक दिली आहे. मेधा पाटकर यांच्या उपोषणाच्या काळात त्यांच्या भूमिकेविषयी गैरसमज पसरविणारे अग्रलेख लिहिताना त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. गिरणी कामगारांचा लढा याच दशकात झाला आणि कोसळून पडला; पण कामगारांची दुःखं जाणून घ्यावीत असं तळवलकरांच्या लेखणीला कधीही वाटलं नाही. या प्रश्नांवर जाताजाता त्यांनी अग्रलेख जरूर लिहिले, पण ब्रिटनमधल्या किंवा रशियातल्या घटनांविषयी लिहितानाची त्यांची आपुलकी त्यात कधी दिसली नाही.

हेच सांस्कृतिक चळवळीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. ‘ग्रंथाली’च्या सुरुवातीच्या काळात या चळवळीची चेष्टा करण्यावरच तळवलकरांचा भर असे. ग्रामीण भागातून नव्यानं लिहू लागलेल्या तरुण लेखकांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात तळवलकरांनी प्रोत्साहन दिल्याचं दिसत नाही. हेच दलित साहित्याबद्दल म्हणता येईल. या लेखकांना पुलंचं प्रशस्तिपत्र मिळाल्यावर किंवा त्यांची थोडीफार प्रसिद्धी झाल्यावर तळवलकरांनी त्यांना स्थान दिलं. तेवढा उदारमतवाद आणि मध्यमवर्गीय पुरोगामीपणा त्यांच्याकडे निश्चितच होता!

तळवलकरांनी आपल्या निवृत्तीच्या मुलाखतीत मराठी साहित्याविषयी अत्यंत हिणकस उद्गार काढले. ‘आपण गंभीरपणे विचार करावा या लायकीचं अलीकडचं मराठी साहित्य नाही,’ असं ते म्हणाले. तीन दशकं संपादक असणार्‍या एका मराठी वृत्तपत्राच्या संपादकाची ही भूमिका असेल तर मराठी साहित्याला कोण वाचू शकणार? खरी गोष्ट आहे की, गेल्या वीस वर्षांतलं मराठी साहित्य तळवलकरांच्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या पलीकडचं आहे. ‘सत्यकथे’च्या त्यांच्या कंपूच्या पलीकडे घडलेली ती घटना आहे. त्यामुळे तळवलकर ती समजू शकत नाहीत. त्यांना पु.ल.देशपांडे किंवा ना.धों.महानोर यांच्याबद्दल वाटतं, तेवढं प्रेम नामदेव कांबळे किंवा उत्तम बंडू तुपेबद्दल वाटू शकत नाही; कारण कांबळे किंवा तुपे ही माणसं त्यांच्या परिघाबाहेरची आहेत. तळवलकरांनी पोसलेल्या मध्यमवर्गीय वाचकाला आपल्या शोकेसपुरतीच ती मर्यादित वाटतात.

तळवलकर आणि त्यांच्या बरोबरच्या साहित्यिक कंपूनं केलेलं हे सांस्कृतिक राजकारण नव्या मराठी साहित्यालाच नव्हे, तर मराठी भाषेलाही मारक आहे. या राजकारणात पुलंना देवपण किंवा शिरवाडकरांना संतपण बहाल करणं बसतं; पण बहुजन समाजातल्या लेखकाला हात देणं बसत नाही. पु.ल. आणि शिरवाडकरांचं अनाठायी स्तोम माजविण्याचा गुन्हाही तळवलकरांच्या कंपूनं केला आहे. या स्तोमातूनच पु.लं.चे पुतळे उभे राहतात आणि शिरवाडकरांच्या चरणी लोक लोटांगण घालतात; पण त्यांच्या साहित्याचं निष्पक्षपाती विश्लेषण करण्याचं काम होत नाही. मराठी साहित्य जगायचं असेल तर हे विश्लेषण कुणीतरी केलं पाहिजे. पु.ल. हे मराठीतले सर्वश्रेष्ठ साहित्यिक नाहीत किंवा शिरवाडकर अनंत काळापर्यंत थोर कवी राहू शकत नाहीत हे सांगितलं पाहिजे; पण देव्हारे माजविण्याची हौस असलेल्या आपल्या मध्यमवर्गीय वाचकाला ही गोष्ट तळवलकर कशाला सांगतील? याच मध्यमवर्गानं आपली मुलं इंग्रजी शाळेत पाठवून मराठी भाषेचा गळा घोटण्याचं काम केलं आहे; पण त्याविरुद्ध निकराचा आवाज उठविण्याचं काम तळवलकरांच्या सांस्कृतिक कंपूनं कधीही केलेलं नाही; कारण या कंपूतल्या लोकांच्या ते सोयीचं नाही. या पांढरपेशा बुद्धिजीवींना हे काम दुसर्‍याच्या घरातून सुरू व्हावंसं वाटतं, स्वतःच्या घरातून नव्हे.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

