वाचलं नसेल तर वाचा (आणि मला धन्यवाद द्यालच!)
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • गौहर जान आणि त्यांचं चरित्र
  • Sat , 15 July 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music केशव परांजपे Keshav Paranjpe गौहर जान Gauhar Jaan गौहर जान म्हणतात मला Gauhar Jan Mhanatat Mala विक्रम संपत Vikram Sampath

विक्रम संपत या तरुण, उमद्या लेखकानं भारताची पहिली ग्रामफोन गायिका गौहर जान (१८७३-१९३०) हिचं कादंबरीच्या अंगानं चरित्र लिहिलं आहे. गौहर जानच्या ग्रामफोन रेकॉर्डसनी त्या काळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक ध्वनिमुद्रिका गौहरच्या आवाजातल्या ‘My name is Gauhar Jaan’ या वाक्यानं संपते. हे वाक्यच संपतने या चरित्राचं शीर्षक म्हणून निवडलं आहे. आणि ते यथार्थ आहे. गौहरच्या व्यक्तिमत्त्वाचं, तिच्या कारकिर्दीचं नेमकं प्रतीक ठरणारी ही उदघोषणा आहे.

विक्रम संपत हा एक बुद्धिमान सुविद्य तरुण आहे. विटस पिलानी या मान्यवर संस्थेतून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी, तर गणितात पदव्युत्तर पदवी त्याने प्राप्त केली आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध ए.पी. जैन इन्स्टिट्यूटमधून वित्त-व्यवस्थापनात त्याने एमबीए केलं. जर्मनीमध्ये जाऊन ‘ग्रामफोन रेकॉर्डिंग्ज इन इंडियन म्युझिक’ या विषयाचं विशेष अध्ययन केलं. विक्रम कर्नाटक संगीत व्यवस्थित शिकलेला आहे. २००८ साली रूपा अँड कंपनी या प्रकाशनसंस्थेनं त्याचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं- ‘स्प्लेंडर्स ऑफ रॉयल मैसूर’. मैसूर संस्थानाचा राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीच्या ६०० वर्षांच्या कालावधीचा विश्लेषक आढावा त्यानं या पुस्तकात घेतला आहे.

या अत्यंत गाजलेल्या पुस्तकानंतरचं त्याचं दुसरं पुस्तक, ‘My name is Gauhar Jaan’ अगदी गाजत-वाजत, थाटामाटात प्रकाशित झालं. दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत या पुस्तकाच्या प्रकाशनाचे व अभिवाचनाचे कार्यक्रम दिल्ली, बंगलोर, कोलकाता, चेन्नई, मुंबई या ठिकाणी झाले. संपतला २०११ साली साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. या पुस्तकाबद्दल अनेक मान्यवरांनी मुक्तकंठानं संपतची प्रशंसा केली आहे.

पंडित जसराजांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे – “या लेखकाचं हे काम पाहिल्यानंतर मला असं वाटतं की, आता कलाकारांना कोणत्याही काळजीचं कारणच उरणार नाही. याच्यासारखे उत्साही संगीतप्रेमी आणि संशोधक ख्यातकीर्त संगीतकारांच्या कारकिर्दीचा त्यांच्या काळासहित मागोवा घेतील आणि जगापुढे मांडत जातील.”

पं. अरविंद पारीख म्हणतात – “विक्रम संपत यांच्या धीट प्रयत्नांना शाबासकीच द्यायला हवी. हे पुस्तक ज्या प्रवाही आणि विचक्षण मर्मभेदी पद्धतीनं लिहिलं गेलं आहे, त्यातून ते रोचक तसंच विश्वसनीय होण्यासाठी विक्रम संपत यांनी घेतलेले अपरिमित कष्ट, बारिकसारिक गोष्टींची काळजी आणि सखोल अभ्यास दिसून येतो.”

उ. अमजद अली खानांनी लिहिलंय – “या शतकातल्या ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अन यशस्वी अशा एका गायिकेचं बहुरंगी आयुष्य संशोधनातून उभं केल्याबद्दल विक्रम संपतसारख्या तरुण, कामाला वाहून घेतलेल्या लेखकाचं मोठंच कौतुक आहे. इतिहास आणि संगीताबद्दलची आपली उत्कटता वाचकांपर्यंत पोचावी या एकमात्र हेतूनं संशोधन करून लिखाण करणाऱ्या या लेखकाचा हेतू अत्यंत प्रशंसनीय आहे.”

