होळीची काही अविट गाणी, पण जुन्या हिंदी चित्रपटांतील
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • होळीविषयक गाण्यांची काही चित्रपट दृश्यं
  • Sat , 11 March 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi होळी Holi

होळी आली की, ‘होली आयी रे कन्हाई’ (‘मदर इंडिया’), ‘अरे जा रे हट नट खट’ (‘नवरंग’), ‘होली के दिन दिल खिल जाते है’ (‘शोले’), ‘रंग बरसे भिगी चुनरवाली’ (‘सिलसिला’)  अशा काही गाण्यांची चर्चा होते. ती टीव्हीवर दाखवली जातात. बस्स. संपली आमची होळीच्या गाण्यांबाबतची रसिकता. याशिवाय हिंदी चित्रपटात होळीची अतिशय गोड अशी गाणी आहेत, हे आपल्या गावीच नाही. 

होळीच्या गाण्यांमध्ये पहिल्यांदा दखल घ्यावी असं गाणं १९५० च्या ‘जोगन’ चित्रपटात आहे. बुलो सी. रानी हा सिंधी संगीतकार गीता दत्तच्या आवाजाच्या विलक्षण प्रेमात होता. या चित्रपटात त्यानं एक दोन नाही तर तब्बल १३ गाणी गीताच्या आवाजात दिली आहेत. संत मीराबाईवरचा हा चित्रपट. नर्गिस यात नायिका आहे. ‘डारो रे रंग रसिया, फागुन के दिन आये रे’ असं गीताच्या आवाजातलं एक गाणं आहे. गाण्याची चाल तशी पारंपरिकच आहे. कोरसचा चांगला वापर केला आहे, पण आज हे गाणं तितकं पकड घेत नाही. अगदी गीताचा आवाजही वेगळा असा जाणवत नाही. नर्गिसला तसंही नाचता येत नव्हतंच. तेव्हा त्या दृष्टीनेही हे गाणं प्रभाव पाडत नाही. पण हे होळीचं पहिलं गाणं आहे, ज्याची दखल घ्यावी लागते. याच वर्षी ‘हमारा घर’ या चित्रपटात चित्रगुप्तने शमशाद-रफीच्या आवाजात होळीचं गाणं दिलं आहे, पण तेही विशेष नाही.  

होळीचं पहिलं ‘हिट’ गाणं म्हणजे १९५२ च्या ‘आन’मधलं, ‘खेलो रंग हमारे संग आज दिन रंग रंगिला आया’. शमशादच्या आवाजातून लोकगीताचा, तर लताच्या आवाजातून नायिकेच्या नाजूक भावनांचा रंग या गीताला चढला आहे आहे. दिलीपकुमार, प्रेमनाथ, निम्मी, नादिरा अशी तगडी स्टारकास्ट यात आहे. नौशाद यांच्या बहुतांश गाण्यांचे बोल शकील बदायुनी यांनीच लिहिले. हे गाणंही शकील यांचंच आहे. भारतीय वाद्यांचा वापर हे तर नौशाद यांचं वैशिष्ट्यच. या गाण्याच्या आशयालाही पोषक असाच त्याचा वापर केला गेला आहे.

यानंतर पुढच्याच वर्षी (१९५३) ‘राही’ चित्रपटात अनिल विश्वास यांनी अस्सल लोकगीताच्या धाटणीचं होळी गीत दिलं आहे. परत असा प्रयोग हिंदी चित्रपटात झाला नाही. पूर्णत: लोकवाद्यांचा वापर, गायकही तसेच (इरा मुजूमदार), नृत्यही तसंच. देव आनंदचा हा चित्रपट. ‘होली खेले नंदलाला बिरज में’ असे या गाण्याचे पारंपरिक बोल आहेत. हे गाणंही अतिशय वेगळं आहे. पुढे ‘रंग बरसे’ सारख्या गाण्यांनी यातील कल्पना उचलल्या. पूर्णत: लोकगीताचाच छाप जसाच्या तसा ठेवण्याचा एक व्यावसायिक धोका अनिल विश्वास यांनी घेतला, यासाठी त्यांना दाद द्यावी लागेल. 

देव आनंद-दिलीप कुमार यांचा १९५५ ला आलेला ‘इन्सानियत’ हा सी. रामचंद्र यांच्या एकापेक्षा एक गोड गाण्यांनी नटलेला चित्रपट. लोकवाद्यांचा अतिशय सुंदर उपयोग या गाण्यांमध्ये केला गेला आहे. यात नायिका बीना रॉयच्या तोंडी होळीचं एक सोज्वळ गाणं आहे- 

तेरे संग संग संग, 

पिया खेलती मैं रंग 

हाय हाय हाय हुयी बदनाम रे 

लागे दुनिया से डर 

गयी गली घर घर 

देखो छेड मुझे लेके तेरा नाम रे 

हे शब्द राजेंद्रकृष्ण यांनी एकमेकांत असे गुंफले आहेत की, ते सहजच चालीत ओवले जावेत. शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, राजेंद्रकृष्ण हे असे गीतकार होते की, त्यांच्या गीतांना स्वत:च्याच अंगभूत चाली आहेत. त्यामुळे संगीतकारांचेही लाडके होते. लताचा आवाज हा तर सी. रामचंद्र यांचा वीक पॉइंटच. त्यामुळे साहजिकच सगळा गोडवा यात उतरला नसता तरच नवल. 

नर्गिस असो की बीना रॉय असो, की निम्मी, यांना नृत्याचं फारसं अंग नाही. परिणामी एका मर्यादेपलीकडे नृत्यप्रधान गाण्यात त्यांचा प्रभाव पडत नाही, पण वैजयंतीमालाचं मात्र तसं नाही. सुंदर चाल, उत्कृष्ट शब्द यांच्या तोडीस तोड नृत्याचा आविष्कार तिच्या गाण्यात पाहायला मिळतो.

