‘ब्लॅक पँथर’ : अमेरिकन सिनेमाचं अस्तित्व बदलून टाकणारा सिनेमा
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अभिषेक भोसले
  • ‘ब्लॅक पँथर’चं एक पोस्टर
  • Thu , 22 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा English Movie ब्लॅक पँथर Black Panther

“अर्रर्रर्र, यात सगळेच काळेच आहेत की, असला कसला हॉलिवुडचा पिक्चर”, औरंगाबादमधल्या मल्टिप्लेक्समध्ये थ्रीडी गॉगल लावून नुकताच प्रदर्शित झालेला ‘ब्लॅक पँथर’ हा हॉलिवुडपट पाहतानाची अनेकांची प्रतिक्रिया.

सातत्यानं गोऱ्यांची मक्तेदारी असणाऱ्या हॉलिवुडमध्ये ‘ब्लॅक पँथर’ हा चित्रपट आलाय आणि त्यानं अमेरिकेतल्या अफ्रिकन अमेरिकन लोकांसोबतच गोऱ्यांचीही थिएटरमध्ये गर्दी ओढलीय. चित्रपटाचं परीक्षण अनेकांनी वाचलं असेल किंवा निदान त्याविषयी वाचलं असेल. पण ‘ब्लॅक पँथर’ या सिनेमानं अमेरिकेमध्ये जी कृष्णवर्णीय लाट आणली आहे, ती यानिमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे.

सहा महिन्यापूर्वी ‘बीच’ (Bitch) या संकेतस्थळावर एक लेख वाचत असताना पहिल्यांदा या सिनेमाबद्दल वाचनात आलं. ‘अफ्रो फ्युचरिझम’ या संकल्पेनवर तो लेख होता. प्रासंगिक उदाहरण द्यायचं म्हणून लेखकानं ‘ब्लॅक पँथर’बद्दल लिहिलं होतं. ‘अफ्रो फ्युचरिझम’ म्हणजे काय तर कृष्णवर्णीय लोकांच्या परिप्रेक्ष्यातून कृष्णवर्णीय लोकांसाठी, तंत्रज्ञानाचा वापर करून, कलेच्या माध्यमातून केलेल्या सकारात्मक शक्यतांचा विचार.

मागच्या आठवड्यात ‘ब्लॅक पँथर’ प्रदर्शित झाला. तेव्हापासून चित्रपट परीक्षणाच्या पलीकडं जगातील बहुतांश माध्यमांचं लक्ष या चित्रपटानं वेधलं आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जातेय. त्यातल्या त्यात अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात ही चर्चा चालू आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांसाठी ६० च्या दशकातील ‘ब्लॅक पँथर’ चळवळ हा अभिमानास्पद इतिहास आहेच. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं कृष्णवर्णीयांसोबतच गौरवर्णीयांसाठी नवा इतिहास रचायला सुरुवात केली आहे.

पूर्णपणे कृष्णवर्णीय कलाकार घेऊन किंवा कृष्णवर्णीय कलाकारांनी मिळून, त्यांना केंद्रस्थानी ठेवून मांडणी केलेला कृष्णवर्णीय चित्रपट अमेरिकेत आणि जगामध्ये खोऱ्यानं पैसे ओढू शकतो, हा स्पष्ट संदेश या चित्रपटानं दिला आहे. कुणाला, तर सातत्यानं गोरे-गोमटे कलाकार असणाऱ्या आणि त्यांच्याच अस्तित्वाभोवती फिरत राहणाऱ्या हॉलिवुडला.

बरं हा सिनेमा फक्त कृष्णवर्णीय सुपरहिरो प्रेक्षकांसमोर मांडत नाही, तर वास्तवातील अफ्रो-अमेरिकन लोकांच्या संघर्षाचं शक्तिशाली कल्पित प्रदर्शनही करतो. एकीकडं ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’चा नारा देत सत्तेत आलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेतील काळ्या लोकांची साहित्यिक मांडणी बदलत आहेच. पण त्या मांडणीला आता अमेरिकेतील गोऱ्यांचंही समर्थन मिळतंय याचे संकेतही हा सिनेमा पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून मिळत आहेत.

