वो इंतजार था जिसका, ये वो सेहर तो नहीं
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • ‘सेहर’चित्रपटाचं पोस्टर
  • Sat , 26 August 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar सेहर Sehar कबीर कौशिक Kabeer Kaushik अर्शद वारशी Arshad Warsi पंकज कपूर Pankaj Kapur महिमा चौधरी Mahima Chaudhry सुशांत सिंग Sushant Singh

फ़ैज अहमद फ़ैज फाळणीमुळे प्रचंड अस्वस्थ होते. ज्या स्वातंत्र्यासाठी आपण झुरलो त्याची किंमत ही अशी चुकवावी लागणं त्यांना सहन होत नव्हतं. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या लेखणीमधून शब्द स्रवले-

वो इंतजार था जिसका

ये वो सेहर तो नहीं

कबीर कौशिक या दिग्दर्शकाच्या उत्तर प्रदेशमधल्या संघटित गुन्हेगारीवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटासाठी 'सेहर'पेक्षा योग्य शीर्षक असूच शकत नव्हतं. काळरात्रीनंतरची पहाट म्हणजे 'सेहर'. 'सेहर'चा शेवट आपल्या शीर्षकाला पुरेपूर न्याय देतो. कितीही वाईट आणि माणुसकीवरचा विश्वास उठवणाऱ्या घटना घडल्या तरी उज्ज्वल भविष्यावरचा आपला विश्वास अढळ राहिला पाहिजे. आता रात्र आहे, म्हणून काय झालं? उद्या एक रम्य पहाट होणारच. आणि हा विश्वास अढळ राहण्यासाठी एक नायक आवश्यक आहे.

सर्वसामान्य लोक हा नायक कधी एखाद्या राजकारण्यात, कधी एखाद्या समाजसेवकात, कधी एखाद्या क्रिकेटपटूमध्ये तर कधी एखाद्या फिल्मस्टारमध्ये शोधतात. 'सेहर'मधला नायक हा पोलीस अधिकारी आहे. तुमच्या आणि माझ्यासारखाच मास, रक्त, भीती, भावना, प्रेम यांनी बनलेला.

उत्तर प्रदेश म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर जे जे येतं, ते ते सगळं 'सेहर'मध्ये दिसतं. अराजक, अंदाधुंदी, स्वस्त झालेली हत्यारं, मानवी आयुष्यं आणि बरंच काही. प्रामाणिक अधिकाऱ्यानं भ्रष्ट व्यवस्थेला अंगावर घेणं हा बॉलिवुडचा आवडता विषय. 'जंजीर', 'गंगाजल', 'अर्धसत्य' , 'शूल', 'खाकी' किती उदाहरणं द्यावीत! पण या यादीतही 'सेहर'चं एक वेगळं स्थान आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे चित्रपट बराचसा सत्य घटनेवर आधारित आहे. 

चित्रपटाचं कथानक १९९७ मध्ये सुरू होतं. उत्तर प्रदेशात भ्रष्टाचाराची अनेक कुरणं आहेत. रेल्वे खात्याची कोट्यवधी रुपयाची कंत्राटं हे असंच एक मलईदार कुरण. कुठलाही भ्रष्टाचार हा काही काळानंतर व्यवस्थेचं रूप धारण करतो. रेल्वे खात्यातल्या भ्रष्टाचाराची एक व्यवस्था तयार झालीच आहे. राजकीय पक्ष, नेते, पोलीस अधिकारी हे सगळेच या व्यवस्थेचे लाभार्थी आहेत. काही गुंडांच्या टोळ्या ही व्यवस्था चालवत आहेत. एखाद-दुसरी हिंसाचाराची घटना वगळता ही व्यवस्था सुशेगात चालू असते, पण जेव्हा व्यवस्था सुरळीत असते तेव्हा तिचं संतुलन बिघडवण्यासाठी एखादा येतोच. नियमच आहे तसा. या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून तिला आव्हान देणाराही एक जण येतोच.

