‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ : मागच्या वेळेसारखी भट्टी जमलेली नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’चं पोस्टर
  • Sat , 25 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie हॅप्पी फिर भाग जायेगी Happy Phirr Bhag Jayegi सोनाक्षी सिन्हा Sonakshi Sinha अभय देओल Abhay Deol अली फझल Ali Fazal डायना पेंटी Diana Penty

दोन वर्षांपूर्वी आलेला ‘हॅप्पी भाग जायेगी’ बर्‍यापैकी विनोदी होता. भारत-पाकिस्तान संबंध, त्यात एक पंजाबी कुडी शादी के मंडप से भाग के लाहोर में मिलती हैं. तिचा प्रियकर व एक लग्नोत्सुक बिझनेसमॅन कॉर्पोरेटर. तिच्या प्रेमात पडलेला पाकिस्तानी लड़का. मग तिला वापस आणताना त्यांची उडालेली तारांबळ आणि त्यातून फुलणारा विनोद अशी रचना पहिल्या सिनेमाची होती. जिमी शेरगिल व पीयूष मिश्रा यांनी धमाल केली होती त्यात. पीयूष मिश्रांचा उस्मान आफ्रिदी तर लक्षात राहण्यासारखा. अगदी ‘शादीराम घरजोडे’ व ‘इन्स्पेक्टर प्यारे मोहन’ या सदाशिव अमरापूरकरांच्या दोन पात्रांसारखा. ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ यात पण त्यांनी तीच भूमिका केलेली असली तरी मागच्या वेळेसारखी भट्टी मात्र जमलेली नाही. अगदी शेरगीलचा दमन सिंग बग्गासुद्धा जमलेला नाही.

हरप्रीत ‘हॅप्पी’ कौर (सोनाक्षी सिन्हा) शांघाय आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलीय. तिला घेऊन जाणार्‍या ड्रायव्हरनं हातात हरप्रीत कौर व गुरदीप सिंग उर्फ गुड्डू असा फलक धरलेला आहे. तिचा मूर्खपणा तिला नडतो. जेव्हा तिच्या लक्षात येतं की, तो ड्रायव्हर चँगचा (जेसन थॅम) असतो. जो तिथला डॉन आहे. चँगनं दमन सिंग बग्गा (जिमी शेरगील) व उस्मान आफ्रिदी (पीयूष मिश्रा) यांनादेखील भारतातून उचलून आणलेलं असतं. तो त्यांना ‘हॅप्पी’ला भेटायला सांगतो, पण तोपर्यंत हॅप्पी त्याच्या चंगूल से भाग जाती है. पळून गेलेली हॅप्पी अनावधानानं खुशी उर्फ खुशवंत सिंग गिलला (जस्सी गिल) भेटते. तिची दर्दभरी दास्ताँ ऐकून त्याचं हृदय पिळवटून निघतं. तो तिला भारतात परत पाठवण्यासाठी अदनान चाऊकडे (डेंझिल स्मिथ) न्यायचं ठरवतो.

ठरवून लग्न झालेलं जोडपं पहिल्या अपत्याबाबत जसं खूप हळवं, भावनिक वगैरे असतं, तसं दुसर्‍या अपत्यावेळी राहत नाही. कारण पहिल्याच्या संगोपनात ज्या चुका झालेल्या असतात, त्या दुसर्‍याच्या वेळी होऊ नयेत याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे ताकदेखील फुंकून पिण्याची सवय त्यांनी लावून घेतलेली असते. पटकथाकार-दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांचं पहिलं अपत्य ‘हॅप्पी भाग जायेगी’ हा त्याच्या दोषासहित चांगला होता.

त्याचं एक कारण म्हणजे चित्रविचित्र स्वभावाची पात्रं. दमन सिंग बग्गा असो किंवा उस्मान आफ्रिदी ही खास भारतीय उपखंडाची मानसिकता दर्शवणारी पात्रं त्यांनी लिहिली होती. त्यात मिश्रा व शेरगीलनी चांगल्या अभिनयानं छान भर घातली होती. सोबत उर्दू, पंजाबी व हिंदी मिश्रित संवादानं अजून मजा आणली होती. तसंच सुचलेल्या संकल्पनेवर अझीझनी बरीच वर्षं काम केलं होतं. त्यामुळे भारत-पाकिस्तानातली वेगवेगळी पात्रं असणारी कथा लोकांना आवडली होती. त्यात नावीन्य, उस्फूर्तता होती. तसंच सिनेमा सर्वांना आवडेल असा हिशोब नव्हता. एक चांगली सुचलेली संकल्पना बर्‍यापैकी फुलवून पेश करायची असा होरा होता. तो योग्य ठरला. सिनेमा हिट ठरला.

