‘रेस 3’ : या चित्रपटाकडून लॉजिक, चांगली कथा यांची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘रेस 3’चं एक पोस्टर
  • Sat , 16 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie रेस 3 Race 3 रेमो डिसूझा Remo D'Souza सलमान खान Salman Khan

‘रेस’चे आधीचे दोन भाग आणि त्यातील कलाकार, किंबहुना दिग्दर्शकाचेही याआधीचे चित्रपट पाहता या चित्रपटाकडून लॉजिक, चांगली कथा किंवा सादरीकरण इत्यादी गोष्टींची अपेक्षा ठेवणं जरा चुकीचंच आहे. मात्र इथं प्रश्न अपेक्षा असाव्यात किंवा नसाव्यात किंवा कशा प्रकारच्या असाव्यात याचा नसून त्या का असाव्यात याचा आहे. तर त्याकरता हा इतर कुठल्याही चित्रपटांसारखाच एक चित्रपट आहे आणि चित्रपट हे बरीच मोठी पोहोच असलेलं माध्यम असून, ही गोष्ट त्याच्या निर्मात्यांनी ध्यानात घ्यायला हवी. याला खरं तर अपेक्षाही म्हणता येणार नाही. कारण ही लक्षात घेण्याजोगी अतिशय साधी गोष्ट आहे. 

चित्रपटाच्या कथानकाबाबत फार बोलणं अशक्य आहे. कारण त्याबाबत बोलायचं म्हटल्यास बरीच उपकथानकं (आणि अतर्क्य ट्विस्ट्स) सांगत बसावं लागेल. त्यामुळे तूर्तास तरी त्याच्या सुरुवातीच्या कथनात सांगितल्या जाणाऱ्या बाबींना मूलभूत कथानक समजून घेण्यात उपयोगी मानता येईल. 

समशेर सिंग (अनिल कपूर) हा बऱ्याचशा देशांना बेकायदेशीररीत्या हत्यारं पुरवणारा अल-शिफास्थित शस्त्रास्त्रांचा उत्पादक आहे. सूरज (साकिब सलीम) आणि संजना (डेझी शाह) ही त्याची दोन अपत्यं तर सिकंदर (सलमान खान) हा त्याचा बॉलिवुडच्याच भाषेत सांगायचं झाल्यास ‘नाजायज’ मुलगा आहे. यश (बॉबी देओल) हा सिकंदरचा बॉडीगार्ड, मित्र की तत्सम काहीतरी आहे. (आठवणं शक्य नाही कारण यात येणाऱ्या खास ‘रेस’ टाइप ट्विस्ट्स आणि एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोड्यांमुळे पात्रांच्या एकमेकांशी असलेल्या नात्यांचा विसर पडला आहे.) राणा (फ्रेडी दारूवाला) हा त्याचा एक शत्रू असून या सर्वांचा त्याच्याशी कायम संघर्ष सुरू असतो. 

अर्थात हे झालं त्याचं एक उपकथानक. कारण या चित्रपट मालिकेतील इतर दोन्ही चित्रपटांप्रमाणे यातही चोरीचं आणखी एक उपकथानक आहेच. मुळात हा चित्रपट आणि या मालिकेतील इतरही भाग हे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या उपकथानकांवर आधारित असतात. जे एकत्र करून (किंवा तसा प्रयत्न करून) ढिसाळ आणि सदोष पटकथेच्या जोरावर या चित्रपटांची पायाभरणी केलेली असते. ज्याला दुबई किंवा तत्सम आखाती देश, चकचकीत वातावरण, गाड्या आणि इतर भौतिक गोष्टींची जोड दिलेली असते. मात्र या सर्व गदारोळात चित्रपटाला त्याचा आत्मा सापडणं तसं अवघडच असतं. ज्याला बऱ्या दिग्दर्शनाची साथ लाभल्यास तो किमान स्वीकारार्ह बनतो. इथं त्याचा भार रेमो डिसुझाच्या खांद्यावर असल्यानं धड तेही शक्य होत नाही. 

आता मागे वळून पाहिल्यास अब्बास-मस्तान जोडीचे या चित्रपट मालिकेतील आधीचे दोन्ही चित्रपट अधिक सुकर वाटतात. कारण कितीही झालं तरी ती दोघं स्वतः आपल्या पात्रांच्या चांगल्या असण्याबाबत स्वतःची खात्री पटलेली जोडी होती. कदाचित त्यामुळेच त्यांना ती पात्रं, त्यांचं वागणं, त्यांचे अशक्यप्राय व अतर्क्य निर्णय आणि ते एकमेकांवर करत असलेल्या कुरघोड्या प्रेक्षकांच्या गळी उतरवणं जमत होतं. शिवाय त्यांची दिग्दर्शकीय शैली किंवा तिचा अभावही जाणवत नव्हता. 