त्याचं नाव असतं गजराज (सुशांत सिंह ). गजराज हा थंड डोक्यानं मुडदे पाडणारा माणूस असतो. तितकाच बुद्धिमान. त्याला ही व्यवस्था ताब्यात हवी असते. या व्यवस्थेचे लाभार्थी त्याला या कुरणाचा थोडा भाग देऊ करतात. पण महत्त्वाकांक्षी गजराजचं समाधान तितक्यावरच होणारं नसतं. त्याला पूर्ण 'वर्चस्व' हवं असतं.  'वर्चस्व' ही राज्यशास्त्रातली महत्त्वाची संकल्पना आहे. अपरिमित ताकद जी कुणासोबतही वाटली जात नाही, ती म्हणजे 'वर्चस्व'. तर हे वर्चस्व मिळवण्यासाठी गजराज रक्ताची होळी खेळायला सुरुवात करतो. त्याच्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला बाजूला करायला सुरुवात करतो.

त्याच वेळेस अजय कुमार (अर्शद वारसी) हा तरुण पोलीस अधिकारी लखनौला बदली होऊन येतो. अजय हा आपल्या राज्यशास्त्राची प्राध्यापिका असणाऱ्या आईसोबत (सुहासिनी मुळे) राहत असतो. अजयचे वडील लष्करी अधिकारी असतात. कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांना लष्करी सेवेतून काढून टाकलेलं असतं. ही मानखंडना सहन न होऊन ते आत्महत्या करतात. अजयच्या आईला आपल्या नवऱ्यावरचा कलंक मुलानं दूर करावा असं वाटत असतं.

अजय असतोही तसाच. कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक. प्रामाणिकपणाची किंमत सततच्या बदल्यांनी चुकवत असतो. लखनौमधला अजयचा पहिला दिवस. त्याच्यासमोर काय आव्हानं आहेत याची चुणूक दाखवणारा दिवस. पदभार सांभाळण्यासाठी तो वरिष्ठ अधिकारी अरुण कुमार (राजेंद्र गुप्ता, एक जबरदस्त अभिनेता) यांच्या केबिनमध्ये बसला आहे. अरुण कुमार हे हुशार आणि प्रामाणिक, पण व्यवस्थेसमोर हतबल झालेले. तरुण अजयमध्ये ते स्वतःला कुठेतरी पाहत असतात. अजयबद्दल त्यांच्या मनात हळवा कोपरा असतो. त्याला ते सतत पाठिंबा देत असतात.

अजयसोबत गजराज थंड डोक्यानं करत असलेल्या हत्यांबद्दल त्यांचं बोलणं चालू असतानाच एका वरिष्ठ सरकारी बाबूचा फोन येतो. "मी सध्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे." अरुण कुमार सांगण्याचा प्रयत्न करतात. "मला तुम्ही अर्ध्या तासात माझ्या मिटिंगमध्ये हवे आहात." फोन खाडकन ठेवल्याचा आवाज. अरुण कुमार काही क्षण शून्यात बघतात आणि अजयकडे पाहून क्षीणपणे हसून म्हणतात,"वेलकम टू लखनौ.” गजराजनं आपल्या टोळीमध्ये युनिव्हर्सिटी स्टुडंट्सची भरती करायला सुरुवात केलेली असते. "आपला हक्क मागून मिळत नसतो, तो बळानं हिसकावून घ्यावा लागतो," असं सांगून कॉलेजमधल्या पोरांच्या पुरुषत्वाला आव्हान करून त्यांना आपल्या टोळीत सामील करून घेतो. त्यातून विद्यापीठात गॅंगवॉर सुरू होतात. अजयच्या कामाच्या पहिल्या दिवशीच झालेल्या एका टोळीयुद्धात तीन विद्यार्थी मारले जातात. या टोळीयुद्धात कार्बाईनसारख्या आधुनिक शस्त्रांचा वापर झालेला असतो. या कोवळ्या तरुणांच्या हातात असली घातक हत्यारं देऊन काय साध्य होतं, असा अस्वस्थ करणारा प्रश्न अजयला पडतो. जिथं हे हत्याकांड झालेलं असतं, त्याच्या समोरच लखनौच्या प्रसिद्ध हलवायाचं दुकान असतं. त्यावर मोठ्या अक्षरांत पाटी असते- 'मुस्कुराईये, क्यूँ की आप लखनौ में है." त्या तशा परिस्थितीमध्येही अजयच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही.

