‘मुल्क’ : स्वभावत:च वादग्रस्त आणि स्फोटक विषयाची अतिशय संयत हाताळणी!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘मुल्क’चं एक पोस्टर
  • Sat , 04 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मुल्क Mulk अनुभव सिन्हा Anubhav Sinha तापसी पन्नू Taapsee Pannu ऋषी कपूर Rishi Kapoor

भारतीय समाज सध्या एका विचित्रच वास्तवाला सामोरा जातोय. एका राष्ट्रीय पक्षाला मिळालेल्या बहुमतामुळे त्याच्या चाहत्या वर्गाला स्वतःची नवी ओळख मिळालीय असं वाटतंय, तर दुसर्‍या वर्गाला अनावश्यक अत्याचाराला सामोरं जावं लागतंय. अत्याचाराला जात व धर्माची जोड दिली जातेय. धर्माची जोड देताना त्यात जागतिक डोकेदुखी असणार्‍या आतंकवादाचाही आधार घेतला जातोय. त्यामुळे आपली नेमकी ओळख काय आहे हे विसरायला लावणारं सगळं वातावरण आहे. याच वातावरणातल्या एका कळीच्या मुद्द्याला हात घालणारा सिनेमा म्हणजे ‘मुल्क’. दिग्दर्शक अनुभव सिन्हा आतंकवादाला कथेच्या केंद्रस्थानी ठेवून समकालीन वातावरणावर भाष्य करतात, हाच याचा मुख्य उद्देश आहे.

मुराद आली मोहम्मद (ऋषी कपूर) हे पासष्ट वर्षांचे वकील वाराणसीच्या मदनगीर या हिंदूबहुल भागात राहत असतात. कुटुंबात पत्नी तबस्सुम (नीना गुप्ता), भाऊ बिलाल मोहम्मद (मनोज पाहवा), त्याची बायको (प्राची शाह पंड्या), त्यांचा मुलगा शाहीद (प्रतीक बब्बर) व मुलगी आयत आहेत. त्यांचा पासष्टावा वाढदिवस मेजवानीसह साजरा केला जात असतो.

बिलालचा मोठा मुलगा आफताब (इंद्रनील सेनगुप्ता) लंडनला राहतोय, पण त्याची हिंदू बायको आरती मोहम्मद (तापसी पन्नू) मुराद अलींच्या ह्या खास दिवसासाठी भारतात आलीय. तिच्यात व आफताबमध्ये आपली होणारी मुले कोणत्या धर्माची असावीत यावरून वाद चालू आहेत. तिची सासू म्हणते त्यांचे वडील ज्या धर्माचे तोच त्यांचा धर्म. तिचा दीर शाहीद मात्र यावर तिच्याशी वाद घालणार असं दिसतं, पण तिला ते नको असतं.

त्याच रात्री शाहीद कानपूरला क्रिकेट मॅच बघायला जातो. दुसर्‍या दिवशी अलाहाबादमध्ये एके ठिकाणी बॉम्बस्फोट होतो. सोळा निष्पापांचा जीव जातो. तपासणीत एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित म्हणून शाहीद दिसतो. सोबतच अँटी-टेररिस्ट स्क्वॉडकडून त्याचा ठावठिकाणा मिळवला जातो. त्याच्याशी त्याच्या कुटुंबाची बातचित चालू असताना तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण दानिश जावेद (रजत कपूर) हा कर्तव्यदक्ष अधिकारी त्याचा खात्मा करतो. चौकशीसाठी बिलालला नेलं जातं. मात्र मुराद अली मोहम्मदच्या पायाखालची जमीन सरकायला लागते.

