‘अपूर्व मेघदूत’ : रंगभूमीच्या इतिहासातला विरळा असा विलक्षण प्रयोग, १९ अंध कलाकारांचा!
कला-संस्कृती - नाटकबिटक
सोनाली नवांगुळ
  • ‘अपूर्व मेघदूत’ या नाटकाचे दिग्दर्शक स्वागत थोरात. गौरव, प्रवीण, तेजस्विनी, रुपाली आणि रश्मी पांढरे (सर्व छायाचित्रं - ऋचा पाटील)
  • Fri , 15 June 2018
  • कला-संस्कृती नाटकबिटक अपूर्व मेघदूत Apoorva Meghdoot गणेश दिघे Ganesh Dighe स्वागत थोरात Swagat Thorat

९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज १५ जून रोजी मुलुंड (मुंबई)च्या कालिदास नाट्यगृहामध्ये ‘अपूर्व मेघदूत’ या नाटकाचा दुपारी तीन वाजता प्रयोग होत आहे. त्यानिमित्ताने...

महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ या संस्कृत काव्यावर बेतलेले ‘अपूर्व मेघदूत’ हे नाटक सादर करतात १९ पूर्णत: किंवा अंशत: दृष्टीबाधित कलाकार! - आणि तरीही व्यावसायिक नटाइतक्या सराईत हालचाली, पल्लेदार वाक्यफेक, रंगमंचाचा संपूर्ण वापर, नृत्ये, छायाप्रकाशाच्या अदभुत खेळातला अविश्वसनीय सहभाग हे सगळे लीलया पार पडते. नाटक दृष्टीबाधित कलाकार करताहेत याचा विसर पडतो. सहज घडून आलंय असं वाटवणाऱ्या या प्रयोगामागे सगळ्यांचीच अविश्रांत मेहनत व मर्यादा झुगारण्याची झिंग आहे. या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक स्वागत थोरात हे नेत्रहीन माणसांच्या जगण्याच्या अनेक क्षेत्रात गेली २४ वर्षं काम करणारे, त्यांना अधिक स्वावलंबी बनवण्यासाठी धडपडणारे! दृष्टीबाधितांसह नाटक हा त्यांचा हातखंडा. १९९७ मध्ये, जगाच्या इतिहासात प्रथमच ८८ अंध कलाकार खुल्या नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याद्वारे लिखित-दिग्दर्शित ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ या नाटकातून रंगमंचावर अवतरले. या विशेष प्रयोगाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली. पु.ल.देशपांडे लिखित ‘तीन पैशाचा तमाशा’ दिग्दर्शित करतानाही त्यांनी संपूर्ण म्हणजे ४४ अंध कलाकारांचा सहभाग घेतला. रंगभूमीच्या इतिहासाlला विरळा असा विलक्षण प्रयोग करताना काय आव्हाने असतात याविषयी त्यांच्याशी व ‘अपूर्व मेघदूत’च्या कलाकारांशी मारलेल्या गप्पा.

.............................................................................................................................................

मुळात उत्तर प्रदेशातली, परंतु सध्या पुणे विद्यापीठात एम.कॉम करत बँकिंगचा अभ्यास करणारी, अंशत: अंध असणारी रुपाली यादव नाटकात यक्षिणीची भूमिका साकारते. ती सांगते,

“माझं राहणं, कपडे, वागणं बोलणं एकूणातच पुरुषी. नाटकातली कमरेला नाजूक हेलकावा देत चालणारी यक्षिणी, नृत्य, चेहऱ्यावरचे हावभाव ही माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट, त्यात रडणं वगैरे तर त्याहून. माझ्या स्वभावाच्या दुसऱ्या टोकाचं हे पात्र. परंतु कांद्याच्या फोडीप्रमाणे एकेक उलगडत जावं तसं झालं. स्वागत सरांनी प्रत्येकाच्या पात्राची नीट ओळख करून दिली. माझ्या पात्रासाठी भावुक होता येणं वगैरेसाठी खूप ऐकायला, विचार करायला लावलं. शिवाय प्रयोगाच्या आधी चार वेळा रंगीत तालीम झाली. म्हणून भीती वाटली नाही. मुळात माझ्या एकूण व्यक्तिमत्त्वात या नाटकानं फार बदल झाला. जवळच्या एकदोन मित्रमैत्रिणींपेक्षा मोठं जग नसलेली व फार कोणात न मिसळणारी मी! आता आमचा संपूर्ण वर्ग माझा मित्र आहे. बॉयकटमधल्या मला या नाटकात एका सुंदर युवतीचा रोल करताना पाहायला माझ्यातल्या नव्या मोकळेपणानं जुळलेलं सगळं मित्रमंडळ लोटलं. यानं आणखी आत्मविश्वास वाढला.”

