‘सर्टिफाईड कॉपी’ : स्त्रीच्या दडपलेल्या वेदनेचा वैश्विक आविष्कार
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
नितीन दादरावाला
  • ‘सर्टिफाईड कॉपी’ची पोस्टर्स
  • Sat , 01 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा सर्टिफाईड कॉपी Certified Copy अब्बास किआरुस्तामी Abbas Kiarostami ज्युलिएट बिनोश Juliette Binoche विल्यम शिमेल William Shimell नितीन दादरावाला Nitin Dadrawala

एक रिकामं टेबल, दोन माईक, खुर्च्या, समोर लेखकाची वाट पाहात बसलेलं निवडक पब्लिक. त्या पार्श्वभूमीवर पडद्यावर नामावली येत असताना हलकासा प्रेक्षकांच्या बोलण्याचा आवाज. जेम्स मिल्लर या ब्रिटिश लेखकाने नुकतंच एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते आहे मूळ कलाकृती आणि त्याची प्रतिकृती यामधील विरोधाभास किंवा द्वंद्व यासंबंधी विचार करणारं. इटलीतील एका छोट्या (तुस्कानी) शहरात पुस्तकाच्या इटालियन भाषांतराच्या आवृत्तीचं प्रकाशन आहे. भाषांतरकारसुद्धा समोर बसलाय आणि सर्व जण लेखकाची वाट बघताहेत. भाषांतरकार टेबलाजवळ येऊन प्रेक्षकांना या पुस्तकासंबंधी माहिती देतो आणि लेखक कुठल्याही क्षणी इथं येईल, असं म्हणतानाच दारातून लेखकाची एन्ट्री होते. लोक टाळ्या वाजवतात. दारातच एक फ्रेंच आर्टडिलर स्त्री आपल्या मुलीबरोबर त्याला भेटते, काही बोलणं होतं. तो टेबलापाशी येतो आणि प्रथम उशीर झाल्याबद्दल क्षमा मागतो. तो म्हणतो, 'मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो असं सांगितलं असतं, पण मी इथं चालत आलोय.'

सुरुवातीच्या औपचारिक गोष्टी संपल्यावर तो म्हणतो की, मूळ कलाकृती आणि तिची हुशार प्रतिकृती या दोन्ही त्या मूळ सर्जनशील कलेच्या शाखा आहेत. 'मूळ' किंवा ओरिजिनलचा आग्रह आपण कायम धरण हे चुकीचं आहे, कारण संपूर्ण मानवी समाज हाच कुठल्या तरी मूळ/ आदिम पूर्वजांच्या डीएनएची प्रतिकृती आहे. कलेमध्ये अधिकारवाणीने केलेली सत्य/असत्याची चर्चा किंवा मूळ कलाकृती यासंबंधीची टीका ही निष्फळ आहे, कारण मूळ कलाकृती हीसुद्धा कलावंताने कुठल्यातरी रूपाची (form) केलेली कॉपीच असते. दारात त्याला भेटलेली स्त्री येऊन पहिल्या रांगेत भाषांतरकाराजवळ बसते. तिचा मुलगा कोपऱ्यात उभा राहून आपल्या हातातील सेलफोनवर किंवा व्हिडिओ गेमशी खेळण्यात मग्र. मुलगा साधारण अकरा वर्षांचा व स्त्री चाळीशी उलटलेली.

लेखक पुढे म्हणतो की, ती कॉपी किंवा प्रतिकृती ही महत्त्वाची अशासाठी असते की, ती आपल्याला मूळ कलाकृतीसंबंधी विचार करण्यास भाग पाडते, उद्युक्त करते. पुढे भाषणात तो सांगत असतो की, या पुस्तकाच्या विषयाची कल्पना मला फ्लॉरेन्समधील प्रसिद्ध पिएत्झा चौकामध्ये आली. या क्षणीच त्या बाईचा मुलगा जवळ येऊन तिला तिथून निघण्यास सांगतो. त्याला भूक लागलीय. ती शेजारच्या भाषांतरकाराच्या कानात काही सांगते व त्याला आपलं कार्ड देऊन तिथून निघते. कॅमेरा सभागृहातून त्या बाईबरोबर बाहेर पडतो. ती एका रेस्टॉरंटच्या दिशेनं निघते. तिच्या मागे काही अंतर राखून मुलगा हातातील गॅजेटच्या स्क्रीनवर काहीतरी करत मग्र मागोमाग येतो. ती दोघं एका टेबलावर बसून बोलतात. मुलगा तिच्याकडे बघत नाहिये, पण तो तिला विचारतो की, तू या लेखकाच्या पुस्तकाच्या इतक्या कॉपीज घेतल्या आहेस आणि त्या माणसाला तू कार्डही दिलंस म्हणजे त्या माणसात तुला इंटरेस्ट निर्माण झाला आहे का? ती सिगारेट पेटवते.

