'धोंडी' : हृदयस्पर्शी 'पाणी'पट
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'धोंडी'ची पोस्टर्स
  • Sat , 10 June 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie धोंडी Dhondi सयाजी शिंदे Sayaji Shinde मोनिष पवार Monish Pawar

शेतकरी आणि पाऊस यांचं एक अतूट नातं असतं. अजूनही बरीचशी शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी नेहमीच पेरणीसाठी पावसाकडे डोळे लावून बसलेला दिसतो. पाऊस वेळेवर पडला नाही तर दुष्काळाचं संकट कोसळतं आणि त्यामध्ये बिचारा शेतकरी होरपळून जातो, असं चित्र आपण वर्षानुवर्षं पाहत आलेलो आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्येचं एक मूळ 'पाऊस' आहे, ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. शेतकरी आणि पावसाचं हे अतूट नातं लक्षात घेऊन पाऊस वेळेवर आणि भरपूर पडावा म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये काही परंपरा वर्षानुवर्षं चालत आलेल्या आहेत. त्यामध्ये बेडकांचं किंवा गाढवाचं लग्न लावणं, दीपदान करणं, मारुतीला किंवा अन्य देवाला पाण्यात ठेवणं (किंवा कोंडणं), काही ठिकाणी अंगाला लिंबाचा पाला बांधून 'धोंडी धोंडी पानी दे…' म्हणत गावात पाणी मागत फिरणं अशा काही प्रथा आणि परंपरा आहेत. विशेष म्हणजे या प्रथा आजही पाळल्या जात आहेत. याच प्रथेचा आधार घेऊन तरुण दिग्दर्शक मोनिष पवार यांनी 'धोंडी' या नवीन मराठी चित्रपटात शेतकऱ्यांच्या समस्यांवर आगळा प्रकाशझोत टाकला आहे.

वास्तविक आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विविध समस्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी केलेल्या आत्महत्या या विषयांवर अनेक मराठी चित्रपटांत भाष्य करण्यात आलं आहे. ('गाभ्रीचा पाऊस' या चित्रपटात तर कोसळणाऱ्या पावसाला शिव्या देणारा मुलगा आहे!) मात्र 'धोंडी'मध्ये पावसाअभावी केवळ शेतकऱ्यावर कोसळणाऱ्या संकटाची कथा पाहायला मिळत नाही, तर या संकटाचा त्याच्या निरागस मुलाच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो आणि पाऊस पाडण्यासाठी तो काय काय प्रयत्न करतो, याचंही चित्रण पाहायला मिळतं. त्याचे हे प्रयत्न हाच चित्रपटाच्या कथेचा मुख्य गाभा असल्याने 'धोंडी' एक हृदयस्पर्शी 'पाणी'पट झाला आहे.

