अण्णाभाऊ साठे खर्‍या अर्थाने लोकलेखक होते!
ग्रंथनामा - झलक
डॉ. जनार्दन वाघमारे
  • ‘जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ या पुस्तकाचे मुखृष्ठ
  • Fri , 25 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे Janwadi Sahityik Anna Bhau Sathe

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डायमंड पब्लिकेशन्स यांच्या वतीने ‘जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ हा अभिवादन ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यातील एका लेखाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

अण्णा भाऊसाठे हे लोकशाहीर म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. लोकशाहीर हे बिरूद त्यांच्या नावामागे नेहमीसाठीच चिकटलेले आहे. जसा शाहिरीने त्यांना गौरव प्राप्त करून दिला, तसे त्यांनी शाहिरीला वैभव प्राप्त करून दिले. महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृद्ध आहे. अण्णाभाऊंनी ती परंपरा अधिक उन्नत, परिणत व संपन्न केली. अण्णा भाऊसाठे, द. ना. गव्हाणकर आणि अमर शेख या तिघांनी मराठी शाहिरीवर कळस चढवला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर या तीन शाहिरांनी आपल्या बुलंद आवाजांनी सबंध आकाशच पेटवून दिले होते. अण्णाभाऊंचा जो हात डफावर पडला, त्याच हाताने त्यांनी पोवाडे लिहिले. आपल्या प्रज्ञा-प्रतिभेने त्यांनी काळाच्या छातीवर महाराष्ट्राच्या अस्मितेची लेणी खोदली. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांचे प्रेम होते. मराठी भाषेचा त्यांना सार्थ अभिमान होता. मराठी संस्कृतीवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता.

‘‘महाराष्ट्र मायभू अमुची | मराठी भाषिकांची | संत महंतांची |

ज्ञानवंतांना जन्म देणार | नररत्नांचे दिव्य भांडार |

समरधिर जिथे घेत अवतार ॥ जी ॥’’

अण्णाभाऊंना मराठी माणसाच्या गाथा गाण्यात धन्यता वाटत होती. ‘महाराष्ट्राची परंपरा’ हा त्यांचा प्रदीर्घ पोवाडा महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास आहे.

अण्णाभाऊंनी अनेक पोवाडे लिहिले व गायिले. त्यांची शाहिरी ही त्यांच्या हातातली तळपती तलवार होती. कामगार चळवळीत त्यांचे व्यक्तिमत्त्व ढाळले गेले होते. ते साम्यवादी होते. ‘जगातल्या कामगारांनो, एक व्हा’ ही कार्ल मार्क्सची हाक त्यांच्याही कानावर पडली होती. कामगारांच्या चळवळीत वारकर्‍यांच्या श्रद्धेने त्यांनी भाग घेतला होता. मुंबईतील गिरणी कामगारांचा क्रांतिकारी श्वासोच्छ्वास त्यांना स्पर्श करत होता. कामगारांचा श्वास आपल्या छातीत कोंडून त्यांनी ‘स्तालिनग्राडचा पोवाडा’ लिहिला व गायला. वर्गसंघर्षात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. कामगार हा उद्याच्या इतिहासाचा नायक ठरणार, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. भांडवलशाही नष्ट होऊन जगात कामगारांचे राज्य स्थापन होईल, ही आशा बाळगून ते आपली लेखणी चालवत होते. ‘दलितांचा आशाकिरण’ म्हणून ते स्तालिनग्राडकडे पाहत होते. हा पोवाडाही बराच मोठा आहे. रशियन क्रांतीने जगातील कामगारांचे स्वप्न फुलवले होते. अण्णाभाऊंना रशियाला जाण्याची संधी प्राप्त झाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांना खूप धन्यता वाटली.

कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा प्रत्येक नेता हा अण्णाभाऊंच्या शाहिरीचा जणू नायक होता. खानदेशातल्या श्रीपत पाटलांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कामगारांच्या मोर्चात नऊ कामगारांनी प्राण गमावले. श्रीपत पाटलांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्यावर अण्णाभाऊंनी ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ हा पोवाडा लिहिला; आणि त्यात प्राण फुंकून त्यांनी तो गायला. श्रीपत पाटलांना त्यांनी अमरपद दिले-

‘‘श्रीपती पाटील दिलदार | पुढारी खंबीर | केला निर्धार |

घेऊन विचार सर्वांचा | बेत केला त्याने निकराचा |

पोवाडा ऐका म्होरं त्याचा ॥’’

अण्णाभाऊंनी कामगारांना स्फूर्ती देण्यासाठी हा पोवाडा लिहिला. कामगारांचा निर्धाराचा व एकजुटीचा गौरव त्यांनी या पोवाड्याच्या माध्यमातून केला आहे. ‘मुंबईचा गिरणी कामगार’ हा पोवाडा तर गिरणी कामगारांचा प्रेरणास्रोत होता. बंगालच्या दुष्काळात हजारो लोक मेले. इंग्रज सरकारला त्याचे काहीच वाटले नाही. ‘बंगालची हाक’ हा पोवाडा भारतीय युवकांना एकजुटीचे आवाहन करतो. त्यांच्या ‘महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया’ या पोवाड्याने तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रान पेटवले होते. मराठी माणसाच्या अंगावर त्याने रोमांच उभे केले होते. त्याने त्याच्या मनात अग्नी चेतवला होता.

अण्णाभाऊंच्या शाहिरीमध्ये पोटतिडीक आहे. त्यांची वर्गसंघर्षाची जाणीव सखोल व उत्कट होती. त्यांचा आवाज हा दलित शोषितांचा आवाज होता. दलित हा शब्द त्यांनी व्यापक अर्थाने वापरला आहे. जो जो शोषित व पीडित तो तो दलित! समाजाच्या तळागाळातला माणूस हा त्यांच्या साहित्याच्या विषय होता. तो त्यांच्या कथा-कादंबर्‍याचा नायक होता. अन्यायाच्या शृंखला तोडण्याचे आवाहन त्यांच्या साहित्यात आहे. अण्णा भाऊंना मार्क्सचे तत्त्वज्ञान प्रिय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला विद्रोह त्यांना लढण्याची प्रेरणा देत होता. घाव घालून जग बदलण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी या दोन महामानवांकडून घेतले होते. देशातील धनदांडग्यांनी, जातदांडग्यांनी व धर्मदांडग्यांनी ज्यांचे शोषण केले त्या दलितांच्या बाजूने ते ठामपणे उभे होते. शोषकांवर व त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर त्यांची लेखणी आघात करते. कामगारांच्या लढ्यात तिने प्रेरकाचे काम केले. कामगारांच्या लढ्याने त्यांच्या मनात विश्वबंधुत्वाची भावना निर्माण केली होती.

‘‘जग बदल घालुनी घाव | सांगून गेले मला भीमराव | ’’