नंतरच्या शॉटमध्ये सरळ तिचं अँटिक शॉप. रस्त्यावरच्या दारातून तळघरात जाणारा जिना. कदाचित दुसऱ्या दिवसाची दुपार आहे. लेखक आपली बॅग दारातच ठेवून पायऱ्या उतरून खाली येतो. आत कुणीच नाही. दुकानात जुनेपुराणे पुतळे, आरसे, बऱ्याच वस्तू. तो एक नजर टाकतो, कुणी आहे का? असं विचारतो. ती स्त्री येते. दोघेही जुन्या पुतळे, वस्तू, कलाकृतींवर काही बोलतात; व तो म्हणतो, की बाहेर दिवस इतका चांगला आहे की, या अंधारात राहण्यापेक्षा थोडं बाहेर फिरावं व शिवाय रात्री नऊ वाजता त्याला परतीची ट्रेन पकडायची आहे हेही सांगतो. ती म्हणते की, माझा तुला बोलावण्यामागचा उद्देश हाच होता की, तुला माझ्या दुकानातील काही प्रतिकृती/कॉपीज दाखवाव्या, तुला काही शॉपिंग करायचं असल्यास मदत करावी व तुला ट्रेनवर सोडावं. दोघेही दुकानातून निघतात व तिच्या गाडीतून त्या छोट्याशा शहरातून फेरफटका मारतात. मग ठरतं की जवळच अध्या तासाच्या अंतरावर असलेल्या लुचिआना गावात जाऊन तेथील एक म्युझियम पाहायचं. वाटेत दोघांचं संभाषण त्यांच्या पुस्तकातील विषयासंबंधी होतं. तो तिने घेतलेल्या त्याच्या पुस्तकाच्या पाच-सहा प्रतींवर स्वाक्षरी करतो. ती त्यातल्या एका पुस्तकावर तिची बहीण 'मारी' हिचं नाव टाकायला सांगते व ती व तिचा नवरा यांच्या वेडेपणा आणि साधेपणावर टीका करते. तो म्हणतो, साधेपणा यावर साधेपणानं सांगण्यासारखं काही नसतं. पण तो एक विनोद सांगतो, ज्यातील एका निर्मनुष्य बेटावरील एकाकी माणसाला एक कोकची बाटली सापडते आणि त्यातून निघालेल्या जिनीजवळ तो कोकच्याच बाटल्या मागतो. म्हणजे त्याचं आयुष्य इतकं साध असतं की, त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची उणीवच नाही. कॅमेरा काही काळ बाहेरून त्यांच्यावर व मग आतून गाडीच्या पुढच्या स्क्रीनमधून बाहेरच्या दृश्यावर येतो. रस्त्याच्या दोन्ही कडेला सायप्रसची झाडं आहेत. आपण एखाद्या चित्रातून प्रवास करतोय असं वाटतं. इटलीच्या गावातील निसर्गसौंदर्य पाहत असतानाच तो तिच्याबरोबर बौद्धिक संभाषण चालू ठेवतो. कलेविषयी व मानवी संबंधाविषयी चर्चा होते. साऱ्या दृश्यात लेखक खूप शांतपणे वावरतोय, पण स्त्रीमध्ये थोडी खट्याळ उत्तेजना दिसते. तो म्हणतो की, मी हे पुस्तकं लिहिलं ते माझ्याच कल्पना स्वतःला पटवून देण्यासाठी.

दिवस हळूहळू पुढे सरकू लागतो तसतसा त्यांच्या परस्परसंबंधांचा प्रवासही पुढे सरकू लागतो. हे गाव (लुचिआनो) आणि इथलं चर्च हे लग्र करण्यासाठी प्रसिद्ध असतात. कार पार्क करून ती त्याला एका छोटेखानी कला संग्रहालयात नेते. ती सांगते की, या म्युझियममध्ये एक चित्र गेली दोनशे वर्षं आहे. ही इथली मोनालिसाच आहे. पण पत्रास वर्षांपूर्वी नेपल्समध्ये मूळ चित्र सापडलं आणि हे चित्र प्रतिकृती आहे, हे जगाला समजलं. तो म्हणतो की, यात काही आश्चर्य नाही, आणि अशा गोष्टी घडतच असतात. या कलाकृतीने प्रतिकृती असूनही बघणाऱ्यांना काही आनंद दिला असणारच. मोनालिसा हे दा विंचीचे चित्रसुद्धा खऱ्याखुऱ्या 'ला जेकॉन्द' या बाईच्या चेहऱ्याची कॉपीच आहे आणि कधीकधी कॉपी ही मूळ संदर्भापेक्षा सुंदर असू शकते.

तेथून बाहेर पडून ती दोघं शेजारच्या एका चर्चकडे वळतात. वाटेत ती आपल्या अकरा वर्षांच्या मुलाची तक्रार करते की, तो भिजला असताना मी त्याला सांगितलं की तू लवकर कपडे बदल नाही तर तुला सर्दी होईल, ताप येईल आणि त्यात तू मरशीलही. तर मुलगा म्हणाला की, (so what?) तर काय झालं? लेखक या संभाषणात मुलाची बाजू घेती की, मुल खरं तर प्रत्येक क्षण शंभर टक्के जगत असतात आणि तो जे म्हणतोय हे जर एखाद्या तत्त्ववेत्याने सांगितले तर तुम्ही ते थोर समजणार. आपण सर्वजण कधी तरी मरणार आहोतच, तर काय झालं? (so what?) ती वैतागते.

त्या छोट्या चर्चमध्ये ते पोहोचतात. जेम्स बाहेर एका बाकावर बसतो. ती आत जाते. आत नुकत्याच लग्र झालेल्या एका जोडप्याचं फोटो काढणं चाललंय. ती बाहेर येऊन आग्रह करते की, त्यांना आपलं लग्न इथेच झालंय असं वाटल्याने आपण दोघांसोबत फोटो काढून घ्यायचाय. जेम्स खरं तर वैतागतो, पण नंतर ते जोडपं आळीपाळीनं त्याला खूप आग्रह करतात आणि तो ते फोटो प्रकरण बळजबरीने कसंतरी उरकतो. तो ज्या बाकावरून उठतो तेथे दुसऱ्या नवोदित जोडप्यातील स्त्री बसते. तिचा नवरा कॅमेऱ्यात अर्धाच दिसतो. फ्रेममध्ये दिसणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एकदम भकास भाव.

