टेकिंग साइड्स : मानवी क्रौर्याला सामोरं जाणारा बौद्धिक संवाद
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
नितीन दादरावाला
  • ‘टेकिंग साइड्स’ची पोस्टर्स
  • Sat , 06 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा टेकिंग साइड्स Taking Sides

“लिहिल्या गेलेल्या शब्दाला हल्ली कुणीही इतकं महत्त्व देत नाही, जितकं पोलीस (किंवा संस्कृतिरक्षक) देतात.’’ - इटालो काल्व्हीनो

काही चित्रपट असे असतात की ज्यांची पुन्हा पुन्हा आठवण होत राहते. मग मनात असा विचार येतो की, असं फार थोड्या चित्रपटांबद्दल का होतं? या संबंधात विचार केल्यावर लक्षात येतं ते असं की, त्या चित्रपटांचे विषय स्थलकालातीत असतात किंवा होत जातात. दुसऱ्या महायुद्धात किंवा अनेक देशांच्या फाळणीत अशा विषयांची बीजं पेरली गेली. त्या बीजांच्या हजारो-लाखो कथा निर्माण झाल्या आणि त्या कथा विविध कोनांतून वेगवेगळ्या प्रकारे अनेक दिग्दर्शकांनी रूपेरी पडद्यावर आणल्या.

‘टेकिंग साइड्स’ या चित्रपटालाही दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरची पार्श्वभूमी आहे.

बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या बर्लिन शहरात दोस्तराष्ट्रांच्या प्रयत्नाने हळूहळू कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित होत आहे. पराभूत जर्मनीत आता न्यायव्यवस्था ही दोस्त राष्ट्रातील अनेक आर्मी जनरल किंवा मेजर या रँकच्या अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. मेजर अरनॉल्डकडे फर्टवँगलरची फाइल सोपवली आहे आणि निष्ठुरपणे त्याच्यावरील आरोपाची सिद्धता करण्याचे आदेश दिले आहेत. अरनॉल्ड हा एक असा अधिकारी आहे; ज्याला संगीताविषयी ओ की ठो माहीत नाही, पण त्याला एका महान संगीतकारावर खटला उभा करायचा आहे. फर्टवँगलच्या वाद्यसमूहातील अनेक सहकारी त्याच्या हेतूविषयी शंका घेत नाहीत, किंबहुना त्याच्या वाद्यसमूहातील अनेक ज्यू वादकांना त्याने आपल्या अधिकारामुळे संगीताच्या नावाखाली वाचवले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. जर्मनीत त्या काळात जगणारा कुणीही असो, कुठल्याही वंशाचा असो तो आपल्या संगीत वारशाबद्दल अतिशय अभिमान बाळगायचा आणि फर्टवँगलर हा त्या साऱ्यांसाठी देवाच्या जागी होता; पण मेजर अरनॉल्डच्या मते तो एक गुन्हेगार आहे. कारण तो कुणाच्या बाजूने उभा राहिला यावरच त्याचे सच्चेपण अवलंबून आहे.

नाझींच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेणे हाच एक गुन्हा होता. पण त्या क्रूर शासनकाळात झालेला नरसंहार पाहता त्या नरसंहाराला एक संगीतकार जबाबदार असू शकतो का, हाही प्रश्न उपस्थित होतो. पण हे सारं घडत असताना मूकपणे पाहत राहणारेही दोषी असतात का? की या साऱ्या घटिताला त्यांची मूक संमती असते? अनेक सामान्यजन आसपास घडणाऱ्या दहशतीच्या वातावरणात गप्प राहणंच पसंत करतात. मग त्यांचं गप्प राहणं हाही गुन्हा आहे का? असे अनेक प्रश्न या चित्रपटाच्या निमित्ताने उभे राहतात. अनेक जर्मन नागरिकांनी-ज्यांच्याकडे सत्ता नाही, उच्चपदस्थांच्या ओळखी नाहीत अशा नागरिकांनी-अधिकृतपणे नाझी पार्टीचं सदस्यत्व घेतलं नाही. आपापल्या नोकऱ्या करताना ते हताशपणे भोवताली घडणाऱ्या घटना पाहत राहिले. कुठल्याही राजकारणापासून दूर राहून काहीही न करणं हा अपराध असू शकतो का? असाच एक कलावंत होता, विल्हेम फर्टवँगलर. बर्लिन फिलहार्मोनिक या वाद्यमेळ्याचा अग्रेसर संगीतकार. हिटलरचंही त्याच्या संगीतावर अनेक जर्मन नागरिकांप्रमाणे प्रेम होतं. ‘टेकिंग साइड्स’ हा फर्टवँगलरच्या चौकशीचा आलेख आहे.

