‘टेक केअर... गुड नाईट’ : सायबर क्राईमचं अंतरंग उलगडणारा ‘सावधानपट’
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  •  ‘टेक केअर... गुड नाईट’चं पोस्टर
  • Sat , 01 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie टेक केअर... गुड नाईट Take Care Good Night पर्ण पेठे Parna Pethe गिरीश जोशी Girish Joshi महेश मांजरेकर Mahesh Manjrekar सचिन खेडेकर Sachin Khedekar

आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा प्रगतीसाठी होत असला तरी त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. विशेषतः या तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ असलेल्या लोकांची यामध्ये जास्त फसवणूक होऊ शकते. संगणकामुळे हल्ली सर्वच क्षेत्रात ‘ऑनलाईन’ व्यवहार चालतात. बँकिंग क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बँकेच्या कामकाजाच्या संदर्भात फसवणुकीचे अनेक प्रकार असू शकतात. त्यामध्ये आता ‘सायबर क्राईम’ची नव्यानं भर पडली आहे. वास्तविक या ‘ऑनलाईन’ व्यवहारामुळे बँकेचं कामकाज अधिक सुकर झालं आहे. संगणकाच्या किंवा मोबाईलच्या साहाय्यानं आता घरबसल्याही बँकेचे व्यवहार करता येतात. मात्र यासाठी मोबाईल किंवा ‘संगणक-निरक्षर’ असून किंवा त्याचं केवळ जुजबी ज्ञान असून चालत नाही. तसंच आपल्या व्यवहारांच्या गोपनीयतेबाबतही अनेकांकडून योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्याचाच गैरफायदा घेणारे अनेक जण असू शकतात आणि त्यामुळेच ‘सायबर क्राईम’च्या घटना वारंवार घडतात. ‘टेक केअर, गुड नाईट’ या नवीन मराठी चित्रपटात अशाच ‘सायबर क्राईम’वर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 

काही सत्यघटनांवर आधारित असलेला हा चित्रपट असला तरी चित्रपटाची कथा अशीच फसवणूक झालेल्या एका व्यक्तीच्या तोंडून निवेदनाच्या स्वरूपात सांगण्यात आली आहे. चांगले कलाकार, चांगलं छायाचित्रण असूनही कथा-पटकथेत काही महत्त्वाचे कच्चे दुवे असल्यामुळे तो एक आधुनिक पद्धतीच्या गुन्हेगारीचा सामान्य रहस्यपट बनला आहे. ‘सायबर क्राईम’वर मराठीत काढण्यात आलेला हा पहिला चित्रपट असल्यामुळे एका अर्थानं सायबर क्राईमचं अंतरंग उलगडणारा हा एक ‘सावधानपट’ ठरला आहे, असंच म्हणावं लागेल.  

एका बड्या कंपनीतून प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अविनाश पाठकची (सचिन खेडेकर) ही कथा आहे. नोकरी करणारी पत्नी आसावरी (इरावती हर्षे), सानिका (पर्ण पेठे) नावाची एक तरुण मुलगी आणि परदेशात शिकायला गेलेला तरुण मुलगा, असं त्याचं चौकोनी कुटुंब आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि त्यामध्ये वारंवार होणाऱ्या बदलाचा अविनाशला तिटकारा आहे. हा बदल स्वीकारण्याची त्याची मानसिक तयारी नाही (म्हणूनच तो सेवानिवृत्त झाला आहे.) मोबाईल आणि संगणकाचंही त्याला जुजबी ज्ञान आहे. सेवानिवृत्तीनंतर पत्नीबरोबर परदेश दौरा करण्याचं त्याचं एक स्वप्न असतं. त्याप्रमाणे तो परदेश दौरा आटोपून मायदेशी परत येतो. मात्र दरम्यान त्याच्या बँक खात्यातून पन्नास लाख रुपये गायब झाल्याचं त्याला कळतं. त्यामुळे त्याला प्रचंड धक्का बसतो. त्यातच मोबाईलवर चॅटिंगशी सवय असणारी सानिका आई-वडिलांच्या गैरहजेरीत एका अनोळखी तरुणाला घरी बोलावते आणि तिच्याकडून नको ते घडतं. तो तरुण त्या प्रसंगाचं व्हिडिओचित्रण करतो. पैसे मिळवण्यासाठी क्रमाक्रमानं ते चित्रीकरण डाऊनलोड करण्याचा त्याचा विचार असतो. या दोन्ही घटनांमुळे हादरलेले अविनाश आणि आसावरी पोलीसांत तक्रार करतात. आणि सायबर क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी पवार (महेश मांजरेकर) त्याचा तपास करतात. त्यावेळी हे दोन्ही गुन्हे एकाच तरुणानं केल्याच्या निष्कर्षापर्यंत ते येतात. हा तरुण कोण असतो? आणि त्याचा हेतू काय असतो? हे अर्थातच पडद्यावर पाहणं संयुक्तिक ठरेल.