दोघेही तिथून निघतात. तो म्हणतो की, नंतर मुलं वगैरे झाल्यावर आयुष्याचं काय होतं हे कळलं तर आज लग्रं झालेली ही जोडपी फोटोसाठीसुद्धा हसणं विसरून जातील. तो म्हणतो की, कुठेतरी कॉफी घेऊ या. थोडं चालून ते एका कॉफी शॉपमध्ये शिरतात. एका टेबलाभोवती बसून कॉफीची ऑर्डर देतात. कॅफेची म्हातारी मालकीण हसून दोघांचं स्वागत करते.

ती सभागृहातून ज्या क्षणी निघते, त्या क्षणी जेम्स हा फ्लॉरेन्समधील चौकात त्याला या पुस्तकाची कल्पना कशावरून सुचली हे सांगण्याची सुरुवात करत असतो; तो धागा तिला इथं आठवतो. ती त्याला त्यासंबंधी विचारते. तो सांगू लागतो की, एकदा एका कॉन्फरन्ससाठी फ्लॉरेन्सला एका हॉटेलात उतरलो होतो. मी माझ्या खोलीच्या खिडकीतून खाली रस्त्यावर एका स्त्रीला चालताना पाहिलं. खूप अंतरावरून तिचा सात-आठ वर्षांचा मुलगा पाठीवर शाळेचं खूपसं ओझं असलेलं दप्तर घेऊन चालत होता. तो जवळ आला की, ती पुन्हा पुढे जायची. पुन्हा तो मुलगा तिच्यापर्यंत जायचा. माझ्या खोलीला दुसऱ्या बाजूलाही खिडकी असल्याने मी त्या बाजूचाही त्यांचा हा तुटक प्रवास बघितला. असं दुसऱ्या दिवशी सकाळीही मी ही आई आणि मुलगा यांचं त्याच पद्धतीने रस्त्यावरून जाणं पाहिलं. ते दोघं कधीच एकत्र चालले नाहीत. नंतर एके दिवशी मला ही आई आणि मुलगा पिएन्झा चौकात दिसले. डेव्हिडच्या पुतळ्याजवळ पायरीवर मुलगा बसला होता. हा डेव्हिडचा पुतळा मूळ मायकेलेंजेलोच्या डेव्हिडच्या पुतळ्याची प्रतिकृती/कॉपी आहे. आई पुतळ्याकडे पाहून मुलाला काहीतरी सांगत होती, तर ती मुलाला काय सांगत असेल असा विचार करताना मला या पुस्तकाची कल्पना सुचली.

जेम्स ही कथा सांगताना स्त्रीच्या डोळ्यातून अक्षू ओघळताना दिसतो. ती तो हळूच पुसते. त्यांची कॉफी येते; पण तितक्यात लेखकाचा सेलफोन वाजू लागतो. तो क्षमा मागून कॅफेबाहेर रस्त्यावर जाऊन फोनवर बोलताना दिसतो. ही कथा, हा चित्रपट इथं एक वळण घेतो. कॅफेची म्हातारी मालकीण आणि स्त्री यांच्यामध्ये जो महत्त्वाचा संवाद होतो, तो या सिनेमाचा 'टर्निग पॉइंट' आहे. तो मुळातूनच पाहिला पाहिजे. हा संवाद इटालिन भाषेत होतो.

कॅफेची मालकीण - त्याची कॉफी थंड होतेय.

स्त्री - तो तसाच आहे.

कॅ. मा. - पण तो चांगला नवरा आहे. मला वाटतं.

स्त्री - काय?

कॅ. मा. - मला नक्की वाटतं, तो चांगला नवरा आहे.

स्त्री - तुला इतकी खात्री कशी काय?

कॅ. मा. - मी पाहू शकते, तू कुठली आहेस?

स्त्री - मी मूळ फ्रेंच आहे.

कॅ. मा. - मग इटालियन कशी बोलतेस?

स्त्री - मी इथे पाच वर्षं राहतेय. आधी फिरेंझी (फ्लॉरेन्स) आता अरेझु.

कॅ. मा. - पण तुम्ही दोघं इंग्रजीत का बोलताय?

स्त्री - तो इंग्रज आहे.

कॅ. मा. - पण त्याला तुझी भाषा येत नाहीय?

स्त्री - नाही.

कॅ. मा. – आणि इटालियन?

स्त्री - नाही. त्याला फक्त 'त्याची' भाषा येते.

कॅ. मा. - तुला मात्र इंग्रजी येतंय. अभिनंदन.

स्त्री - त्याला परदेशी भाषेत रस नाही. त्याला फक्त स्वतःत आणि स्वत:च्या कामात रस आहे. खरं तर त्याला कशातच रस नाही.

कॅ. मा. - पण हे असंच चांगलं असतं. पुरुषाला त्याचं काम आवडण चांगलंच.

स्त्री - मग आपलं, बायकांच काय?

स्त्री - काम त्यांना गुतवून ठेवतं, आणि आपण आपल्याकडे पाहतोच.

स्त्री - मी एकट्यानं आयुष्य जगण्यासाठी नाही केलंय लग्र. मला माझं आयुष्य नवऱ्याबरोबर शेअर करायचंय. हे माझं मागणं काय जास्त आहे?

