‘कौल’ डोक्याला झिणझिण्या आणतो!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
यश एनएस
  • ‘कौल’मधील एक दृश्य
  • Sat , 19 November 2016
  • मराठी सिनेमा कौल Kaul आदिश केळुस्कर Aadish Keluskar रोहित कोकाटे Rohit Kokate

आदिश केळुस्कर (प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर यांचा मुलगा) या तरुण दिग्दर्शकाचा ‘कौल’ हा 'विचित्रपट' आहे. त्याच्या बऱ्याच चाहत्यांसारखा, मीही तो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पिफ्फ) पाहिला. चित्रपट संपल्यानंतर बाहेर आलो, तेव्हा काही सुचत नव्हतं. ज्या मित्रांबरोबर पाहिला, त्यांच्याशी ‘कौल’बद्दल खूप बोललो, तरी पण अंगात निर्माण झालेली विचित्र ऊर्जा काही केल्या कमी होत नव्हती. बाहेर रस्त्याला आलो, चहा प्यायलो. मग हॉटेलात जाऊन मित्रांबरोबर बिअर प्यायलो. काहीच फरक पडला नाही. आपल्याला या चित्रपटामुळे वेड तर नाही ना लागलं, अशी शंका वाटू लागली. रात्री झोपेपर्यंत ‘कौल’चाच विचार करत होतो. शेवटी वाटलं की, या पुढे असा चित्रपट बनवता आला नाही तर काही अर्थ नाही!

‘कौल’चं नाव पहिल्यांदा पिफ्फच्या यादीत पाहिलं. त्याचा टीझर शोधून पाहिला आणि लगेचच हे काहीतरी खूप वेगळं आहे हे कळालं. आपण एका पुरुषाला रस्त्याच्या पलीकडून पाहत असतो, मधून गाड्या जात असतात आणि तो पुरुष फूटपाथवर, फक्त त्याला ऐकू येणाऱ्या गाण्याच्या चालीवर, मनसोक्तपणे नाचत आसतो. बास, एवढाच होता त्याचा एक टीझर! तरीपण त्यातून चित्रपटाचा ‘पोत’ स्पष्टपणे जाणवला. मराठी सिनेमामध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळणार याची खात्री पटली.

तुमच्या एव्हाना हे लक्षात आलं असेल की, या चित्रपटाचं परीक्षण करतानाही मला खूप प्रयास पडत आहेत. इतका अमूर्त (abstract) अनुभव शब्दात कसा मांडणार?

आपल्याला स्वत:ला एखाद्या कलाकृतीच्या स्वाधीन करणं क्वचितच जमतं. त्यात मोबाईलवर एखादा मेसेज आला तर तो चित्रपट चालू असतानाही आपल्याला वाचायचा असतो! तशी बहुतांश भारतीय चित्रपटांनीच आपल्याला सवय लावली आहे की, चित्रपट पाहणं म्हणजे फक्त 'करमणूक'. त्यामुळे चित्रपट या कलाकृतीचं एक व्याकरण असतं आणि त्याचा पण आस्वाद घेतला जाऊ शकतो, याच्यापासून आपल्याला लांबच ठेवलं गेलं आहे. मात्र हे ठामपणे म्हणता येईल की, 'कौल'नं चित्रपटाच्या व्याकरणाचा नवीन शोध लावला आहे. कदाचित तसं करणं गरजेचंही होतं.

आजवर मराठी आणि हिंदीमध्येही मानसिक रोगांवर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत, पण ‘कौल’ इतका त्या रोगांचा प्रत्यक्ष अनुभव करून देणारा चित्रपट सापडणं कठिणच. ‘स्क्रिझोफ्रेनिया’ हा मानसिक आजार, त्याच्या तीव्र स्वरूपात, नेमका कसा असतो हे ‘कौल’ बघितल्यावर समजतं.      

कदाचित आदिश केळुस्कर 'कौल'चा लेखक आणि दिग्दर्शक म्हणेल की, ‘‘स्क्रिझोफ्रेनिया’च्या बराच जवळ जात असला तरी हा चित्रपट फक्त त्याबद्द्ल नाही.’ तसं नेमक सांगायचं झालं तर 'कौल'ला पारंपरिक कथानक आणि रचना नाही. काही दृश्यांचा कालावधी आपल्याला सवय असलेल्या कालावधीपेक्षा इतका जास्त आहे की, दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचं आहे असा प्रश्न पडू शकतो. त्यात कथानक शोधायला गेलो तर काहीच मिळत नाही आणि विफलता वाढतच जाते!

‘कौल’चा अनुभव त्यातील दृश्यांचा कालावधी, त्यांची पडद्यावरील योजना, त्यातील परिणामकारक पार्श्वसंगीत, अभिनय आणि एडिटिंग यांच्या मिश्रणातून आपल्यापर्यंत पोचतो. त्यासाठी एकच करावं लागतं. ते म्हणजे स्वतःला ‘कौल’च्या स्वाधीन करणं!