अण्णाभाऊंनी पोवाड्यांबरोबर लावण्याही लिहिल्या. त्यांच्या पोवाड्यात वीररस जसा प्रचूर आहे, तसा शृंगाररस त्यांच्या लावण्यांमध्ये विपुल प्रमाणात आहे. पोवाडे असोत अथवा लावण्या, त्यांमध्ये दलित, पीडित व कष्टकर्‍यांचे प्रतिबिंब हमखास आढळेल. कामगारवर्गाविषयीची कणव व त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची चीड त्यांच्या शब्दांतून तीव्रतेने व्यक्त झाली आहे. वीर व शृंगाररसांबरोबर करुणरसही त्यांमध्ये झिरपत असताना दिसतो. अण्णाभाऊ स्वतः कामगार होते. झोपडपट्टीत ते राहात होते. दारिद्रयाने ते वेढले गेले होते. मुंबईतील कामगार वस्त्यांना दारिद्रयाने विळखा घातला होता. गावकुसाबाहेरील अस्पृश्य जातींच्या वाट्याला जे भोग आले होते, ते त्यांनी स्वत: भोगले होते. कामगार चळवळीत ते कार्ल मार्क्स व लेनिन वाचून सामील झाले नव्हते. गिरणगावातील नागमोडी व अरुंद रस्त्यांवर त्यांना मार्क्स व लेनीनची गाठ पडली होती. त्यांनी त्यांच्याशी रस्त्यात उभ्याउभ्या संवाद केला. आणि आपल्या झोपडीत फाटक्या अंथरुणावर पडल्या पडल्या त्या संवादावर चिंतन केले. त्यांनी जे लिहिले त्याला या चिंतनाची डूब मिळाली. ते साम्यवादी बनले ते अशा प्रकारे. साम्यवादात त्यांना मुक्तिपथ दिसला. ‘मुक्ति कोण पथे?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांनी कामगार चळवळीत शोधले होते. जगातील समदु:खी कामगारांशी त्यांनी स्वत:ची नाळ जोडली. मांग जातीत जन्मल्यामुळे अस्पृश्यतेचे चटके त्यांनी सोसले होतेच. वाटेगावच्या अण्णा भाऊंनी मुंबईची वाट धरली. जिवाची मुंबई करण्यासाठी नव्हे तर भाकरीसाठी. गिरणगावातील विद्यापीठात ते शिकले. पुढे नारायण सुर्वेही याच विद्यापीठात शिकले. मॅक्झिम गोर्की हे या विद्यापीठचे कुलगुरू होते.

कामगार चळवळीने अण्णाभाऊंच्या मनात आशावाद फुलवला होता. ही पृथ्वी शेषाच्या फण्यावर नव्हे तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे, या शब्दांतून त्यांचा दुर्दम्य आशावाद व्यक्त झाला आहे. या एकाच वाक्यात त्यांचे श्रमोपनिषद व्यक्त झाले आहे. अण्णाभाऊंचे समग्र साहित्य क्रांतिप्रवण आहे. क्रांतिप्रवण साहित्यात-मग ते कुठल्याही भाषेत असो-नैराश्यवाद असू शकत नाही. अण्णाभाऊंनी आपला लढाऊ बाणा लपवून ठेवला नाही. ध्येयवादाला वैफल्याचा पुसटसाही स्पर्श नाही. ते हाडाचे शाहीर व साहित्यिक होते, याकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्या लिखाणात मोठ्या प्रमाणात वाङ्मयीन मूल्यांचा आविष्कार झालेला आहे. अण्णाभाऊंना सौंदर्यदृष्टी होती.

प्रत्येक लेखकाला स्वत:ची भूमिका असतेच. रंजनवाद हीदेखील एक प्रकाराची भूमिकाच आहे. लेखकाची जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्याच्या साहित्यात व्यक्त होतेच. साहित्य ही मानवी जीवनावरची समीक्षा असते. जीवनवादी लेखक परंपरेचा व स्थितिशीलतेचा पूजक नसतो; परिवर्तनाचा तो पुरस्कर्ताही असतो.

अण्णाभाऊ साठे हे फार शिकलेले लेखक नव्हते. अल्पशा अक्षरओळखीतून त्यांनी शब्दप्रपंच केला. त्यांच्या लेखणीतून ‘अक्षर’साहित्य निर्माण झाले आणि तेही विपुल प्रमाणात, हे लक्षात घेतले पाहिजे. बहुजन समाजातील संतकवींनी अक्षरवाङ्मय निर्माण केले आहे. बहिणाबाई चौधरींसारख्या एका निरक्षर बाईने निर्माण केलेले साहित्य हे मराठी साहित्याचे आभूषण ठरले आहे. अण्णाभाऊंना निसर्गाने अलौकिक अशी प्रतिभा दिली होती. या प्रतिभावंताने परिश्रम आणि लेखणी पकडली. गुन्हेगारीची परंपरा असलेल्या वारणेच्या खोर्‍यात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी सारस्वताच्या खोर्‍यात प्रवेशून एक वेगळ्या प्रकारचा गुन्हा केला.