अजय गजराजला अडवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो, पण त्याला अतिशय मर्यादित यश मिळतं. कारण पोलीस दलातलेच अनेक अधिकारी गजराजला आतून सामील असतात. अजयची पुढची कृती काय असणार आहे, याची टीप गजराजला अगोदरच मिळत असते. अजय आणि गजराज या दोघांमध्ये टॉम अँड जेरीचा खेळ चालू असतो. फक्त या खेळात टॉम आणि जेरी सतत बदलत असतात. व्यवस्थेनंच अजयचे हात बांधले गेलेले असतात.

अजय अरुण कुमारांसमोर संघटित गुन्हेगारीवर प्रहार करण्यासाठी एका स्पेशल टास्क फोर्स गठन करण्याचा प्रस्ताव ठेवतो. अशी स्पेशल टास्क फोर्स जिच्या हातात प्रचंड अधिकार एकवटलेले असतील आणि जिला लाल फितीच्या जंजाळात अडकून पडण्याची गरज नसेल. अरुण कुमारांना ही कल्पना आवडते. पण त्यांना यासाठी 'बाबूंची' परवानगी आवश्यक असते. हे बाबू लोक म्हणजे व्यवस्थेचा गाळीव अर्क असतात. ऑफिसमध्ये गोल्फ खेळणारे, प्रशासनात एक नवीन वर्णव्यवस्था लागू करणारे आणि त्यांच्यापेक्षा खालच्या पायरीवर असणाऱ्या लोकांकडे तुच्छतेनं पाहणारे. त्यांना आपली कामं सोडून राजकीय घडामोडी घडवण्यात जास्त रस असतो. हे बाबू लोक अजयचा स्पेशल टास्क फोर्सचा प्रस्ताव धुडकावून लागतात.

पण अचानक एक अनपेक्षित घटना घडते. हातात आलेल्या शक्तीच्या मदात गजराज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मित्राची हत्या करतो आणि त्यांच्या नातवाचं अपहरण करतो. मग इतके दिवस झोपलेली शासकीय यंत्रणा खडबडून जागी होते. आपण निर्माण केलेला भस्मासूर आता आपल्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला आहे, हे त्यांच्या लक्षात येतं. मुख्यमंत्री जातीनं या प्रकरणात लक्ष घालतात. अजयला त्याची स्पेशल टास्क फोर्स उभा करण्याची परवानगी मिळते. अजय आपले विश्वासू अधिकारी घेऊन गजराज आणि त्याच्या टोळीचा बिमोड करण्यास सिद्ध होतो. पण गजराजला ट्रेस कसं करायचं हा प्रश्न असतो. पण त्याचं उत्तरही मिळतं.

उत्तर प्रदेशमध्ये नुकतीच सेल्युलर सर्व्हिस सुरू झालेली असते. कुठलीही आधुनिक शस्त्रं आणि तंत्रज्ञान पोलिसांच्या अगोदर समाजविरोधी घटकांच्या हातात जातात, हे एक कटू सत्य असतं. गजराज आणि कंपनी धंद्याचं सगळं मायक्रो मॅनेजमेंट मोबाईलवरून करायला लागलेली असते. पोलिसांना तर ही काय भानगड आहे हेच लक्षात येत नसतं. पण एका प्रसंगात त्यांच्या असं लक्षात येतं की, मोबाईलवरून केल्या जाणाऱ्या कॉल्सना ट्रेस करून आपण गजराजपर्यंत पोहोचू शकतो. पण टास्क फोर्समधले अधिकारी कार्यक्षम असले तरी याबाबतीत निरक्षर असतात. या टप्प्यावर चित्रपटात एंट्री होते ती प्रोफेसर तिवारीची (पंकज कपूर ). हा या क्षेत्रातला तज्ज्ञ मानला जात असतो. अजय या कामासाठी प्रोफेसर तिवारीची मदत घ्यायची ठरवतो. तिवारी मदतीची तयारी दाखवतात, पण एक समस्या असते. तिवारींना हत्यारांचा फोबिया असतो. रिव्हॉल्व्हर आणि तत्सम हत्यारं बघून ते भीतीनं अस्वस्थ होतात.

