म्युझिक ऑफ दी घोस्ट्स : कंबोडियन स्वातंत्र्य-क्रांतीच्या अपेक्षाभंगाचं कथन
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
नितिन जरंडीकर
  • ‘म्युझिक ऑफ दी घोस्ट्स’चं मुखपृष्ठ आणि कादंबरीकर्ती
  • Fri , 01 September 2017
  • ग्रंथनामा Granthnama म्युझिक ऑफ दी घोस्ट्स Music of the Ghosts व्हॅडे रेटनर Vaddey Ratner नितिन जरंडीकर Nitin Jarandikar

कंबोडिया म्हटलं की, दोन गोष्टींची हटकून आठवण होते. एक म्हणजे अंकोर वट हे तिथलं पुरातन आणि विशाल असं विष्णू मंदिर. आणि दुसरं म्हणजे २०व्या शतकानं पाहिलेला कंबोडियाचा क्रुरकर्मा पॉल पॉट. अर्थात अंकोरवट आणि पॉल पॉट यांना एकाच सूत्रात बांधणं उपरोधिक ठरू शकतं, पण दुर्दैवानं गेली अनेक दशकं कंबोडियाचं हेच भागधेय बनून राहिलं आहे.

कंबोडिया म्हणजे पूर्वीचा काम्पुचिया. कंबोडिया आणि भारत यांचं नातं थेट प्राचीन इतिहासापर्यंत जाऊन पोहोचतं. भारत–चीन यांच्या भूतकाळातील विख्यात सिल्क रुटवरील कंबोडिया हा व्यापार–उदिमाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा मुक्काम होता. पण आधुनिक कालखंडात युरोपियनांनी आशिया आणि आफ्रिका खंडात वसाहती वसवण्याचा जो सपाटा लावला, त्यातून कंबोडिया सुटू शकला नाही. १८६३ पासून १९५३ पर्यंत कंबोडिया फ्रेंचांची वसाहत होता. भारत-कंबोडिया संबंधांचे पुरातन अवशेष आजही तेथील हिंदू-बौद्ध स्थापत्यकला आणि धर्म-परंपरांच्या अनुषंगानं पाहावयास मिळतात. दुर्दैवानं निर्वासाहतीकरणाच्या टप्प्यात कंबोडिया सक्षमपणे उभा राहू शकला नाही. राजघराण्यांचं वर्चस्व, त्यातून उदभवणारे संघर्ष, अमेरिका-व्हिएतनाम युद्धात दोन्ही राष्ट्रांनी कंबोडियाचा बफर-स्टेट म्हणून केलेला वापर आणि खमेर रूज नामक कम्युनिस्ट पार्टीनं घातलेला हैदोस, यातून कंबोडिया पूर्णपणे होरपळून निघाला. पैकी १९७५ ते १९७९ हा चार-पाच वर्षांचा कालखंड कंबोडियाच्या इतिहासातील अतिशय भीषण असा आहे.

१९७५ साली झालेल्या कंबोडियन नागरी युद्धानंतर खमेर रूजनं राजसत्ता उलथवून टाकली. या खमेर रूजचा नेता पॉल पॉट याची तुलना आपल्याकडच्या वेड्या महम्मद तुघलकाशी करता येईल. बुर्झ्वा समाजव्यवस्था नाकारणाऱ्या पॉल पॉटनं शहरी आणि नागर व्यवस्थेचं समूळ उच्चाटन करायचा चंग बांधला. पारंपरिक कृषी व्यवस्थेवर अनाठायी भर देत अवजड उद्योग मोडीत काढले. भाषाव्यवस्थेपासून दैनंदिन जगण्यावरती कडक निर्बंध लादले. शहरांतून प्रचंड मोठ्या संख्येनं समूहाचं ग्रामीण भागात सक्तीनं विस्थापन करवलं. विस्थापित समूहाला बळजबरीनं कृषीव्यवस्थेला जुंपण्यात आलं. नवी व्यवस्था नाकारणाऱ्यांची सरसकट कत्तल करण्यात आली.

या सगळ्याचा परिणाम म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्था गोत्यात आली. प्रचंड मोठा दुष्काळ पडला. दारिद्र्य, उपासमार, आरोग्य सुविधांची वानवा यातून लाखो लोक मृत्यूमुखी पडले. अभ्यासकांच्या मते मृतांचा हा आकडा दीड ते तीन दशलक्ष इतका आहे. १९७९ साली व्हिएतनामच्या सैन्यानं हस्तक्षेप करत खमेर रूजची सत्ता उलथवून टाकली. पण पुढे १९९४ पर्यंत खमेर रूज गनिमी काव्यानं कंबोडियन सरकारविरुद्ध लढत राहिले. १९९८मध्ये पॉल पॉट मरण पावला आणि हळूहळू खमेर रूजची सद्दी संपत गेली. २००५मध्ये संयुक्त राष्ट्रानं खमेर रुजवर जिनोसाईडचा आरोप ठेवत लवादाची नेमणूक केली आणि २०१० मध्ये खमेर रूजच्या नेत्यांना मानवतावादी विरोधी ठरवत दोषी म्हणून जाहीर केलं.