वाङ्मयाला ते तिसरा डोळा मानीत. दलित वर्गाशी ते एकनिष्ठ होते. त्याच्या न्यायी संघर्षावर व त्याच्या अंतिम विजयावर त्यांचा ठाम विश्वास होता. कष्टकरी व कामकर्‍यांच्या श्रमातूनच राष्ट्राची संपत्ती निर्माण होते. कार्ल मार्क्सने हेच सांगितले आहे. ‘श्रमिक वर्ग हा या देशाचा सामाजिक व सांस्कृतिक पाया आहे. हा दलित आजच्या समाजाचे हृदय आहे, त्या हृदयाचे अदम्य स्पंदन होत असते,’ हे सांगायला ते विसरले नाहीत. दलित वर्गाचे दु:ख अण्णाभाऊंनी भोगले होते. दलितमुक्तीच्या दिशेत त्यांचा लेखनप्रवास आयुष्यभर चालू होता.

अण्णाभाऊंच्या अनेक कथा व कादंबर्‍या गाजल्या. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला वि. स. खांडेकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. तीत ते अण्णाभाऊंविषयी लिहितात, ‘या लेखकाला प्रतिभेचं देणं आहे, जीवनात आग ओकणार्‍या हरेक तर्‍हेच्या गोष्टींचा अनुभव आहे. त्याच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि अन्यायाविरुद्ध बंड उभारणार्‍या वृत्तीचा तो पूजक आहे!’ अण्णाभाऊंची प्रतिभा लावण्याची होती. त्यांची प्रज्ञा कारुण्याने भिजलेली होती.

अण्णाभाऊंना वारणेच्या खोर्‍यात अनेक वृत्ती-प्रवृत्तींची माणसे भेटली. त्यांना त्यांनी आपल्या कथा कादंबर्‍यांमध्ये चित्रित केले. त्या माणसांवर त्यांचे निरतिशय प्रेम होते. त्यांच्या गुणदोषांसहित त्यांनी त्यांना स्वीकारले होते. ते म्हणतात, ‘‘मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. जीवनातील वास्तवच विस्मयकारक असते. त्याच्या सान्निध्यात कल्पना लुळीपांगळी ठरते.’’ अण्णाभाऊंच्या प्रतिभेला ङ्गिनिक्स पक्ष्याचे पंख लाभले होते, असे मला वाटते.

अण्णाभाऊ साठे हे एक झपाटलेले लेखक होते. अवतीभोवती पसरलेले अफाट  दु:ख, दारिद्रय व अज्ञान हेच त्यांच्या चिंतनाचे व लेखनाचे विषय होते. त्यांचे साहित्य विपुल आहे. त्यांचे तेरा कथासंग्रह, तीन नाटके, चौदा लोकनाट्ये, पस्तीस कादंबर्‍या, दहा पोवाडे आणि एक प्रवासवर्णन असे एवढे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या सात कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले आहेत. केवळ वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी हे साहित्य निर्माण केले.

अण्णाभाऊंच्या सर्वच कथा-कादंबर्‍यांचे नायक त्यांच्या भाग्यशाली ‘उद्या’कडे जातात आणि तो भाग्यशाली ‘उद्या’ त्यांच्याकडे येतो. साहित्यिक म्हणून अण्णा भाऊंचे मोठेपण मराठी समीक्षकांना लवकर उमगले नाही, हे खेदाने सांगितले पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे खर्‍या अर्थाने लोकलेखक होते.

‘फकिरा’ ही कादंबरी वाङमयीन मूल्यांच्या कसोटीवर उतरणारी आहे. तिची वाचनीयता अतिशय प्रत्ययकारी आहे. वाचकांची उत्कंठा ती वाढवते. अण्णाभाऊंची भाषा, वर्णनशैली आणि कथाकथन अप्रतिम आहे. वारणा खोर्‍यातील बोलीभाषा त्यांनी अतिशय कौशल्याने वापरली आहे. उपमा लाजवाब आहेत. म्हणींचा उपयोगही त्यांनी अतिशय कल्पकतेने केला आहे. त्यामुळे कथेला रंजकता प्राप्त झाली आहे. ती प्रचारकी नाही. सामाजिक वास्तव हाच तिचा आशय आहे; आणि त्या वास्तवाची अभिव्यक्ती कलात्मक आहे. वाङमयीन आविष्कार म्हणतात ते यालाच. अण्णाभाऊंचे साहित्य प्रादेशिक, ग्रामीण आणि दलित या तिन्ही साहित्य प्रकारांमध्ये मोडते. या तिन्हींचे गुणविशेष त्यात प्रचूर प्रमाणात आहेत.