अनेक जर्मन कलाकारांनी हिटलरच्या उदयाबरोबरच जर्मनीतून पाय काढण्यास, स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. फर्टवँगलरचा समकालीन आणि कट्टर प्रतिस्पर्धी संगीतकार ओट्टो कॅम्पलर याने १९३३ साली जर्मनीतून अमेरिकेत स्थलांतर केलं आणि लॉस अँजेलीस फिलहार्मोनिकची धुरा सांभाळली. पण फर्टवँगलरने देश सोडला नाही. तो मेजर अरनॉल्डला हे पटवण्याचा प्रयत्न करतो की, त्याची बांधिलकी त्याच्या संगीताशी, त्याच्या वाद्यवृंदाशी आणि त्याची मायभूमी जर्मनीशी होती. कला ही त्याच्यासाठी राजकारणापेक्षा खूप वर होती. ना तो कधी नाझी पार्टीचा सदस्य झाला ना त्याने कधी नाझी मानवंदना (एत्लू) दिली. जर्मनीतच राहून नाझींपासून दूर राहणं ही तारेवरची कसरत होती. जर्मनीच्या इतिहासाशी, कलापरंपरेशी त्याची बांधिलकी होती. कलेचा तो वारसा पुढे नेण्यासाठी कुणीतरी जर्मनीत राहायलाच हवं होतं, ही त्याची भूमिका होती. हिटलरच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या संगीताच्या कार्यक्रमात भाग घेणं, ही त्यातूनच आलेली एक असहाय, पण आवश्यक गोष्ट होती.

पहिल्याच दृश्यात आपल्याला विल्हेम फर्टवँगलर बिथोवनच्या पाचव्या सिंफनीचं संगीतसंयोजन करताना दिसतो. अनेक उच्चपदस्थ जर्मन अधिकारी प्रेक्षकांत बसले आहेत. बॉम्बवर्षावात होणारा धोक्याचा इशारा देणाऱ्या भोंग्याचा आवाज ऐकू येतो, पण फर्टवँगलर थांबत नाही. जवळपास कुठेतरी बॉम्ब पडल्याचा आवाज ऐकू येतो. प्रेक्षागृह हादरतं पण संगीत सुरूच राहतं. शेवटी हॉलमधील वीज जाते आणि संगीत थांबतं. इथूनच एक प्रकारचा ताण संपूर्ण चित्रपटभर राहतो आणि हा ताण कला आणि राजकारण यामधील आहे, हे सूत्र शेवटपर्यंत जाणवत राहतं.

दुसरं महायुद्ध नुकतंच संपलंय, याच्या खुणा भग्नावस्थेतील बर्लिन शहरावरून फिरणारा कॅमेरा आपणास दाखवतो. हिटलरने नुकतीच आत्महत्या केलीय. जर्मनीतील उरल्यासुरल्या नाझींचं उच्चाटन (डिनाझीफिकेशन) करण्यासाठी दोस्तराष्ट्रांनी चौकशीचा ससेमिरा सुरू केलाय. पहिल्या दृश्यात दिसणाऱ्या विल्हेम फर्टवँगलर या संगीतकाराची चौकशी करण्याचं प्रमुख काम अमेरिकन मेजर अरनॉल्ड सुरू करतो. बर्लिनच्या एका पडक्या इमारतीत तो आपलं तात्पुरतं ऑफिस सुरू करतो. एक टंकलेखिका आणि एक निरीक्षक-दोघेही जर्मन पण इंग्रजी येणारे-त्याला सहकारी म्हणून मिळाले आहेत. फर्टवँगलर जरी संगीतकार असला आणि त्याला अटक वगैरे झालेली नसली तरीही अरनॉल्ड त्याच्याकडे युद्धकाळातील गुन्हेगार म्हणूनच पाहतो. त्याच्या संगीतचमूतील अनेकांची तो साक्ष घेतो आणि फर्टवँगलरला कसं अडकवता येईल, हे कटाक्षाने पाहतो. पण त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांना फर्टवँगलरचं संगीतकार म्हणून असलेलं मोठेपण आधीच माहीत आहे. त्यांना त्याच्याबद्दल नितान्त आदर आहे आणि त्याचा वारंवार होणारा अपमान त्यांना पाहवत नाही.

