२०१७ : ‘फास्टर फेणे’ ते ‘हलाल’ आणि ‘शेंटिमेंटल’ ते ‘उबुंटू’
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी  
  • २०१७मधील काही निवडक मराठी चित्रपट
  • Tue , 02 January 2018
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष मराठी सिनेमा Marathi Movie

गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीनं कात टाकली असून चित्रपटाच्या सर्व अंगांचा विचार करता मराठी चित्रपटसृष्टी सध्या चांगलीच बहरात आली आहे असं म्हणावं लागेल. मावळत्या वर्षात म्हणजे २०१७ साली सुमारे शंभर चित्रपटांची निर्मिती झाली. त्यामध्ये विविध विषयांवरील चित्रपटांचा समावेश होता. यापैकी अनेक चित्रपट सामाजिक विषयाच्या बाबतीत आशयघन होते. काही नेहमीप्रमाणे मालमसाला भरलेले, तर काही बदलत्या काळानुसार कौटुंबिक व्यवस्थेची जाणीव करून देणारे होते. काही कौटुंबिक चित्रपट चांगलेच चकचकीत होते. केवळ चकचकीतपणामुळे आशय नसलेले काही चित्रपटही बऱ्यापैकी चालले. तर चांगले विषय असूनही केवळ योग्य प्रसिद्धी आणि मार्केटिंग अभावी काही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाहीत. असं असलं तरी एकूणच मराठी चित्रपटसृष्टीनं आपली घोडदौड चालू ठेवली आहे. 

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांवर नजर टाकल्यास चित्रपटांच्या विषयांचीही वैविध्यता लक्षात येते. ‘बघतोस काय मुजरा कर’पासून ‘आयटेमगिरी’पर्यंत आणि ‘बंदुक्या’पासून ‘बॉईज’पर्यंतच्या चित्रपटांची नावंच त्यांच्या विषयांतील विविधता दर्शवणारी आहेत. नेमकंपणानं सांगायचं तर ‘शिव्या’ या विषयावरही त्याच नावानं चित्रपट प्रदर्शित झाला. ‘ती देते, तो देतो, सगळेच देतात.... शिव्या’ अशी त्या चित्रपटाची टॅगलाईनच होती. लहान मुलांच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारे ‘अंड्याचा फंडा’, ‘ओलीसुकी’, ‘उबुंटू’ यांसारख्या चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. तर मराठी जनतेची ‘विठ्ठलभक्ती’ लक्षात घेऊन ‘विठ्ठलाशपथ’ आणि ‘थँक यू विठ्ठला’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले.

मावळत्या वर्षातील बरेच चित्रपट खऱ्या अर्थानं ‘शेंटिमेंटल’ होते, तर काही चित्रपट ‘मुरांबा’सारखे मुरलेले होते. या वर्षात काही दाक्षिणात्य चित्रपटांचे ‘रिमेक’ ही मराठीत पाहायला मिळाले. त्यातील काही ‘देवा’ची आठवण करून देणारे होते, तर काही अगदीच ‘भिकारी’ होते. ‘मांजा’ (सायको थ्रीलर), ‘लपाछपी’, ‘कनिका’ या चित्रपटांनी गूढ, रहस्यमय चित्रपटांतही मराठी चित्रपट मागे नाहीत हे दाखवून दिलं. ‘कासव’, ‘हलाल’सारखे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे चित्रपट हे खरं तर २०१६ साली तयार झालेले चित्रपट, मात्र ‘बजेट’ अभावी त्यांना प्रदर्शित व्हायला २०१७ साल उजाडावं लागलं. ‘बॉक्स ऑफिस’च्या संदर्भात बोलायचं झाल्यास मावळत्या वर्षात ‘फास्टर फेणे’नं सर्वांत जास्त धंदा केला, तर ‘ती सध्या काय करते’, ‘बापजन्म’, ‘चि. व चि. सौ. का.’, ‘हृदयांतर’, ‘ध्यानीमनी’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ यासारखे कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरले. 

मावळत्या वर्षातील अशाच काही प्रमुख चित्रपटांचा हा धांडोळा… 

‘फास्टर फेणे’

प्रसिद्ध बालसाहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गाजलेला ‘फास्टर फेणे’ हा डिटेक्टिव्ह नायक काळानुसार बदल करून दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी पडद्यावर आणला. अमेय वाघनं ‘फास्टर फेणे’च्या भूमिकेचं सोनं केल्यामुळे प्रेक्षकांनीही त्याला ‘टॉक’ करून चांगली पसंती दिली.

‘कासव’

संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून ओळख असलेल्या सुमित्रा भावे यांनी कासवाच्या निसर्गनिर्मित जन्माच्या प्रक्रियेचा आधार घेऊन निर्मिती केलेल्या ‘कासव’ चित्रपटात प्रतीकात्मक चित्ररूपाद्वारे मानवी जगण्याला बळ देणाऱ्या ‘कासवा’ची सुंदर गोष्ट सांगितली.

