फास्टर फेणे : फेणेची पहिली परीक्षा 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘फास्टर फेणे’ची पोस्टर्स
  • Sat , 28 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie फास्टर फेणे Faster Fene

आपल्या लहानपणीचा आपला आयडियल नायक आता पडद्यावर येतोय… मग तो कसा असेल?... ‘न्यूजवर तर दाखवत होते, तो मोठा झालाय?’पर्यंतचे प्रश्न मनात ठेवून आलेले आणि आपल्या मुलांना आपल्या लहानपणीच्या हिरोची ओळख करून द्यावी म्हणून त्यांच्यासोबत चित्रपटाला आलेला बरेच नॉस्टल्जिक प्रेक्षक दिसले. 

अर्थात भा. रा. भागवतांचं सर्वश्रुत 'फास्टर फेणे' हे पात्र, अमेय वाघचं त्यासाठीचं कास्टिंग, क्षितिज पटवर्धनची पटकथा आणि संवाद, आदित्य सरपोतदारचं दिग्दर्शन आणि सर्वांत शेवटी कळणारं, गिरीश कुलकर्णीचं खलनायक असणं, इतक्या गोष्टी समोर असताना 'फास्टर फेणे' या चित्रपटाची हवा निर्माण झाली नसती तरच नवल. 

भागवतांच्या या मानसपुत्राला अमेय वाघ आणि क्षितिज पटवर्धनची कथा न्याय देऊ शकेल का? कथानकात नक्की काय बदल केले असतील? सर्वांच्याच मनात हे आणि असेच प्रश्न होते. 

बनेश फेणे ऊर्फ बन्या (अमेय वाघ) हा मेडिकलची एन्ट्रन्स देण्यासाठी पुण्यात आलाय. परीक्षेच्या एक दिवस आधी त्याची ओळख धनेश लांबेकर या एका हुशार आणि मोठी स्वप्नं असलेल्या मुलाशी होते. पण परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीच कळतं की, धनेशनं आत्महत्या केली आहे. जे फेणेला पटत नाही. आणि मग शोध सुरू होतो एका रहस्याचा. ज्यात त्याला मदत करते त्याची बालमैत्रीण अबोली (पर्ण पेठे), त्याचा नव्यानेच झालेला एक मित्र 'भूषण' ऊर्फ भू-भू (शुभम मोरे) आणि लेखक भा. रा. भागवत (दिलीप प्रभावळकर).

ज्यात त्याचा सामना होतो आप्पा अंधारेशी (गिरीश कुलकर्णी). हा आप्पा कोण, त्याचा आणि धनेशचा संबंध काय, शिक्षणक्षेत्रातील गुन्हेगारी, वगैरेचा शोध म्हणजे 'फास्टर फेणे'. 

कथा आणि पात्रांबाबत बोलायचं झाल्यास एकदोन दुर्लक्षित करण्याजोगे अपवाद वगळता 'फाफे' एकदम परफेक्ट झाला आहे. फेणेचं पात्र आणि कथेतील जग सभोवतालच्या बदलांनुसार टेक्नोसॅव्ही झालेलं आहे. सध्याच्या सोशल नेटवर्किंग साइट्सचे संदर्भ, त्यांच्यावरील विनोद आणि त्यांचा रहस्य सोडवण्यात केलेला उत्तम वापर, यामुळे फास्टर फेणेचं पात्र अधिक वास्तववादी आणि जवळचं वाटतं. उदाहरणार्थ, त्याच्या आणि अबोलीच्या पहिल्या भेटीदरम्यानचे आणि नंतरही चित्रपटभर दिसणारे कालसुसंगत आणि सहज लक्षात येतील असे तरुणाईवर टिप्पणी करणारे संवाद चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. 

फेणेचं आणि आप्पाचं समोरासमोर येणं, हे चित्रपटात एक टेन्स वातावरण निर्माण करतं. त्यांच्यातील संवाद जितका हसवणारा आहे, तितकाच आप्पाच्या बोलण्यामुळे-हसण्यामुळे आपल्या मनात धडकी भरवणारा आहे. क्षितिजची पटकथा एका उत्तम पटकथेचा नमुना आहे. रहस्य आणि साहस हा त्याचा जॉनर कायम ठेवण्यात चित्रपट यशस्वी होतो. प्रेमकथा किंवा मेलोड्रामा नसल्यानं चित्रपट संथही होत नाही. शिवाय संवादांनी चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. 