पटकथाकार-दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची आतापर्यंतची कामगिरी ही दोन घटका मनोरंजन करणार्‍या सिनेमांचा दिग्दर्शक म्हणून आहे. ‘रा.वन’ आणि काही उत्तम गाणी असणारा ‘तुम बिन’ हा रोमॅंटिक ड्रामा या दखलपात्र कलाकृती. त्याही मनोरंजनाला वाहिलेल्या. त्यामुळे संवेदनशील विषय घेऊन त्याचा अभ्यास करून एक चांगल्या बांधलेल्या पटकथेत ते पेश करतील याची सुतराम कल्पना ट्रेलर बघताना येत नाही. उलट हिंदू-मुस्लिम, तिढा-प्रेम हा हिंदी सिनेमावाल्यांचा आवडता विषय त्याला भावनिक संवादांची जोड देऊन नेहमीचं कथानक असणारा सिनेमा असेल असं वाटतं. ते फोल ठरतं ते सिनेमाच्या सुरुवातीपासूनच.

वाराणसीच्या विहंगम दृश्यांनी व कथानकात पुढे अधिक तपशीलात येणार्‍या एका प्रसंगानं सिनेमाची सुरुवात होते. मुराद अली मोहम्मदचं कुटुंब व मोहल्ल्याची ओळख करून दिली जाते. हळूहळू कथानक वाढवत नेत मध्यंतरानंतरच्या भागाची तयारी करतात ते बघण्यासारखं आहे. हा भाग थ्रिलरसारखा आहे. विषयाची निवड करून त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ते प्रेक्षकांना पटेल अशा पद्धतीनं त्याची रचना केली आहे. कारण मुस्लिम समाज व आतंकवाद हे नाजूक विषय. पटकथा रचताना ती मुस्लिम किंवा हिंदू धार्जिणी होण्याची शक्यता वाढीला लागते. त्यासाठी ते आजच्या भारतीय समाजाच्या विविधतेत एकता असणार्‍या गोष्टींची फार छान सांगड घालतात.

म्हणजे आरती मोहम्मद ही हिंदू आहे, तर मुराद अली एका हिंदू मोहल्ल्यात राहतायेत कारण त्यांचं घर स्वातंत्र्यापूर्वी तिथं बांधलेलं आहे. पुढे वस्ती वाढली तशी हिंदूंची घरं वाढली. दानिश जावेद हा मुस्लिम कर्तव्यदक्ष अधिकारी आहे, ज्याच्यासाठी कर्तव्यदक्ष असणं हे त्याच्या राजकीय-धार्मिक विचारांपेक्षा महत्त्वाचं आहे. तर चौबे व सोनकर हे हिंदू शेजारधर्म पाळणारे आहेत. चौबे हे आजच्या हिंदुत्ववादी वृत्तीचं दर्शन घडवणारं पात्र आहे. अशा प्रकारे सिन्हा एकूण आजचं वास्तव उभं करतात. त्यामुळे त्यांना यासाठी पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत.

सिनेमाचा मध्यंतरानंतरचा भाग न्यायालयात घडतो. हा भाग शेवटाकडे चढत जाणारा आहे. तसंच सिन्हांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज करून दाखवणारा. सिन्हांनी न्यायालयात घडणार्‍या वादी-प्रतिवादींच्या मुद्द्यांसाठी लखनौ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नदीम सिद्दिकी यांची मदत घेतली आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना खरेपणा येतो. आरती मोहम्मद जेव्हा मुराद अलीवरच्या आरोपांचं खंडन करण्यासाठी उभी राहते, तेव्हा तिच्या मुद्द्यांना धार येते. पोलिसांची चौकशी व एकूण न्यायालयीन प्रक्रिया तपशीलात येते. अशा प्रकारे तपशीलवार मुद्दे मांडण्याची कथा ताम्हाणेच्या ‘कोर्ट’मध्ये व ‘तलवार’ सिनेमात बघायला मिळाली होती.

सिन्हांचे सिनेमॅटोग्राफर इवान मलिगन दिग्दर्शकाची नजर अचूकपणे पकडतात. त्यामुळे न्यायालय असो वा वाराणसी ते जिवंतपणे डोळ्यांसमोर त्या त्या ठिकाणचं वातावरण उभं करतात. त्यामुळे सिनेमाला जिवंतपणा येतो. तसंच प्रस्थापित मुराद अलीचं अचानक विस्थापित झाल्याची वेदना थेट पोचते. त्याच्या भावनिक मुद्द्यात खरेपणा येतो. हे सगळं घडतं ते सिन्हांच्या वैचारिक सुस्पष्टतेमुळे. तसंच कुणा एकाची बाजू न घेता समकालीन वास्तवाला कॅमेर्‍यात कैद करण्याच्या भूमिकेमुळे.