'धोंडी'मध्ये पाहायला मिळते ती 'किस्ना' या शेतकऱ्याची आणि त्याच्या 'दाद्या' या लहान मुलाची करुण कथा. आधीच कर्जबाजारी झालेल्या किस्नाजवळ नांगरणीसाठी बैल नाहीत. ते उसने आणून नांगरणी आणि पेरणी केली तर खतासाठी पैसे नाहीत आणि एवढं करून पेरणी केली तर पाऊसच येत नाही. तो हवालदिल झालेला आहे. आई-पत्नी आणि दाद्यासह दोन शाळकरी मुलं असं कुटुंब असलेला किस्ना परिस्थितीमुळे पिचला आहे. त्यातच गावातील काही तरुण शेतकऱ्यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने किस्नाचंही मनोबल ढासळलं आहे. त्यातून तोही आत्महत्येचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याचं सारं कुटुंब कोसळतं. विशेषतः त्याचा मुलगा दाद्या हे सर्व पाहून खूप अस्वस्थ होतो. या साऱ्या संकटाचं मूळ 'पाऊस' आहे, हे त्याच्या लक्षात येते. हा पाऊस लवकर पडण्यासाठी तो त्याच्या बालबुद्धीला पटेल असे उपचार करू लागतो. अगदी सुरुवातीला 'येरे येरे पावसा, तुला देतो पैसा...' या पारंपरिक गाण्यातील शब्द लक्षात घेऊन मित्रांना बरोबर घेऊन तो एकेक पैसा आपल्या शेतातही पुरतो. मात्र तरीही पाऊस पडत नाही. त्यामुळे पुढचा उपाय म्हणून तो गाढवाचं लग्न लावण्याचा प्रयत्न करतो. उंच डोंगरावर जाऊन हुलकावणी देणाऱ्या ढगांना पाऊस पाडण्याची विनवणी करतो. तरीही निष्ठूर पाऊस त्याला दाद देत नाही. त्यामुळे शेवटी गावचा गुरव गावकऱ्यांच्या सभेत पाऊस पाडण्यासाठी 'धोंडी धोंडी पानी दे....' या प्रथेचा उपाय करण्यास सांगतो. गावकरी त्याला विरोध करतात, मात्र त्यामुळे तरी पाऊस पडेल या एकाच आशेनं दाद्या हे 'धोंडी'चं आव्हान स्वीकारतो आणि आपल्या अंगाला लिंबाचा पाला बांधून 'पानी' मागत गावभर फिरतो.

त्यात त्याला यश मिळतं का? पाऊस पाडण्याचं त्याचं स्वप्न पुरं होतं का? यासाठी 'धोंडी' पडद्यावर पाहणंच अधिक चांगलं होईल.

विवेक चाबुकस्वारने दाद्याची भूमिका छान रंगवली आहे. पाऊस पडावा या एकाच हेतूनं निरागस भावनेतून त्यांनी व्यक्त केलेली तळमळ आणि त्यासाठी केलेले प्रयत्न हृदयस्पर्शी ठरले आहेत. किस्नाच्या भूमिकेत सयाजी शिंदे यांच्याकडून तशा खूप अपेक्षा होत्या, मात्र गरीब, परिस्थितीनं गांजलेला 'किस्ना' उभा करण्यात त्यांना फारसं यश आलेलं नाही असंच म्हणावं लागेल. त्यांची देहबोली आणि भाषाशैली ही त्यांच्या इतर भूमिकांना साजेशी अशी 'उग्र' वाटते. त्यामानाने दाद्याच्या आईच्या भूमिकेतील पूजा पवारने उत्तम भूमिका साकारली आहे. आजी झालेल्या सुहासिनी देशपांडे आणि इतर अनेक नवख्या कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या पार पडल्या आहेत.

दाद्याची चेष्टा आणि थट्टा करत का होईना त्याच्या पाऊस पाडण्याच्या प्रयत्न्नांना मदत करणारं गावातील रिकामटेकड्या तरुणांचं टोळकं मजा तर आणतंच, पण त्याचबरोबर ग्रामीण भागातील सद्यस्थितीचं चांगलं दर्शनही घडवतं. प्रख्यात अभिनेते विनय आपटे यांचा हा बहुधा शेवटचा चित्रपट. यामध्ये त्यांनी गावच्या पाटलाची भूमिका केली आहे. आपली 'पाटीलकी' सांभाळून असणारा आणि वेळ येताच दाद्याला मदत करण्याची भूमिका घेणारा सहृदय पाटील विनय आपटे यांनी चांगला रंगवला आहे. त्यांच्याच निवेदनातून चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते.

लेखक-दिग्दर्शकाला हा निवेदनाचा 'फॉर्म' का आवश्यक वाटला त्याचं उत्तर मात्र मिळत नाही. किरण राज यांनी संगीतबद्ध केली तिन्ही गाणी श्रवणीय आणि कथेच्या विषयाला पूरक अशी ठरली आहेत.

थोडक्यात, शेतकऱ्यांच्या समस्यांवर एका वेगळ्या अंगानं प्रकाशझोत टाकणारा हा 'धोंडी' एक हृदयस्पर्शी 'पाणी'पट ठरला आहे.

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.                             

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......