‘महानगर’, लिपस्टिक, सिगरेट आणि मॉल
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अलका गाडगीळ
  • ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चं एक पोस्टर
  • Wed , 26 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा लिपस्टिक अंडर माय बुरखा Lipstick Under My Burkha अलंक्रीता श्रीवास्तव Alankrita Shrivastava प्रकाश झा Prakash Jha

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाचा सांधा नारायण सुर्वेंच्या ‘पाणी भरायला जाऊ की नको ऐसा खत में लिखो’ या कवितेशी आणि सत्यजित राय यांच्या ‘महानगर’ या सिनेमाशी चपखल जुळतो.

‘पाणी भरायला…’ या कवितेतला परदेशी कामाला असूनही बायकोला नियंत्रित करू पाहणारा नवरा आपल्याला दिसतो. ‘लिपस्टिक’मध्ये अरब देशातली नोकरी गमावून शिरीनचा नवरा परत आलाय. त्याच्या नकळत आणि त्याच्या अनुपस्थितीत शिरीन सेल्सगर्लची नोकरी अत्यंत यशस्वीपणे करतेय. पण नवरा तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तिच्या शरीरावर तो वाटेल तेव्हा वाटेल तसा अत्याचार करतो, हक्क गाजवतो.

‘महानगर’ चित्रपटाची नायिका ‘आरती’ साठच्या दशकांतील उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय निर्बंध तोडून नोकरीसाठी बाहेर पडलीय. नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर चहा पावडर घ्यायलाही पैसे नसल्यामुळे आरतीने काम शोधायला सुरुवात केली. पटकन नोकरीही मिळाली, पण काम आहे सेल्सगर्लचं. तिथं तिची एडिथशी ओळख आणि ओळखीचं मैत्रीत रूपांतर होतं. रोज उच्चभ्रू वस्तीत घरोघरी जाऊन प्रॉडक्ट्स विकण्याचं काम करायचं. चुणचुणीत एडिथ तिला त्याच्या ट्रिक्स शिकवते. लिपस्टिक भेट देते आणि ती लावायची कशी याचं प्रात्यक्षिकही आरतीच्या ओठांवरच करते. आरती खूप वेळ आपली लिपस्टिक लावलेली प्रतिमा आरशात पाहत राहते. लवकरच तिच्या पर्समधली लिपस्टिक नवऱ्याला दिसते. तो अस्वस्थ होतो. ‘नोकरी सोड’ तो फर्मावतोय. गृहिणीच्या कर्तव्यांची आठवण करून देतो. सत्शील स्त्रियांनी कसं वागावं यासंबंधीचा पाठही तिला देतो. पण आरती शांतपणे आपल्या फिरतीच्या कामासाठी बाहेर पडते. मध्यमवर्गीय स्त्रियांनी लिपस्टिक लावणं भद्र समजलं जात नसतानाही रोज नोकरीच्या कालावधीत लिपस्टिक लावणं ती चालू ठेवते.

‘महानगर’मध्ये लिपस्टिक बंडखोरी आणि स्वातंत्र्याचे रूपक म्हणून समोर येते आणि ‘लिपस्टिक’मधल्या रेहाना या कॉलेज कन्यकेसाठीही ती मुक्तीरूप घेऊन येते.

नावात बुरखा असल्यामुळे या सिनेमाची गोष्ट एका विशिष्ट धर्मातल्या स्त्रियांची असेल असं वाटू शकतं. पण ‘लिपस्टिक...’ जुलमाच्या छायेत राहणाऱ्या सर्व स्त्रियांची गोष्ट आहे.

रेहाना, शिरीन, लीला आणि उषा एका जुन्या वाड्यात राहतात. पंचावन्न वर्षांची उषा हवेलीच्या मालकांपैकी एक आहे. तिथं तिची बुआजी म्हणूनच ओळख आहे. इतर तिघींची कुटुंबं तिथं भाडेकरू म्हणून राहतायत. उषाचा नवरा अनेक वर्षापूर्वीच निवर्तलाय. याच हवेलीच्या गच्चीवर लीला ब्युटी पार्लर चालवतेय आणि एका मुस्लिम फोटोग्राफरच्या प्रेमात आकंठ बुडालीय.

‘लिपस्टिक’ने काही धारणांना जोरदार धक्का दिला आहे. यातली लीला संभोगासाठी सदासर्वकाळ आतुर असणारी. दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्यावरही मध्यरात्री आपल्या फोटोग्राफर प्रियकराच्या घरात घुसून त्याला बाथरूममध्ये ओढत नेऊन सेक्सचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करणारी. नियोजित नवऱ्यासोबत डेटवर असताना कारमध्ये त्याला आडवं करण्याचा प्रयत्न करणारी लीला स्त्रियांना छळणाऱ्या अपराधगंडापासून मुक्त आहे. नियोजित नवरा मात्र ‘सुहाग रातपर्यंत वाट पाहू’ असं सांगून आपली सुटका करून घेतो. 