तळवलकरांच्या निवृत्तीच्या निमित्तानं एक परिसंवाद शिवाजी मंदिरच्या शाहू सभागृहात अशोक मुळे यांनी आयोजित केला होता. खरं तर, एखाद्या संपादकाच्या कारकिर्दीविषयी असा परिसंवाद व्हावा हा त्या संपादकाचा बहुमान आहे; पण तळवलकरांनी या परिसंवादालाही आक्षेप घेतला आणि संयोजकांनी ऐनवेळी परिसंवादाचा विषय बदलला; ‘वृत्तपत्रात संपादकांची मनमानी असते का?’ असा थातुरमातुर विषय ठेवला; पण उपस्थित वक्त्यांपैकी सर्व जण तळवलकरांना केंद्रबिंदू मानूनच बोलले. डॉ. मंगला आठलेकर यांनी तळवलकरांच्या मराठी साहित्याविषयीच्या विधानाबद्दल आक्षेप घेतला आणि सडेतोड टीका केली. कुमार केतकरांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नेहमीच्या भूमिकेप्रमाणे औचित्य (!) सांभाळत माझ्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या मुद्द्याशी सहमती दाखविली.

पण कमाल केली ती य.दि.फडके यांनी. अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी तळवलकरांच्या वकिलाची भूमिका पार पाडली. तळवलकर हे अग्रलेखक म्हणून कदाचित यशस्वी असतील, पण संपादक म्हणून त्यांचं योगदान काय, असा माझा प्रश्न होता; कारण गेल्या तीन दशकांत एक व्यंगचित्रकारही या संपादकानं घडविला नाही. किती लेखकांशी चर्चा केली, किती जणांच्या लिखाणावर संस्कार केले, हा तर संशोधनाचा विषय ठरावा. अग्रलेखापलीकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’ची जी काही प्रतिष्ठा आहे, ती तळवलकरांच्या सहकार्‍यांची कामगिरी आहे. कदाचित य.दिं.ना माझं हे विश्लेषण बोचलं असावं. त्यांनी तळवलकरांच्या संग्राहक वृत्तीचा उल्लेख केला; का तर तळवलकर लिखाणासाठी डॉ. फडक्यांना फोन करतात! आपल्या कंपूतल्या लोकांशी संपर्क ठेवला म्हणून तळवलकर संग्राहक ठरत असतील तर त्या इतका मोठा विनोद दुसरा नाही. य.दिं.नी टिळक-आगरकरांच्या मर्यादांचा उल्लेख करून तळवलकरांच्या मर्यादांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. वक्त्यांना टोमणे मारताना ते आपल्या इतिहासाच्या वाचनाचा वारंवार उल्लेख करत होते. इतिहासाचं वाचन आणि संशोधन हा य.दिं.चा पूर्ण वेळेचा व्यवसाय आहे. त्यांनी तो प्रामाणिकपणे केला एवढाच निष्कर्ष त्यातून निघू शकतो. पुन्हा वाचन ही काही य.दि.फडके यांची मक्तेदारी नाही. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास पुनःपुन्हा वाचल्यानं तळवलकरांवरच्या आक्षेपाचं निराकरण कसं होणार हे समजू शकत नाही. अर्थात, य.दिं.नी तळवलकरांची वकिली करावी यात आश्चर्य मात्र नाही. उदारमतवाद्यांचा हा कंपू एकमेकांच्या प्रतिष्ठा सांभाळत असाच वाढला आहे. य.दिं.नी तळवलकरांच्या वाचनाचं कौतुक करायचं, तळवलकरांनी आपल्या मुलाखतीत य.दिं.चा उल्लेख करायचा आणि दोघांनी मिळून श्री.पु.भागवतांची पाठ थोपटायची! म्हणूनच मग ‘चित्रमय स्वगत’सारखं अत्यंत भंकस पुस्तक श्री.पुं.नी काढल्यावर तळवलकर काही बोलत नाहीत आणि य.दिं.नाही इतिहास आठवत नाही.