फर्टवँगलरचा कणा मोडण्यासाठी मेजर अरनॉल्ड हरएक प्रयत्न करतो. फर्टवँगलरचं एवढंच म्हणणं असतं की, हे सारं तो करत होता; कारण त्याची संगीतावरची निष्ठा त्याला जर्मनीतून पळू जाऊ देत नव्हती. अशा अंधारमय काळात जर्मनीतील संगीत परंपरा जिवंत ठेवणं, हीही एक सांस्कृतिक जबाबदारी होती असं तो मानतो.

अशा या स्वरमेळ संगीत संयोजकाला अरनॉल्ड ‘बँडवाला’ म्हणून हाक मारतो. त्याला अनेकदा चौकशीसाठी बोलावून खोलीबाहेरच्या खुर्चीत तासनतास वाट बघायला लावतो. अरनॉल्डच्या सहकाऱ्यांपैकी एक अमेरिकन आर्मीतील जर्मन ज्यू लेफ्टनंट डेव्हिड विल्स व टंकलेखिका तरुणी एम्मी स्ट्रब (हिचे वडील हिटलरच्या नाझी सैन्यात जनरल होते, पण हिटलरच्या खुनाचा प्लॉट रचल्याबद्दल त्यांना देहदंड झाला होता.) या दोघांना अरनॉल्डची फर्टवँगलरबरोबरची वागणूक आवडत नाही. त्यांना त्याबद्दल अपराधी वाटतं. फर्टवँगलरच्या चौकशीमुळे त्यांना धक्का बसलाय. अनेक ज्यू वादकांना त्याने स्विर्त्झलँडच्या वेशीतून पळून जाण्यास मदत केलीय, हे एम्मीला ठाऊक आहे. हिटलरच्या मृत्यूनंतर फर्टवँगलरने वाजवलेल्या ब्रकनरच्या सातव्या सिंफनीची रेकॉर्ड रेडिओवर वाजवली गेली हे सत्य असलं तरी त्याबद्दल त्याला कसं जबाबदार धरता येईल, अशी या दोघांचीही भूमिका आहे.

एम्मीचा कल फर्टवँगलरच्या बाजूला आहे हे लक्षात घेऊन मेजर अरनॉल्ड एम्मीला ज्यूंच्या प्रेतांची, छळछावण्यांची चित्रफीत दाखवतो; पण एम्मी म्हणते की, ‘मी स्वत: जर्मन असले आणि या काळात जर्मनीत राहत असले तरी जर्मनीतील सर्वसाधारण जर्मन लोकांना असं काही दूर कुठेतरी चालू आहे याची आणि त्याची भयानकता याची जाणीव नव्हती.’’  हे मेजर अरनॉल्डला पटत नाही.

मेजर अरनॉल्डसारख्या संगीताची अभिरुची नसलेल्या माणसाकडून वारंवार अपमान करून घेणं, हेच फर्टवँगलरचं भागधेय आहे. फर्टवँगलरने चुकीच्या बाजूने उभं राहणं निवडलं खरं, पण हा गुन्हा त्याच्यावर खटला भरण्याइतका मोठा आहे का? भले त्याने नाझींपासून हातभर अंतर ठेवलं तरी आपण जर्मन आहोत आणि हा माझा देश आहे, हीच त्याची भूमिका होती. त्याचा प्रतिस्पर्धी आणि थोर संगीतकार कॅम्पलर याने देश सोडला. कारण तो ज्यू होता आणि त्याला त्याच्या जीवाची शाश्वती नव्हती. हा संघर्ष ‘टु बी ऑर नॉट टु बी’ असा होता.

दोस्त राष्ट्रांपैकी रशियन जनरलला या फर्टवँगलरची चौकशी व्हायला नकोय. त्याला त्याची महती माहीत आहे. या शतकातील हा सर्वोत्तम संगीतसंयोजक त्याला आपल्या देशासाठी हवा आहे. तो नानापरीने मेजर अरनॉल्डला समजावतो की, ही चौकशी थातूरमातूर पद्धतीने करून फर्टवँगलरची फाइल क्लिअर कर. पण मेजर अरनॉल्डने अनेक जळणाऱ्या प्रेतांचा वास छळछावणीपासून चार मैल दूरवर घेतलाय; त्याने प्रेतांचा खच बघितलाय आणि जर्मनीतील प्रत्येक सडलेल्या गोष्टीबद्दल तो जर्मन शासनाची बाजू घेणाऱ्या किंवा त्यांच्याविरुद्ध उभे न राहता जगणाऱ्या प्रत्येक जर्मन नागरिकाला दोषी धरतोय. त्याच्या दृष्टीने कला, संगीत, संस्कृती या गोष्टी लाखो ज्यूंच्या भीषण कत्तलीनंतर तद्दन झूट आहेत.