........

सांगली जिल्ह्यातील सोनेगावचा, एम.ए.च्या प्रथम वर्षात शिकत नव्या परीक्षांची तयारी करणारा प्रवीण पाखरे ‘स्वरगंधार’ नावाचा ऑर्केस्ट्रा चालवतो. पंचवीस जणांच्या या टीमच्या नावावर ३०० पेक्षा जास्त कार्यक्रम आहेत. अंशत: अंधत्त्वासह शालेय स्तरावर काही किरकोळ काम करून पाहणाऱ्या प्रवीणला वाटतं, 

“लोकांमध्ये मी मिसळायचो पण नाटक वगैरे पहिल्यांदाच केलं. सिनेमे व नाटकांना जायचो तेव्हा वाटायचं की, आपल्याला हे करायला मिळायला हवं, तर काहीतरी करून दाखवू. निर्मात्या रश्मी यांनी प्रथम विचारलं तेव्हा ताबडतोब होकार दिला. मला खूप उत्साह होता, पण मला ‘मेघा’ची भूमिका मिळाली नि खूप नैराश्यच आलं... कारण वाटतं तितकं हे सोपं नव्हतं. गोष्ट समजून घ्यायला इतकं झगडावं लागलं तर पुढचं कसं होणार असं वाटलं, पण संकल्पना नीट समजावून सांगितली गेली. सराव करतानाही एकेक संवाद बसवण्यासाठी लांबून प्रवास करून यायचं व स्वत:चं थोडंसं आटपलं तरी सगळ्यांचं नाटक ऐकायचं यानं आधी कंटाळा यायचा, पण समोरच्याचं ऐकणं किती महत्त्वाचं हे कळत गेलं व रोजच्या आयुष्यातही मी बदललो. माझी रोजच्या बोलण्यातली आवाजाची पट्टीही यातून संवादी होत गेली. ऑर्केस्ट्राला मिळणारा प्रतिसाद आणि नाटकातल्या अभिनयाला मिळणारा प्रतिसाद यातला फरक मला कळू लागला आहे. विशिष्ट संवादाला अचूकपणे प्रेक्षकांची दाद आली की, मोहरून जायला होतं. भूमिकांसाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे कळल्यामुळं सिनेमा व नाटकाकडे बघायचा माझा दृष्टीकोनही बदलला.”

........

पुणे विद्यापीठात एम.कॉम पूर्ण करणारी व बँकिंग व हार्मोनिअमच्या परीक्षांमध्ये व्यस्त असणारी तेजस्विनी भालेकर आता पूर्णपणे अंध झालीय. वयाच्या २१ व्या वर्षांपर्यंत तिला दिसत असे. तिनं अनुभव सांगितला,

“दिसायचं तेव्हाही मी शाळेत किंवा कॉलेजात अभिनय कधी नाही केला. नंतर दिसेनासं झाल्यावर माझी मोबिलीटी पूर्ण गमावली मी. घराबाहेर पाऊल टाकलं की परावलंबी. सोबतीशिवाय कधी चाललेही नाही, मग नाटक कसं करणार? अभिनय, डायलॉग, हावभाव वगैरे नंतरचं, आधी मी स्वावलंबी होणं गरजेचं होतं. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्वागतसरांनी मोबिलीटी ट्रेनिंग दिलं. बुस्ट केलं. आता सोळा प्रयोग झाल्यानंतर मी पूर्ण बदललेय. एकटी फिरायला लागले. आत्मविश्वास आला. नाटकाशिवाय हे झालं नसतं. दिसत नसल्यामुळे आम्ही काही गोंधळ घालू शकत होतो, पण आपण जिथं सादरीकरण करणार तिथला नकाशा डोक्यात ठेवून विनागोंधळ कसं पार पाडायचं याचा एकदा सराव झाला नि सोपं झालं. चुकून प्रेक्षकांकडं पाठ झाली तर? वगैरे प्रश्न पडायचे बंद झाले.” 