‘कपूर अँड सन्स’मध्ये एकाच पातळीवरचा सर्वच कलाकारांचा अभिनय ही जमून आलेली दुर्मीळ गोष्ट होती. इथंही तेच म्हणता येईल. खरं तर अभिनेत्यांची अचूक निवड हा अनुभव सिन्हांनी मारलेला षटकारच आहे. अगदी छोट्या भूमिका निभावणारेही कमालीचे जिवंत वाटतात. त्यातही मनोज पाहवा अप्रतिम. सतत छोट्या भूमिकात दिसणारे मनोज मोठी भूमिका असेल तर काय करू शकतात याचं हे उत्तम उदाहरण. नीना गुप्ता, आशुतोष राणा व इतर मंडळी चांगली साथ देतात. पात्रांच्या भाऊगर्दीत प्रतीक बब्बर व रजत कपूर अचानक चमकणार्‍या वीजेसारखी कामगिरी करतात. बाकी ऋषी कपूर व तापसी पन्नू यांच्या खांद्यावर संपूर्ण सिनेमाचा डोलारा उभा आहे. ते ती योग्यपणेच निभावतात. दोघांच्या गेल्या काही वर्षांतल्या विविधांगी भूमिकांमध्ये अजून एकाची भर असंच म्हणावं लागेल.

कुमुद मिश्र हे अजून एक गुणी नट. दिलेली भूमिका समरसून करणं हा त्यांचा खाक्या. कुठल्याही सिनेमात काही प्रसंगांपुरतेच दिसणारे ते आपली छाप सोडून जातात. इथंही ते न्यायाधीशाच्या भूमिकेत छाप सोडतात. त्यांचं काम मध्यंतरानंतर येतं. तेही मोजक्याच प्रसंगांत. तरीही ते लक्षात राहतात, ते त्यांच्या तोंडी असणार्‍या एका छोटेखानी भाषणामुळे. हे भाषण खूप भडक नाही किंवा अति भावनिक नाही. संवाद एखाद्या प्रगल्भ, अनुभवी माणसानं चार प्रबोधनात्मक गोष्टी सांगाव्यात अशा पद्धतीचे आहेत. ते न्यायाधीश असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात कळकळ आहे. सध्याच्या वातावरणाबद्दल चिंता आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निव्वळ सिनेमातल्या पात्रांना लागू न होता थिएटरमध्ये बसलेल्या सर्वसामान्य भारतीयांना लागू होतात. त्यामुळेच त्यांचं कामही भूमिकेची लांबी कमी असली तरी महत्त्वाचं ठरतं.

आजचं वास्तव खूप विचित्र आहे. कुणी कुठली बाजू घ्यावी याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. घेतलेली भूमिका किंवा मांडलेला विचार हा टोकाचा, उथळ तसंच तारतम्य सोडणारा ठरतोय. माझीच भूमिका महत्त्वाची बाकीचे दुय्यम अशा गटात विभागणी झालीय. त्यामुळे मुराद अली मोहम्मद ‘मैं प्यार करता हूं लेकीन दिखाऊं कैसे?’ असा प्रश्न करतात तेव्हा ते मनात रुंजी घालायला लागतं. हा प्रश्न एकट्या मोहम्मदचा राहत नाही, तर क्षुल्लक कारणांवरून अत्याचार केल्या जाणार्‍या वर्गाचाही प्रश्न होतो. कदाचित ते वेगळा प्रश्न मांडतील, पण त्यांची भावना तीच असेल जी मुराद अली मोहम्मदची आहे. या भावनेचं प्रकटीकरण म्हणजे हा सिनेमा. अनुभव सिन्हांनी तीनशे साठ अंशात घेतलेला हा वळसा त्यांची प्रगल्भता दाखवतो, तसंच संवेदशील विषयसुद्धा उत्तम कलाकारांच्या साथीनं थेट प्रेक्षकांपर्यंत पोचवता येतो हा संदेशही.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......