कॅ. मा. - अगं नवरा बिझी असलेलाच बरा; दुसऱ्या बाईच्या नादी लागण्यापेक्षा. नवरा असतो म्हणून तर आपलं बायकोपण मिरवतो.

स्त्री - पण मला असा आयुष्यात अनुपस्थित असलेला नवरा नकोय. गेल्या आठवड्यात हा आपल्या मुलाचा वाढदिवस विसरला.

कॅ.मा. - माझा विश्वास बसत नाही.

स्त्री - मी सांगते ना, तो फक्त स्वत:चा विचार करतो आणि स्वत:च्या कामाचा.

कॅ. मा. - आणि मैत्रीण, प्रेमिका?

स्त्री - मला माहीत नाही.

कॅ. मा. - पण तुला माहीत करून घ्यायचंय की, हा कुणाशी फोनवर बोलतोय आणि तेही रविवारच्या, सुट्टीच्या दिवशी.

स्त्री - नाही. मी फक्त पाहतेय त्याच्याकडे. माझा तो उद्देश नाही.

कॅ. मा. - हो, पण तुझ्या डोळ्यात संशय आहे. पण मला तुझा नवरा आवडला बाई.

स्त्री - का?

कॅ. मा. - अग बहुतेक नवरे रविवारी बिछान्यात लोळत राहणं पसंत करतात, पण हा नवरा वेगळा आहे. तुला रविवारी बाहेर घेऊन फिरतोय. शिवाय त्याच्याकडे तुला सांगण्यासाठी गोष्टी ठेवण्यास, पटवण्यास तो धडपडतोय.

स्त्री - खरंच?

कॅ. मा. - पण त्याने आज जरा दाढी केली असती तर बरं झालं असतं.

स्त्री - पण तो एक दिवसाआड दाढी करतो. आमच्या लग्राच्या दिवशी तो तसाच दाढी न करता आला. माझ्या काकाने विचारलं पण त्याला, तर तो आपल्या दाढीला शांतपणे कुरवाळत म्हणाला, की, मी एक दिवसाआड दाढी करतो आणि काल तर केली होती.

एवढ्यात कॅफेचे दार उघडून जेम्स आत येतो. ती सांगते त्याला, की म्हातारी तुला माझा नवरा समजलीय आणि मीही तिची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. तो विचारतो की, काय म्हणत होती ती? ती म्हणाली की, तू आमची भाषा का बोलत नाहीस? तो म्हातारीकडे बघून बोलतो की, मी माझं आयुष्यं जगतो, ते त्यांचं जगतात. आणि ती विचारतेय की, तू दाढी का केली नाहीस. तो म्हणतो की, मी एक दिवसाआडच दाढी करतो. दोघंही या कॅफेतून बाहेर पडतात आणि त्याच क्षणी सारं बदलून जातं. ते इथपर्यंत इंग्रजी बोलत असतात. आता ते अधूनमधून फ्रेंचमध्येही बोलतात. हळूहळू ते नवरा-बायको किंवा एक जोडपं असल्यासारखं बोलू लागतात, ज्यांचं लग्न होऊन साधारणपणे पंधरा वर्षं उलटली आहेत, आणि त्यांना एक अकरा वर्षांचा मुलगा आहे. हळूहळू सिनेमात सत्य (Reality) काय आहे ही गोष्ट धूसर/अस्पष्ट होत जाते. कॉफी शॉपमधून बाहेर पडल्यावर चालता चालता तो तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत सहजपणे ओढला जातो. कथेच्या आत असलेली दुसरी कथा सुरू होते. तिच्या जगण्याच्या धडपडीत तो कायम गैरहजर असतो. एकट्यानं मुलाला वाढवण्याचं दुःख ती भोगत असते. तो जगभर कामाच्या निमित्तानं फिरत असतो. कुटुंबापेक्षा काम त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं.

या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली तत्त्वज्ञानात्मक कल्पना ही मूळ कलाकृती आणि तिची प्रतिकृती यांचा परस्परसंबंध आणि विरोध, यात एक प्रकारचं द्वंद्व आहे. लेखक आणि ही स्त्री या दोघांत नवरा-बायकोचं नातं जे मुळातच नाही त्याचा अभिनय करू लागतात. म्हणजेच ते जीवनातील मूळ नात्याचीच कॉपी करू लागतात, पण या कॉपीच्या ते आहारी जाऊ लागतात. आणि हा त्यांच्या जगण्याचा प्रवास खरा आहे की खोटा, यामधील सीमारेषा पुसट होत जात ते खरेखुरे नवरा-बायको म्हणून वागू लागतात. जगण्याची कॉपी करत असताना खोल मुळातल्या प्रेमाच्या शक्यता दिसू लागतात. खोट्या (किंवा खऱ्या?) आठवणी आणि प्रत्यक्षात घडू पाहणारी कटुता यातून कल्पना (Fiction) आणि सत्य (Reality) यामधून सिनेमाची आंदोलनं सुरू राहतात.

ती मानवी संबंधांची मुळं शोधू पाहतेय. प्रत्येक संभाषणातून पंधरा वर्षांच्या तिच्या एकाकी जगण्याचे, तिच्या आयुष्यातील घटनांचे पडसाद आणि त्यातून मुक्त होण्याची तिची धडपड दिसून राहते. तो वाहत राहतो या अनोळखी कालप्रवाहात. त्या दोघांचा भूतकाळ एकच नाही ना, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येऊन जातो, इतका हा खेळ खराखुरा/बोचरा होत जातो.