अमेरिकेतील अफ्रो अमेरिकन, मेक्सिकोतील स्थलांतरित आणि इतर मुस्लिम यांना सातत्यानं ट्रम्प यांच्याकडून लक्ष्य बनवण्यात येत असताना हा सिनेमा आलाय. याची प्रचिती नुकतीच अमेरिकन राष्ट्रध्यक्षांनी अफ्रिकेतील ५४ राष्ट्रांसंदर्भात केलेल्या ‘Shithole’ या टिप्पणीतून येते. या सिनेमाची घोषणा २०१४मध्ये झाली होती. पण तो अशा परिस्थितीमध्ये प्रदर्शित होईल आणि अमेरिकेतील लोक त्याला एवढं डोक्यावर घेतील याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल.

खरं तर हा सिनेमा अफ्रो – अमेरिकन लोकाचं ‘ब्लॅक ड्रीम’ तुमच्यासमोर उभं करतो. जगातील कृष्णवर्णीयांचं नरेशन गोऱ्या राष्ट्रांच्या सावलीखाली आकार घेत असताना हा सिनेमा प्रदर्शित झालाय. तो स्वतंत्र कृष्णवर्णीय राष्ट्राची, जिथं मानवी स्वातंत्र्य, संसाधन आणि तंत्रज्ञानावरील स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाची संकल्पना सिनेमाच्या माध्यमातून अस्तित्वात आणतो. हॉलिवुडमध्ये कृष्णवर्णीयांचं प्रतिनिधित्व निर्माण करतो. सुपर हिरोची परंपरा पुढे नेतो, पण तो अफ्रिकन कुळातला असतो. असं काही पाहायची सवय नसलेल्या लोकांमध्ये हा सिनेमा का गाजतोय, विशेषत: अमेरिकेतील गौरवर्णीयांमध्ये.

ट्रम्प यांच्या निवडीनंतर कृष्णवर्णीयांच्या भविष्याबद्दलचा विचार करणंही कठीण झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या निर्माण होत चाललेल्या प्रतिगामी परंपरेला छेद देण्याचं काम ‘ब्लॅक पँथर’नं केलंय. या सिनेमाच्या माध्यमातून कृष्णवर्णीय मांडणी किंवा स्वप्न केंद्रस्थानी ठेवून सध्याच्या प्रतिगामी परिस्थितीला दिलेली ही प्रतिक्रिया आहे. ज्यातून कृष्णवर्णियांच्या अस्तित्वाची अबाधित दृष्टी मांडली जातेय. ही मांडणी कृष्णवर्णीयाबद्दल असणारा संस्थात्मक भेद, शोषणाची घर करून असलेली प्रतिमा तोडण्याचा प्रयत्न करतेय. ही प्रतिक्रिया देत असताना सिनेमा प्रेम आणि कृष्णवर्णीयांचा स्वाभिमान तर कायम ठेवतेच, सोबतच त्यातील कट्टरतावादाला नाकारण्याचं कामही करते. स्वत:चा शत्रू मांडताना त्याला ती फक्त गोऱ्यापुरता मर्यादित करत नाही, तर तो सर्व रंगाचा असल्याचं सांगते.

सध्याच्या अमेरिकेतील परिस्थितीमध्ये हे मांडणं अमेरिकेचा नागरिक म्हणून सर्वांनाच आकर्षित करणारं आहे. अमेरिकेतील ४१ टक्के कृष्णवर्णीय दरिद्र्यरेषेच्या खाली आहेत. फेडरल रिझर्व्हच्या आकडेवारीनुसार गोऱ्या अमेरिकन नागरिकाचं सरासरी मूल्य (नेट वर्थ) १.७१.००० अमेरिकन डॉलर्स आहे, तर कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकाचं १७,६००. असं असताना अर्थिकदृष्ट्या तंत्रज्ञानानं प्रगत स्वायत्त कृष्णवर्णीय राष्ट्राची संकल्पना मांडणं लोकांना आकर्षित करणारं आहे.