एकदा तिवारी आणि एक पोलीस अधिकारी जीपमध्ये बसलेले असतात. तो अधिकारी आपली बंदूक काढून समोर ठेवतो. ती बघून तिवारी प्रचंड अस्वस्थ होतात. ते हळुवारपणे अधिकाऱ्याला विनंती करतात, "आप जरा इसे अंदर रखेंगे? हमें ऐसी चिजोंसे परहेज है." अधिकारी हसून बंदूक होलेस्टरमध्ये ठेवतो आणि मिश्कीलपणे विचारतो, "लता से तो परहेज नहीं है न?" आणि टेपवर लताची गाणी लावतो. हळुवार मनाचे प्रोफेसर तिवारी आणि कडक मिजाजचे चोवीस तास हत्यार बाळगणारे पोलीस अधिकारी, हे एक विचित्र कॉम्बिनेशन असतं. पण तिवारींच्या मदतीमुळे टास्क फोर्सला यश मिळायला लागतं. मोबाईल वापरणारे गजराजचे सहकारी एक एक करून टिपले जायला लागतात. गजराज पोलीस दलाच्या आक्रमकतेमुळे गोंधळून जातो.

दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्यामुळे आपले राजकीय संबंध वापरून गजराज अजयला पायबंद घालू शकत नसतो. पण आपल्याला वाचवू शकतील ते राजकारणीच हे त्याला पक्कं माहीत असतं. तो राज्यातल्या तालेवार नेत्यांशी संपर्क साधतो.

राजकारण हे प्रत्येक गुन्हेगाराचं शेवटचं आश्रयस्थान असतं हे गजराजच्या लक्षात येतं. त्या तालेवार नेत्याच्या मदतीनं जवळ आलेली निवडणूक लढवण्याचं गजराज ठरवतो. गजराजनं निवडणूक लढवली आणि तो जिंकला तर कोणताही टास्क फोर्स त्याला हातही लावू शकणार नाही, याची जाणीव अजयला असते. आपल्या हातात फार कमी वेळ राहिला आहे, हे त्याला कळतं. लवकर हालचाली नाही केल्या तर गजराज नेता बनून आपल्या डोक्यावर बसेल, हे त्याला कळत असतं. गजराजला लवकरात लवकर शोधून त्याला मारण्याची घाई सुरू होते. टास्क फोर्स गजराज आणि त्याच्या टोळीला गाठते. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून निघालेली एक रेल्वे या कौरव-पांडवांचं कुरुक्षेत्र बनतं.

अजय आणि गजराज चित्रपटात पहिल्यांदाच एकमेकांसमोर येतात. ते लंबेचवडे डायलॉग बोलत बसत नाहीत. लगेच एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला उद्युक्त होतात. तिवारीही टास्क फोर्स सोबत असतातच. अंदाधुंद गोळ्या चालतात. एक वेळ अशी येते की, गजराजच्या टोळीतले आणि टास्क फोर्समधले सगळे मारले जातात. तिवारी एका बाकाआड दडून भीतीनं थरथरत हा मृत्यूचा मंजर बघत असतात. आता दोघंच जण शिल्लक असतात. गजराज आणि जबर जखमी झालेला अजय. गजराज आपली बंदूक अजयवर रोखतो. नेहमी युद्धात पांडव जिंकायला पाहिजे, असं थोडीच असतं! अजय डोळे मिटतो. गोळी झाडल्याचा आवाज येतो. अजय डोळे उघडतो. गजराजवर कुणीतरी गोळी झाडलेली असते. प्रोफेसर तिवारी थरथरत्या हातात बंदूक घेऊन उभे असतात. अजयच्या म्लान चेहऱ्यावर हसू उमलतं. गजराजचा खात्मा बघून अजय आनंदानं डोळे मिटतो. आपल्या वडिलांमुळे परिवारावर लागलेला डाग आपण पुसला आहे, हे समाधान त्याला शेवटच्या क्षणी लाभतं. महाभारताच्या शेवटी कसा फक्त अश्वत्थामा वाचतो, तसे तिवारी वाचतात. नेमकं काय घडलं हे जगाला सांगण्यासाठी. अजय आणि त्याच्या टीमच्या बलिदानाची गाथा जगाला सांगण्यासाठी. 