सुप्रसिद्ध नाटककार गिरीश जोशी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धात ‘सायबर क्राईम’चं रहस्य टिकवण्यात दिग्दर्शकाला चांगलं यश मिळालं आहे. मात्र मुख्य गुन्हेगार कोण आहे हे कळल्यानंतर त्याचा तपास अगदी सरळसोट पद्धतीनं होतो. तपासात कोठेही गूढता न ठेवल्यामुळे, तसंच धक्कातंत्राचा कसलाही वापरही न केल्यामुळे शेवट अर्थातच मिळमिळीत वाटतो.

चित्रपटात सानिकाची मैत्रीण पौर्णिमा (संस्कृती बालगुडे) हिचंही एक उपकथानक आहे. अर्थात सायबर क्राईमशी त्याचा काही संबध नसला तरी आधुनिक पिढीचं विचार आणि त्याचे दुष्परिणाम यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसंच अविनाश-आसावरी आणि सानिका यांच्यातील कौटुंबिक संबंध लक्षात घेता आधुनिक पिढीला समजून घेताना पालकांनी आपल्या मुलांना कसं विश्वासात घेण्याची गरज आहे, यावर यानिमित्तानं भर देण्यात आला आहे. मात्र अत्याधुनिक घरात राहणारा, प्रसंगी घरात व्होडका पिणारा अविनाश केवळ संगणक-निरक्षर नव्हे, तर आधुनिक बदलाचा तिटकारा असणारा आहे, हे कथेशी विसंगत वाटतं.

त्याचप्रमाणे कथेतील ‘सायबर-क्राईम’ हे केवळ थ्रिल म्हणून केलेलं आहे, असं जेव्हा मुख्य गुन्हेगाराकडून सांगितलं जातं, त्यावेळी त्याच्या बेकारीबाबतची सहानभूती मिळून कथेतील ‘सायबर-क्राईम’चं गांभीर्यही आपोआपच कमी होतं. ‘सायबर-क्राईम’बाबतची अत्यावश्यक माहिती देण्याबाबत मात्र चित्रपट कोठेच कमी पडत नाही. 

अविनाशच्या मुख्य भूमिकेत सचिन खेडेकर यांनी उत्तम अभिनय केला आहे. महेश मांजरेकर यांनीही हसत-खेळत तपास करणारा पोलीस अधिकारी चांगला रंगवला आहे. सानिकाच्या भूमिकेत काम करताना पर्ण पेठे यांनी ‘कोठेतरी हरवलेली एक मुलगी’ चांगली उभी केली आहे. याशिवाय संस्कृती बालगुडे, विद्याधर जोशी, सुलेखा तळवलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्याही भूमिका चांगल्या वठल्या   आहेत. विशेष म्हणजे अपेक्षेप्रमाणे चित्रपटात एकही गाणं नाही. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......