........

गौरव घायले बँकर. सगळ्यात जास्त पल्लेदार वाक्यं कालिदासानंतर ज्याच्या वाट्याला आली, ती त्यानं केलेल्या यक्षाच्या भूमिकेला. तो म्हणाला, 

“छोटे मोठे रोल्स, एन्ट्रीज घेण्याचा सराव चालू होता आणि फार अपेक्षा नसताना अचानक यक्षाची मोठी भूमिका वाट्याला आली. धक्काच बसला. यक्षाच्या मनोगतात सगळं काव्यमय होतं. मला कविता आवडतात. त्यामुळं अवघडही सोपं करता आलं. महिन्यात संहिता पाठ झाली, पण शब्दोच्चार समजून घेतल्याशिवाय सहजता कशी येणार? प्रत्येक तालमीला इम्प्रोवाईज करत गेलो. मोबिलिटी हाच अंध माणसांसाठी चॅलेंजिंग भाग असतो, असं जनरली लोकांना वाटतं, पण एकदा नकाशा कळला की सोपं असतं. माझ्यासाठी आव्हानाचा भाग होता की, अवघड काव्यमय मनोगतातून प्रेक्षकांना खिळवून कसं ठेवायचं? तालमींच्या वेळेस नि सुरुवातीच्या प्रयोगांना आलेले काही ओळखीचे म्हणाले, “तू बोलतोस छान पण अर्थ कळत नाही बाबा!” मग मी भावनेनुसार उच्चारण कसं व्हावं, तोचतोपणा येऊ नये यासाठी प्रयत्न करत राहिलो. आवाजातील अभिनय, देहबोली या गोष्टींकडं प्रथमच पाहिलं यानिमित्तानं. याचा जगण्यातही उपयोग होईल.”

........

रश्मी पांढरे व वीणा ढोले ‘अपूर्व मेघदूत’च्या तांत्रिक अर्थाने निर्मात्या आहेतच, पण त्यांची यातली गुंतवणुक हृदयातून आहे. रश्मी म्हणतात,

“मी स्वत: बिझनेस वुमन आहे. त्यामुळं माझ्यासाठी अतिशय सजगपणे केलेली ही कृती आहे. मी व्यावसायिक नाट्यनिर्माती नव्हे, पण खूप दिवसांपासून अपंग व्यक्तींच्या खोलातल्या प्रश्नांवर काहीतरी करावं हे घोळत होतं. हाती चांगलं स्क्रीप्ट येत नव्हतं. लेखक गणेश दिघे व दिग्दर्शक स्वागत थोरातांमुळे तो शोध संपला. नाटकात काम करणाऱ्या कलाकार मंडळींची निवड होतानापासून माझं अख्खं घर व आम्हा मैत्रिणींची, अगदी सामान लोड करणाऱ्यांचीही मन:पूर्वक गुंतवणूक यात होत गेली. जागतिक रंगभूमी म्हणजे काय हे ठाऊक नसणारी माणसंही या नव्या प्रयोगासाठी रात्ररात्र जागली आहेत, हे पाहताना माझी माणसांच्या चांगुलपणावरची श्रद्धा वाढली. काम करणारे सगळे दृष्टीबाधित कलाकार स्वत:च्या क्षमतेवर शिक्षण, नोकरी, परीक्षांसाठीची धावाधाव असं करत नाटक करताहेत. नाटक हा जीवनमरणाचा प्रश्न नाही, पण वेळ काढून असं काही केलं पाहिजे, आपल्या क्षमतांबद्दल बोललं पाहिजे ही तळमळ त्यात आहे. रोज जगताना पावलापावलावर आव्हानं असूनही हे नवं आव्हान पेलत त्यांनी मागच्या वर्षीपेक्षा अधिक शैक्षणिक प्रगती केलीय. कारण जबाबदारी वाढल्याची जाणीव प्रत्येकात आहे. मलाही हे सगळं करताना सांघिक मल्टिटास्किंग आकळत गेलं. स्वत:च्या क्षमतांचं आकाश विस्तारलं!

........

स्वागत थोरात, दिग्दर्शक.

‘अपूर्व मेघदूत’ टीम नवी, शिवाय नेत्रहीन... कसं जमवलं?