चित्रपटाचा शेवट असा केला आहे की फर्टवँगलरसंबंधीच्या खटल्याचा न्याय जणू प्रेक्षकांनी करायचा आहे. चौकशीचा कुठलाही निकाल आपल्याला कळत नाही. शेवटी खऱ्याखुऱ्या फर्टवँगलरची चित्रफीत दाखवली जातेय. तो नाझी अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात वाद्यमेळ्याचे स्वरसंयोजन करतोय. कार्यक्रम संपताच एक नाझी अधिकारी पोडियमजवळ येतो व फर्टवँगलरशी हस्तांदोलन करतो. फर्टवँगलर तो जाताच खिशातून रुमाल काढून हात खसकन पुसून टाकतो. पुन्हा याच अ‍ॅक्शनचा क्लोजअप इस्तवान साबो आपल्याला दाखवतो आणि चित्रपट संपतो. पण मनात रेंगाळतो तो प्रश्न असा की, हात पुसून टाकून दुष्ट शक्तीचा स्पर्श सहज पुसून टाकता येतो; पण त्या शक्तींनी केलेला रक्तपात, अमानुष संहार कसा पुसून टाकणार? तो होत होता तेव्हा तुम्ही कुठल्या बाजूला उभे होतात? तुम्ही कुणाची बाजू घेतली? किंवा कुठलीही बाजू न घेता सारा तमाशा पाहिलात? कळत-नकळत हेच खरे प्रश्न आहेत. तसेच रानटीपणाच्या राजवटीत संपूर्ण समाजाच्या सार्वजनिक जुलूमशाहीबद्दल एका कलावंताला जबाबदार धरता येईल का? हाही प्रश्न निर्माण होतो.

एक कलावंत म्हणून विल्हेम फर्टवँगलरचं पात्र या चित्रपटाचं महत्त्वाचं मध्यवर्ती पात्र आहे. या कलावंताच्या जीवनातील हा अंधारा कालखंड आहे. विसाव्या शतकातील मोठा संगीतकार, पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातील एक मोठं नाव आणि त्या अत्युच्च पदावर टिकून राहण्याची त्याची धडपड व त्याच्या नैतिकतेचा पंचनामा या चित्रपटात आहे. फर्टवँगलरला समाजात असलेला मान/श्रद्धा ही युद्धोत्तर काळातही आपल्याला चित्रपटात अनेक ठिकाणी दिसते. ट्रॅममधून प्रवास करताना लोक त्याला ओळखतात, त्याच्याबद्दलची आदराची प्रतिक्रिया आपण त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकतो; त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांत या महान कलावंताबद्दलची करुणा दिसते.

फर्टवँगलरची बाजूही आपल्याला महत्त्वाची वाटते. तो म्हणतो की, ‘माझी नाळ संगीताशी जोडलेली आहे. काळ्या अंधकारमय अशा काळात जर्मन लोकांना संगीताद्वारे आध्यात्मिक आधार देणं, हे माझं कर्तव्य होतं. वधस्तंभ आणि स्थलांतर या दोन बिंदूंमधील घट्ट दोरखंडावर मी चालतोय. संवेदनशील माणसाला काळ्या कालखंडात नेहमीच पडणारे हे प्रश्न आहेत. लढायचं की पळून जायचं? ‘टु बी ऑर नॉट टु बी?’ कलेला राजकारणापासून दूर ठेवावं ही त्याची धारणा होती. जेव्हा नाझींची सत्ता आली तेव्हा फर्टवँगलरने आपल्या समकालीन असणाऱ्या शॉनबर्ग या ज्यू संगीतकाराची भेट घेतली. तो स्थलांतर करण्याच्या तयारीत होता; पण त्याने फर्टवँगलरला सांगितलं की, ‘तू मात्र जर्मनी सोडू नकोस आणि चांगलं संगीत म्हणजे काय, याची जाण जर्मन जनतेला सांगत राहा.’ हा सल्ला फर्टवँगलरने पाळला.