या पुस्तकाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विश्वसनीयता! एकूणच लेखन प्रपंचात हा गुण दुर्मीळ आहे. त्यातून संगीत व कलाकार यांविषयीच्या लेखनात तो फारच विरळा आहे. चरित्रलेखन ही एक शिस्त आहे, ही गोष्टच अनेक लेखकांच्या गावी नसते. ज्या कलाकाराचं चरित्र लिहिलं जातं, खुद्द त्याची (तिची) साक्ष ही शास्त्रकाट्यावर चरित्रलेखकाला तपासून घ्यावी लागते! न्यायालयात साक्षी-पुराव्यांनी एखादी गोष्ट सिद्ध करणंसुद्धा चरित्रलेखनाच्या तुलनेत सोपं ठरावं. कारण न्यायालयातील सत्य प्रस्थापन एका मर्यादेत होत असतं. चरित्रलेखनाची व्याप्ती खूप अधिक असते. मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या तुकड्यांचे दुवे जुळवावे लागतात आणि त्यातून एक – जास्तीत जास्त खरं चित्र उभं करायचं असतं. रुबिक क्युबमध्ये एका रंगाचे तुकडे एकत्र जमवण्याचं काम जितकं जिकिरीचं, तितकंच चरित्राच्या साधनांची जुळवाजुळव करण्याचं काम जिकिरीचं असतं. सगळे तुकडे जमले, पण एकत्र जुळले नाही तर सगळी जुळवाजुळव विस्कटावी लागते. रुबिक क्युबमध्ये निदान रंग दिसत असल्याने जुळणी पूर्ण झाली आहे की नाही हे लक्षात येतं. चरित्रलेखनात लेखकाला हे आपल्या प्रज्ञेनंच ठरवावं लागतं. एखाद्या लेखकाला विश्वसनीयता या मूल्याचं महत्त्व कळलं तरी विश्वसनीयता कशी साध्य करावी हे माहीत नसतं.

सामान्यत: गंभीर संशोधकांची टवाळी करण्यात कामचलाऊ लेखक आणि त्यांचा वाचक धन्यता मानतात. पुष्कळदा ऐतिहासिक सदरातील लेखन हे ऐतिहासिक घटना किंवा व्यक्तीचा संदर्भ घेऊन केलेलं काल्पनिक लेखन असतं. ऐतिहासिक संदर्भ घेऊन आलेल्या नाटक-चित्रपटांबद्दल काय सांगावं! सगळा सोयीचा आणि सवंग मामला असतो. थोडं सावध होऊन वाचा, कदाचित आपल्याला राग येईल. ‘कट्यार…’ बोलूनचालून काल्पनिकच कथा. पण तरीही इतिहासाची जाण असलेल्या प्रेक्षकाला विशेषत: चित्रपट पाहणं त्रासाचंच ठरतं! असो. तर गौहरकडे वळतो.

हे पुस्तक म्हणजे काही ऐतिहासिक दस्तवेजांचं गॅझेट नाही. कल्पिताची जोड ऐतिहासिक दस्तवेजांना द्यावीच लागली आहे. पण अशी जोड देताना ज्या मर्यादा पाळल्या जाण्याची अपेक्षा असते, त्यांचं भान लेखकाला असावं लागतं. ते विक्रम संपतला आहे. (आमीर खानच्या सौभाग्यवतींचा या लेखनावर एक चित्रपट बनवण्याचा मानस आहे म्हणे!) गौहर जानची कथा रंगवण्याच्या मोहापासून विक्रमनं स्वत:ला व्यवस्थित दूर ठेवलं आहे.