शिरीनचा नवरा मात्र टिपिकल मेल शोव्हिनिस्ट पिट-एमसीपी. संभोगासाठी बायकोला तयार करणं, तिची संमती घेणं या मर्दाला बहुदा अपमानासारखं वाटत असावं. शिरीन हा अतिरेकी बलात्कार सहन करून घेते. तिच्यासमोर मुक्तीचा एकही मार्ग नाही.

या चित्रपटानं वैवाहिक बलात्कारासंबंधी खणखणीत भाष्य केलं आहे.

फोटोग्रारवर प्रेम असूनही लीलाची आर्इ या लग्नाला तयार नाही. तिनं स्थळ बघितलंय. साखरपुडाही ठरवला आहे. हवेलीत समारंभ सुरू असताना अचानक लार्इट गायब होतात. मेन स्विचकडे जात असताना उषाची एका प्रौढ पुरुषाशी जवळजवळ टक्कर होते. तो प्रौढ पुरुष फ्युज फिक्स करत असताना हवेलीत राहणारी शेजारीण तिथं अवतिर्ण होते आणि त्याची ओळख करून देते- ‘ये हमारे भैय्याजी है’. भैय्याजीच्या पत्नीचं नुकतंच निधन झालेलं असतं आणि त्याची ही भाभी त्याच्यासाठी वधू शोधण्याच्या प्रयत्न करत असते. ‘ये पचपन के है, वो चालीस पचासकी हो तो भी चलेगी. आपभी ध्यान में रखना बुआजी’. या प्रौढ पुरुषाचं अचानक समोर येणं, फ्युज फिक्स करता करता झालेला संवाद, नंतर अभावताच निघालेला त्याच्या पुनर्विवाहाचा विषय या सगळ्यामुळे उषाची होणारी चलबिचल रत्ना पाठकने अप्रतिमरीत्या दाखवली केली आहे. तिचा केवळ चेहराच नव्हे तर तिचं अख्खं शरीरच बोलतं. या वळणावरच उषाचं भावनिक एकलेपण अधोरेखित होतं.

साठीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या उषाला पिवळं साहित्य वाचण्याचा शौक आहे. चित्रपटाची सुरुवात उषाच्या व्हॉर्इस ओव्हरने होते. वयात आलेल्या रोझीची ‘जवानी काटे की तरह चूभ रही है. जिस्म के अंदर का तुफान बाहर की आंधी की से भी खतरनाक है’ हे कथन सुरू असताना पडद्यावर मॉल दिसतो. कॉलेजियन रेहाना लिपस्टिक ट्राय करताना दिसते. कोणाचं लक्ष नसताना ती लिपस्टिक सरळ पर्समध्ये सरकवतेय. नंतर मॉलच्या वॉशरूममध्ये जाऊन जीन्स, टीशर्ट, मोकळे सोडलेले केस आणि ओठांना लिपस्टिक लावून सुसाट वेगानं कॉलेजमध्ये. रेहानाला लीव झेपेलिन हा इंग्लिश बँड, फाटकी जीन्स आणि पार्ट्या आवडतात. पण घरातून बाहेर निघताना बुरखा घालावा लागतो. रेहानाच्या कुटुंबाचा बुरखा शिवण्याचा व्यवसाय आहे. रोज तिलाही मान मोडून शिलार्इचं काम करावं लागतं. घरातल्या कर्मठ वातावरणात तिचा जीव घुसमटतो.

नातवांबरोबर स्विमिंग पूलवर गेलेल्या बुआजीची स्विमिंग ट्रेनर जसपाल बरोबर भेट होते. जसपालच्या आग्रहाखातर ती पोहण्याचा क्लास सुरू करते आणि चांगलं पोहूही लागते. जसपालच्या पिळदार शरीराची तिला मोहिनी पडू लागते. नंतर रोज रात्री रोझी बनून पिवळ्या पुस्तकातील रोझीच्या कामुक कहाण्या फोनवरून त्याला सांगण्याचं सत्रही ती सुरू करते.