पळून जायचं की राहायचं? कलावंत म्हणून जगत राहायचं की काम बंद करायचं? जे घडतंय ते गप्पपणे पाहायचं की प्रतिकार करण्याचा प्रयत्न करायचा? लढायचं की शेपूट घालायची? असे प्रश्न काळ्या कालखंडात सतत पडत असतात. या दोन विचारांच्या बिंदूमधल्या घट्ट दोरीवर फर्टवँगलरच्या चालण्याने अनेकांचे जीव वाचवले गेले, हेही सत्य नाकारता येत नाही. नाझी अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांतून त्याने अनेक ज्यूंना देशाबाहेर जाण्यास मदत केली, याचे अनेक पुरावे आहेत. याचाच अर्थ पकडल्या गेलेल्या ज्यूंचं काय झालं, किंवा काय होणार आहे याची जाणीव नाझी सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात वावरणाऱ्यांना असलीच पाहिजे, असं मेजर अरनॉल्डचं मत होतं. फर्टवँगलरने ज्यूंना पळून जाण्यास केलेल्या मदतीचा नेमका उलट अर्थ अरनॉल्ड काढतो. (हाही एकाधिकारशाहीला मारलेला टोला आहे. एकाधिकारशाहीत कुठल्याही गोष्टीचा अर्थ हवा तसाच काढता येतो.) मेजर अरनॉल्ड त्याच्यावर आरोप करतो की, बर्लिन वाद्यमेळ्याचं पद सोडून जाण्यास तो घाबरला. कारण त्या काळातील तरुण संगीतसंयोजक व त्याचा प्रतिस्पर्धी हर्बर्ट वॉन कर्जानला कमी लेखण्यासाठी त्याने नाझींबरोबर हात मिळवले. अनेक ज्यूंना निसटून जाण्यासाठी त्याने मदत केली त्यामागे जर्मनी जरी युद्ध हरली तरी समाज आपल्याकडे सन्मानाने पाहील, ही भावना होती.

इतिहासात डोकावून पाहिलं तर अशा अनेक नोंदी आहेत की, जर्मनीतील या काळ्याकुट्ट काळात विल्हेम फर्टवँगलरच्या संगीताला बहर आला होता. त्याचं संगीत हे त्या दडपशाहीच्या काळात जर्मनीतील अनेकांच्या जगण्याचा आधार होतं, जिवंत राहण्याचं कारण होतं.

फर्टवँगलरच्या मते तो गोअरिंग आणि गोबेल्स यांच्या हातातील एक प्यादं होता आणि त्याच्या कला व सांस्कृतिक सत्ता गाजवण्याच्या विरुद्ध त्याने जर्मनीत राहूनच आतून लढा दिला.

संपूर्ण चित्रपटभर काहीतरी दुरुस्त न करण्यासारखं घडलं आहे, याची खंत फर्टवँगलरच्या चेहऱ्यावर सतत आहे.

चित्रपटाबाहेरच्या खऱ्या इतिहासात फर्टवँगलरची ही केस पूर्ण होईपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचं संगीतविषयक व्यावसायिक काम करण्यास बंदी घातली होती. १९४७ साली ही केस निकाली निघाली आणि फर्टवँगलर मुक्त झाला. त्याला शिकागो सिंफनी वाद्यमेळ्याच्या प्रमुखपदी येण्याचं आमंत्रण मिळालं. पण अनेक वादकांनी त्याच्याविरुद्ध राजीनाम्याचं आणि प्रचंड अपप्रचाराचं अस्त्र उगारल्याने त्याची नेमणूक रद्द करण्यात आली. १९५४ साली तो मरण पावला.

इतिहासात या गोष्टीची अनेकदा पुनरावृत्ती झाली आहे की, खुनी राज्यकर्त्यांना अशा उच्चभ्रू/बड्या कलावंतांचा स्वत:चा बडेजाव दाखवण्यासाठी वापर करायचा असतो. शिवाय जगात त्यामुळे आपली इभ्रत वाचवता येते. या मोठ्या लोकांना ‘मोठं’ मानणारा संपूर्ण वर्ग/समाज आपल्या पंखाखाली घेता येतो. कुठल्याही एकाधिकारशाहीला थोडाफार सांस्कृतिक ऐवज लागतो. कुठलंही गैरकृत्य करताना असे कलावंत आपल्या बाजूला उभे आहेत, याचा त्यांना आधार असतो. शिवाय स्वत:ची चांगली ‘प्रतिमा’ तयार करण्यासाठी हे संबंध वापरता येतात. कलावंतांचेही यात छुपे फायदे असू शकतात.