एका दृश्यामध्ये हॉटेलातील बाथरूममध्ये जाऊन ती भलंमोठं कानातलं डूल घालतं, नीट मेकअप करते, भडक लिपस्टिक लावून बाहेर येते. जणू काही ती हे सारं खूप दिवसांनी भेटलेल्या नवऱ्याला बरं वाटावं म्हणून करतेय. (पण तो या गोष्टींची दखलही घेत नाही.) पण त्याच वेळी त्याला प्रचंड भूक लागलीय. वेटरने त्याच्याकडे केलेल्या दुर्लक्षानं तो अपमानीत झालाय. मागवलेल्या रेड वाईनची चव त्याला अजिबात आवडली नाहीये. रिकाम्या रेस्टॉरंटमधील संभाषण भावनिक आणि तरीही क्रूर पातळीवर जातं.

या दोघांमध्ये कुठलातरी निःशब्द इतिहास आहे का? याचा विचार प्रेक्षकांच्या मनात घोळू लागतो, पण या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. अब्बास किआरुस्तामी अशी सोपी उत्तरं मिळणार नाहीत याचा चोख बंदोबस्त आपल्या दिग्दर्शनातून करतो. या दोघांच्या तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक संवाद सत्यात बुडवून बाहेर आलेला वाटतो. त्यामुळे सत्याच्या आभासाचा एक स्तर सतत चित्रपटाच्या मूळ संहितेत मिसळून जातो. प्रेमकथेच्या इतिहासात या दोघांच्या संबंधांची कथा सहजपणे मिसळून जाऊ शकते. पुढे कथा वेडेपणाच्या पातळीवर गुंतागुंतीची होत जाते. तिच्या भळभळणाऱ्या जखमेवर तिला हवी आहे त्याची फुंकर आणि तो तसा किनाऱ्याकिनाऱ्याने चालणारा, पण तरी तिच्याकडे अदृश्य लाटेबरोबर ओढला जाणारा. कलाकृतीच्या ओरिजनल आणि फेक असण्याबद्दल स्वतंत्र मत असणारा हा ब्रिटिश लेखक या छोट्याशा प्रवासात तिच्या नवऱ्याची प्रतिकृती/कॉपी होत जातो. ही कुणाच्याही आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर घडणारी कथा असू शकते.

अनेक जोडपी या भावनेतून अनेकदा जात असतात. दोघांमधील संबंध अनोळखी होत होत मूळ रस्त्याला वाटा फुटू लागतात. वर्षांमागून वर्षं एकत्र वाटचाल करताना एकमेकांना गृहीत धरल्यामुळे  काहीतरी महत्त्वाचं हरवलेल असतं; ज्यामुळे ते एकत्र आलेले असतात. परिस्थिती, जबाबदारी, प्रत्येकाचा स्वतंत्र अवकाश या साऱ्यातून हे घडलेलं असतं. ही दोन पात्रं आपल्या स्वतंत्र जगात असेच अनुभव घेत असतील, अशीही शक्यता आहे. दोन शब्दांमधील अवकाशात खूपसे अर्थ दडलेले असतात, तसेच या सिनेमाच्या दोन फ्रेममधील अवकाशात अनेक भावनांचे प्रतिध्वनी आहेत.

दोघे चालत एका चौकात येतात. एका कारंज्यात एक पुतळा दिसतो. त्यात एका नग्न पुरुषाच्या मानेवर एका स्त्रीनं विश्वासानं आपली मान टाकलेली दिसते. तिला त्या पुतळ्यामध्ये बद्ध झालेल्या स्त्री-पुरुषांच्या संबंधाविषयी अधिक जाणून घ्यायचंय. त्याला अजिबात रस नाही. एक म्हातारं टुरिस्ट जोडपं भेटतं. ती वारंवार त्यांना या पुतळ्याबद्दल विचारते. जेम्सलाही संवादात ओढण्याचा प्रयत्न करते. नंतर ते निरुद्देश चालू लागतात. तिची छाती भरून येते. कुठल्यातरी अदृश्य दडपणाने तिला गुदमरल्यासारखं होतं. ती एका प्रचंड दार असलेल्या रिकाम्या चर्चमध्ये जाऊन बाहेर येते. तो विचारतो की, तू प्रार्थना करत होतीस? ती म्हणते की, मी आत असताना माझी ब्रेसियर काढून टाकली. ती पर्समधून काढून ब्रेसियर दाखवते. पूर्ण दुपार/ संध्याकाळ फिरून थकलेली ती आपल्या पायातले सँडल काढून हातात घेते व एका घराच्या पायऱ्यांवर बसते. शेजारी तोही बसतो. ती त्याच्या खांद्यावर मान टाकते.