आदित्य सरपोतदारने यापूर्वी 'क्लासमेट्स'मध्येही रहस्य हा जॉनर हाताळला होता. पण त्यावेळी पटकथेतील दोषांमुळे चित्रपटात उणीवा होत्या. मात्र यावेळी तसं झालेलं नाही.  

चित्रपटाचं छायांकन कमाल आहे. पूर्ण चित्रपटभर पिवळसर रंगाचं आणि काही ठिकाणी लाल रंगाचं जेश्चर वापरून चित्रपटात गूढतेचं, थोडंसं अस्वस्थतेचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे. ड्रोन शॉट्स तर नितांतसुंदर आहेतच. पण चेस सीन्स आणि फाइटिंग सीक्वेन्स उत्तमरीत्या चित्रित आणि फास्ट पेस्ड पद्धतीनं तितक्याच उत्तमरीत्या संकलित केले आहेत. 

शिवाय, पार्श्वसंगीत हा या चित्रपटांमध्ये महत्त्वाचा भाग आहे. जॉय आरिफ यांचं पार्श्वसंगीत, फाफेची त्यांनी तयार केलेली सिग्नेचर ट्यून, तिचा वेगवेगळ्या प्रकारे केलेला वापर आणि चित्रपटात घडत असणाऱ्या दृश्याचा आणि एकूणच चित्रपटाचा विचार करून दिलेलं संगीत, चित्रपटाला पूरक ठरतं. 

एकही गाणं नसल्यानं चित्रपट रेंगाळत नाही. पटकथेतही तो कुठे रेंगाळत नाही. रहस्याची उकल करणारे काही सीन्स थोडेसे लांबवलेले वाटतात, पण ते कथेच्या ओघात आणि संगीत आणि पडद्यावरील कलाकारांमध्ये चाललेल्या अभिनयाच्या जुगलबंदीत लक्षात येत नाहीत. 

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात लालसर फ्रेम वापरून केलेली आपल्याला पडलेल्या प्रश्नांची सोडवणूक थोडी लवकर उरकता आली असती तरी चाललं असतं, पण तितकंच. 

पण यामुळे चित्रपटाचा एकूण प्रभाव कुठेच कमी होत नाही. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेतील कलाकारानं त्याचं काम चोख पार पाडलं आहे. अमेय वाघच्या निवडीबाबतच्या सर्व शंका चित्रपट पाहून दूर होतात. पर्ण पेठे नेहमीप्रमाणे उत्तमच. दिलीप प्रभावळकर आणि श्रीकांत यादव दोघेही लहान पण महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शोभून दिसतात.  

तरीही सर्वांत जास्त आवडून जातो तो गिरीश कुलकर्णी. त्याने साकारलेला आप्पा धडकी भरवणारा आहे. त्याचं हास्य, त्याची आणि फेणेचं समोरासमोर येणं, बसमधील सीन वगैरे काही दृश्यं टाळ्या घेणारी आहेत. आप्पा अंधारेच्या रूपानं बऱ्याच दिवसांनी एक तगडा खलनायक पहायला भेटतो. 

अर्थात, कथानकात कालानुरूप केलेले बदल, भा. रा. भागवतांचं फास्टर फेणे हे फक्त पात्र घेऊन त्याची नव्यानं केलेली मांडणी वगैरे बऱ्याच गोष्टी नवीन असतीलही. पण तरीही एक चित्रपट म्हणून 'फास्टर फेणे' आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, एवढं मात्र नक्की. 

आणि एका उत्तम व्यावसायिक तरीही प्रयोगशील चित्रपटाकडून याहून अधिक अपेक्षा काय ठेवणार? 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Chandru I

Sat , 28 October 2017

हा पिक्चर म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. फक्त फास्टर फेणेचे नाव आणि वेशभूषा हिच काय ती पुस्तकाशी मिळतीजुळती आहे. बाकी सर्व भंपकपणाच आहे. प्रसिद्ध पात्रांचे नाव वापरून लोकांना आकर्षित करायचे आणि पानी कम चित्रपट त्याच्या माथ्यावर मारायचा. ज्यांनी लहानपणी फास्टर फेणेचे वाचला आहे त्यांना हा चित्रपट म्हणजे देशमुखपुत्राने पैशासाठी केलेल्या थिल्लरपणाच वाटेल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......