अंकोरवटसारख्या नितांतसुंदर स्थापत्यकलेचा वारसा आपल्या राष्ट्रध्वजावर दिमाखात मिरवणाऱ्या कंबोडियामध्ये गेली ६०-७० वर्षं भयाण अनुभवांना सामोरा जाणारा समाज सृजनाच्या सर्व शक्यताच गमावून बसला आहे. या पार्श्वभूमीवर व्हॅडे रेटनर या अमेरिकास्थित कंबोडियन लेखिकेची एप्रिल २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘म्युझिक ऑफ दी घोस्ट्स’ ही कादंबरी महत्त्वपूर्ण ठरते. खमेर रूजच्या भयप्रद कालखंडात कंबोडियन नागरिकांनी केलेला संघर्ष आणि त्यानंतरच्या कालखंडात उभं राहण्याची त्यांची धडपड या सूत्राभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. रेटनर यांची ‘इन दी शॅडो ऑफ दी बनियन’ ही २०१३मध्ये प्रसिद्ध झालेली पहिली कादंबरी. तीदेखील खमेर रूज कालखंडावरच आधारित होती, जिची जाणकारांनी आणि अभ्यासकांनी मुक्त कंठानं प्रशंसा केली आहे.

‘म्युझिक ऑफ दी घोस्ट्स’ या कादंबरीतील सुतीरा ऑन्ग नामक युवती ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा. खमेर रूजनं नागरी समाज ग्रामीण भागात विस्थापित करण्याचा जो सपाटा लावला होता, त्यातून निराधार आणि भुकेकंगाल झालेले सुतीराचे आजी-आजोबा १३ वर्षांच्या सुतीराची जबाबदारी तिच्या मावशीवर सोपवतात. भूसुरंग आणि खमेर सैनिकांचा ससेमिरा चुकवत महत्प्रयासानं सुतीरा तिच्या मावशीसोबत थायलंडला पोहोचते आणि तिथून अमेरिकेमध्ये.

१९७९मध्ये मायदेश सोडून गेलेली सुतीरा तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजे २००३ मध्ये पुन्हा एकदा कंबोडियाला यायला निघते. इथून कादंबरीला सुरुवात होते. तिला कंबोडियाला परत येण्यात खरं तर काही स्वारस्य उरलेलं नसतं. खमेर राजवटीच्या कालखंडानं तिची आई, लहान भाऊ, आजी-आजोबा गिळंकृत केलेले असतात. तिला व तिच्या मावशीला देशोधडीला लावलेलं असतं. पण तिच्या कंबोडियाला भेट देण्याच्या निर्णयाला दोन गोष्टी कारणीभूत होतात.

एक म्हणजे तिच्या मावशीचं अमेरिकेत निधन होतं. तिची अंतिम इच्छा असते की, आपल्या अस्थी मायदेशात मेकोंग शहरातील बौद्ध स्तूपामध्ये जतन केल्या जाव्यात. दुसरं कारण म्हणजे याच दरम्यान मेकोंग शहरातून एका अनोळखी वृद्ध संगीतकाराचं तिला पत्र येतं. तो संगीतकार आणि सुतीराचे वडील एकेकाळी मित्र असतात. सुतीराच्या वडलांनी त्यांची काही वाद्यं या वृद्ध संगीतकाराला जपून ठेवण्यास सांगितलेलं असतं. ती सुतीराकडे सुपूर्त करण्याचा त्याचा मानस असतो.

सुतीराचे वडील उच्चविद्याविभूषित असतात. कंबोडियन संगीताचा अभ्यास करण्यासाठी त्यांना अमेरिकन सरकारची फेलोशिप मिळालेली असते. ज्यात त्यांना डॉक्टरेटही मिळाते, पण ७०च्या दशकात इतर कंबोडियन तरुणांप्रमाणे क्रांतीच्या स्वप्नांनी तेही भारावून जातात. परिणामी ते स्वतःला खमेर रूज चळवळीत झोकून देतात. पुढे १९७४च्या एका रात्री ते भूमिगत होतात. ते पुढे भविष्यात कधीही सुतीराला भेटत नाहीत. किंबहुना वडलांचं नेमकं काय झालं, याबाबत ती पूर्णतः अनभिज्ञ असते. मात्र तिनं आपल्या मनात सुसंस्कृत वडलांच्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात.