- एकंदर समाजाचा अपंग व्यक्तींकडं पाहण्याचा दृष्टीकोन इतका संकुचित व घिसापिटा आहे की, साध्या साध्या गोष्टीही त्यांच्या लक्षातच येत नाहीत. एखाद्याला एखादा अवयव नाही तर तो माणूस म्हणून तो जगायच्या लायकीचा नाही, ते ओझं आहे असा समज. अन्न, वस्त्र, निवारा या शिवाय त्यांच्या गरजा असतात हे इतरांच्या मनातही येत नाही. साधी गोष्ट असते एक्सप्रेशन्स! ही गोष्ट भावभावनांशी संबंधित असते हेच लोक विसरतात. म्हणजे पहा, मला प्रश्न असा विचारला जातो की, या लोकांना तुम्ही भावना कशा शिकवल्या? अंध-अपंग आपल्यासारखीच माणसं आहेत, तशाच भावभावना, नवरस, षड्रिपू त्यांच्यामध्येही आहेत. ते वेगळे शिकवायची गरज नाही. दु:ख शिकवावं लागतं का? माणसं अंध असली तरी रिअ‍ॅक्ट होण्याची भावनिक पद्धत कशी काय बदलेल? हो, नव्या कामासाठी प्रशिक्षण आवश्यक असतं. इतकंच.

हे व्यावसायिक नट नव्हेत, शिवाय मर्यादा वेगळ्या... त्यांना मोकळं कसं केलं?

- सर्वसामान्य नाटकासाठी पात्रांच्या निवडीचे काही निकष असतात. उदा. विशिष्ट पात्राच्या गुणवैशिष्ट्यांना साजेसं व्यक्तिमत्त्व, अनुभव, भाषा, अभिनयक्षमता वगैरे. काम सोपं व्हायला बरेचसे दिग्दर्शक तयारीचे कलाकार निवडतात. मात्र इथं अंध कलाकारांची नाटकंच झालेली नाहीत. त्यामुळं ‘मेघदूत’च्या बाबतीत कलाकार निवडताना ‘काम करायची तीव्र इच्छा’ हीच जमेची बाजू मानली. ही मुलं नवी असली तरी त्यांच्या मनात मी यापूर्वी अंधांना घेऊन केलेल्या नाटकांमुळे विश्वास आहे, पण नाटकासाठीचा आत्मविश्वास निर्माण करावा लागला. दिसण्याची अडचण असल्यामुळं समोरचा सांगतो तसं अनुकरण करता येत नाही. तेव्हा मुद्राभिनय व कायिक अभिनय त्यांच्याकडून करून घेणं हे आव्हानच. कारण अंध व्यक्ती हालचाली खूप मर्यादित करतात, फार सावध असतात, शंकित असतात. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी तयार होत आहेत तशी स्वत:ला सिद्ध करण्याची ऊर्मी यांच्यामध्ये खूप तयार झालीय. कुठल्याही बदलाची सुरुवात आतून होत नाही तोवर काही खरं नाही असं म्हणत मी त्यांना उद्युक्त करायचो. त्यांचं रोजचं जगणं, ब्रेल येणं, न येणं, ‘स्पर्शज्ञान’, ‘दृष्टी’सारख्या पाक्षिकांचं वाचन वगैरे गप्पांतून त्यांना मोकळं करत गेलो. हीच नट निवडीची प्रक्रिया. ती दोन-तीन महिने चालली. यातून निवडलेली ही १९ मुलंमुली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कॉलेज, विशिष्ट क्लासेस, नोकरी वगैरेसाठी पुण्यात आलेली, वसतिगृहात किंवा पीजी म्हणून राहून शिकणारी. प्रत्येकाची व्यस्तता व संबंधित क्षेत्रातील नियम-अटी सांभाळत आम्ही तालमी केल्या. ब्रेल व ऑडिओ संहिता समजून घेण्यापासून सुरुवात झाली.

नाटकासाठी मोबिलीटी प्रशिक्षण दिलं गेलं म्हणजे? ते नाटकाशी संबंधित कसं?