गौहर या विषयाला त्यानं काही काळ वाहून घेतलं होतं खरं, पण तिच्याविषयी तो वाहवत गेलेला नाही. ऐतिहासिक पुराव्यांच्या कंदिलाच्या प्रकाशात जेवढं दिसलं, तेवढंच त्यानं सांगितलं आहे. भल्याभल्यांना हा असा संयम पाळता येत नाही. या संयमामुळे हे पुस्तक बरंचसं कथनात्मक आहे. यात संवाद फारच कमी आहेत. गौहरला नायिका बनवून तिचं समर्थन, तिच्याविषयी सहानुभूती अशा ललितलेखन रंगांची होळी विक्रमने खेळलेली नाही.

एवढ्या संयमानं लिहिलेलं असूनही गौहरचं चरित्र विलक्षण असल्याची साक्ष पटल्यावाचून राहत नाही. तिची अलौकिक बुद्धिमत्ता, तिची कलासाधना, तिच्या कलेचा दर्जा, तिच्या स्वभावाचे उपजन, परिस्थितीने घडवलेले कंगारे, सर्व काही वाचकाच्या अनुभवाला येतं.

या पुस्तकाची गौहर ही नायिका असेल, तर तो काळ हा या पुस्तकाचा नायक आहे. गौहरचं चरित्र काळाच्या ज्या पटावर उमटलं आहे, त्या पटाचे ताणेबाणे विक्रमने चांगले समजून घेतले आणि समजावून दिले आहेत.

संगीत ही कला आहे आणि कलाकाराचं कल्पक मन ही या कलावेलीची जन्मभूमी आहे. या वेलीचा बहर रसिकाच्या हृदय-अंगणात सडा होऊन पडतो. हे सगळं जितकं खरं आहे, तितकंच संगीत – खरं तर प्रत्येक कला – हे एक सामाजिक घटित आहे, समाजव्यवस्थेचा तो एक भाग आहे. आणि या वास्तवाचं भान आल्यावरच कलासमीक्षा परिपक्व होते. एक रसिक म्हणूनसुद्धा कलाजगतातल्या घडामोडी समजून घ्यायला मदत होते. गौहर वाचून वाचकांचे कितीतरी गोड गैरसमज दूर होऊ शकतील.

आजच्या ज्येष्ठतम पिढीच्या कलाकारांच्या जन्माच्या आसपास गौहर निवर्तली. तिचं विश्वसनीय चरित्र या पिढीला ज्ञात होतं का? त्यांनी ते आस्थेनं वाचलं आहे, वाचलं असतं का? आपल्या सांगीतिक कारकिर्दीचा अन्वय लावण्यासाठी हे चरित्र उपयोगाचं आहे, हे त्यांनी ध्यानात घेतलं असतं का?

निदान आजच्या रसिकांनी ते वाचावं, कलाकारांनी ते वाचावं. एका तालेवार गुणसंपन्न कलावतीचं चरित्र म्हणून ते वाचनीय आहेच, पण आजच्या संगीत व्यवहाराकडे बघण्यासाठी काहीएक वेगळं भान हे पुस्तक देईल असं मला नक्की वाटतं. परंपरेनं चालत आलेल्या बंदिशी – रागरागिण्यांचा वारसा पुढच्या पिढीला मिळत आलाच आहे, पण त्या जुन्या पिढीची, त्या जुन्या काळाची स्पंदनं अशा पुस्तकाच्या रूपानं उपलब्ध होत असतील तर तीही तितकीच मोलाची, नाही का?

गौहर जान म्हणतात मला! – मूळ इंग्रजी लेखक – विक्रम संपत, मराठी अनुवाद – सुजाता देशमुख,

राजहंस प्रकाशन, पुणे, पाने - २१०, मूल्य - २२५ रुपये. सूट - १०%

पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3684

.............................................................................................................................................

सुजाता देशमुख यांची नेमकी भाषा अंतर कमी करणारी आहे, ही या मराठी अनुवादाची मोठी जमेची बाजू आहे. गौहरची आई मल्का जान हिची उर्दू शायरी (आणि उत्तम मराठी भावानुवाद) या पुस्तकाची वाचनीयता वाढवतात. गौहरची पाच-सहा प्रकाशचित्रंही संग्राह्य आहेत. पुस्तकाचा २१० पानांचा विस्तार बराच संयमित आहे. कादंबरी म्हणून लिहिली तर हे चरित्र ५०० पानांचंही होऊ शकलं असतं.

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......