मला विचाराल तर मी 'सेहर'ला 'अर्धसत्य' आणि 'शूल'च्या श्रेणीत ठेवेल. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे दिग्दर्शक व लेखक कबीर कौशिक. त्यानं चित्रपटाची पटकथा एकदम घट्ट बांधली आहे. एक-दोन प्रसंग वगळता मेलोड्रामा मुळीच नाही. सगळं अगदी आपल्या आजूबाजूला घडतं तसं वास्तविक. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, असं का म्हणतात याचा प्रत्यय हा चित्रपट बघताना वारंवार येतो. चित्रपटातले संवादही विषयाला साजेसे. शुद्ध अवधी हिंदीमधले. पण या इतक्या चांगल्या कथेला महिमा चौधरीच्या पात्राचं आणि तिच्या व अजयच्या प्रेमकहाणीचं ठिगळ कबीरला का लावावंसं वाटलं हा संशोधनाचा विषय आहे. महिमा चौधरीच्या ट्रॅकमुळे उगीच कथानकात अडथळा येतो. कदाचित आपला चित्रपट खूपच डार्क होत आहे, अशी भीती त्याला वाटत असावी. त्यामुळे 'सॉफ्ट टच' देण्यासाठी त्यानं असं केलं असावं.

'सेहर'मध्ये दिग्दर्शक आणि लेखक म्हणून जी उंची कबीरनं गाठली, ती दुर्दैवानं त्याला पुन्हा कधीच गाठता नाही आली. त्याने नंतर जे चित्रपट केले, ते वाईट म्हणावे या श्रेणीतले होते. यापुढे कबीर चांगला चित्रपट करण्यात अपयशी ठरला, तर अजून एक 'वन फिल्म वंडर' म्हणून त्याची नोंद होईल, जे दुर्दैवी असेल…

चित्रपट प्रचंड आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे अर्थातच अर्शद वारसी. अर्शद हा देशातल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय कुमारच्या रोलमध्ये त्याने आपलं सर्वस्व दिलं आहे. हा चित्रपट येईपर्यंत अर्शदची 'सर्किट' इमेज प्रस्थापित झाली होती. ही गंभीर भूमिका करण्यास हा अभिनेता योग्य आहे, का अशी शंका अनेकांना वाटत होती. पण आपल्या अभिनयानं अर्शदनं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानं चित्रपटात आदर्श अंडरप्ले कसा असावा याचं उदाहरण घालून दिलं आहे. धीरगंभीर, क्वचितच हसणारा, न्यायाची चाड असणारा, कमी पण मुद्देसूद बोलणारा आणि डोक्यात आगडोंब उसळलेला पोलीस ऑफिसर रंगवण्यासाठी अर्शदशिवाय योग्य माणूस दुसरा कुठलाच नव्हता, असं सिनेमा बघितल्यावर सतत वाटत राहतं. पंकज कपूर यांनी घाबरट पण एका क्षणी कमालीचं धैर्य दाखवलेला प्रोफेसर तिवारी जबरदस्त केला आहे. चित्रपटातल्या अनेक भागांवर रामगोपाल वर्माच्या 'सत्या'चा ठसा सतत जाणवत राहतो. विशेषतः गॅंगवॉर आणि पोलीस एन्काउंटरच्या प्रसंगामध्ये.

