‘पुष्पक विमान’ आणि भाबड्या स्वप्नपूर्तीचं लांबलेलं उड्डाण 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘पुष्पक विमान’ची पोस्टर्स
  • Sat , 04 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie पुष्पक विमान Pushpak Vimaan मोहन जोशी Mohan Joshi सुबोध भावे Subodh Bhave

माणूस स्वप्नावर जगतो असं म्हणतात. भले त्याची सगळीच स्वप्नं पूर्ण होतील ना होतील. अनेकदा तर स्वप्नभंगाचं दुःख वाट्याला येतं, तरीही स्वप्नं पाहण्याचे तो सोडत नाही. कारण त्यातच जीवन जगण्याची उमेद असते. ‘पुष्पक विमान’ या नवीन मराठी चित्रपटात असंच भाबडं स्वप्न पाहिलेल्या एका ‘तात्या’ नावाच्या आजोबाची कथा आहे. आजोबा आणि नातू यांच्या घट्ट प्रेमाच्या नात्यांचा आधार घेऊन ही कथा गुंफण्यात आली आहे. कथेची संकल्पना खूप चांगली आहे. मात्र पडद्यावर ती साकारताना भाबड्या स्वप्नपूर्तीचं हे उड्डाण मात्र अकारण लांबवण्यात आलं आहे. 

‘पुष्पक विमान’ म्हटलं की लगेचच कोणालाही संत तुकाराम महाराजांची आठवण होते. कारण याच ‘पुष्पक विमाना’तून संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. संत तुकारामांची पांडुरंगावर अपार श्रद्धा आणि भक्ती होती. आपल्या भेटीची त्यांना लागलेली आस पाहून पंढरपूरच्या पांडुरंगानं त्यांना हे पुष्पक विमान पाठवलं आणि त्यात बसून संत तुकाराम त्याच्या भेटीला निघून गेले, असं हरदासाच्या कथेत सांगितलं जातं.

कडगाव गावचे तात्या हे असेच एक हरदास म्हणजे कीर्तनकार. त्यांचीही संत तुकारामांवर अपार श्रद्धा. आपल्या गावातील लोकांसमोर केलेल्या कीर्तनात संत तुकाराम विमानात बसून सदेह वैकुंठाला कसे गेले, ही आख्यायिका रंगून सांगण्यात त्यांचा हातखंडा. आणि संत तुकाराम जसे विमानात बसून पांडुरंगाच्या भेटीला गेले, तसे आपणही विमानातून गेलो तर आपणासही संत तुकाराम भेटतील ही त्यांची भाबडी आशा.

मात्र शाळेत जाणाऱ्या त्यांच्या विलास नावाच्या छोट्या नातवानं विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला असं सांगून त्यांना जमिनीवरही आणलेलं असतं, परंतु त्यांचं भाबडं स्वप्न शेवटपर्यंत कायम राहतं. योगायोगानं त्यांचा नातू व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईला येतो आणि तात्या त्याचा संसार पाहायला म्हणून मुंबईत येतात. एकदा ते गच्चीवर गेले असताना त्यांच्या अगदी जवळून विमान निघून जातं. पहिल्यांदाच विमान पाहणारे तात्या त्याच विमानाला ‘पुष्पक विमान’ समजतात आणि अशाच विमानातून गेल्यास आपणास नक्की संत तुकाराम भेटतील, असं स्वप्न उरी बाळगतात. त्यांच्या या स्वप्नपूर्तीचे पुढे काय होतं, हे पाहण्यासाठी ‘पुष्पक विमाना’ची सफर करणं उत्तम. 

वर म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाची कथा-संकल्पना चांगली आहे. मात्र त्यासाठी लागणारी पटकथा बंदिस्त असायला हवी होती. ती नसल्यामुळे तात्यांचं गावातील वास्तव्य आणि नंतर ते मुंबईत आल्यानंतरचा प्रवास यातच चित्रपटाचा अर्धा भाग खर्ची घालण्यात आला आहे. विनोदनिर्मितीसाठी टाकलेले काही प्रसंग टाळता आले असते तर बरं झालं असतं. हे प्रसंग कंटाळवाणे झाल्यामुळे चित्रपटाची कथा सुरुवातीला पकड घेत नाही. म्हणजे एखाद्या कीर्तनकारानं उत्तररंगातील चांगल्या कथेला फारसा वाव न देता पूर्वरंग रंगवण्यातच आपला सारा वेळ घालवावा आणि नंतर अगदी थोड्या वेळात मूळ कथा सांगावी असंच काहीसं पडद्यावरील सादरीकरणात झालं आहे. थोडक्यात ‘पुष्पक विमाना’चं उड्डाण अकारण लांबवण्यात आलं आहे. 

चित्रपटाच्या उत्तरार्धात मात्र कथेच्या विमानानं धावपट्टीवर चांगली गती घेतली आहे. अति उंचावर गेल्यावर तात्यांना भोवळ येण्याचा आजार निष्पन्न झाल्यावर त्यांच्या नात-सुनेनं त्यांच्या विमान-प्रवासाला केलेला विरोध आणि तात्यांचा विमान-प्रवास रद्द होण्याच्या शक्यतेमुळे निर्माण झालेलं नाट्य चांगलंच रंगलं आहे. अगदी शेवटची विमानातील दृश्यंही विलोभनीय झाली आहेत.

कीर्तनकार तात्यांच्या तोंडची सर्वच अभंग-गाणी कथेला अनुकूल ठरली आहेत. संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयतीर्थ मेवुंडी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी आदी दिग्गज गायकांनी ती गायली असल्यामुळे श्रवणीय झाली आहेत. (त्या पार्श्वभूमीवर मुंबईचं वैशिष्टय सांगणारं गाणं मात्र विसंगत वाटतं) कथेची भाषा वऱ्हाडी आहे. त्यामुळे काही ठिकाणी संवाद चांगली मजा आणतात. 

चित्रपटाचे नायक ‘तात्या’ असल्यामुळे साहजिकच सर्व फोकस त्यांच्यावरच आहे आणि मोहन जोशी यांनी तात्यांच्या भूमिकेतील विविध छटा चांगल्या रंगवल्या आहेत. सुबोध भावेनेही विलासच्या भूमिकेत चांगला अभिनय केला आहे. स्मिता या विलासच्या पत्नीच्या भूमिकेतील गौरी महाजन तसंच विलासचा मदतनीस झालेला सुयश झुंजूरके यांनी पदार्पणातच आश्वासक कामं केली आहेत. राहुल देशपांडे यांचं तुकारामांच्या भूमिकेतील रूपही सुखावह आहे. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......