- संहितेचं वाचन व मोबिलीटी प्रशिक्षण या प्रक्रिया एकाच सुमारास झाल्या. नाटकातील सहभागी नटांपैकी प्रत्येकाच्या अंधत्वाच्या प्रकारानुसार अडचणी वेगळ्या. त्यामुळं अनेकांना प्रशिक्षणाची गरज होती. मोबिलीटीच्या प्रशिक्षणाबाबत माझी व्याख्या अशी, ‘मोबिलीटी म्हणजे स्वयंसिद्ध होणं!’ कशाकशात? तर, पारंपरिक आयुध म्हणजे पांढरी काठी पकडण्याची, फिरवण्याची पद्धत समजून घेत वाटेतल्या अडथळ्यांना पार करत आवश्यक त्या स्थळी सुरक्षित पोहोचू व कार्य पूर्ण करू शकणं. डोळे नसले तरी बाकीची ज्ञानेंद्रिये चालू असतात, त्यांचा सक्षमपणे कसा वापर करायचा हे शिकवलं जातं. रस्ता व परिसर समजून घेताना लिफ्टचा चालू-बंद होतानाचा वेगळा आवाज, बटणं, वॉचमनचं घर, झाडांची सळसळ, पक्षी, घरांमधले विशिष्ट वेळचे विशिष्ट आवाज किंवा वास, पानाची, चहाची टपरी, वडापावची गाडी, शाळा अशा विविध खाणाखुणा ओळखणं व लक्षात ठेवणं बिंबवलं जातं. यातून लोकेशन फाईंडिंग करताना भान ठेवायची सवय लागते. हे ट्रेनिंग झाल्यावर चालण्याचा आत्मविश्वास वाटू लागतो. प्रत्येक नाट्यगृहाचं माप थोडंफार वेगळं असतं, विंगांची संख्या बदलते. प्रत्येक नव्या ठिकाणी स्टेज समजावून सांगितलं जातं. कारण संपूर्ण रंगमंचाचा आणि विंग्जचा वापर आम्ही करतो. ज्ञानेंद्रियांचा वापर करत भान ठेवण्याची सवय भिनवल्यामुळं समोरचा कलाकार बसला आहे की उभा आहे, त्याची दिशा कोणती, स्पॉट कुठून व कसा येतोय वगैरे अंदाज सरावाने येतात आणि प्रेक्षकांना कळणार नाही अशा पद्धतीनं त्यांना समोरच्या कलाकाराकडून हिंट्स मिळत असतात, त्यानुसार प्रतिक्रियात्मक हालचाली होतात. स्वत:च्या डोळ्यांना पट्टी बांधून मी हा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं हे बारकावे मला समजतात व सांगता शिकवता येतात.

तरीही समजा नट संवाद विसरला, समजा एखाद्याची एन्ट्री चुकली व समोरच्या दृष्टीबाधित कलाकाराला हे लक्षात आलं नाही...

- न दिसण्यामुळं इथं पाठांतर ही एक मोठी जमेची बाजू आहे. लक्षात ठेवण्याची सवयच लागते. अर्थात मेहनत घ्यावी लागते. त्यामुळं प्रॉम्पटिंग नावाचा प्रकार इथं आढळत नाही. पात्रांच्या हालचालीच अशा पद्धतीनं बसवलेल्या असतात की, शक्यतो त्यांना काही धोके निर्माण होणार नाही. आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगतो की, खूप चांगल्या पद्धतीनं मी व्हिज्युअलाईज करू शकतो की, अमुक प्रसंगात यक्ष कुठे व त्यावेळी मेघ-दामिनी कुठे! त्यामुळं कोण कुठं असेल तर एकमेकांना पूरक ठरतील हे आधीच पक्कं माझ्या अभ्यासात ठरत असल्यानं जागा ऐनवेळी बदलत नाहीत. सगळ्या सूचना अंतिम असतात. यातून त्यांचा वैचारिक गोंधळ टळतो. नाटकातला प्रसंग, त्या त्या व्यक्तिरेखेची मानसिक व भावनिक अवस्था, प्रतिक्रिया यांची चर्चा झाल्यावर मग या प्रसंगात चीड किंवा रड असं सांगायची गरज पडत नाही. प्रश्न येतो तो हालचालींचा. प्रत्येक अंधत्वानुसार देहबोली वेगळी होत जाते. दृष्टीदोषाचा प्रकार, मर्यादा व फायदे जाणून घेऊन आम्ही प्रवास करत गेलो. जिला किंवा ज्याला नजरेच्या विशिष्ट टप्प्यातले आकार धूसर का होईना दिसतात त्यांना शिकवून मी त्यांच्या मदतीनं इतर पूर्णांध नटांच्या हालचाली व नृत्यं बांधली. त्यामुळं प्रत्येक जणानं स्वत:शिवाय दुसर्‍या एकदोन पात्रांच्या उभारणीत सहभाग दिलाय. काही जण म्हणाले, यातले संस्कृत श्‍लोक काढून टाका किंवा थोडं कॉम्पॅक्ट करा. मात्र मेघदूताच्या प्रवासाला धक्का लावायचा नव्हता. सामान्य डोळस कलाकारांना घेऊन जसं नाटक करता आलं असतं तसंच इथंही केलं. अंध आहेत म्हणून नृत्य नको, तलवारबाजी नको, शॅडोसारखा प्रयोग नको अशा सवलती मुळीच घेतल्या नाहीत. अंधत्व वगळता आम्ही नॉर्मल आहोत हे सांगायचं असेल तर सवलती कशाला घ्यायच्या?

