‘बर्डमॅन’, ‘द सेव्हन्थ सील’ आणि चित्रपटांमधील ‘अस्तित्ववाद’
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
जीवन नवगिरे
  • ‘बर्डमॅन’ आणि ‘द सेव्हन्थ सील’
  • Sat , 26 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie द सेव्हन्थ सील The Seventh Seal इंगमार बर्गमन Ingmar Bergman बर्डमॅन Birdman

वूडी अॅलन म्हणतात, “मी अस्तित्ववादावर परीक्षा दिली. मी सर्व प्रश्न कोरे सोडून आलो आणि मला पूर्ण मार्क्स मिळाले.” त्यांच्या बऱ्याच चित्रपटांच्या पात्रांमध्ये आपल्याला अस्तित्ववाद दिसून येतो. ते इंगमार बर्गमन यांचे चाहते आहेतच, हे आपल्याला त्यांच्या ‘अॅनीहॉल’, ‘मॅनहॅटन’सारख्या चित्रपटांमध्ये दिसून येतं. ‘अॅनीहॉल’मध्ये डॉक्टर लहान अॅल्वीला विचारतात, ‘तू का एवढा निराश आहेस?’ तर त्याचं उत्तर असतं, “आपलं विश्व प्रसरण पावतंय. एके दिवशी ते फुग्यासारखं फुटून गेल तर सगळं नष्ट होईल.” आता तो लहान मुलगा त्याच्या कल्पनेच्या जोरावर ते बोलतो, तो काही खरोखर विश्वाच्या चिंतेत थोडी पडला असेल, पण अॅलन आपल्याला त्यामधून विनोदाच्या अंगानं अस्तित्ववाद दाखवून देतात.

इंगमार बर्गमन, आंद्रेईता र्कोव्स्की, चार्ली कॉफमन यांचे बरेच चित्रपट हे अस्तित्ववाद या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहेत. ‘बर्डमॅन’, ‘सेव्हन्थ सील’, ‘इकिरु’, ‘सिनेकडोके, न्यूयॉर्क’, ‘अनोमालिसा’सारखे बरेच चित्रपट आहेत. ज्यामध्ये अस्तित्ववाद खोलवर दिसून येतो.

बर्डमॅन (२०१४)

बर्डमॅन सुरू होतो आणि एकदम पहिल्याच दृश्यात, रिगन किंवा विशेषतः बर्डमॅन प्रश्न करतो ‘आपण इथे कसे आलो? हे ठिकाण फार भयंकर आहे...’ असा प्रश्न प्रत्येक जण कधी तरी ज्याच्या त्याच्या आयुष्यात करत असतो. नेमकं हेच रिगन थॉमसनसोबत घडतं. आणि या मधून आपल्याला अज्ञानाचा अनपेक्षित सदगुण बघायला मिळतो.

रिगन थॉमसन (मायकेल किटन) हा एक अभिनेता आहे. वीस वर्षाआधी त्यानं बर्डमॅन या सुपर हिरोचं पात्र साकारलेलं असतं. तो तेव्हा एक प्रसिद्ध आणि प्रस्थापित अभिनेता असतो. पण वर्तमानात त्याने त्याची प्रसिद्धी गमावलेली असते. तो त्याच्या कारकिर्दीतील वाईट दिवसात असतो. पण त्याच्या मनातील बर्डमॅनचं भूत गेलेलं नसतं. तो पुन्हा एकदा त्याची कारकीर्द प्रस्थापित करण्यासाठी ‘What We Talk About When We Talk About Love’ हे नाटक करत असतो. त्यामधील अभिनेते मिळवण्यासाठी त्याला झगडावं लागतं. आणि त्याचं वैयक्तिक जीवनसुद्धा काही स्वस्थ नसतं. मग त्याची घटत जाणारी प्रसिद्धी आणि वैयक्तिक समस्या, हे सर्व त्याला निराशामय होण्यासाठी पुरेसे ठरतात. रिगनच अस्तित्वसंकट हे त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे आलंय, विश्वातील अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नामुळे नव्हे. तर त्याला परत प्रसिद्धी मिळवायचीये आणि परत एकदा लोकांच्या नजरेत हिरो बनायचंय. ती त्याची महत्त्वाकांक्षा असते. आणि त्याचा बर्डमॅनच भूत त्यासाठी पूरक असतं. तो एक प्रकारे त्याच्या अहंकाराचं प्रतिनिधित्व करतो.