महाराष्ट्राचं वैचारिक विश्व संकुचित करणार्‍या पांढरपेशा उदारमतवाद्यांची ही टोळी आणखी किती काळ प्रतिष्ठितपणे वावरणार आहे, एवढाच प्रश्न माझ्यासमोर आहे. तळवलकर तीस वर्षं या टोळीचे म्होरके होते. आपल्या सोयीच्या चर्चा या सर्वांनी मिळून घडविल्या आणि तोच महाराष्ट्र आहे असं आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला. तळवलकरांच्या निवृत्तीनंतर तरी या टोळीचं साम्राज्य संपेल अशी आशा आहे.

निवृत्तीसाठी तळवलकरांना शुभेच्छा!

.............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

????? ???????

Sat , 11 November 2017

निखिलजी वागळेंनी मांडलेले अनेक मुद्दे गोविंद तळवळकरांवर टिका करणारे असले तरी अनेक ठिकाणी वागळेंनी तर्काचा किंवा काही तथ्यांचा आधार दिलेला आहे. त्यामुळे वागळेंच्या टिकेचे खंडनही तर्क वापरूनच करावे लागेल, वागळेंचे मुद्दे खोटे आहेत हे दाखवणारी तथ्ये सांगावी लागतील. वागळेंबाबत अपमानास्पद शेरेबाजी करून टिकेचे खंडन करता येणार नाही. उदा. वागळेंच्या लेखातील खालील भाग लक्षात घ्या-- >> तळवलकर हे अग्रलेखक म्हणून कदाचित यशस्वी असतील, पण संपादक म्हणून त्यांचं योगदान काय, असा माझा प्रश्न होता; कारण गेल्या तीन दशकांत एक व्यंगचित्रकारही या संपादकानं घडविला नाही. किती लेखकांशी चर्चा केली, किती जणांच्या लिखाणावर संस्कार केले, हा तर संशोधनाचा विषय ठरावा. अग्रलेखापलीकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’ची जी काही प्रतिष्ठा आहे, ती तळवलकरांच्या सहकार्‍यांची कामगिरी आहे. << आता जर कुणाला ह्या टिकेचे खंडन करायचे असेल तर तळवळकरांनी संपादकाच्या भूमिकेतून काम करताना किती लेखकांशी चर्चा केली, किती जणांच्या लिखाणावर संस्कार केले हा तपशील दिला पाहिजे. तो देता येत नसेल तर वागळेंची टिका वाजवी,साधार आहे असे मानावे लागेल.


Ram Jagtap

Mon , 23 October 2017

@ Tula V - तारखांचा घोळ हा तांत्रिक प्रॉब्लेम आहे. अक्षरनामा संपादक मंडळ कुठल्याही कमेंट संपादित करत नाही आणि डिलीट तर अजिबात करत नाही. आणि स्वतः कमेंट करण्याइतकी वाईट अवस्था अजून तरी आमच्यावर आलेली नाही. लोक ज्या भाषेत आणि जसे व्यक ्त होतात, त्यातून त्यांचा वकुब, व्यासंग आणि प्रगल्भता आपोआपच जाहीर होत असते, त्यासाठी अक्षरनामाच्या संपादक मंडळाला काही करायची गरज पडत नाही. - राम जगताप, संपादक, अक्षरनामा


Tuks V

Mon , 23 October 2017

Korda, gedekar, dholane यांनी केलेल्या कमेंट्सची तारिख jan 17, dec16 अशी लेखाच्या तारखेच्या आधिची कशी ? लेख तर आॅक्टोबर २०१७ चा आहे ना ? अक्षरनामानेच ते कमेंट स्वत: लिहिलेत का ? Positive comment पण आहेत दाखवायला ?