चित्रपटात फर्टवँगलरच्या मनावर/आत्म्यावर चढलेली अपराधी भावनेची जखम/पुटं मेजर अरनॉल्ड वारंवार खरवडतो, सोलून काढतो.

या चित्रपटाचा दिग्दर्शक इस्तवान साबो (Istvan Szabo) याचा जन्म १९३८ साली बुडापेस्ट येथे झाला. ‘मेफिस्टो’ या चित्रपटासाठी त्याला ऑस्कर मिळालं. विसाव्या शतकात आपल्या कारकिर्दीच्या निमित्ताने युरोपातील अनेक देशांमध्ये आपलं आयुष्य जगताना तेथील समाज, कलावंत दशकामागून दशकं लोटत असताना युद्ध, फॅसिझम किंवा सांस्कृतिक क्रांती या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहतात/प्रतिक्रिया देतात, याच्या नोंदी तो घेत होता. हा कायमच त्याच्या अभ्यासाचा विषय झाला. युद्धकाळातील सौंदर्यशास्त्रावर त्याच्या चित्रपटांतून भाष्य केलं जातं.

१९५६ साली हंगेरीमध्ये सोव्हिएत युनियनने घुसखोरी केली तेव्हा हंगेरीत राहूनच इस्तवान साबो हा त्या सत्तेखाली काम करत राहिला. आपल्या देशाप्रति प्रामाणिक राहणं, आपल्या कलेशी निष्ठा ठेवणं, सोव्हिएत सत्तेबरोबर त्यांचा द्वेष करत/शिव्या देत काम करतानाच स्वत:ची निष्ठा हंगेरीवर आहे याचं भान ठेवून काम करणं या गोष्टी त्याने केल्या होत्या. त्यामुळे खरं तर फर्टवँगलरच्या या गोष्टींबरोबरच तो स्वत:ची बाजू अटीतटीने ह्या चित्रपटातून सांगतोय, हेही जाणवत राहतं. कदाचित त्याला या गोष्टीचा गंडही असण्याची शक्यता आहे. अनेक कलावंतांसारखं आपल्या मायभूमीतून दुसऱ्या देशात सुरक्षिततेसाठी पळून जाणं त्यालाही शक्य होतं, पण त्याने हंगेरीतच राहून ते सारं सोसलं. साबो तेव्हा तरुण होता. हंगेरीत कम्युनिस्ट शासनाची ती सुरुवात होती. प्रत्येकाचं स्वातंत्र्य हळूहळू आकसत असताना कला आणि राजकारण यांना दोन वेगळ्या गोष्टी म्हणून अस्तित्व उरतं का? हा प्रश्न कळीचा बनून राहिला होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या साबोला या प्रश्नाने पछाडलं की, कला आणि राजकारण याचा उपयोग सर्वंकष सत्ताधीश कसा करून घेतात? तो एका मुलाखतीत म्हणतो, “हुकूमशहांना कलावंतावरची मालकी हवी असते. त्यासाठी ते काही खास कलाकारांवर मेहेरबान होतात. कारण त्यांना जगासमोर हे दाखवायचं असतं की, पाहा या कलाकारावर आमचा ताबा आहे. सगळं कसं छान छान, आलबेल आहे. कलावंत कसा मोकळा श्‍वास घेत आहेत, हे भासवण्याची त्यांना गरज असते.”

चित्रपटात दिमशित्झ हा रशियन सैनिक अधिकारी फर्टवँगलरला या साऱ्यातून मोकळं करून रशियात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. कारण फर्टवँगलर हा स्टालीनचाही आवडता संगीतकार असतो. त्याला या आरोपातून सोडवून रशियात नेण्यासाठी हवी ती किंमत मोजण्यास तो तयार असतो, पण मेजर अरनॉल्ड आपल्या भूमिकेवर ठाम असतो.