या चित्रपटांत मॉल एक सुटकेचा मार्ग म्हणून दिसत राहतो. रेहानाला घरातून निघून या मॉलमध्येच यायचं असतं. तिला आधुनिक जीन्स, लिपस्टिक आणि शूज हवे असतात. ते विकत घेणं जमणारं नसतं. मग ते चोरण्याचे मार्ग ती शोधून काढते. हा मॉल तिची स्वप्नपूर्ती करतो. उषा ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ या भावनेनं मोठ्या धाडसानं स्विम सूट घेण्यासाठी मॉलमध्ये येते. शिरीनही आपल्या कामासाठी मॉलमध्ये येत राहते. घरच्या जुलमापासून दूर.  

“स्त्रियांची लैंगिकता सुप्त असते तसंच स्त्रियांना भावनिक जवळीक हवी असते. त्यांच्यामध्ये निसर्गत:च, एकपतित्वाची भावना असते. पुरुषांच्या लैंगिक अंदाधुदीच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांचं एकपतीव्रत तटबंदीसारखं उभं असतं”, अशी मांडणी हेतुपुरस्सर करण्यात आली असं उत्तर-आधुनिक मानववंशशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ म्हणतात. ही मांडणी समाजाला हवीहवीशी वाटणारी होती. स्त्री लैंगिकतेला वेसण घातली नाही तर समाजात हाहा:कार होर्इल असं वाटू लागतं. पुरुषांना मिळणाऱ्या लैंगिक स्वातंत्र्याबद्दल स्त्रियांना वाटणारं दु:ख हे पितृसत्तेनं लादलेलं दु:ख आहे. पुरुषांची कामवासना अपरंपार असते आणि मनावर ताबा ठेवून बाहेरख्यालीपणा केला नाही, याबद्दल रूखरूख वाटण्याची तसंच स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची सोय पितृसत्तेनं पुरुषांसाठी करून ठेवलीय. पण स्त्रीनं तसं काही केलं तर तिला स्वत:लाच गुन्हा केल्यासारखं वाटू लागतं. हे सारे भ्रम पितृसत्तेनं पेरलेले.

‘लिपस्टिक...’ ने पुरुषत्वाच्याही साऱ्या छटा समोर आणल्या आहेत. होणाऱ्या वधूशी धिटार्इनं बोलू न शकणारा, लाजणारा, लीलाने संभोगाचं सूचन केल्यावर भांबावून जाऊन आपला नकार दर्शवणारा वाग्दत्त पुरुष, जीवनाचा आनंद लुटणारा आणि लीलावर प्रेम करणारा फोटोग्राफर, बायकोवर बलात्कार करणारा, तिला गर्भनिरोधकं वापरू न देणारा, कंडोम वापरायला नकार देणारा, शिरीनचा एमसीपी नवरा.

मनात अपराधगंड न बाळगता सेक्सचा आनंद लुटणारी लीला ‘लिपस्टिक’मध्ये आहे. आपल्या प्रियकराबरोबर आणि होणाऱ्या नवऱ्याबरोबर एकाच वेळी संबंध ठेवण्याचं धाडस तिच्यामध्ये आहे. पण तिच्यासमोर अनिश्चितता आहे. शिरीनला लग्न आणि लग्नातला लैंगिक छळ सहन होर्इनासा झाला आहे. रेहानाला घरच्या कर्मठ बंधनातून मोकळं होऊन गायिका व्हायचंय, यौवनाचा आनंद लुटायचाय. उषाची कामप्रेरणा जागृत आहे, पण तो आनंद प्रौढ विधवेला कसा मिळावा?

दिवाळीच्या दिवशी उषानं आयोजित केलेल्या पार्टीनंतर तिची पिवळी पुस्तकं, रोझी बनून जसपालला तिने केलेले फोन कॉल यांचा छडा बुआजींच्या कुटुंबाला लागतो. रिहानाने मॉलमध्ये केलेल्या चोऱ्यांचाही छडा लागतो. तपासामध्ये पोलिसांना तिच्या कॉलेजमधल्या ग्रूपनेच मदत केलेली असते. या प्रकरणामुळे तिचं कॉलेज बंद होणार असतं. लीलापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो. तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल होणाऱ्या नवऱ्याला समजलंय. लग्न मोडणार हे नक्की. शिरीनला नोकरीत बढती मिळालीय, पण नवरा ती करू देणार की नाही हा प्रश्न आहे आणि रोज रोज होणारा लैंगिक अत्याचार थांबवणंही तिच्या हातात नाही.