शोध घेण्याचा संघर्ष हा ‘कौल’च्या अनुभवाचा खूप मोठा भाग आहे. यातील नायक मुंबईहून कोकणात शिक्षकाच्या नोकरीसाठी जातो. खरं तर त्याने मुंबईत एका माणसाचा खून केलेला असतो. कोकणात असताना त्याला एक विलक्षण अनुभव येतो आणि त्यानंतर तो सत्याचा आणि अर्थाचा शोध घ्यायला लागतो. यात त्याने अनुभवलेलं किती खरं आणि किती खोटं याचा शोध आपण आणि तो एकाच वेळी घेत राहतो. त्याने खरंच खून केलाय का? त्याला खरंच तो म्हातारा दिसला का? एका क्षणात खरंच रात्रीचा दिवस झाला का? तो म्हातारा खरा होता का, तो मानसोपचारतज्ज्ञ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तेव्हा लक्षात येतं की, हा सगळा खेळ कोणाच्या दृष्टिकोनातून आपण गोष्ट बघतो आहोत, याच्याशी संबंधित आहे. कुठल्या व्यक्तीचा दृष्टीकोन ‘खरा’ असतो? नायकाप्रमाणे आपणही आपल्या परीनं जग अनुभवत असतो. मग आपला अनुभव 'खरा' कशावरून? इतक्या खोल प्रश्नांची जाणीव करून देणारी पटकथा आदिशला कशी सुचली? बहुधा त्याच्या जगण्यात नक्कीच कुठल्या तरी प्रकारचं स्वातंत्र्य असणार.

नायकाची भूमिका रोहित कोकाटेने केली आहे. आदिश आणि रोहितची आधीची शॉर्ट फिल्म ‘आय लव्ह यू टू’ बघितली तर लक्षात येतं की, रोहितचे डोळे खूप सूचक आहेत. त्याच्या डोळ्यातले भाव 'कौल'मधल्या नायकाच्या आतला संघर्ष खूप सहजपणे दर्शवतात. आदिशच्या दिग्दर्शनाप्रमाणे रोहितच्या अभिनयाला एक वेगळेपण आहे. ते ‘कौल’सारख्या चित्रपटातच चमकू शकतं. ‘कौल’मध्ये एक दृश्य आहे, ज्यात रोहित आपल्याला पाठमोरा होऊन बोलत बसला आहे. त्याच्या त्या अवस्थेतला अभिनय बघूनही अंगावर काटा येतो!  

पिफ्फनंतर आदिशबरोबर थोड्या गप्पा मारण्याची संधी मिळाली. तेव्हा कळालं की, ‘कौल’ हा चित्रपट बनवणाऱ्या अख्ख्या टीमची संख्या फक्त सात आहे! एवढ्या कमी लोकांबरोबर चित्रपट बनवताना खूपच मेहनत करावी लागते. पण त्याचबरोबर या प्रकारामुळे एखाद्या हस्तकलेला येतो, तसा पर्सनल टचही येतो. अमेय चव्हाणने केलेलं छायाचित्रण उल्लेखनीय आहे. नेहमीच्या छायाचित्रणाच्या कल्पना ओलांडून त्याने आणि आदिशने जणू नवीन पेंटिंग्ज रंगवली आहेत. या पेंटिंग्जमुळे आणि ऋत्विक राज पाठक व सिद्धार्थ दुबे यांनी योजलेल्या ध्वनीसंयोजनामुळे चित्रपटाच्या आशयाला अधिक गहिरेपणा आला आहे. चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर चित्रपट हा अर्धा दृश्यांचा आणि अर्धा आवाजांचाच असतो. ‘कौल’मधल्या आवाज आणि नादांमध्ये खरोखर इतकी ताकद आहे की, चित्रपट पाहताना मळमळायला लागतं. या चित्रपटाचे निर्माते, चिंटू सिंग आणि उमा केळूस्कर यांच्या धाडसाचं आणि निवडीचं कौतुक केलं पाहिजे.

‘कौल’ बघितल्यानंतर आदिशच्या यूट्युबवरच्या सगळ्या शॉर्ट फिल्म बघितल्या. प्रत्येकीमध्ये त्याच्या विचारांची स्पष्टता स्वच्छपणे दिसते. असे चित्रपट मराठी आणि भारतीय सिनेमासृष्टीत बनवले जात आहेत, हे आपल्या कला-संस्कृतीच्या सामर्थ्याचं आणि प्रगतीचं चिन्ह आहे.

आदिश एका (http://indiaindependentfilms.com/2015/10/23/kaul-interview-aadish-keluskar/) मुलाखतीत म्हणतो, “प्रेक्षकांना अनुभवायचं स्वातंत्र्य क्वचितच दिलं जातं... मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, हा चित्रपट (कौल) मला तुमच्यापेक्षा जास्ती समजतो असं नाही. तुमच्यापेक्षा वेगळा समजत असेल, पण नक्कीच जास्त नाही... मला वाटतं की प्रत्येक प्रेक्षकाचा अनुभव वेगळा आणि वैयक्तिक असणं सर्वांत उत्तम. आणि हे साध्य करण्यासाठी चित्रपट बनवताना प्रेक्षकांचा बिलकूल विचार न करून त्यांचा मान राखला जाऊ शकतो...” 

हे झालं मला सापडलेल्या ‘कौल’बद्द्ल. पण अजूनही मला ‘कौल’ पूर्णपणे सापडलेला आहे असं नाही. त्यातल्या तत्त्वज्ञानाच्या अजून जवळ जायला हवं. एक शिक्षक, सत्याचा शोध, चमत्कार, देव, सृष्टी, जगाचा अंत करू शकणारी ती घंटी आणि मानवी मनाच्या उणीवा, या सगळ्यांना एक सलग जोडणारा धागा असल्याचं जाणवतं. त्यात एक कथाही आहे. मला त्या धाग्याचा शोध घ्यायचा आहे. आशा आहे की, तो शोध घेता घेता 'वेड' लागू नये.

तुम्ही ‘कौल’ बघाल तेव्हा तुम्हालाही माझ्यासारखंच बरंच काही सापडेल, सापडावं! प्रत्येकाला हा चित्रपट पाहताना एक नितांत सुंदर अनुभव येऊ शकतो!

लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.

yashsk@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......