इतिहासाने वापरलेले सर्व पैलू साबो दिग्दर्शक म्हणून वापरतो. बातमीपट वारंवार दाखवून जुन्या काळात घडलेली सत्य घटना वारंवार अधोरेखित केली जाते. बर्गनबेल्सन छळछावणीत हजारो ज्यूंची नग्न प्रेते बुलडोझरने सामुदायिक कबरीत टाकतानाचा माहितीपट मधून मधून मेजर अरनॉल्ड पाहताना दिसतो. ते भीषण वास्तव प्रेक्षकही पाहतो आणि मग प्रत्येक जर्मन नागरिकाला युद्धगुन्हेगार म्हणून शिक्षा झाली पाहिजे, हा मेजर अरनॉल्डचा अट्टहास आपण समजू शकतो.

युद्धोत्तर भकास बर्लिन शहराची अचूक नोंद दिग्दर्शकाने या चित्रपटात घेतली आहे. हा चित्रपट याच नावाच्या १९९५ सालच्या रोनाल्ड हारवूड यांच्या नाटकावर आधारित आहे. मूळ नाटकावरून हा चित्रपट बेतलेला असल्यामुळे की, काय चित्रपट नाटकाच्या पकडीतून सुटत नाही.

एका संगीतकारावरचा खटला असल्यामुळे या चित्रपटाचं संगीत हाही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बिथोवन आणि अन्तोन ब्रकनर या दोन संगीतकारांचं संगीत या चित्रपटात प्रामुख्याने वापरलं आहे. फर्टवँगलरने या दोन संगीतकारांचं संगीत जास्तकरून संयोजित केलं आहे. या चित्रपटात ‘खऱ्या’ फर्टवँगलरवरील माहितीपटाची चित्रफीत वारंवार वापरली आहे, त्यामुळे संपूर्ण गोष्टीला एक सत्याची किनार लाभते. शिवाय फर्टवँगलरचं स्वत:चं संगीत पार्श्वसंगीत म्हणून बऱ्याच ठिकाणी येतं. युद्धकाळातील रेडिओच्या रेकॉर्डिंग्जवरून ते आता डिजिटल रेकॉर्ड करून घेतलं आहे. हिटलरच्या मृत्यूनंतर फर्टवँगलरने व्हायोलिनवर वाजवलेली ब्रकनरची सातवी सिंफनी रेडिओवर ऐकवली गेली, यावरूनही फर्टवँगलर नाझींना आणि हिटलरला किती प्रिय होता, हा मुद्दा मे. अरनॉल्ड पुन्हा पुन्हा चौकशीत उपस्थित करतो. युरोपात उगम पावलेलं पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत आणि अमेरिकन बॉबी ट्रंपचं ‘रूट 66’ हे संगीत तुलनात्मक सांस्कृतिक विरोधाभास म्हणून चित्रपटात वापरलं आहे.

एका दृश्यामध्ये बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या, छत नसलेल्या इमारतीत जर्मन संगीतरसिक भर पावसात संगीताचा कार्यक्रम हातात छत्री धरून ऐकतात. बिथोवनची सिंफनी वाजवणाऱ्या त्या वादकांचा पर्यायाने संगीताचा हा एक प्रकारचा सन्मानच असतो. फर्टवँगलरही पावसात भिजत एका खुर्चीवर जाऊन बसतो. काही रसिक त्याला ओळखतात. मान झुकवून ते त्याच्याविषयी आदर व्यक्त करतात. त्यानंतरच्या एका दृश्यामध्ये अमेरिकन सैनिक एका बारमध्ये ‘रूट 66’चा ढॅणढॅण बँड ऐकताना दिसतात. हा सांस्कृतिक फरक आपल्याला चित्रपटात मुद्दाम दाखवला जातो.

संगीताशी देणंघेणं नसणाऱ्या मेजर अरनॉल्डच्या हातात या चौकशीनिमित्त एक प्रकारची सत्ता येते आणि त्या सत्तेसमोर फर्टवँगलर असहाय होत जातो. यातून अपरिमित सत्ता हातात आल्यावर ‘फॅसिझम’च्या वृत्ती जागृत होतात की काय, हे सुचवलं जातं. मेजर हळूहळू ‘नाझी’ असल्याचा भास होतो आणि आपली सहानुभूती फर्टवँगलरच्या दिशेने वळते.

राजकीय आणि तत्त्वज्ञानात्मक चर्चा यांचा एक अंत:स्थ स्तर या चित्रपटाला आहे. कलावंताचं स्वातंत्र्य, त्याची निष्ठा, कला की राजकारण, कलावंताचं कर्तव्य या साऱ्या विषयांभोवती या चित्रपटाची संहिता रुंजी घालत राहते. संस्कृती आणि राजकारण या विषयाची उलटसुलट बाजू दाखवणारा हा चित्रपट आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो.

