‘यंग्राड’ : ‘टपोरी’ मुलांचं भावविश्व 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘यंग्राड’चं एक पोस्टर
  • Sat , 07 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie यंग्राड Yangrad मकरंद माने Makrand Mane

‘विषमता’ हे आपल्या समाजाचं एक प्रमुख वैशिष्ट्य बनून राहिलं आहे. ही विषमता केवळ आर्थिक बाबतीत नाही तर सर्वच बाबतीत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आपला समाज नेहमीच दुभंगलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या किंवा झोपडपट्टीत वा तत्सम ठिकाणी राहणाऱ्या गरीब समाजातील मुलांचीही काही स्वप्नं असतात, मात्र त्यांनी स्वप्नरंजन करूच नये, असंच समाजातील इतर घटकांना वाटत असतं. त्यातही संस्काराअभावी काही मुलं वाममार्गाला लागली की, ‘झोपडपट्टीतील घाण ही शेवटी त्याच मार्गानं जाणार’ अशीच स्वाभाविक प्रतिक्रिया समाजातील इतर घटकांकडून व्यक्त होते. मात्र अशी मुलं स्वतःहून कधी वाममार्गाला जात नाहीत, कधी कधी परिस्थितीच त्यांना या वाममार्गाकडे घेऊन जाते. परंतु अशा मुलांच्या भावभावना समजून घेण्याची कोणाचीच तयारी नसते.

‘यंग्राड’ या मराठी चित्रपटात अशाच टपोरी मुलांचं भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो खास करून नाशिक भागात ‘टपोरी’ (उनाडटप्पू) मुलांसाठी वापरला जातो. 

या चित्रपटात पाहायला मिळते ती अशाच चार टपोरी मित्रांची कथा. विक्या, अंत्या, बाप्पा आणि मोन्या हे ते चार शाळकरी मित्र. बेधडक वृत्तीचा विक्या हा त्यांचा ‘बॉस’ असतो. समान आर्थिक स्तरातील या चारही मित्रांना स्वछंदी जीवन जगण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे अभ्यास कमी आणि इतर नाना गोष्टी करण्यात त्यांचा अधिक वेळ जात असतो. अर्थात मुलांनी शिकून चांगलं मोठं व्हावं, अशा त्यांच्या आई-वडिलांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे स्वाभाविकच घरात विशेषतः वडिलांकडून अभ्यासाबाबत सारखी टोचणी चालू असते. मात्र त्यांना पाठीशी घालणाऱ्या बहिणीही असतात. मौजमजा करण्यासाठी पैशाची गरज लागते हे समजल्यानंतर ते चौघेही बाजार समितीतील गाळेमालकांकडून जबरदस्तीनं खंडणी गोळा करण्याचे काम स्वीकारतात. त्यातून पैसे मिळताच त्यांच्या स्वछंदी जीवनाला आणखीनच जोर येतो.

त्यातच विक्या तेजू नावाच्या एका शाळकरी मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्याचं भावविश्वच बदलून जातं. तिच्यासाठी तो चांगलं वागायचं ठरवतो. मात्र त्यासाठी त्याला गाळेमालकाकडून जबरदस्तीनं खंडणी गोळा करणाऱ्या बल्लाळदादाशी पंगा घ्यावा लागतो. त्याचे परिणाम त्या चौघांनाही कसे भोगावे लागतात आणि त्याचा शेवट कसा होतो, यासाठी ‘यंग्राड’ पडद्यावर पहायला हवा.  

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त ‘रिंगण’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याही चित्रपटाच्या दिग्दर्शनाबाबत त्यांनी कुठेही कसूर केला नाही, मात्र कथेतील दोष ठळकपणे जाणवत राहतात. तसंच पटकथेची बांधणी व्यवस्थित करता न आल्यामुळे तीही विस्कळीत झाली आहे. बंदिस्त पटकथेचं ‘रिंगण’ पूर्ण न झाल्यामुळे चित्रीकरण चांगलं असूनही त्याचा हवा तसा प्रभाव पडत नाही.

चित्रपटाच्या पूर्वार्धात या मित्रांच्या स्वछंदी जीवनावर भर देण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये फारसं नाट्य नसल्यामुळे चित्रपट हवी तशी पकड घेत नाही. उत्तरार्धात अनेक नाट्यमय घटना एकापाठोपाठ घडत जातात. मात्र त्यातील काही घटनांबाबत निर्माण झालेले प्रश्न काहीसे अनुत्तरीतच राहतात. ज्या कारणावरून बल्लाळदादा या चारही मित्रांना दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यांत अडकवतो, ते अधिक प्रखरतेनं मांडण्याची गरज होती. शिवाय घाटावर धार्मिक विधी करणारा अंत्या केवळ विक्यासाठी एवढं टोकाचं पाऊल का उचलतो? त्यालाही व्यवहार्य उत्तर मिळत नाही. एक धक्कातंत्र म्हणूनच ती घटना सीमित राहते. 

हल्ली चित्रपटात पौगंडावस्थेतील मुलामुलांचं प्रेम बिनधास्त दाखवण्याची एक लाटच आली आहे. विक्या आणि तेजूच्या प्रेमप्रकरणाबाबतही तेच म्हणावं लागेल. मात्र यामध्ये परिस्थितीला शरण जाताना जगण्याचं वास्तव स्वीकारणारी तेजू अधिक प्रभावी ठरते. उदध्वस्त झालेल्या विक्याचं आयुष्य सन्मार्गाला लावण्याचा एका नृत्यशिक्षकाचा उपक्रमही स्तुत्य आहे. नाशिकच्या घाट आणि मार्केट यार्ड परिसरात झालेलं उत्तम चित्रीकरण ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. तसंच चित्रपटाच्या शेवटी विक्या आणि त्याच्या अगतिक बापातील संवाद अंतर्मुख करणारा आहे.

चित्रपटातील शेवटचं गाणं वगळता इतर सर्व गाणी कथेला पूरक आणि श्रवणीय आहेत. चित्रपटातील प्रमुख सर्व कलाकार नवीन असूनही त्यांनी केलेल्या चांगल्या अभिनयामुळे हा चित्रपट सुसह्य झाला आहे. चैतन्य देवरे (विक्या), सौरभ पडवी (अंत्या), शिव वाघ (मोन्या) आणि जीवन करळकर (बाप्पा) या चौघांनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत. तेजू झालेली शिरीन पाटीलही आपल्या प्रभावी अभिनयामुळे चांगली लक्षात राहते. आपल्या मुलाची- विक्याची- सदैव काळजी करणारा मात्र परिस्थितीमुळे अगतिक झालेला बाप शशांक शेंडे यांनी नेहमीप्रमाणे चांगला रंगवला आहे. विठ्ठल पाटील (बल्लाळदादा), शरद केळकर (तुरुंगातील दादा), शंतनू गंगणे (नृत्यशिक्षक) सविता प्रभुणे (तेजूची आई) यांच्या भूमिका चांगल्या वठल्या आहेत. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......