खरे तर लेखक हा समकालीन वाचकांसाठी लिहितो. समकालीन वाचक हे समकालीन वास्तवाचे चांगल्या प्रकारे आकलन करू शकतात. कारण समकालीन वास्तव त्यांनी अनुभवलेले असते. साहित्याला प्राप्त होणारे आशयद्रव्य मुख्यत: समकालीन समाजाचे अंग असते. अण्णाभाऊंनी वाटेगाव, त्याचा परिसर आणि वारणा खोरे यातील सामाजिक वास्तवाला ‘फकिरा’ या कादंबरीत वस्तुनिष्ठपणे कलात्मक रूप दिले आहे. अतिशय संवेदनशील मनाने लिहिलेली ही कादंबरी आहे. या कादंबरीतील व्यक्तिचित्रे अप्रतिम आहेत. विशेषत: राणोजी मांग, शंकरराव पाटील, विष्णूपंत कुलकर्णी आणि रावसाहेब खोत यांची व्यक्तिमत्त्वे त्यांच्या कंगोर्‍यांसहित उभी केलेली आहेत. वाटेगाव व शिरगाव या दोन गावांनाही त्यांनी व्यक्तिमत्त्वे दिलेली आहेत. ज्या प्रदेशात ही गावे वसलेली आहेत त्या प्रदेशाचे त्यांनी संवेदनशील मनाने मानुषीकरण ‘Tale of Two Cities’ केले आहे.

विषमताग्रस्त समाजात दलित-पददलितांवर पदोपदी अन्याय होतो. आणि म्हणून त्यांना संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा अण्णा भाऊंच्या साहित्याचा प्राणबिंदू आहे. संघर्ष कशासाठी? कुणासाठी? व कुणाविरुद्ध हे प्रश्न ओघाने आलेच. अण्णाभाऊंच्या कथा-कादंबर्‍यांमधला संघर्ष शोषण आणि व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. तो दलित-पीडित-शोषित-वंचितांसाठी आहे. तो त्यांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी आहे. जागे झालेले अन्यायग्रस्त लोक हे संघर्षरत असतात. अन्यायग्रस्त समाजघटक नाइलाजाने गुन्हेगारीत सापडलेले असतात. परिस्थितीने निर्माण केलेल्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी प्रसंगी त्यांना मिळेल ते शस्त्र हाती घ्यावे लागते. तो व्यूह फोडून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. जगण्याच्या धडपडीतून त्यांच्या हातून गुन्हे घडतात. ते अटळ असतात. संघर्ष हा अण्णाभाऊंच्या नायक-नायिकांचा प्राणवायू आहे. त्यांच्या एका कादंबरीचे नावच ‘संघर्ष’ आहे. अण्णा भाऊंच्या कथा आणि कादंबर्‍या संघर्षाचे विज्ञान विशद करतात.

खरे तर संघर्ष हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भागच असतो. संघर्षाशिवाय समाजजीवनाला गती मिळत नाही. आणि गती मिळाल्याशिवाय त्याला स्वत:ची लय सापडत नाही. संघर्षाशिवाय समाजपरिवर्तन होऊ शकत नाही. अण्णाभाऊंच्या साहित्यात हा संघर्ष विविध पातळ्यांवर दिसून येतो.

.............................................................................................................................................

जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे - संपा. डॉ. पी. विठ्ठल, डॉ. राजेश्वर दुडूकनाळे

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पाने - २२०, मूल्य – २५० रुपये.

पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3994

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......