ती म्हणते, आपण आपल्या लग्नाच्या रात्री कुठल्या हॉटेलात राहिलो होतो आठवतं? तो चहूकडे पाहतो. त्याला आठवत नाही. ती उठून त्याच पायऱ्यांनी वर जाऊन हॉटेलातील रिसेप्शनवर उभ्या असलेल्या माणसाला सांगते की, नऊ नंबरच्या खोलीची चावी थोडा वेळ देशील का? आम्ही दोघांनी पंधरा वर्षांपूर्वी लग्नाची रात्र याच खोलीत घालवली होती. फक्त थोडा वेळ प्लीज. तो चावी देतो. ती जिन्याने वर जाते. खोलीतल्या बेडवर पहुडते, तो मागून येतो. ती म्हणते, अजून सारं तसंच आहे. या उशीच्या अभ्ऱ्याला अजून तुझा गंध आहे. या खिडकीबाहेर पाहा म्हणजे तुला आठवेल, हीच ती खोली होती. तो दोन्ही खिडक्यांतून पाहतो. गावातील घराच्या कौलांवर आणि चर्चच्या मनोऱ्यांवर संध्याकाळ हळूहळू उतरतेय. त्या खोलीच्या निःशब्द शांततेत आपल्याला कळत नाही की, ती दोघं त्या खोलीत रात्र घालवणार की, तो त्याची रात्री नऊ वाजताची परतीची ट्रेन पकडणार. तो बाथरूममध्ये जातो. त्याच्या चेहऱ्यामागे खिडकीतून कौलारू घरं आणि चर्चचा मनोरा दिसतो. तो दिवा विझवतो. गावातल्या चर्चची बेल वाजत राहते. संध्याकाळच्या प्रार्थनेची आठवण देणारी की, ती आहे कुणाच्या मृत्यूची, की एखाद्या संबंधाचा झालेला अंत सुचवणारी. सिनेमा इथं संपतो.

अब्बास किआरुस्तामी हा इराणी दिग्दर्शक शिक्षकाच्या भूमिकेतून जणू 'सिनेमाचा धडा' आपल्याला शिकवतो. तो कॅटच्या पत्त्याची एकएक भिंत कथेबरोबर बांधत जातो. पत्त्यांचाच डोलारा आहे हे कळत असतंच, पण आपल्याला या पत्यांचे बांधलेले इमले आपल्या जगण्याच्या, आपल्या स्वप्नांच्या आठवणी करून देतात. संवादाचे आरसे आपल्याला मधूनच आपला धुसर चेहरा दाखवून जातात. हा सिनेमा एक आरसेमहाल आहे. कित्येकांना त्यात आपलं प्रतिबिंब दिसेल. बिंब-प्रतिबिंब असा खेळ चित्रपटभर सतत सुरू राहतो. हा सिनेमा बघून लगेच विसरता येत नाही. वाटतं की, दिग्दर्शकाने काहीतरी शिकवलंय आणि घरी जाऊन गृहपाठ करायचा आहे. अधूनमधून सिनेमातील खरं जग या कथेला पुढे नेण्यास मदत करतं आणि हा चित्रपट पाहता पाहता आपण दिग्दर्शकाला शरण जातो. किआरुस्तामीच्या चित्रपटात डोळ्यांनी जे दिसतं, त्यापेक्षा खूप काही 'घडत' असतं.

किआरुस्तामी हा इराणमधील खूपच गाजलेला असा दिग्दर्शक आहे. इराणी सिनेमाला जगाच्या नकाशावर आणण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्या चित्रपटात माहितीपट (डॉक्युमेंटरी) आणि चित्रपट या माध्यमाची नेहमीच सरमिसळ असते. म्हणजे सत्य आणि फिक्शन या दोन संकल्पनांमध्ये त्याच्या चित्रपटाचील पात्रं हिंदोळे घेत असतात. इराणमधून हद्दपार केल्यामुळे या चित्रपटाच्या निमित्तानं किआरुस्तामीचा कॅनव्हास इराणमधून बाहेर पडून इतर जगाची दखल घेताना दिसतो. त्याच्या शांतपणा, संयम, कुठेही घाई न करण्याची वृत्ती चित्रीकरणातून दिसते.

अब्बास किआरुस्तामीचा जन्म २२ जून १९४०ला तेहरान, इराणमध्ये झाला. लहानपणापासून त्याचा रेखाटनाकडे ओढा होता. १८ व्या वर्षी त्याने ग्राफीक- कलास्पर्धेत भाग घेतला व तो त्या स्पर्धेत जिंकला. फाईन आर्ट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. तेहरानमध्येच ग्राफिक डिझायनर, पोस्टर बनवणे, जाहिराती करत वगैरे सुरुवातीची वर्षं घालवली. १९६९मध्ये त्याने लहान मुलांसाठी एक शॉर्टफिल्म केली. नंतरच्या त्याच्या चित्रपटात माहितीपट सतत डोकावतो. १९९० सालच्या 'क्लोजअप' या सिनेमामुळे लोक त्याला दिग्दर्शक म्हणून ओळखू लागले. आपल्या अनेक चित्रपटांत पात्रांना कारमधून प्रवास घडवणं म्हणजेच पर्यायाने प्रेक्षकांना कारमधील कॅमेऱ्यामधून दृश्यप्रवास करायला लावणं ही किआरुस्तामीची खासीयत आहे.

एका मुलाखतीत किआरुस्तामी म्हणतो की, या चित्रपटातील घटना माझ्याबरोबरच घडली आहे; पण या गोष्टीला पंधरा-वीस वर्षं झाली असतील. मी या स्त्रीबरोबर असाच एक दिवस घालवला आहे. नंतर एकदा ती माझ्या एका चित्रपटाच्या उद्घाटनाला आली होती. मी तिच्याकडे पाहून हात हलवला व नंतर भेटू असं ठरवलं. पण नंतर गर्दीमुळे मला वेगळ्याच दरवाजाने थिएटरबाहेर नेलं व त्यामुळे नंतर त्या स्त्रीला मी कधीच भेटू शकलो नाही. मला आठवत नाही की, ही गोष्ट ज्युलीएट बिनोश तेहरानला आली असताना मी तिला का सांगितली. गोष्ट सांगत असताना तिचा चेहरा असा फुलत गेला, जणू ती त्या गोष्टीतील स्त्रीच आहे. ती तशीच दिसू लागली. तिच्या चेहऱ्यावर ते भाव उमटू लागले. गोष्ट तिला सांगत असतानाच या चित्रपटाची पटकथा आपसूक तयार होत गेली. या कथेचा सिनेमा होऊ शकतो, याची जाणीव तिचा चेहरा पाहून प्रकर्षानं झाली. तिनं या चित्रपटातील स्त्रीचा रोल करण्यास तत्काळ मान्यता दिली.