उषाला तिचे भाचे आणि सुना घराबाहेर काढतात. तिला आधार देण्यासाठी इतर तिघीही तिला तळमजल्यावरच्या खोलीत घेऊन जातात. बुआजीच्या सामानात ‘लिपस्टिकवाले सपने’ हे पुस्तक आहे. ते वाचून लीला म्हणतेय दोन दोन पुरुषांच्या प्रेमात फसली बिचारी. अखेरच्या दृश्यात गप्पागोष्टी करत असताना या चार स्त्रिया एक सिगरेट शेअर करताना दिसतात. मैत्री आणि जवळीक दर्शवण्यासाठी या दृश्याची योजना करण्यात आली असावी. या वळणावर चित्रपट संपतो. परंतु या दृश्यामुळे स्त्रीवादी चळवळीबद्दल असलेला गैरसमज अधिक मजबूत होतो.

एकोणिसशे वीसच्या दशकांत स्त्रीवादी चळवळ सिगरेट ओढण्याचा हक्क मिळवण्यासाठी सुरू झाली, असा एक गैरसमज पसरवला गेला होता. समता आणि समान दर्जा मिळवायचा होता तो केवळ सिगरेट ओढण्याच्या स्वांतत्र्यासाठी नव्हे, पण जाहिरात आणि पब्लिक रिलेशन्स एजन्सींनी याचा फायदा घ्यायचं ठरवलं.

१९२८ मध्ये अमेरिकन टोबॅको कंपनीचे मालक जॉर्ज वॉश्गिंटन हिल काहीसे चिंतित झाले होते. सिगरेट ओढणाऱ्या पुरुषांची संख्या वाढत होती. मालब्रो सिगरेट ओढणं म्हणजे पुरुषत्व आणि संपत्तीचं प्रदर्शन होतं जवळजवळ. कारण मालब्रो महागही होती. काही सिनेमांत स्त्रिया सिगरेट ओढताना दाखवल्या जायच्या, पण त्या वेश्या किंवा क्लब डान्सरच्या भूमिका करणाऱ्या असत. त्यामुळे स्त्रियांना मात्र या जाळ्यात ओढता येत नव्हतं. पण पहिल्या महायुद्धानंतर स्त्री चळवळी सक्रिय व्हायला लागल्या होत्या.

या बदलत्या माहोलात स्त्रियांना सिगरेटकडे आकर्षित करण्यासाठी वॉशिंग्टन हिल यांनी एडी बर्नीज या जनसंपर्क आणि प्रचारतंत्र तज्ज्ञाला पाचारण केलं. एडी बर्नीज प्रख्यात मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉइड यांचा भाचा.

काही उच्चभ्रू महिलांना पैसे देऊन मुक्रर करण्यात आलं. न्यू यॉर्कच्या चौकांत उभं राहून सिगरेट ओढण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले.

नंतर ३१ मार्च १९२९ च्या र्इस्टर परेडमध्येही या स्त्रियांना पेरण्यात आलं होतं. परेड सुरू झाल्यानंतर या स्त्रियांनी आपल्या सिगरेटी पेटवल्या. तिथं पत्रकार गोळा झाले. सिगरेट या ‘मुक्तीच्या मशाली’ (‘टॉर्चेस ऑफ फ्रीडम’) असल्याचं या स्त्रियांनी पत्रकारांना सांगितलं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत हिच हेडलार्इन झाली. ‘मुक्तीच्या मशाली’ची कल्पना नंतर इतकी लोकप्रिय झाली की, अधिकाधिक स्त्रिया सिगरेट ओढून ‘मुक्त’ होऊ लागल्या. ही सारी सुप्त योजना एडी बर्नीजची. मार्केटिंग, जाहिरात आणि जनसंपर्कानं स्त्रियांच्या मुक्तीच्या मशालींची कल्पना गळी उतरवली आणि स्त्रीवादी चळवळ सिगरेटशी जोडली गेली.

अलंकृता श्रीवास्तव प्रतिभावान दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका आहे. ‘लिपस्टिक’सारखी बेधडक गोष्ट सांगण्याचं कौशल्य आणि धाडस तिच्यामध्ये आहे. घोषणाबाजी किंवा आक्रस्ताळेपणा न करता लैंगिकतेच्या अनेक आयामांची गोष्ट तिला सांगता आली, याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं थोडं.

लेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sudarshan Chavan

Wed , 26 July 2017

Anthropological perspective पासून सुर्व्यांची कविता, रेंचा महानगर सिनेमा हे पॉप कल्चर रेफेरन्सेस, PR चा संबंध सगळं आवडलं. खरंच. पण यात आपण कथा थोडी जास्तच रिव्हील केलीय असं वाटलं. सिगरेटला स्वातंत्र्याशी आजच्या काळातही जोडावे का? हा प्रश्न खूप जणांनी उपस्थित केलाय, त्यासाठी शेवट सांगायची गरज नव्हती. असं वाटतं.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......