सुतीरा कंबोडियाला परतते. त्यामुळे कादंबरीमध्ये सुतीराला दिसणारा वर्तमान कंबोडिया आणि त्या पार्श्वभूमीवर उलगडत जाणारा तिचा आणि तिच्याबरोबरीनं कंबोडियन समाजमनाचा भूतकाळ, यांची एकत्र गुंफण पाहावयास मिळते.

सुतीराच्या कथानकाबरोबरीनं अजून एक कथानक कादंबरीत उलगडत जातं. ते म्हणजे वृद्ध संगीतकाराचं. मेकोंग शहरातील एका बौद्ध स्तूपामध्ये राहणाऱ्या या वृद्धाबद्दल शहरात किंवा स्तूपामध्ये कोणालाही फारसं काही ठाऊक नसतं. धार्मिक कार्याच्या वेळी आत्म्यांना आवाहन करण्यासाठी गीतगायन आणि संगीत वाजवण्याची जबाबदारी स्तूपानं त्याच्यावर टाकलेली असते. त्यानं आपला एक डोळा गमावलेला असतो आणि त्याच्या देहबोलीतून जाणवणारी अगतिकता, यावरून स्तूपातील सर्व भिक्कूंना अंदाज असतो की, हा वृद्ध खमेर रूजच्या अराजक कालखंडाचा साक्षीदार आहे. पण या जखमेवरची खपली कोणीच काढू इच्छित नाही. वृद्ध संगीतकार अन्यायी राजवटीचा साक्षीदार तर असतोच, पण त्याबरोबरच त्यानं आपल्या मनात आपली मुलगी आणि सुतीराचे आई-वडील यांच्याबद्दलचीही गुपितं लपवून ठेवलेली असतात. त्याचबरोबर भूतकाळात केलेल्या एका पापाचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलेलं असतं, ज्याचा त्याला कबुलीजबाब सुतीरासमोर द्यायचा असतो.

आपली मुलगी या जगात आता नाही, याची खात्री असूनही वृद्ध संगीतकार सुतीरामध्ये आपल्या मुलीला शोधायचा प्रयत्न करत राहतो. त्याला आठवतं, खमेर रुजची राजवट सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी सुतीरा आपल्या आईसोबत त्याला भेटलेली असते. सुतीराच्या आईला भेटल्यानंतर वृद्ध संगीतकाराच्या मनातील नाजूक आठवणी पुन्हा जागृत होतात. सुतीराची आई ही एका अमेरिकन दूतावासात काम करणाऱ्या कंबोडियन अधिकाऱ्याची मुलगी असते. वृद्ध संगीतकार त्याच्या तरुणपणी कंबोडियन संगीताचा अभ्यास करण्यासाठी काही काळ अमेरिकेत गेलेला असतो. तिथंच त्याला सुतीराची आई भेटते आणि त्यांची प्रेमकहाणी फुलू लागते. पण सुतीराचे आजोबा या संबंधांना विरोध करतात. स्वतःच्या वडलांच्या मृत्यूचं निमित्त होऊन वृद्ध संगीतकार कंबोडियाला परततो. अमेरिकेतच सुतीराचे वडील आणि वृद्ध संगीतकार यांची कंबोडियन संगीताच्या निमित्तानं जानपहाचन झालेली असते. पुढे कंबोडियात होऊ घातलेल्या नागरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे सारेच कंबोडियात परततात. वृद्ध संगीतकाराला सुतीराच्या आईचं लग्न आपल्या संगीतकार मित्राबरोबर झाल्याचं समजतं आणि तो त्यांच्या आयुष्यातून बाजूला होतो.

या दरम्यान राजसत्ता उलथवून टाकून क्रांती घडवून आणण्याच्या खमेर रूजच्या स्वप्नांनी असंख्य कंबोडियन तरुण भारावून गेलेले असतात. वृद्ध संगीतकारही खमेर रुजकडे आकृष्ट होतो. सुतीराच्या वडलांप्रमाणे वृद्ध संगीतकारदेखील भूमिगत होतो. खमेर रूज राजसत्ता उलथवून टाकण्यात यशस्वी होतो.