किआरुस्तामीची आणि ज्युलिएट बिनोशची पहिली भेट १९९०मध्ये झाली आणि त्यांच्यात मैत्रीचे बंध निर्माण झाले. २००८मध्ये त्याच्या 'शिरिन' या चित्रपटात तिने एक छोटासा रोल केला. किआरुस्तामी म्हणतो की, 'या चित्रपटाचा आराखडा ज्युलिएटला ऐकवताना तिच्या प्रतिक्रिया तो अतिशय बारकाईने न्याहाळत होता. यातून चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची वाढ होत गेली. मी सांगतोय ते कथानक त्यात तिच्या संवेदनशीलेतून किंवा हावभावांतून महत्त्वाची भर पडत गेली. तिचं मुलांच्याबरोबरचं नातं आणि तिचा एक स्त्री म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन याचा मला खूप उपयोग झाला.

आधी या सिनेमातील लेखकाच्या भूमिकेसाठी रॉबर्ट डी निरोचा विचार होत होता. पण शेवटी विल्यम शिमेल या ऑपेरा गायकाची निवड झाली, कारण त्याने त्या आधी कुठल्याही सिनेमात काम केलं नव्हतं. विल्यम शिमेल (वय ५७) एका मुलाखतीत म्हणतो की, 'तीस वर्षं स्टेजवर ऑपेरात गाऊन मिळवलेली प्रतिष्ठा एका सिनेमाने जाईल असं आधी वाटलं, पण शेवटी हो म्हणालो. कारण दिग्दर्शक किआरुस्तामी खूपच आग्रही होता.’ दिग्दर्शक म्हणून किआरुस्तामी नेहमी नवशिक्या कलावंताला घेऊन अतिशय कमी बजेटमध्ये आपला सिनेमा करण्याबाबत प्रसिद्ध आहे. विल्यमचं ऑपेरातील काम पाहून हा लेखकाच्या व्यक्तिरेखेला न्याय देईल असं वाटलं आणि या माध्यमात त्याचं कच्चं (Raw) असणं ज्युलिएट बिनोशसमोर कसं निखरत जाईल, याचा अंदाज दिग्दर्शक म्हणून किआरुस्तामीला येऊ लागला. तो म्हणतो की, एक पर्शियन कविता आहे की, सांगणाऱ्याची उत्सूकता वाढवतो नेतो ऐकणारा. ऐकणाऱ्याच्या हावभावामुळे सांगणाऱ्याचा उत्साह वाढतो. तसंच माझं होत गेलं. या सिनेमाच्या गोष्टीसाठी ज्युलिएट बिनोशचं मी देणं लागतो. सिनेमा सुरू करताना बिनोशच्या मनात खूप प्रश्न होते. तिला या पात्राच्या 'चरित्रात' घुसायचं होतं. पण मी सुरुवातीपासून तिच्या मनात बिंबवलं की, ही स्त्री तूच आहेस. तुला कुणासारखं तरी वागा-बोलायची गरजच नाही, तू फक्त तुझ्यासारखी वाग. आणि तिला हे पटू लागलं की, ही स्त्री तीच आहे. हळूहळू या स्त्रीचं पात्र उभं राहात गेलं. त्याला एक घट्ट आकार येत गेला. स्टेजवर ऑपेरा सिंगर असलेला विल्यम शिमेल कुठेही नाटकी होत नाही. त्याचा अॅक्टर म्हणून पहिलाच सिनेमा आहे आणि त्याच्यासमोर कसलेली अभिनेत्री आहे ज्युलिएट बिनोश. या चित्रपटातील तंत्राविषयी बोलताना किआरुस्तामी म्हणतो की, दोघाही कलाकारांचे शॉट घेताना शक्यतो असं पाहिलं आहे की, विल्यम शिमेल पडद्यावर असताना तो प्रेक्षकातील स्त्रियांकडे पाहून बोलतोय आणि ज्युलिएट बिनोश पडद्यावरून प्रेक्षकातील पुरुषांशी बोलतेय.

इटलीतील तुस्कानी परगण्यातील लुचिआनो हे गाव दिग्दर्शकानं शूटिंगसाठी निवडलं. फ्लोरेन्सपासून हे गाव ९२ कि. मी. वर आहे. आठशे वस्तीचं गाव. पाच चर्च आणि सहा-एक कॅफे बार असणारं. एक कलासंग्रहालय. मध्यकालातील आठवण करून देणारं, दगडांनी बांधलेली घरं असलेलं गाव. त्यामुळे टुरिस्टांची थोडीशी वर्दळ. गाड्या अतिशय कमी व अनेक आतल्या गल्ल्यात/चौकात गाड्या नेण्याची बंदी. चर्चची बेल गावभर कुठेही ऐकू येते इतकं लहान गाव.