‘बंदुक्या’

प्रसिद्ध दलित साहित्यिक (कै.) रामनाथ चव्हाण यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात दिग्दर्शक राहुल चौधरी यांनी गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का बसलेल्या पारधी समाजाचं भीषण वास्तव प्रभावीपणे चित्रित केलं.

‘हलाल’

मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा म्हणून संबोधला जाणारा ‘तिहेरी तलाक’ हा अत्यंत संवेदनशील विषय या चित्रपटात परिणामकारकरीत्या हाताळला आहे. शिवाजी लोटन पाटील यांचं उत्कृष्ट दिग्दर्शन आणि चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव या मुख्य कलाकारांचा उत्तम  अभिनय, यामुळे ‘हलाल’चा समाजमनावर चांगलाच प्रभाव पडला.

‘दशक्रिया’

बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटात नदीच्या घाटावर होणाऱ्या ‘दशक्रिया’ विधीच्या संदर्भात लहान मुलांचं भावविश्व दाखवण्यात आलं. सामाजिक प्रथेचंही त्यामधून सम्यक दर्शन घडवण्यात आलं. या चित्रपटाला एका विशिष्ट समाजानं विरोध केला, मात्र तो या चित्रपटाच्या पथ्यावरच पडला असं म्हणावं लागेल. 

‘घाट’ 

धार्मिक स्थळी असलेल्या नदीघाटावर मिळेल त्यावर गुजराण करणाऱ्या गोरगरिबांचं नेमकं आयुष्य असतं तरी कसं याचं अतिशय विदारक दर्शन ‘घाट’मध्ये पाहायला मिळालं. लेखक-दिग्दर्शक राज गोरडे यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात एका गंभीर सामाजिक विषयाला हात घातला असून या ‘घाटा’वरील वास्तव मनाला अंतर्मुख करून गेलं.

‘बापजन्म’

लेखक-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या ‘बापजन्म’ या चित्रपटात परिस्थितीमुळे मुलांपासून दुरावलेल्या एका ‘बापाची’ हळवी कथा मोठ्या मिश्किल पद्धतीनं सादर करण्यात आली आहे. विषय तसा गंभीर असूनही त्याची मांडणी खेळकर पद्धतीनं केल्यामुळे एका ‘बाप’माणसाची हळवी कथा पाहिल्याचं समाधान मिळून गेलं.  

 ‘उबुंटू’

या चित्रपटामागे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते नेल्सन मंडेला यांच्या गाजलेल्या ‘उबुंटू’ या वाक्प्रचाराची प्रेरणा होती. नेल्सन मंडेला यांनी साऱ्या जगाला उद्देशून दिलेल्या ‘उबुंटू’ या संदेशपर आफ्रिकन शब्दाचा अर्थ आहे, ‘मी आहे, कारण आम्ही आहोत’. थोडक्यात या शब्दातून समाजशक्तीची ताकद किती असते, हे अधोरेखित करण्यात आलं. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित या चित्रपटामागची  कल्पना चांगली होती, मात्र ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच यशस्वी झाली. 

‘बॉईज’

अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज’मध्ये मुलांचं भावविश्व दाखवण्याच्या नावाखाली प्रामुख्याने दोन इब्लिस कार्ट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. त्यांचा हा ‘धुमाकूळ’ मनोरंजक होता, खरा पण त्यापलीकडे जाऊन ‘आनंदाच्या झाडा’पर्यंत जाऊ शकला नाही. 

‘शेंटिमेंटल’

‘पोस्टर बॉईज’मुळे गाजलेले लेखक-दिग्दर्शक समीर पाटील यांनी पोलीस खात्याबाबत असलेल्या समाजाच्या ‘मेन्टॅलिटी’वर नेमकं बोट ठेवून ‘शेंटिमेंटल’मध्ये पोलीस खात्याची एक ‘मेंटल’ कथा ‘इनोदी’ पद्धतीने सादर केली. अशोक सराफ यांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका ही या चित्रपटाची जमेची बाजू होती.

‘कच्चा लिंबू’

जन्मतःच ‘स्पेशल’ असणारी मुलं ही आपल्याकडील एक मोठी सामाजिक समस्या आहे. मात्र या मुलांना दूर न लोटता त्यांच्या मनापासून सांभाळ करणारे त्यांचे आई-बाबाही तितकेच ‘स्पेशल’ असतात. अशाच ‘स्पेशल’ आई-बाबांची कहाणी ‘कच्चा लिंबू’मध्ये सांगण्यात आली. सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, मनमीत पेम यांचा उत्कृष्ट अभिनय हे या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य होतं.

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......