पण इथून पुढे चक्रं उलट्या दिशेनं फिरू लागतात. एका बाजूला मोठ्या प्रमाणात नागर जनसमूहाच्या विस्थापनाची प्रक्रिया सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला संघटन भक्कम करण्यासाठी खमेर रूज कार्यकर्त्यांवर जाचक निर्बंध लादतो. एकाधिकारशाही निर्माण करण्याच्या अट्टाहासापोटी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू होते. खमेर रूजनं नेमून दिलेल्या आचारसंहितेनुसार जगताना थोडीशी जरी चूक झाली तरी त्या कार्यकर्त्याची रवानगी छळछावणीत होऊ लागते. अशी चूक म्हणजे थेट खमेर रुजला आव्हान आणि ती व्यक्ती व्हिएतनामच्या गोटातील किंवा त्यांचा गुप्तहेर असल्याचं गृहीत धरलं जाऊ लागतं. सर्व शाळा आणि बौद्ध स्तूपांचा छळछावणीसाठी वापर करण्यात येऊ लागतो. ज्यांनी सशस्त्र क्रांतीमध्ये सहभाग घेतला, त्यांनाच या छळछावण्यात डांबून ठेवण्यात येतं. या ठिकाणी या कार्यकर्त्यांवर अमानुष अत्याचार करण्यात येतात. व्हिएतनामी गुप्तहेर असल्याचं वदवून घेण्यात येतं. अर्थातच यातील बहुतांश कार्यकर्ते मृत्युमुखी पडतात.

क्रांतीनंतर खमेर राजवट वृद्ध संगीतकाराला अशाच एका छळछावणीमध्ये धाडते. जिथं त्याला सुतीराचे वडील भेटतात. खरं तर दोघंही संगीताचे उपासक असतात, हा त्यांचा स‌र्वांत मोठा गुन्हा असतो. अमानुष मारहाणीनं दोघंही गलितगात्र, हताश होतात. केवळ मरणानंच यातून आपली सुटका होईल, याची त्यांना खात्री पटते. अगतिक झालेले सुतीराचे वडील वृद्ध संगीतकाराजवळ कबूल करतात, “आपणासमोर दोन रस्ते होते- एक संगीताचा आणि दुसरा क्रांतीचा. दुर्दैवानं आपण चुकीचा रस्ता निवडला.”

कथानकाच्या या टप्प्यावर सुतीराचे वडील वृद्ध संगीतकाराला आपली तीन पारंपरिक वाद्यं एका खेडेगावात शाबूत असल्याचं सांगतात आणि आपल्या पश्चात त्यांची देखभाल करण्याचं ते त्याच्याकडून वचन घेतात. हीच ती तीन वाद्यं, वृद्ध संगीतकार सुतीराकडे सोपवू इच्छितो.

सुतीरा कंबोडियामध्ये पाच महिन्यांच्या वास्तव्यासाठी आलेली असते. या वास्तव्यात तिला अथक संघर्ष करणारी आपल्या मायभूमीतील असंख्य माणसं भेटतात. साऱ्यांची घरं उद्ध्वस्त झालेली असतात, सगेसोयरे, आप्तस्वकीय हरवले असतात किंवा काळाच्या पडद्याआड गेलेले असतात. आणि या साऱ्यांचा भूतकाळ काळवंडून गेलेला असतो.

एका प्रसंगात सुतीराचा ड्रायव्हर तिला पनॉम पेनमधील कंबोडियन नागरिकांचं स्मारक दाखवतो. जिथं खमेर राजवटीत मारल्या गेलेल्या लोकांच्या कवट्या, त्यांचे फोटो आणि नावं मांडून ठेवली असतात. पण तो तात्काळ हेही नमूद करतो की, आजपावेतो कोणत्याही कंबोडियन नागरिकानं या स्मारकात पाऊल टाकण्याचं धाडस केलेलं नाही. कारण न जाणो कुठल्यातरी आप्तेष्टाचं नाव किंवा फोटो दृष्टीस पडेल!

सुतीरा पहिल्यांदा ज्या वेळी मकोंग शहरातील स्तूपाला भेट देते, त्या वेळी तिथं तिला मृत व्यक्तींना समर्पित केलेला एक फलक पाहावयास मिळतो. ज्यात ती आपल्या वडलांचं नाव वाचते. त्यामुळे आजपर्यंत वडील कदाचित जिवंत असतील ही तिनं बाळगलेली आशा फोल ठरते. आता खऱ्या अर्थानं आपलं कंबोडियाशी असलेलं नातं संपल्याची तिला जाणीव होते. आता कंबोडियात थांबण्याचं तिला काहीच कारण उरत नाही.