Tuks V

Mon , 23 October 2017

कल्पना करा, १० वी ला बोर्डात गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा त्याच्या शाळेने सत्कार समारंभ ठेवला आहे. व त्यात त्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाची माहिती देणारे भाषण करण्याची जबाबदारी जर त्याच शाळेतील १० वीत सर्व विषयांत नापास झालेल्या अत्यंत द्वाड, वाया गेलेल्या विद्यार्थ्यावर सोपावली. तर काय होईल ? तो द्वाड विद्यार्थी काय हुशार विद्यार्थ्याने केलेल्या कष्टाची माहीती देईल, की सूडबुद्धीने, जळफळाटाने हुशार विद्यार्थ्याची थट्टा उडवेल ? नक्कीच थट्टा ऊडवेल, व स्वत:मध्ये जे गुण ( की दुर्गुण ?) आहेत ते हुशार विद्यार्थ्यात कसे नाहीत हे दाखवायचा प्रयत्न करेल. जसे की हा हुशार विद्यार्थी सिगरेट ओढू नाय शकत, बियर नाय पित, रस्त्यावर मारामरी करायची यांत धमक नाय, पोरीला प्रपोज करायची हिंमत नाय याला वगैरे वगैरे. आता अश्या भाषणावर लोक हसतील कदाचीत, पण त्यामुळे हुशार विद्यार्थ्याचे क्रेडिट कमी होणार नाही तर ढ विद्यार्थ्याची अक्कल कळेल व त्याच्या मूर्खपणावर हसतील लोक. तर तळवलकरांवर टिका करणारया लोकांना पाहून ढ आणि हुशार विद्यार्थ्याचा प्रसंग आठवतो. एका बाजूला पत्रकारितेची दैदिप्यमान कारकिर्द असलेले लोकांचे लाडके तळवलकर जे जवळजवळ २५ वर्षे मटाचे संपादक होते व वयाच्या ७० वर्षापर्यंत पत्रकारीतेत होते तर दुसरया बाजूला असे टिकाकार जे बरेचदा बिनकामाचे असतात, ज्यांनी त्याच्या कारकिर्दीत टुकार मासिके चालवली. असे काही लोक तळवलकरावर टिका करतात. टिका करणे चालेल ते लोकशाहीत असायलाच पाहिजे. पण टिका करताना पातळी सोडून टिका करू नये. ते करायचे असल्यास पहिले स्वत:ची पात्रता काय आहे हे तपाहून पाहावे. JRDTataचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. There is always a way of doing things gracefully. If you want to do something then do it with dignity. त्यामुळे तळवलकरांवर टिका करणारया नापास पत्रकारांनी टिका gracefully कशी करावी हे पहिले शिकावी. ऊगाच सूडबुद्धीने जातीद्वेषातून कोणा व्यक्तीवर टिका होऊ नये. तळवलकरांनी त्याच्यावरील टिकेला तेव्हाही फारशी किंमत दिली नाही. व ते आत्ता असते तरी त्यांनी अश्या नापासांच्या टिकेकडे दुर्लक्षच केले असते. कारण त्यांना कदाचित हि इंग्रजी म्हण माहीत होती Never get into fight with pig, you both will get dirty but pig enjoys it. नापासांना पास होण्यासाठी शुभेच्छा ! Happy Diwali ! Happy new year


ADITYA KORDE

Mon , 23 October 2017

उर्जिता ह्याना, निखिल वागळे सध्या काय करतात?... प्रश्न खडुस वाटला तरी तसे ते नाही... प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवण्याची शिक्षा मिळाली त्यांना...हे भयानक नाहीका ? ज्या गोष्टीबद्दल खंत आणि हळहळ व्यक्त करायची त्याबद्दल उलट टोमणे मारणे हे सभ्यतेच्या कुठल्या चौकटीत किंवा नैतिकतेत बसते?


GHANSHAM GEDEKAR

Mon , 23 October 2017

उर्जिताची प्रतिक्रिया आणि मोदी भक्तांची प्रतिक्रिया यांच्यात फरक काहीच नाही. मुद्दे सोडून टीका वा भाष्य करणाऱ्याच्या व्यक्तिमत्वावर शिंतोडे उडविणे, हीच त्यांची बुद्धिमत्ता आहे.


manoj dholane

Mon , 23 October 2017

Chhan lekh.......Vaghalencha swagat..........lekhatil matashi sahamat nasnarani Vaghalencha kiman mat mandnyacha adhikar tari manya karava..........evadh madhyamvargiy udarmatvad tari talvalkarani aaplya vachakana tyanchya agralekhatun shikavala a na!!!!!!!!!!!!!!


manoj dholane

Mon , 23 October 2017

Chhan lekh.......Vaghalencha swagat..........lekhatil matashi sahamat nasnarani Vaghalencha kiman mat mandnyacha adhikar tari manya karava..........evadh madhyamvargiy udarmatvad tari talvalkarani aaplya vachakana tyanchya agralekhatun shikavala a na!!!!!!!!!!!!!!