ही गोष्ट खरी आहे की आपण सगळेच कायम कुठल्यातरी बाजूचे असतो किंवा नसतो. कित्येकदा अनेक महत्त्वाच्या क्षणी आपण एकदम त्रयस्थ होऊन कुठलीच बाजू न घेता सुरक्षित वेगळेपण जपतो. वेळोवेळी पुकारलेल्या ‘बंद’मध्ये काहीही न करता एका रजेचा बळी येऊन आपण आपलं स्वातंत्र्य किंवा जीव वाचवतो. पण त्याचा अर्थ असा निघतो की तुम्ही बंदमध्ये सामील झालात किंवा ‘बंद’ पुकारणाऱ्यांना, दंगा करणाऱ्यांना, कायदा हातात घेणाऱ्यांना तुमचा पाठिंबा आहे. पण जेव्हा सर्वस्व पणाला लागलेलं असतं, डोक्यावर टांगती तलवार असते आणि परिणाम काय होईल, याची शाश्वती नसते, तेव्हा आपण नेमके कुठल्या बाजूला असतो, कुणाची बाजू घेतो किंवा कुठलीही बाजू न घेता जन्म काढता येतो का, हा खरा प्रश्न आहे.

एकाधिकारशाही, एकपक्षीय शासनव्यवस्था, हुकूमशाही असणाऱ्या समाजात कला आणि राजकारण हे अतिशय गुंतागुंतीचं असतं. त्यामुळे अशा प्रकारचं शासन हे कलेकडे तसंच कलावंताच्या स्वातंत्र्याकडे बारीक लक्ष ठेवून असतं. लोकशाहीमध्ये सरकारला कुठल्याही कलेची पर्वा नसते आणि त्यामुळे कलावंतांना हवं ते स्वातंत्र्य सहज घेता येतं. आपण जे काही लिहिलं आहे हे कुणीतरी राजकीय अंगाने तपासणार आहे, ही जाणीवसुद्धा लेखकांचं स्वातंत्र्य आकुंचित करण्यास पुरेशी ठरते.

चित्रपट संपल्यावर सुन्न झालेल्या मनात आपल्याला जाणवतं की इस्तवान साबोने आपल्याला एका ‘लिंबो’ किंवा ‘नरो वा कुंजरो’ मन:स्थितीत अवचित पकडलंय. चांगले चित्रपट दिग्दर्शक असेच तुम्हा-आम्हाला दचकवून थोड्या काळासाठी स्तब्ध/सुन्न करतात. साबो चित्रपट अशा पद्धतीने संपवतो/सोडून देतो की, जणू आता फर्टवँगलर अपराधी आहे का, हा नैतिक निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.

शेवटच्या दृश्यामध्ये ‘खरा’ फर्टवँगलर आपला हात खसकन पुसतो, पण सगळं इतकं सोपं असतं का? लाखो ज्यूंच्या हत्या इतक्या सहजपणे विसरता येतात का? हे विचार मनात उमटतात तिथेच हा चित्रपट यशस्वी होतो.

हा चित्रपट म्हणजे एक बौद्धिक संवाद आहे, प्रत्येक काळातील मानवी क्रौर्याला सामोरं जाणाऱ्या प्रत्येकासाठी. अतिरेकी तालीबानी वृत्ती किंवा आक्रमक धार्मिक उन्माद समोर दिसत असताना काहीएक कृती करण्यास विचारप्रवृत्त करणारा हा चित्रपट आहे. सामाजिक आणि कलात्मक जबाबदारीची जाणीव करून देणारी ही एक परिणामकारक प्रतीकात्मक कृती आहे.

(‘मुक्त शब्द’ मासिकाच्या एप्रिल २०१७च्या अंकातून लेखकाच्या संमतीने पुनर्मुद्रित.)

……………………………………………………………………………………………

लेखक नितीन दादरावाला प्रसिद्ध चित्रकार आहेत.

nitinda77@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

pramod bapat

Sat , 06 May 2017

कला आणि कलावंत, कलावंत आणि समाजस्थिती असे वेगवेगळे पीळ दाखवित पुढे सरकणारा चित्रपटच तुम्ही शदांतून डोळ्यासमोरून झगझगत नेलात. न बघताही पाहिल्याचे समाधान आणि पाहण्यासाठी तहान लावलीत.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......