हा सिनेमा अमेरिकेमध्ये एवढा लोकप्रिय झालाय की, कमाई तर त्यानं केलीच आहे, पण ट्विटरवर #WhatBlackPantherMeansToMe नावाचा हॅश टॅग ट्रेंड्रिंगमध्ये आहे. त्यातले ट्रविट वाचले तर लक्षात येईल की, राजकीय आणि सांस्कृतिक दमनाच्या काळात सिनेमाची भूमिका काय असू शकते. या हॅशटॅगचा वापर करून कृष्णवर्णीयांच्या परिस्थितीवर व्यक्त होणारे रंगाच्या पलीकडं गेले आहेत.

अमेरिकेतील लोकांनी कधीही विचार केला नसेल असा राजा असलेला कृष्णवर्णीय सुपरमॅन तर स्वीकाराला आहेच, त्यासोबत गुलाम नसलेली, पूर्ण सिनेमात कधीच नजर खाली न झुकवलेली, झुंजणारी कृष्णवर्णीय स्त्रीदेखील स्वीकारली आहे. अर्थात ही अमेरिकेत चालू असलेली ही चर्चा तिथल्या सत्ताधाऱ्यांसाठी संदेश आहे. तो संदेश त्यांना योग्यपणे मिळाला आहे. म्हणून मागच्या दोन-तीन दिवसांपासून हा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या गोऱ्या लोकांना कृष्णवर्णीयांनी कशा प्रकारे मारहाण केली याचे व्हिडिओ पद्धतशीरपणे व्हायरल करण्यात येत आहेत. अर्थात यात तथ्य नसल्याचं तिथल्या तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा सातत्यानं स्पष्ट करत आहेत.

दिग्दर्शक रयान गॉग्लरनी सिनेमाच्या माध्यमातून त्याचं राजकीय मत, कृष्णवर्णिय म्हणून असणारं त्याचं स्वप्न मांडलं आहे. स्वातंत्र्य असणाऱ्या लोकांची, जे पारतंत्र्यात आहेत, त्यांच्याप्रती असणाऱ्या कर्तव्याची जाणीवही करून दिली आहे. फक्त सिनेमा पाहून ते कर्तव्य पार पडणार आहे का याची चर्चा चालत राहिल. पण ‘ब्लॅक पँथर’ हा आता फक्त सिनेमा राहिलेला नाही, तर तो चळवळ बनलाय. त्यानं अमेरिकेतील सिनेमाचं अस्तित्वच पूर्णपणे बदलून टाकलंय, तसंच हॉलिवुडची गोरी चवदेखील. सांस्कृतिक-राजकीय दमनाच्या काळात सिनेमाची भूमिका काय, याचं यापेक्षा चांगलं उत्तर असू शकत नाही.

फक्त अमेरिकतच नाही तर औरंगाबादच्या त्या सिनेमागृहात “अर्रर्रर्र, यात सगळेच काळे आहेत की, असला कसला हॉलिवुडचा पिक्चर” म्हणणाऱ्या प्रेक्षकाचंही हॉलिवुडबद्दलचं मत बदलेल.  

.............................................................................................................................................

लेखक अभिषेक भोसले औरंगाबाद येथील एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पत्रकारिता विषयाचे प्राध्यापक आहेत.

bhosaleabhi90@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Pravin Shinde

Thu , 22 February 2018

चित्रपटाच्या संकेतांचा अर्थ उलगडून सांगणारा लेख. तसेच चित्रपटाच्या निमित्ताने अमेरिकेतील समाजात काय घडामोडी घडत आहेत याचीही महत्वाची माहिती मिळाली. कृष्णवर्णीयांच्या सांपत्तिक स्थितीत असलेली विषमता आणि तरीही त्यांची स्वप्न पाहण्याची जिद्द व त्यातून उदयाला आलेला "ब्लॅक पँथर" ही मांडणी देखील खुप सकारात्मक वाटली.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......