Urjita J

Sun , 22 October 2017

ह्या लेखातून तळवलकरांचा तुच्छतावाद दिसला नाही पण काही चिल्लर पत्रकारांचा 'ब्राम्हणद्वेष' मात्र जाणवला. तळवलकर, फडके, भागवत हे ब्राम्हण असल्याने ते 'संकुचितवादी', पण तेच जर वागळेच्या 'ठराविक फेव्हरेट' जातींमधले असते तर वागळेला ते लगेच थोर समाजसुधारक वगैरे वाटले असते, असो. तर वागळेंना पुल देशपांडे, शिरवाडकर हे पण काही भारी वाटत नाहित. हे पण बरोबरच आहे , असे म्हणतात की ऊकिरड्यावर कचरा ऊकरणारया डुकराला, तुम्ही पौष्टिक जेवण जेवायला दिले तर त्याला ते आवडणार नाही. अर्थात हे एक उदा. आहे, कोणाला डुक्कर वगैरे मी म्हणत नाही आहे. त्यामुळे लोकांनी उगाच भावना दुःखावून घेऊ नये.सांगायचा, मुद्दा हा की तळवलकराना मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार, गोएंका पुरस्कार मिळाला आहे तो काय उगाचच काय ? वागळेंना काय मिळालेय ? वागळे ह्यांनी भागवतांच्या एका पुस्तकाला भंकस म्हटले आहे. तसे असेल तर त्यांना एक सांगावेसे वाटते की तुम्ही काढलेले मॅग्झीन 'षटकार'आणि चंदेरी चे जुने अंक वाचा जरा, ते भागवतांच्या पुस्तकापैक्षाही बकवास आणि भंकस आहेत ( कदाचित म्हणूनच ते बंद पडले) असो. काही लोक म्हणतात की लंडन टाईम्स, ईकोनाॅमिस्ट वाचणारे सामान्यांना ग्रेट वाटतात. ते का ग्रेट असतात हे कळण्यासाठी टिका करणारयांनी पहिले लंडन टाईम्स व ईकोनाॅमिस्ट वाचावे, त्यांचे मराठी ॲक्सेंटवाले इंग्रजी (?) आम्ही एेकले आहे. टिव्हीवर, त्यावरून वाटते की त्यांना कदाचित डिक्शनरी बाजूला ठेवूनच ते वाचावे लागेल ते. असो. तर मनास प्रश्न हा पडतो की या लोकांना तळवलकरांचा द्वेष का वाटतो ? विचार केल्यावर असे जाणवते की लोक तळवलकरांच्याबद्दल लोकांच्या आत्मियतेला आणि २७ वर्षे मटाचे संपादक या रेकाॅर्डवर जळतात. इकडे काही लोकांवर दर ६ महिन्यांनी बेकारीची कुर्हाड कोसळत आहे. आतातर, जवळजवळ सगळे चॅनल संपले नोकरी करून, त्यामुळे सक्तिची निवृत्ती आलीय काही लोकांवर, आणि चॅनेलवर एवढा आरडाओरडा करूनपण लोक काही विशेष किंमत देत नाहीत, काही तर हिंग लावून विचारत पण नाहीत. त्यामुळे जर कोणा जुन्या पत्रकाराच्या आयुष्यात स्थैर्य असेल, लोकांचे प्रेम असेल तर अश्या लोकांचा जळफळाट होणारच. पण त्यामुळे चिडून जर कोणी प्रसिद्ध लोकांवरच टिका करत असेल, तर तो सूर्यावर थुंकण्याचा प्रकार झाला, त्यामुळे संत्र्याला काहिच फरक पडत नाही, थुंकी थुंकणारयाच्या तोंडावर येउन पडते. सूज्ञास अधिक सांगणे न लगे. सकारात्मक पद्धतीने विचार करा जरा,.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख