'बॉईज' : दोन इब्लिस कार्ट्यांचा धुमाकूळ
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'बॉईज'चं एक पोस्टर
  • Mon , 11 September 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie बॉईज Boyz सुमंत शिंदे Sumant Shinde पार्थ भालेराव Parth Bhalerao प्रतीक लाड Pratik Lad अवधूत गुप्ते Avadhoot Gupte

जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो - मग ती मुलं असोत वा अनुभवसंपन्न मोठी माणसं. अनेकदा अनुकूल परिस्थिती असतानाही आनंदानं जीवन जगता न येणारे काही जण असतात, तर प्रतिकूल परिस्थितीतही मौजमजा करणारे अनेक जण आजूबाजूला पाहायला मिळतात. शेवटी आपलं जीवन कसं जगायचं, आनंदी की दुःखी याचा फंडा ज्याचा त्यानंच  ठरवायचा असतो. अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज' या नव्या मराठी चित्रपटात मुलांचं वेगळं भावविश्व दाखवताना हाच 'फंडा' सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात मुलांचं भावविश्व दाखवण्याच्या नावाखाली प्रामुख्यानं दोन इब्लिस कार्ट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतो. त्यांचा हा 'धुमाकूळ' मनोरंजन करतो खरा, पण त्यापलीकडे जाऊन 'आनंदाच्या झाडा'पर्यंत जाऊ शकत नाही.

'बॉईज' ही कथा आहे प्रामुख्यानं बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र आलेल्या तीन मित्रांची. यातील कबीर हा शहरात राहणाऱ्या एका चांगल्या सुशिक्षित कुटुंबातील आहे. मात्र त्याला त्याच्या जन्मापासून त्याचे वडील कोण, हे माहीत नसतं आणि आईकडे सतत विचारणा करूनही त्याला त्याचं उत्तर मिळत नसल्यामुळे तो दुःखी असतो. परिणामी आईवर नाराज आहे. त्याचं आणि त्याच्या आईमधील तणावग्रस्त वातावरण निवळण्याच्या हेतूनं मावशीच्या सांगण्यावरून तो बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्यासाठी येतो. हुशार असलेला कबीर प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन पुरस्कार मिळवत असला तरी, त्याला जगण्यात कोणताच आनंद वाटत नसतो.

याउलट त्याचे दोन मित्र ढुंग्या आणि धैर्या हे दोघेही ग्रामीण भागातून आलेले असतात... घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही कशाचीही फिकीर न करता 'बिनधास्त' जगणारे. बोर्डिंग स्कुलमध्ये आल्यानंतर ढुंग्या आणि धैर्या कबीरला आनंदानं जीवन जगायला कसं शिकवतात आणि आईबद्दलची त्याची अढी दूर करून उभयतांचं मीलन कसं घडवून आणतात, हे या चित्रपटात पाहायला मिळतं.

चित्रपटाची कथा सूत्रबद्ध नाही. पटकथाही फारशी बंदिस्त नाही. त्यामुळे दिग्दर्शकानं ढुंग्या आणि धैर्या बोर्डिंग स्कूलमध्ये आल्यानंतर त्यांनी घातलेल्या 'धुमाकुळा'ला अधिक प्राधान्य दिलं आहे, हे स्पष्टपणे जाणवतं. विशेष म्हणजे त्यामागचा त्यांचा नेमका हेतूही स्पष्ट होत नाही. ''आम्ही आगाऊ आहोत म्हणून आम्ही आगाऊपणा करणार'' हेच या 'धुमाकुळा'मागचं प्रमुख सूत्र असल्यामुळे बोर्डिंग स्कूलची शिस्त वारंवार मोडणं, कठोर शिस्तीच्या मुख्याध्यापकांना त्रास देणं, नामदेव नावाच्या 'आगाऊ' शिपायाला अद्दल घडवणं, बोर्डिंग स्कूलभोवती असलेली 'हागणदारी'ची जागा जाळून टाकणं आदी काही त्यांचं 'कारनामे' पाहायला मिळतात. विशेष म्हणजे त्यांचा हा धुमाकूळ 'वाचिक' पद्धतीचाही आहे. अनेक द्वैअर्थी संवादांनी तो अधोरेखित होतो. या द्वैअर्थी संवादांनी काही ठिकाणी जरूर हास्याचा स्फोट होतो, मात्र काही ठिकाणी पांचटपणाचा प्रत्यय येतो.

'टीचर्स डे'निमित्त आयोजित कार्यक्रमात पेयात भांग मिसळून सर्वांना नाचण्यास प्रोत्साहित करणाऱ्या 'आम्ही लग्नाळू .. ' या गाण्याचं टेकिंग मात्र छान जमलं आहे. (या गाण्यात 'जर्दाळू' शब्दाचा वापर केला असता तर गाण्याचं आणखी एक कडवं निश्चित वाढलं असतं!). याउलट सनी लिऑनवर चित्रित केलेलं 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला ....' हे लावणी कम आयटेम साँग केवळ गल्लाभरू 'मालमसाला' असल्याची जाणीव होते. कारण लावणीमागची पार्श्वभूमी वरवरची वाटते. केवळ कबीरच्या प्रेयसीला - ग्रेसला - लावणी पाहायची इच्छा होते, म्हणून हे तिघं लावणी पाहायला जातात हे कारण पटत नाही.

या ग्रेससह चित्रपटातील बऱ्याच व्यक्तिरेखा आणखी विकसित करण्याची गरज होती. त्यामध्ये कबीरची आई, मावशी, बोर्डिंग स्कूलमधील मंदार नावाचे शिक्षक आदींचा समावेश करावा लागेल. कबीरच्या आई-वडिलांचा नेमका 'प्रॉब्लेम' काय होता, तो आधीच स्पष्ट करायला हवा होता. त्यामुळे त्याच्या वडिलांचं अगदी शेवटी दिसणं कथेशी विसंगत वाटतं. आणि सर्वांत मुख्य म्हणजे ढुंग्या आणि धैर्या यांना बोर्डिंग स्कूलमध्ये ज्या कारणांसाठी प्रवेश दिला जातो, तेच मुळी सुरुवातीला पटत नाही. अर्थात चित्रपटाच्या शेवटी ते कारण खोटं दाखवून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे खरा, पण तो खूप तकलादू वाटतो. त्यामुळेच संपूर्ण चित्रपट या दोन 'इडियट' मुलांच्या कारनाम्याच्या आधारावरच पेलला आहे, हे जाणवत राहतं.

शांत, समंजस, अबोल पण नंतर ढुंग्या आणि धैर्या यांच्या संगतीत राहून आनंदी जीवन जगू पाहणारा कबीर सुमंत शिंदे याने चांगला उभा केलाय. ढुंग्या आणि धैर्याच्या भूमिकेत अनुक्रमे पार्थ भालेराव आणि प्रतीक लाड यांनी बिनधास्त कामं करून मजा आणली आहे. विशेषतः पार्थ भालेराव यानं आपल्या अनुभवाच्या जोरावर सर्वांवर मात केली आहे. मुख्याध्यापक झालेले झाकीर हुसेन, मंदारच्या भूमिकेतील संतोष जुवेकर, शिल्पा तुळसकर (कबीरची आई), शर्वरी जमेनीस (कबीरची मावशी), वैभव मांगले (नामदेव शिपाई) आदी कलाकारांची कामंही ठीक आहेत. अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली गाणी हे या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण म्हणावं लागेल. या गाण्यांपैकी '..... आम्ही लग्नाळू' हे गाणं मस्त जमलं असून ठेका धरायला लावतं.

'बॉईज'ची कल्पना काहीशी 'थ्री इडियट'शी मिळतीजुळती वाटते. 'थ्री इडियट'मध्येही इब्लिसपणाचा धुमाकूळ आहे. परंतु त्या चित्रपटातली मुलं जात्याच हुशार असतात आणि त्यांना काही विशिष्ट उद्देश साध्य करावयाचा असतो. आणि ते करतातही. 'बॉईज'मध्ये मात्र कबीरला आनंदी राहण्याचा मंत्र देण्याचं उद्दिष्ट दोन इब्लिस कार्ट्यासमोर असले तरी लक्षात राहतो तो प्रामुख्यानं त्यांनी घातलेला धुमाकूळ. त्यामुळे केवळ मनोरंजनासाठी या दोन इब्लिस कार्ट्यांचा धुमाकूळ पाहायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......