याउलट डिसुझा हा अगदी काटेकोरपणे मध्यम दर्जाच्याही खाली रेंगाळणारा दिग्दर्शक आहे. हॉलिवुडमधील ‘स्टेप अप’ चित्रपट मालिकेचं ‘एबीसीडी’ नामक चित्रपट मालिकेतील अधिक भारतीय आणि त्याहून अधिक भावनाक्षोभक चित्रण, यांमुळे तो त्याच्या समकालीन दिग्दर्शकांपेक्षा उजवा नक्कीच नाही. आणि कोरिओग्राफर ते दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या फराह खानसारख्या दिग्दर्शिकेच्याही जवळपास जाणाराही नाही. 

चित्रपट, त्याचं कथानक, त्यातील लॉजिकचा अभाव, दृश्य सातत्येतील अभाव इत्यादी गोष्टींची तर मोजणीच नको. कारण भारतात, शिमल्यात असलेल्या एका हॉटेल कम नेत्यांसाठीच्या वेश्यालयातील नेत्यांच्या अश्लील चित्रफितींचा समावेश असलेली हार्ड डिस्क कंबोडियामध्ये का ठेवली असेल किंवा दुबईमधील भारतीय अवैध शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला आपला व्यवसाय सोडून ती का चोरावी वाटेल किंवा चित्रपटात असणारे इतरही अनेक तर्कशास्त्राला फाट्यावर मारणारे ट्विस्ट्स आणि इतर घटना या कुठल्या कुरापती मेंदूतून कशा आणि मुख्यतः का आल्या असाव्यात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

सलमान खान किंवा बॉबी देओल किंवा चित्रपटातील इतर कलाकार आणि त्यांचा अभिनय यांच्याबद्दल फारसं न बोललेलं बरं. कारण त्यात बोलावं असं काही नाही. त्यातल्या त्यात सलमानबाबत बोलून तर एखादा नक्कीच ‘विद्यावाचस्पती’ म्हणून ओळखला जाण्यास पात्र ठरू शकतो. 

फक्त एक टिप्पणी तेवढी करावीशी वाटते. ती म्हणजे डेझी शाहच्या पात्राला म्हणे बॉक्सिंगची आवड असते. ती जिमनॅस्टिकचीही चाहती असावी. शिवाय (भर वाळवंटात) ‘रोप क्लाइंबिंग’ही करतेच. मात्र ती आधीच आपल्याला हाणामारी करायला जायचं आहे हे माहीत असूनही लांबलचक उंचीच्या टाचा असलेले सँडल्स आणि वन पीस ड्रेस घालून तिथं का जाते हे कळत नाही. शिवाय शॉटगन मारताना तोल कसा सांभाळते, हेही तिचं तीच जाणो. हो, आता हे केलं नसतं तर तिला अँजेलिना जोलीसारखं वन पीस कमरेखाली सरळ रेषेत फाडून गुंडांना कसं लोळवता आलं असतं, नाही का?

एकूणच चित्रपटात आणि त्याच्याशी निगडित असलेल्या बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यायची गरज आहे. सलमानच्या पात्रानं (आणि अगदी त्यानंही) तो म्हणजे काही ‘जॉन विक’ नव्हे हे आणि डेझीनं ती अँजेलिना जोली आणि दिग्दर्शक रेमोने तो काही ‘एडगर राइट’ नाही, हे लक्षात घ्यायला हवं होतं. (राइटचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे चित्रपटात अचानक येणारे स्लो मोशन आणि स्टाइलिस्टिक दृश्यं.) 

आधी उल्लेख केल्याप्रमाणे पटकथा एकसंध नाही. संवाद तर ‘आय अॅम सिक ऑफ सिक्कु’, ‘इसे ‘दिल’ नहीं, ‘डेल’ खोलके दिखाओ’ आणि अशाच इतर वाक्यांनी ‘हेट स्टोरी 4’च्या लेखकाला लाजवतील असे आहेत! 

चित्रपटात फ्लॅश बॅक आणि अॅक्शन असलेली दृश्यं मोबाईल कॅमेराहून अधिक वेगवेगळ्या फिल्टरच्या रूपातून दिसतात. बाकी संकलनात चित्रपटाचा किमान तासभर कमी करता आला असता. ज्यात किमान पाऊणे तासभर चालतील इतकी गाणीही आहेतच. ज्यात सुमारे आठ संगीत दिग्दर्शक आणि दहा गीतकार (ज्यात सलमान खानचाही समावेश आहे!) आहेत. 

याखेरीज सलीम-सुलेमान जोडीला स्कोअरसाठी श्रेय दिलं आहे. मात्र हे पार्श्वसंगीत बरंच किंबहुना गरजेपेक्षा अधिक लाऊड आहे. इतकं की त्यापुढे डेझी आणि इतरांचा लाऊड अभिनयदेखील कमी पडतो. 

एकूणच काय तर चित्रपट अगदी कमर्शियल चित्रपटांच्या चाहत्यांनाही आवडण्याची शक्यता कमीच आहे. कारण अतिरिक्त लांबी, मख्ख चेहरा घेऊन चित्रपटभर वावरणारे कलाकार, अनावश्यक आणि गरजेहून अधिक असलेली रटाळ गाण्यांची संख्या, या गोष्टी चित्रपटाच्या कंटाळवाणं ठरण्यास पुरेशा आहेत. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......