हेमंत कुमारचं संगीत असलेल्या ‘अंजान’ (१९५६) मधील होळीचं गाणं, ‘होली की आयी बहार’ हे याचंच चांगलं उदाहरण. वैजयंतीमालाच्या हालचाली अगदी साध्या आहेत. पण त्यातून जो परिणाम साधला जातो, तो फार कलात्मक आहे. हे गाणंही राजेंद्रकृष्ण यांचंच आहे. 

मौसम पे रंग, मेरे मन में तरंग 

नयनों में साजन का प्यार 

देखो होली की आयी बहार 

असे साधेच पकड घेणारे एकमेकांत गुंफले गेले शब्द या गीतात आहेत. खरं तर राजेंद्रकृष्णच्या गीतरचनेबद्दल स्वतंत्रच लिहायला पाहिजे.

याच वर्षी हेमंतकुमार आणि राजेंद्रकृष्ण या जोडीनं अजून एका चित्रपटात होळीचं गाणं दिलं आहे. चित्रपट होता ‘दुर्गेश नंदिनी’. प्रदीपकुमार-बीना रॉय या जोडीचा हा चित्रपट. लताच्या आवाजात एक गाणं ‘मत मारो श्याम पिचकारी, मोरी भिगी चुनरिया सारी रे’ असं आहे, तर दुसरं गाणं हेमंतकुमार लता यांच्या आवाजात, ‘प्यार के रंग में सैंय्या मोरी रंग दे चुनरिया’ असं आहे. होळीच्या दोन गाण्यांचा असा प्रयोग आधी आणि नंतरही कुठल्या चित्रपटात दिसला नाही. या दोन्ही गाण्यांत बासरी आणि शहनाई या सुषिर वाद्यांचा वापर केला आहे. पिचकारीतून हवेच्या दाबाने रंग उडवला जावा, तसे हवेच्या दाबाने स्वर बाहेर पडणारी वाद्यं, यासाठी निवडण्याची प्रतिभा हेमंतकुमार यांच्यापाशीच होती. 

नौशाद आणि शकील बदायुनी याच जोडीनं १९६० च्या ‘कोहिनूर’मध्ये ‘तन रंग लो जी आज मन रंग लो’ हे होळीचं गोड गाणं दिलं आहे. लता-रफीचा आवाज म्हणजे नौशाद यांना हवं तसं खेळायला मिळालेलं मैदान. १९५० ते १९६० या दशकात लता-रफीच्या आवाजावर विविध संगीतकारांनी जे आणि जसे प्रयोग केले, तसे परत कुणाला करता आले नाहीत. कारण या दोघांच्या आवाजाची रेंज अफाट होती. पुढे त्यांच्या आवाजाचा जो साचा तयार झाला किंवा त्यांच्या आवाजाचाच दबाव संगीतकारांवर यायला लागला, तशी स्थिती या काळात नव्हती. त्यामुळे त्यांची सगळ्यांत मधुर गाणी याच काळातील आहेत. या गाण्यावर नाचताना मीनाकुमारीच्या मर्यादा जाणवू नयेत म्हणून किमान हालचालीतून कॅमेरा हवा तो भाव टिपत इतरत्र सरकतो.

होळी म्हणजे मस्ती असं जे समीकरण आहे, त्याला खरा न्याय देणारं एक गाणं १९६६ मध्ये ‘बिरादरी’ या चित्रपटात गुणी संगीतकार चित्रगुप्त यांनी दिलं. या गाण्याची छाप पुढे इतर होळी गीतांवरही आढळते. शशी कपूर आणि पुढे कॅबरे डान्सर म्हणून गाजलेली फरियाल यांच्यावर हे गाणं चित्रित आहे. सोबत यात मेहमूद आणि हेलनचं धम्माल नृत्यही आहे. रफी-सुमन कल्याणपुर-मन्ना डे यांच्या आवाजात हे गाणं आहे. ‘रंग दो सभी को आज इक रंग मे, आयी रंगीली होली रे’ या शब्दांना उत्तर प्रदेशातील मथुरेच्या परिसरातील पारंपरिक होळीगीतांचा साज चित्रगुप्त यांनी चढवला आहे. पुढे ‘जय जय शिवशंकर’ किंवा यासारख्या गाण्यांत हेच वापरलं गेलं. यात हेलनला मराठमोळ्या नववारीवर नृत्य करायला लावलं आहे.  

पुढे मात्र होळीची गाणी जवळपास हद्दपारच झाली. जी आली त्यातही गाण्यांचा ढंग बदलला. मुळात संगीताचाच ढंग बदलला. याची सुरुवात रवीच्या संगीतातील ‘फुल और पत्थर’च्या ‘लायी है हजारो रंग होली’ या आशा भोसलेच्या गाण्यापासून दिसते. यातील ऑकेस्ट्राची हाताळणी आधुनिकतेच्या नावाखाली माधुर्य हरवत चाललेली दिसून येते. 

हृदयनाथ मंगेशकरांनी १९८४मध्ये ‘मशाल’ चित्रपटात जे होळीचं गाणं दिलं आहे, ती चाल मराठी गाण्याची आहे. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी’ या चालीवर ‘ओ होली आयी होली आयी देखो होली आये रे’ असं ते गाणं आहे. गाणं चांगलं आहे, पण मराठी रसिकांच्या कानात जुनंच गाणं बसल्यामुळे हे नवं लक्षात राहत नाही.

 a.parbhanvi@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......