‘गेम नाईट’ (२०१८) : ‘ब्लॅक कॉमेडी’ चित्रपट-चाहत्यांसाठी पर्वणी
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘गेम नाईट’चं पोस्टर
  • Sat , 16 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie गेम नाईट Game Night जेसन बेटमन Jason Bateman रचेल मॅक'अडम्स Rachel McAdams

‘गेम नाईट’चा वीसेक मिनिटांचा ‘फर्स्ट अॅक्ट’ हा आजवर पाहिलेल्या ‘ब्लॅक कॉमेडी’ जॉन्र चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट म्हणावा इतका चांगला आहे. पुढे येणाऱ्या घटना, पात्रं आणि संभाव्य परिणाम यांची योग्य मांडणी करण्यात ‘फर्स्ट अॅक्ट’ महत्त्वाचा असतो. जो थोड्याफार फरकानं चित्रपटाची आणि त्याच्या चांगल्या अथवा वाईट असण्याची किमान कल्पना आपल्याला देतो. इथं याच भागापासून जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केल्यानं पुढील ‘फास्ट पेस्ड’ अॅक्शन-थ्रिलर (ब्लॅक ह्युमरस) दृश्यं आणखी प्रभावी बनतात. 

मॅक्स डेव्हिस (जेसन बेटमन) आणि एमी डेव्हिस (रचेल मॅक'अडम्स) हे सुरुवातीलाच पहिल्याच भेटीत त्यांच्यातील समान आवडींमुळे एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न करतात. ज्या समान धाग्यांमुळे ते एकत्र येतात, ते म्हणजे अमेरिकन संस्कृतीचा भाग म्हणाव्यात अशा ‘गेम नाईट्स’, त्यांची बुद्धिमत्ता आणि खिलाडू वृत्ती यांचा समावेश आहे. (ज्यापासून आणि पुढे येणाऱ्या घटनांमुळे चित्रपटाला हे नाव लाभलं आहे.) 

मॅक्सचा मोठा भाऊ, ब्रुक्स डेव्हिस (काईल चँडलर) हा जवळपास एका वर्षानं मध्ये आलेला आहे. त्यामुळे नेहमी ज्यांच्यासोबत ‘गेम नाईट’ भरवली जाते, त्या मित्रांसोबत त्यालाही त्यांच्या घरी बोलावतात आणि एका ‘रोलर कोस्टर’ राईडला सुरुवात होते. 

‘ब्लॅक कॉमेडी’ चित्रपट प्रकाराला बऱ्याच मोठ्या लोकांच्या अस्मितेची परंपरा लाभलेली आहे. ज्यात प्रामुख्यानं ‘कोएन ब्रदर्स’चा समावेश करावासा वाटतो. ज्यात ‘फार्गो’ला हार्ड कोअर क्राइम थ्रिलर सोबतच ब्लॅक ह्युमरची जोड आहे. याखेरीज या प्रकारातील विशेष असलेला ‘बर्न आफ्टर रीडिंग’देखील (२००८) त्यांचाच. त्यामुळे या जॉन्रला हात घालून या आणि अशा इतर क्लासिक चित्रपटांनी या प्रकारात निर्माण केलेल्या चांगल्या असण्याच्या किमान रेषेला स्पर्श करणंही मोठं आहे असं म्हणावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच क्वचितच एखादा चित्रपट त्या पातळीला जाऊन पोचतो. 

‘गेम नाईट’वर ‘कोएन ब्रदर्स’चा आणि त्यांच्या शैलीचा (चांगल्या अर्थानं) प्रभाव आहे. ज्यासोबत ते चित्रपटात एका दृश्यादरम्यान त्यांचं नाव घेऊन त्यांना मानवंदनाही देतात. मात्र याखेरीज यावर कथानकाच्या आणि दिग्दर्शनाच्या पातळीवर ‘डेव्हिड फिंचर’ दिग्दर्शित ‘द गेम’ (१९९७) या चित्रपटाचाही प्रभाव आहे. जे याच्या विषयाला आणि प्रकाराला पूरक ठरतं. त्यामुळे फिंचर आणि ‘कोएन ब्रदर्स’ या दोघांच्या शैलीचा प्रभाव असलेल्या रूपातून, त्यांच्या शैली ओव्हर लॅप झाल्या असाव्यात अशा प्रकारची एक तिसरी शैली तयार होते, तेव्हा चित्रपट ओघानंच कथन आणि चित्रण, दोन्ही प्रकारे आकर्षक आणि रंजक बनतो. 

अलीकडील चित्रपटांकडे पाहता ‘पॉप कल्चर’मधील चित्रपट किंवा तत्सम गोष्टींच्या संदर्भांचा किंवा उल्लेखाचा एखाद्या चित्रपटात समावेश करणं ही एक नवीन ‘सेक्सी’ गोष्ट बनली आहे. ज्यामागे मुख्यतः ‘डेडपूल’ आणि ‘गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी’ यांचा प्रभाव असतो. इथंही ते संदर्भ येतातच. मात्र त्यांच्यासाठी चित्रपटाबाहेर, ‘गुगल’ करायची गरज भासत नाही. कारण त्या संदर्भानंतर लगेच एखादं पात्र सदर चित्रपटाचं नाव घेतं. जे खरं तर अधिक उत्तम आहे. शिवाय, त्या संदर्भाव्यतिरिक्तही ती दृश्यं आणि ती पात्रं खरी भासतात आणि केवळ संदर्भापुरती वापरली आहेत असं वाटत नाही. कारण त्या दृश्यांना वर्णद्वेष आणि तत्सम गोष्टींचे अंडरकरंट्स असतात. 