फ्रान्स, इटली आणि बेल्जिअम अशा तीन देशांतील कंपन्यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमा फ्रेंच, इटालियन आणि इंग्रजी या भाषांमध्ये विकसत जातो. ‘सर्टिफाईड कॉपी’ हा सिनेमा १८ मे २०१०ला त्रेसष्ठाव्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या स्पर्धेत उतरला. या दिग्दर्शकाची हा इराणच्या बाहेर बनवलेला पहिला सिनेमा. इराणमध्ये या सिनेमावर सार्वजनिकरीत्या पाहण्यास बंदी घालण्यात आली. स्पेनच्या फेस्टीव्हलमध्ये या सिनेमाला गोल्डन स्पाईक अॅवॉर्ड मिळालं. या चित्रपटासाठी ज्युलिएट बिनोशला उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक कान्समध्ये मिळालं. पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणात तिने इराणमध्ये नजरकैदेत असलेल्या चित्रपट दिग्दर्शक जाफर पनाहीकडे लोकांचं लक्ष वेधलं. पनाहीचं नाव कान्सच्या ज्युरीमध्ये होतं, पण तेवढ्यात त्याला अटक झाल्यामुळे येता आलं नाही.

पहिल्या पाहण्यात हा एक बुद्धिगम्य सिनेमा वाटतो. पण दुसऱ्या, तिसऱ्या पाहण्यात त्याच्या खोलवरच्या अर्थच्छटा जाणवू लागतात. हा सिनेमा सोपी उत्तरं देत नाही, पण खूपसे प्रश्न उभे करतो. हा सिनेमा समजणं इतकं महत्त्वाचं राहत नाही, पण समजून घेण्याचा प्रयत्न महत्त्वाचा होतो. कुठलीही कला/कलाकृती ही अनेक शक्यतांसाठी खुली असते. दिग्दर्शक जणू एक जादूचा प्रयोग दाखवतो आणि आपण टाळ्या वाजवायचं विसरून स्तब्ध होतो; पण खरं तर तो समजावून सांगतो की, सिनेमा ही गोष्ट स्वप्नासारखी असली तरी त्यात खोलवर एक जादुई अर्थ दडलेला असतो. कुणी त्यापर्यंत पोहाचू शकतं किंवा काहींना त्याचा चुटपुष्टता स्पर्श होतो.

कलाकृती आणि तिची प्रतिकृती हे रूपक या चित्रपटाचा गाभा आहे. किंबहुना हा चित्रपटसुद्धा एखाद्या चित्रपटाची कॉपी असू शकते. रॉबर्ती रोझेलिनीचा १९५४ सालचा 'जर्नी टू इटली' या चित्रपटात एक जोडपं इटलीला प्रवास करताना प्रवासात त्यांचे संबंध उलगडत जातात किंवा १९९५ सालच्या 'बिफोर सनराईझ' या चित्रपटात संपूर्ण अनोळखी तरुण-तरुणी युरेलमध्ये भेटतात व व्हिएन्ना शहरात एक संपूर्ण संध्याकाळ आणि रात्र गप्पा मारत घालवतात. या दोन्ही चित्रपटांची छाया या चित्रपटावर असली तरी त्याचं वेगळेपण अधिक ठसठशीत आहे.

या चित्रपटात इंग्रजी, फ्रेंच व इटालियन या तिन्ही भाषा वापरल्या जातात आणि हळूहळू लक्षात येतं की, या सिनेमात भाषा ही बिनमहत्त्वाची होऊन एक स्त्री आणि एक पुरुष त्यांच्या संबंधातील भाषा महत्त्वाची होत जाते. त्याचबरोबर दोन संवादामधील, सीनमधील अवकाश, शांततेची भाषा महत्त्वाची आहे. प्रेम आणि मानवी संबंध हे असे विषय आहेत, ज्यावर न जाणे किती लाख कथा आणि कविता लिहिल्या गेल्या असतील आणि तरीही हे विषय जुने होत नाहीत. या संपूर्ण चित्रपटात नायिकेचं नाव कुठेच येत नाही. तिला अनाम ठेवण्यामागे लेखक/दिग्दर्शकाचा हेतू असावा की, 'ती'ने तिच्यासारख्या अनेक स्वतःच्या हिमतीवर जगणाऱ्या जगभरच्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करावं.

भारतातल्या कुठल्यातरी भाषेत एक लोककथा आहे. ज्यातील स्त्री आपल्या पोटात, मनात एक गोष्ट आणि एक गाणं दडवून ठेवते. बायकांनी आपल्या मनातलं बोलणं हे मोठं पाप मानलं जात असे. ती गोष्ट आणि गाणं तिच्या आत गुदमरत असतात आणि एके दिवशी ती झोपली असताना उघड्या तोंडातून ते बाहेर येतात. या चित्रपटातील फ्रेंच नायिका इटलीमधील एका छोट्या शहरात एकटीनं मुलाला वाढवतेय आणि चित्रपटाच्या ओघात तिच्या आत गुदमरणारी एक गोष्ट हळूहळू तिच्या जगण्या-वागण्यातून उलगडत जाते. आणि तिच्या जगण्याचं एकाकीपण पडद्यावर साकारत जातं. देश कुठलाही असो आणि भाषा कुठलीही असो, त्या स्त्रीचं नातं भारतातील कुठल्यातरी बोलीभाषेतील त्या लोककथेतील स्त्रीशी जोडलं जातं, आणि लोककथेचा पाया किती विशाल असतो आणि स्त्रीच्या आत दडपलेली वेदना कुठल्याही देशात किती सारखी असते, हेही कळतं.

लेखक प्रसिद्ध चित्रकार आहेत.

nitinda77@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे.

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Mon , 03 July 2017

अप्रतिम अस्वादन! पुरतं घेरून टाकणारं! असंच अधिकाधिक वाचायला आवडेल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......