चित्रपटातल्या अनेक अनाम कलाकारांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. चित्रपटात अर्शद, महिमा आणि काही प्रमाणात सुशांत, पंकज कपूर, सुहासिनी मुळे व राजेंद्र गुप्ताचा अपवाद वगळता एकही ओळखीचा चेहरा नाही. पण या अनाम अभिनेत्यांनी आपल्या भूमिका सुरेख वठवल्या आहेत. विशेषतः गजराजच्या गॅंगमधले त्याचे सहकारी आणि अजयच्या स्पेशल टास्क फोर्समधल्या अधिकाऱ्यांची भूमिका केलेले अभिनेते निव्वळ थोर आहेत. यातले बहुतेक कलाकार नंतर पुन्हा कधीच दिसले नाहीत. या खेरीज चित्रपटात अजून एक महत्त्वाचं पात्र आहे. दस्तुरखुद्द लखनौ शहर. ज्याप्रमाणे रामूनं 'सत्या'मध्ये मुंबई अप्रतिमपणे टिपली आहे, त्याचप्रमाणे कबीरनं लखनौ आणि त्या शहराची वेगळी संस्कृती अप्रतिमपणे टिपली आहे. ''मुस्कुराईये, क्यूँ की आप लखनौ में है."सारखे संदर्भ त्यामुळे अजूनच रोचक वाटतात. एका खुसखुशीत संवादापेक्षा हा एक संदर्भ मोठा आहे.

अजय आणि गजराजची पात्रं ही खऱ्या आयुष्यातल्या लोकांवरून प्रेरित आहेत. अजयचं पात्र अरुण कुमार या पोलीस अधिकाऱ्यावरून घेतलं आहे. हे तेच अधिकारी आहेत, ज्यांनी एकेकाळी प्रचंड गाजलेलं तेलगी प्रकरण खणून काढलं होतं. सध्या ते सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. गजराजचं पात्र श्रीपक्ष शुक्ला या माफिया डॉनवर बेतलेलं आहे. शुक्लानं अवघ्या विशीत अख्ख्या उत्तर प्रदेशला अंडरवर्ल्डला धारेवर धरलं होतं. डीपी यादवसारखे जुने डॉनही त्याच्या नावानं थरथर कापायचे. असं म्हणतात की, शुक्लानं तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांची हत्या करण्यासाठी सहा करोडची सुपारी घेतली होती. जेव्हा त्याचा एन्काउंटर झाला, तेव्हा तो अवघ्या चोवीस वर्षांचा होता. अर्थात अरुण कुमार आणि श्रीपक्ष शुक्ला यांची कथा पडद्यावर आणताना कबीरनं बरीच सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे. शेवट तर एकदमच वेगळा घेतला आहे.

'सेहर' फारसा चालला नाही. ज्या दिवशी तो प्रदर्शित झाला, त्याच दिवशी प्रचंड पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली होती. पण तसं झालं नसतं तरी चित्रपट चालला असता का? बहुतेक नाही. 

'सेहर'मध्ये ठराविक अंतरानं सतत मृत्यूचा अक्राळविक्राळ चेहरा सतत दिसत राहतो. आत्महत्या, हत्या, निर्घृण मृत्यू असे मृत्यूचे वेगवेगळे चेहरे सतत दिसत राहतात. दिग्दर्शक कबीरला मृत्यूवर सतत काहीतरी भाष्य करायचं आहे असं सतत जाणवत राहतं. शेवटी मृत्यू हेच त्रिकालाबाधित सत्य आहे, हेच सतत चित्रपटात अधोरेखित होत राहतं. असाच एक मृत्यू झाल्यावर चित्रपटामधल्या पात्राच्या तोंडी मृत्यूवर भाष्य करणारी अप्रतिम कविता आहे. लेखाचा शेवट या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय होऊच शकत नाही. 

इस काली ठंडी आग को वापस कर रहा हूँ मैं…..

और इसी के साथ लौटा रहा हूँ,

ये सफेद मिट्टी, ये गतिहीन पानी, ये बहरी हवा
और ये अथाह आकाश, जो गूंगा है…..|


यूँ तो मैं जानता हूँ ईश्वर, की तुम जानते थे की एक दिन,
मैं ये सब कुछ इसी तरह तुम्हें वापस कर दूँगा |

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......