‘हॅप्पी फिर भाग जायेगी’मध्ये परत तोच फॉर्म्युला वापरून त्यात अजून एका हॅप्पीची भर घालून अजून खुमारी वाढवता येईल असा प्रयत्न केला आहे. इथंही संकल्पना उत्तम आहे. एका हॅप्पीऐवजी दुसर्‍या हॅप्पीचं अपहरण झालं तर काय धम्माल येईल असा विचार केलेला दिसतो. पण पहिल्यात व यात एक मुद्दा ते सपशेल विसरलेत. तो म्हणजे पटकथेकडे लक्ष देणं. पहिला भाग दोन वर्षांपूर्वी आला होता, पण अझीझ पटकथेवर २०१२ पासून काम करत होते. त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी दोष म्हणून वाटत असतील, त्या कमी करत करत आले असणार. तसंच प्रत्यक्ष चित्रीकरणाआधी पण बरेच बदल घडले असतील. खासकरून आनंद रायनी निर्मितीची जबाबदारी घेतल्यावर. वर म्हटल्याप्रमाणे उस्फूर्ततेनं काम केल्यानं त्यातील दोष कमी होत नाहीत, पण ठरवून काम केल्यावर त्यातले दोष कमी करता येतात. दुर्दैवानं ‘विश्वरूपम २’मध्ये जसं कमल हासननी पटकथेकडे, पात्रांच्या वाढीकडे, त्यांच्या जिवंतपणाकडे दुर्लक्ष केलं, तीच चूक अझीझनी केली आहे.

मुळात कथेत अजून एका हॅप्पीची आणायची काय गरज होती याचं ठोस, विश्वसनीय कारण मिळत नाही. दुसर्‍या हॅप्पीची पार्श्वभूमी फ्लॅशबॅकमध्ये तपशिलात दाखवली जाते. ज्याची गरज नव्हती. तरीही निव्वळ संकल्पनेचा विचार केला तर एकाच नावाच्या दोन व्यक्तींमधून उडणाऱ्या तारांबळीला चांगल्या, जमलेल्या विनोदी प्रसंगांची जोड देणं गरजेचं होतं. अझीझ त्याऐवजी शाब्दिक विनोदाला महत्त्व देऊन प्रसंगनिष्ठ विनोदाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हशा निर्माण करण्याची संपूर्ण जबाबदारी अभिनेत्यांवर येऊन पडते. पण शाब्दिक विनोदावर किती वेळ मारून नेणार?

तसंच विनोदी सिनेमा असला की खलनायक विनोदी, माठ, ठोकळेबाज असावेतच हा दिग्दर्शकांचा गैरसमज का असतो ते कळत नाही. इथं अदनान चाऊ हा त्याच्या कामात गंभीर आहे. तो ज्या गांभीर्यानं उर्दू भाषा बोलतो आणि भारतीय-पाकिस्तानी सांस्कृतिक गोष्टी शिकवत असतो, ते खरंच विनोदी आहे. पण दिग्दर्शक त्याचा तो शौक म्हणून दाखवतात. त्यामुळे ते बालिश वाटायला लागतं. तो अडलेल्यांना मदत करणारा चीनमधला भाई आहे, पण प्रत्यक्षात त्याची ‘भाईगिरी’ मुंबईतल्या एखाद्या गल्लीतल्या दादा इतपतसुद्धा दिसत नाही.

इथं हॅप्पी व खुशवंत बर्‍यापैकी गंभीर आहेत, पण त्यांचं वागणं प्रसंगाला शोभणारं नाही. ते ओढूनताणून गंभीर झाल्यासारखे वागतात. हा दोष खरं तर पटकथाकाराचा आहे. त्यांनी या या प्रसंगात माझे नायक-नायिका असे वागतील इतकाच विचार केल्यामुळे अभिनेत्यांना पात्र उभं करायला वेळच मिळत नाही. तसंच असा एकही प्रसंग त्यांच्यावर येत नाही, ज्यात त्यांना स्वतःची बुद्धी वापरता यावी. त्यांचं वागणं दिग्दर्शकानं त्यांच्याकडून प्रतिक्रिया काढून घेणं इतपतच उरतं. परिणामी कमालीची एकमितीतली पात्रं तयार झाली.

‘हॅप्पी फिर भाग जायेगी’मध्ये लक्षात राहतात ते तिघे. डेंझिल स्मिथ, जिमी शेरगील व पीयूष मिश्रा. स्मिथ खर्‍या अर्थानं अदनान चाऊ हे पात्र जीवंत करतात. जेवढा वेळ ते पडद्यावर आहेत, तेवढा वेळ आपण काहीतरी खरंखुरं बघतोय असं वाटतं. शेरगील व मिश्रा हे अनुभवी लोक. ते निव्वळ ऐकीव गोष्टींवर पात्र उभं करतील असा त्यांचा अभिनय असतो. त्यांनी पूर्वीच्याच जोशात पात्रं उभी केली आहेत. तीही पटकथेकडून काडीची मदत मिळत नसताना. अली फझल व डायना पेंटी यांनी फक्त आधी होतो तर इथंही असणं गरजेचं आहे म्हणून काम केलेलं आहे. राहता राहिला सोनाक्षीचा सिन्हाचा प्रश्न. तिला कॅमेऱ्यासमोर प्रेझेंटेबल राहायला उत्तम जमतं. ते तिनं बिनबोभाट केलं आहे.

मुदस्सर अझीझना चित्रविचित्र पात्र लिहिण्यात स्वारस्य असेल तर ती लिहावीत, पण थोडी गांभीर्यानं. उस्फूर्तता प्रत्येक वेळी कामाला येत नाही.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......