टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अमित शहा आणि राहुल गांधी
  • Sat , 16 September 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya अमित शहा Amit Shah राहुल गांधी Rahul Gandhi

१. रेल्वे प्रशासनाला धक्का देणारा निर्णय मोहालीतील एका न्यायालयानं दिला आहे. रेल्वेनं संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला संबंधित मालकांना न दिल्यानं न्यायालयानं मोहाली रेल्वे स्टेशन आणि एक्स्प्रेसची दोन इंजिनेच जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. चंदीगड-लुधियाना रेल्वेमार्गासाठी रेल्वे प्रशासनानं १९९९ मध्ये कंबाला गावातील ग्रामस्थांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. मात्र, या जमिनीचा योग्य मोबदला संबंधित ग्रामस्थांना मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अरे बापरे, ते बुलेट ट्रेनचं काय ते नीट करा हं सगळं... ते तर मोठं खटलं आहे... नंतर कळायचं की रूळच जप्त झाले... बाकी न्यायालयानं जर याच प्रकारे सर्व ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना देण्याच्या भरपाईबद्दल कठोर भूमिका घेतली, तर देशातली बहुतेक धरणं आणि मोठे प्रकल्प जप्त होऊन न्यायालयाच्या आवारात धूळ खात पडतील. एखाद्या दिवशी मंत्रालयावर, विधानभवनांवर किंवा संसदभवनावरही टांच आणावी लागेल.

.............................................................................................................................................

२. पुढील पाच वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या ३० टक्क्यांनी कमी होणार आहेत. सिटी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी ही शक्यता वर्तवली आहे. तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि रोबोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात येणार आहेत, असं पंडित म्हणाले. आता लोक बँकांमध्ये जाण्याऐवजी मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगच्या आधारे सर्व सुविधांचा वापर करतात. बँकाही स्वयंचलित यंत्रांचा वाढता वापर करत आहेत. त्यामुळे बँकांना कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत नाही, असंही ते म्हणाले.

जगभरात काय होईल ते होवो, भारतात, खासकरून सरकारी क्षेत्रातल्या बँकांमध्ये कर्मचारी म्हणून माणसांना पर्याय नाही. अहो, कितीही बुद्धिमान झाला तरी रोबो कोणावर खेकसू शकतो का? वरून नोटबंदीचा आदेश आला की, आपण सीबीआयचे बाप असल्याच्या थाटात, आपल्याला पोसणाऱ्या ग्राहकाला त्याचेच पैसे काढताना गुन्हेगार असल्याचा फील देणं एका तरी संगणकाला जमेल का? शिवाय, खास लोकांच्या नोटा बदलून देणे, करकरीत बंडलं बड्या धेंडांना मागच्या दाराने देणं, ही कामंही यंत्रांच्या आवाक्यातली नाहीत.

.............................................................................................................................................

३. औरंगाबाद शहरात महावितरणनं भारनियमन लागू केल्यानंतर, कोणतीही पूर्वसूचना न देता वीजकपात केल्याच्या विरोधात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुभेदारी विश्राम गृहावर महावितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. वीजचोरी आणि वीजबिल वसुली होत नसल्यामुळे वीजकपात करण्याचा निर्णय घेतल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खैरेंना सांगितलं. काही नागरिकांनी निदान सकाळच्या वेळेत तरी वीजकपात न करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली, तेव्हा खैरे यांनी आक्रमक पवित्रा घेत आपण शिवसेनेवाले आहोत, आपण तडजोड का करायची? काहीही करून आपल्याला २४ तास वीज मिळालीच पाहिजे, असं म्हटलं.

आपण शिवसेनावाले आहोत, आपण तडजोड का करायची, हे वाक्य २०१४नंतर आपल्याला शोभत नाही, हे खैरेंना कोणीतरी सांगायला हवं. आता तडजोडीचंच नाव शिवसेना होऊन बसलं आहे. त्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांवर ताव दाखवण्याआधी आपण सरकारचे घटकपक्ष आहोत, याचं भान बाळगायला हवं. सतत विरोधी पक्षाची भूमिका करत राहिलात, तर कायम विरोधातच बसायची पाळी येईल.

.............................................................................................................................................

४. अपयशी ठरलेल्या नेत्यांचं देशात कोणीही ऐकत नाही. त्यामुळेच अपयशी नेते अमेरिकेत जाऊन भाषणं देतात, अशा शब्दांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना टोला लगावला. राहुल गांधींनी अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘मोदींच्या राजवटीत हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाने डोकं वर काढलं आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधलं.

राहुल गांधी यांनी परदेशात केलेलं हे गेल्या तीन वर्षांतलं पहिलंच भाषण असावं. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक दौरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहेत आणि अमेरिकेत भाषणंही दिली आहेत. मग अपयशी नेते परदेशांत जाऊन भाषणं देतात, हा टोला नेमका कुणाला? आपल्याच कपाळावर मारून घेतला की काय? शिवाय सुपरयशस्वी पक्षाध्यक्षांनी अपयशी उपाध्यक्षाच्या भाषणाची एवढी दखल घेण्याचं तरी कारण काय?

.............................................................................................................................................

५. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (ABVP) ‘जोर का झटका’ देत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियानं (NSUI) दणदणीत विजय मिळवला आहे. ‘एबीव्हीपी’चं वर्चस्व संपुष्टात आणत ‘एनएसयूआय’ने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर कब्जा केला. एनएसयूआयच्या रॉकी तुशीदनं अध्यक्षपदी विजय मिळवून एबीव्हीपीचे चार वर्षांपासूनचं वर्चस्व संपुष्टात आणलं. गेल्या वर्षी एबीव्हीपीनं तीन पदांवर विजय मिळवला होता.

जेएनयूपाठोपाठ दिल्ली विद्यापीठात मिळालेला दणका हा विद्यमान केंद्र सरकारच्या विरोधात वारं वाहू लागल्याचे संकेत देणारा आहे. मात्र, हे आता कोणी मान्य करणार नाही. या निवडणुका फुटकळ ठरवल्या जातील. कैलाश विजयवर्गीय या तोंडाळ नेत्यानं तर जेएनयूमधले निकाल येण्याच्या आधीच ‘देशद्रोही फुटीरतावादी हरले’ असं ट्वीट करून स्वहस्ते स्वमुखभंग करून घेतला होता. देशातल्या बहुतेक हवापालटांची सुरुवात विद्यार्थ्यांपासून होते, याचा, जयप्रकाशांच्या आंदोलनात कधी काळी उतरलेल्या, भाजपेयींना तरी विसर पडायला नको.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......