परंतु अशा काही घटना घडत जातात की, सुतीराला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची वेळ येते. या पाच महिन्यांच्या वास्तव्यात सुतीराला नुरून नावाचा एक डॉक्टर भेटतो. नुरूनची कहाणी इतर कंबोडियन नागरिकांपेक्षा किंवा सुतीरापेक्षा फारशी वेगळी नसते. पण आरोग्यसेवा पूर्ण कोलमडलेल्या प्रदेशात निस्वार्थीपणे झटणारा तो एक मसीहा असतो. त्याच्या सहवासात राहून सुतीराला संघर्षाच्या एका नव्या आयामाची जाणीव होते. याच दरम्यान मेकोंग स्तूपामध्ये एक तीन वर्षांची मुलगी दाखल होते. स्तूपाचे महंत सुतीराला या मुलीच्या आईचा खून झाल्याचं सांगतात आणि या दुःखातून सावरण्यासाठी मदत करण्याची विनंती करतात. डॉ. नुरून आणि सुतीरा आपणहून या मुलीची जबाबदारी स्वीकारतात. सुतीराच्या कंबोडियात स्थिरावण्याच्या निर्णयाला अजून एक भक्कम कारण मिळतं.

कादंबरीत सुतीरा आणि वृद्ध संगीतकार यांची एकूण तीन वेळा भेट होते. पहिल्या भेटीत सुतीरा आपला भूतकाळ आणि खासकरून आपले वडील गायब झाल्यापर्यंतचा तपशील वृद्ध संगीतकाराला कथन करते. दुसऱ्या भेटीत वृद्ध संगीतकार आपलं आणि तिच्या वडलांचं छळछावणीतलं विदारक कथन करतो. तर तिसऱ्या भेटीत सुतीराच्या वडलांची वाद्यं तिच्याकडे सुपूर्द करून आपल्या जन्मगावी परत जाण्याचा मानस व्यक्त करतो.

दुसऱ्या भेटीच्या दरम्यान वृद्ध संगीतकार त्रस्त करणाऱ्या आपल्या पापाचा कबुलीजबाब सुतीरासमोर देतो. तो कादंबरीचा क्लायमॅक्स आहे.

कादंबरीच्या अखेरच्या भागात डॉ. नुरूनच्या नव्या घराच्या भूमिपूजनाच्या विधीचं वर्णन येतं. या कार्यक्रमाला आत्म्यांना आवाहन करण्यासाठी गाण्याची जबाबदारी अर्थातच वृद्ध संगीतकारानं स्वीकारलेली असते. विधीपूजनासाठी सुतीरा नुरूनच्या शेजारी बसते. वृद्ध संगीतकार सूर छेडतो आणि सुतीराला जणू काही आपले वडीलच शुभाशिष देत आहेत, असा साक्षात्कार होतो आणि कादंबरी संपते.

कादंबरीच्या शेवटी येणारे नुरूनच्या घरबांधणीचं रूपक अर्थातच व्यापक अर्थानं संपूर्ण कंबोडियाच्या पुनर्बांधणीसंदर्भातलं आहे. आपलं सर्वस्व गमावलेली इथली माणसं अशी सहजी हार मानणारी नाहीत. भूतकाळाचं ओझे झुगारून नव्या उमेदीनं वर्तमानाला सामोरं जाण्याची, अथक संघर्षातून पुन्हा नव्या जोमानं ‘घर’ बांधण्याची त्यांची ही ऊर्मी निश्चितच दिलासा देणारी आहे.

कादंबरीभर पसरलेलं संगीताचं रूपकही अशाच पद्धतीनं सृजनाच्या नित्यनूतन शक्यता अधोरेखित करतं. विपरीत परिस्थितीतही सुतीराचे वडील व वृद्ध संगीतकार यांनी जपून ठेवलेला संपन्न संगीताचा वारसा आता सुतीरानं जपायचा असतो. त्यामुळे स्थळ-काळाची मोठी मर्यादा असणारी ही कादंबरी संगीताच्या रूपकाद्वारे सर्व मर्यादा ओलांडत सार्वत्रिक बनते. मानवी जीवनातील जगण्याचा, तगून राहण्याचा संघर्ष सनातन आहे. पण सृजनाच्या उन्मेषानं हा संघर्ष केवळ रानटी पातळीवरचा न राहता तो अधिकाधिक अर्थपूर्ण बनतो हे निःसंशय.

म्युझिक ऑफ दी घोस्ट्स - व्हॅडे रेटनर (टचस्टोन, न्यूयॉर्क). पाने - ३२६, मूल्य – ₹३९८.०५/- (किंडल ईबुक आवृत्ती)  

.............................................................................................................................................      

लेखक इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.

nitin.jarandikar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......