त्यामुळे जेव्हा ‘पल्प फिक्शन’चा (१९९४) संदर्भ येऊन ती पात्रं ‘वुई आर बिग मुव्ही फॅन्स’ असं सहज म्हणतात, तेव्हा हलकेच ही नवीन ‘सेक्सी’ गोष्ट फॉलो करणाऱ्या चित्रपटांवर एक उपहास तयार होतो. 

शिवाय कथानकाबाबत मुख्य हेतू जरी एका विशिष्ट गोष्टीवर आधारित असला आणि वेळोवेळी त्याच दिशेनं वाटचाल करत असला तरी त्या प्रवासात आणि त्यादरम्यान घडणाऱ्या घटनांमध्ये मूळ चित्रपटाच्या कथनाचं यश आहे. 

अॅक्शन थ्रिलर चित्रपटांमध्ये आणि त्यातही जर ते ब्लॅक कॉमेडी या प्रकारालाही हात घालत असतील तर त्यात हिंसा हा एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र हिंसेबाबत आणि खासकरून चित्रपटांमध्ये असलेल्या हिंसेबाबात दरवेळी तिच्या फिल्मी असण्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याची गरज असते. कारण खऱ्या आयुष्यातील हिंसा, हिंसक घटना या अधिक क्रूर स्वरूपाच्या असतातच. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा त्या अधिक अनपेक्षित प्रकारच्या असतात. त्यामुळे प्रत्येकाला बंदूक चालवता येईलच असं नसतं किंवा गोळी लागल्यावर काय होईल, किंबहुना कोण कसं रिअॅक्ट होईल याची कल्पना नसते. बऱ्याचदा चित्रपटांमध्ये नायक किंवा नायिकेला अधिक ‘बॅडअॅस’ दाखवताना अशाच रिअॅलिझमचा अभाव असतो. त्यामुळे ब्लॅक कॉमेडी असलेल्या चित्रपटांत अशा घटनांचा आणि रिअॅलिझमचा समावेश करून प्रत्यक्ष हिंसेचं उपहासात्मक स्वरूप दाखवून एक डार्क सटायर निर्माण करण्याला वाव असतो. 

प्रामुख्यानं ‘गाय रिची’च्या चित्रपटांमध्ये अशा स्वरूपाच्या दृश्यांचा समावेश दिसून येतो. ज्यासाठी एक अलीकडील आणि या प्रकारातील आयडियल चित्रपट म्हणून ‘द नाइस गाईज’कडे (२०१६) पाहता येतं. तर याचा उल्लेख करायचं कारण हेच की, हा चित्रपटदेखील याच रांगेत बसतो. आणि अॅक्शन आणि फाईट सीन्सना वास्तववादी चित्रणाचं रूप देऊन विनोदी पद्धतीनं रंगवतो. 

शिवाय तणावपूर्ण वातावरणात गैरसमज आणि गोंधळामुळे निर्माण झालेल्या घटनांमधून होणारी विनोदाची व्युत्पत्तीदेखील चित्रपटाच्या प्रभावात भर घालतात. क्लिफ मार्टिनेझचं पार्श्वसंगीत आणि ‘क्वीन’ ते ‘ड्रेक’ अशा बऱ्याच बँड्सच्या गाण्यांचा समावेश असलेला ओरिजनल साऊंडट्रॅकदेखील चित्रपटात महत्त्वाचं इनपुट देणारा ठरतो. मार्क पेरिझची बांधेसूद पटकथा आणि संवाद हे चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. कारण अनेक गोष्टी रूढ मार्गांनी जाऊन उपहासात्मक किंवा विनोदी न बनता वाईट लिखाणामुळे त्यांतील गाभा हरवून जाण्यालायक पद्धतीनं रंगवल्या जाऊ शकल्या असत्या याचा प्रत्यय चित्रपट पाहताना येतो. 

चित्रपटांबाबत ‘कोएन ब्रदर्स’ आणि गेल्या काही वर्षांत मालिकांबाबत ‘डफर ब्रदर्स’ या दोन दिग्दर्शक आणि निर्मात्या जोड्यांनी त्यांचं कौशल्य आणि निर्णयक्षमता सिद्ध केली आहे. आता ‘हॉरिबल बॉसेस’ (२०११) चित्रपट मालिका, ‘स्पायडर मॅन होमकमिंग’ (२०१७) जॉन डले आणि जोनाथन गोल्डस्टैन या दोन दिग्दर्शक लेखक द्वयीचाही यात समावेश करायला हरकत नाही. 

एकूणच ‘गेम नाईट’ हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी किंवा डार्क ह्युमर प्रकारातील चित्रपटांच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे आणि निर्विवादपणे या वर्षातील काही उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे!

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......