नाट्यानुभवाच्या पलीकडे जात समाजानं काय गोष्टी बदलाव्यात असं वाटत होतं. ते कशा तऱ्हेनं झालं?

- ‘जे कायमच कोणत्या ना कोणत्या दर्जेदार कृती पाहू शकतात अशा डोळस लोकांसमोर नाटक करणार आहोत. त्यांच्यासमोर काही चुकलं तर?’ या विचारानं आमच्या कलाकारांना खूप टेन्शन आलं होतं. अर्थात आम्ही पहिल्या प्रयोगापूर्वी वेशभूषा व लाईट्ससह नाट्यगृह भाड्यानं घेऊन चार रंगीत तालमी केल्या होत्या. त्यांना समजावलं, संपूर्ण मेहनत घेऊन अतिशय डिव्होशनने तुम्ही नाटक करताय तर आनंद घ्या, तरच तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. म्हणून नाटकामधून एक सकारात्मक ऊर्जा प्रेक्षकांना मिळते. चांगलं नाटक निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट संहिता व निर्मितीमूल्यांसाठी तडजोड न करणारा निर्माता लागतो. लेखक गणेश दिघे, निर्मात्या रश्मी पांढरे, वीणा ढोले यांच्यामुळं ते साधलं गेलं. यातून अशा प्रयोगांना व्यावसायिक यश नक्कीच आहे, हे समाजासमोर आलं. सामाजिक संस्थांनी निधी संकलनासाठी या नाटकाला आमंत्रित केलं व ते प्रयोग यशस्वी झाले. उदा पंढरपूरला लायनेस क्लबनी घेतलेल्या प्रयोगात खर्च वजा जाता पावणे तीन लाख रुपये निधी जमला. ज्यातून कुष्ठरोग्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रासाठी मदत झाली. नाशिकमध्ये रोटरीने शाळांमधल्या मुलांसाठी, नगरला ‘आकांक्षा केंद्रा’साठी निधी उभा राहिला. त्यामुळं अंध व्यक्ती फक्त मागतात असं नाही तर आपल्या कलाकृतीतून दुसऱ्या चांगल्या कामासाठी निधी उभारून देऊ शकतात हे सिद्ध झालं. नाट्यशास्त्रात डोळ्यांतून भाव दाखवण्याविषयी सांगितलं गेलंय, पण जे अंध आहेत त्यांच्यासाठी काय हे सांगितलेलं नाही. असे बदल लोकांना कृतीतून दाखवले आम्ही. कुठल्याही अपंग व्यक्तीला सहकार्याचा हात द्या, पण विनाकारण उठसूठ मदत करू नका, स्वयंसिद्ध होण्याची मोकळीक द्या, ते नेहमीनेहमी धडपणार नाहीत व पडले तर आम्ही असू ही खात्री त्यांना द्या शिवाय पुढे जाऊन  पडणारच नाहीत असं वातावरण निर्माण करा हा दृष्टीकोन पोहोचवण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो हळूहळू झिरपतो आहे.

.............................................................................................................................................

लेखिका सोनाली नवांगुळ स्तंभलेखिका, अनुवादक, मुलाखतकार आणि गप्पिष्ट आहेत.

sonali.navangul@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......