आपल्यामध्येही असा अहंकार दडलेला असतो. आपण प्रसिद्ध होण्याकरता बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. आपल्या सगळ्यांना लोकांच्या नजरेत हिरो बनायचं असतं. मग तो सोशल मीडिया असो किंवा अनेक इतर गोष्टी. रिगनच्या बाबतीत त्याचा हा अहंकार म्हणजे बर्डमॅन होय. जो की, सतत त्याला या सगळ्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करत असतो. आणि हेच त्याचं अज्ञान असतं. कारण ज्या लोकांमध्ये आपण प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं अस्तित्वसुद्धा निरर्थक आहे. आणि एकंदरीत आपली सगळी कृत्यं निरर्थक ठरतात.

रिगन आणि त्याची मुलगी सॅम (एमास्टोन) च्या दृश्यात हे सगळं स्पष्ट होतं. सॅम तिच्या वडिलांना म्हणते, “तुम्ही हे नाटककलेच्या प्रेमापोटी नव्हे तर प्रसिद्धीसाठी करताय. बाहेर जगात अनेक लोक आहेत, जे दररोज त्यांच्या जीवनात प्रसिद्धीसाठी झगडत असतात. तुम्ही हे सगळं मृत्यूच्या भीतीपोटी करत आहात. आणि तुमच्या असण्या-नसण्यानं काही फरक पडणार नाही, या भीतीपोटी तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंय. आणि तेच खरंय, कोणाला काही एक फरक पडत नाही. तुम्ही काही खूप महत्त्वाचे नाही. त्याला स्वीकारून सामोरं जा.” आणि हेच बर्डमॅन चित्रपटाचं सार आहे. शेवटी रिगन त्याच्या अहंकाराच्या अज्ञानापायी असं काही करतो की, खरंच त्याच्या अज्ञानामध्ये आपल्याला अनपेक्षित सदगुण दिसून येतो. त्याचं हेच अज्ञान त्याला मुक्त होण्यास मदत करतं. जे चित्रपटामध्येच बघण्यात मजा आहे. चित्रपटाचा शेवट हा संदिग्ध आहे आणि त्याचा काय अर्थ घ्यायचा प्रत्येकावर अवलंबून आहे.

द सेव्हन्थ सील (१९५८)

अस्तित्ववादावरील हा सर्वांत प्रसिद्ध सिनेमा. इंगमार बर्गमन यांचा हा मास्टरपीस आहे. माणसाचा जीवन आणि मृत्यूमधील संघर्ष बर्गमन यांनी अतिशय रूपकात्मक रीतीनं यामध्ये दाखवला आहे. अँटोनिअस (मॅक्सव्हॉन सिडॉव) हे मुख्य पात्र. जो मध्ययुगीन युरोपमधील एक योद्धा होय. जेव्हा मृत्यू त्याला घेऊन जायला येतो, तेव्हा तो मृत्यूला त्याच्यासोबत बुद्धिबळ खेळण्याची विनंती करतो. विशेष म्हणजे बर्गमन यांनी चित्रपटात मृत्यूला मानवसदृश दाखवलं आहे. हा बुद्धिबळाचा खेळ वेगवेगळ्या अंतरात खेळला जातो. आणि याच अंतरामध्ये अँटोनिअस त्याचे एक महत्त्वाचं काम पूर्ण करणार असतो.

अँटोनिअस पुढे चर्चमध्ये जातो, तेव्हा तेथील धर्मगुरूसमोर, तो त्याच्या आणि देवाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करतो. तो त्याच्या लोकांबद्दल असलेल्या दुर्लक्षितपणामुळे समाजाच्या बाहेर केला गेलाय आणि तो त्याच्याच तिरस्कारामध्ये भीतीदायक जीवन जगतोय. त्याला त्याच्या जीवनात काही एक अर्थ दिसत नाही. त्याचं संपूर्ण जीवन आश्चर्यात आणि शोध घेण्यात गेलंय. पण त्याला फक्त निरर्थक गोष्टींशिवाय काहीच मिळत नाही. आणि ते इतरांच्या आयुष्यालासुद्धा लागू पडतं. म्हणून शेवटी मृत्यूसोबत शेवटचा डाव खेळण्या अगोदर अँटोनिअसला ज्ञान हवंय, त्याच्या प्रश्नांची उत्तर हवीत. “देव असा लपून का बसतो? मला श्रद्धा, गृहितकं नव्हे तर ज्ञान हवंय. देवानं मला त्याची उत्तरं द्यायला हवीत. आणि जर देवच नसेल तर कोणीच असल्या निरर्थक जगात त्याचं जीवन जगू शकणार नाही. म्हणून आपण देवाची एक प्रतिमा बनवणं गरजेचं आहे,” या मानसिक व्यथेनं अँटोनिअस ग्रासलेला असतो.

बर्गमन यांनी त्या काळातील समाजावर असलेल्या धार्मिक अंधश्रद्धेचा पगडा या चित्रपटातून मांडला आहे. माणूस या विश्वात स्वतःच्या एकटेपणाला घाबरतो आणि एक दिवस मृत्यू अटळ आहे, या गोष्टीमुळे त्याचा धर्मावरील विश्वास अधिक रूढ होत जातो. आणि याच अतिविश्वासाचा धार्मिक गुरू फायदा करून घेतात, लोकांना मृत्यू आणि राक्षस यांच्या भीतीनं अंधारात ठेवतात. आणि समाज अंधश्रद्धेमध्ये बुडून जातो. अँटोनिअस याच देवाच्या आणि राक्षसाच्या संकल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. त्याच्या मते, ‘श्रद्धा ही यातना आहे. श्रद्धा म्हणजे कोणीतरी अंधारात असलेल्या व्यक्तीवर प्रेम करणं आणि आपण कितीही आवाज दिलात तरी ती व्यक्ती आपल्यासमोर न येणं होय.’ यामध्ये ती व्यक्ती म्हणजे देव. संपूर्ण आयुष्य त्यानं देवाला आवाज दिलाय, पण तो नेहमी निराश झालाय. यामुळेच त्याला देवावरील श्रद्धा म्हणजे एक प्रकारची यातनाच वाटते.

अँटोनिअस मृत्यूला बुद्धिबळाच्या खेळात अनेकदा चकवा देण्याचा प्रयत्न करतो, पण मृत्यू हा अटळ आहे, त्याला कोणीच हरवू शकत नाही. मृत्यू त्याला विचारतो कि, ‘मी दिलेल्या विश्रांतीमधून तुला फायदा झालाय का?’ यावर अँटोनिअस ‘हो’ म्हणतो. कारण जरी त्याला त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं नसलं, तरी त्याच्या प्रवासात तो एक गोष्ट जाणतो की, जीवनामधील छोट्या छोट्या सुखाच्या क्षणांमधून आपणबरच काही जगू शकतो. आणि अस्तित्वाचे प्रश्न त्यासमोर क्षुल्लक बनून जातात. अँटोनिअस मृत्यूनंतर त्याच्या उत्तरांची अपेक्षा ठेवतो, पण मृत्यू त्याला उत्तर देतो- ‘मी काहीच रहस्य ठेवत नाही. माझ्याकडे काही एक सांगण्यासारखे नाही.’ म्हणजे बर्गमन त्या संवादामधून मृत्यूनंतर असलेल्या जीवनाच्या, स्वर्ग आणि नरकासारख्या गोष्टींवर पडदा टाकतात. बर्गमन यांनी या चित्रपटामधील बुद्धिबळाचा खेळ म्हणजे आपलं आयुष्य, आपण हा खेळ मृत्युसोबत खेळतोय आणि अँटोनिअस म्हणजे आपण होय, असं रूपकात्मक रीतीनं दाखवलं आहे.

वरील दोन चित्रपटांमध्ये अस्तित्ववाद दोन वेगळ्या प्रकारे आढळून येतो. ‘बर्डमॅन’मधील रिगन हा वैयक्तिक दुःखांमुळे अस्तित्व निराशेत असतो आणि अँटोनिअस हा खरंच विश्वाच्या आणि अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांच्या उत्तरांमागे धावत असतो. किशोरवयात बरेच जण निराशेत जातात आणि त्यालाच अस्तित्वाची निराशा (Existential Angst) समजून बसतात. बऱ्याच वेळा ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे निराशेत असतात, अस्तित्वाच्या नव्हे. पण अस्तित्ववादाचा अभ्यास करणं रंजक आहे. कारण ते तत्त्वज्ञान निराशामय नव्हे, तर ते आपल्याला जाणीव करून देतं कि, आपण या जगात पूर्णतः स्वतंत्र आहोत आणि आपल्या कृत्यासाठी आपणच जबाबदार असून आपल्या मनाप्रमाणे जगण्यास स्वतंत्र आहोत.

अस्तित्ववाद शेवटी सांगतो, जरी आपलं आयुष्य निरर्थक असलं तरी आपण स्वतःच्या जीवनात एक उद्देश ठरवून त्याला अर्थमय करू शकतो. आणि एक समाधानी जीवन जगू शकतो. ज्या प्रकारे ‘अॅनीहॉल’मध्ये डॉक्टर लहान अॅल्वीला उत्तर देतात, “विश्व जरी प्रसरण पावत असलं तरी ते अजून कोट्यवधी वर्षं टिकून राहणार आहे. आणि जोपर्यंत आपण इथं आहोत, तोपर्यंत आपण आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे.”

.............................................................................................................................................

लेखक जीवन नवगिरे चित्रपट अभ्यासक आहेत.

navgirejeevan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Mayur Navgire

Sat , 26 May 2018

Very nice explained. Helpful to those are in depression, or fighting for self existence. Keep it up Jeevan...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......