शेफ : कुछ इश्क किया, कुछ काम किया 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘शेफ’मधील काही दृश्यं
  • Sat , 07 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie शेफ Chef

राजा कृष्ण मेननचा 'शेफ' हा जॉन फॅवरोच्या २०१४मधील याच नावाच्या इंग्रजी चित्रपटाचा ऑफिशिअल रिमेक आहे. मात्र नामसाधर्म्य आणि मूळ संकल्पना वगळता हा चित्रपट कुठेही मूळ ‘शेफ’च्या जवळपास जात नाही.  

'शेफ'ची कथा अगदी साधी सोपी आहे. रोशन कालरा (सैफ अली खान) हा एक परदेशस्थ शेफ आहे. पण त्याच्या व्यावसायिक कारणांमुळे आणि स्वतःमधील रॉनेस व फ्रेशनेस हरवल्यामुळे त्याची चिडचिड होते. त्यामुळे गरजेचा असलेला एक 'ब्रेक' त्याला थोडासा नाइलाजानंच का होईना, पण घ्यावा लागतो. 

तो भारतात कोचीमध्ये राहणारी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी राधा (पद्मप्रिया जानकीरामन) आणि मुलगा अरमान (स्वर कांबळे) यांच्याकडे परततो. आणि इथंच स्वतःच्या 'शेफ'म्हणून चालू असलेल्या करिअरमधील त्याची पुढील वाटचाल सुरू होते. मग पुढे त्याच्या या प्लॅनचं काय होतं की, तो पुन्हा अमेरिकेत जातो याची गोष्ट म्हणजे 'शेफ'.

चित्रपटाची सुरुवातच मुळी रोशनचं एका ग्राहकाशी भांडण झाल्यानं त्याच्या कामावरून काढल्या जाण्यानं होते. मग तो पुढील नोकरी शोधण्यापूर्वी काही दिवसांकरिता आपल्या मुलाकडे, भारतात येतो. आणि इथूनच ही गोष्ट केवळ बाप-मुलाच्या नात्याची किंवा रोशन-अरमानची न राहता राकेशच्या आत्मशोधाची होते. 

पात्रांची कल्पना जरी उत्तम असली तरी काही ठिकाणी पात्रं आणि काही प्रसंग उभे करताना लेखक आणि दिग्दर्शकाला अपयश आलेलं आहे. बरीचशी दृश्यं मुळात का आहेत, हेच कळत नाही. उलट अशा वाढीव दृश्यांमुळे चित्रपट बऱ्याचदा रेंगाळत जातो. फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ यामध्ये याच कारणानं ठळक फरक दिसून येतो. 

कारण मध्यांतराच्या पूर्वीचा भाग जितका रेंगाळतो, त्याहून जास्त तो पुढील भागात उचल खातो. आणि क्लायमॅक्सच्या दिशेनं प्रवास करताना चित्रपट आधीपेक्षा जास्त सुखकर वाटू लागतो. 

आपल्या भूतकाळातील चुका सुधारत, आपल्या मुलाला प्रेरणा देणारा सैफचा 'रोशन' कुठेच कमी पडत नाही. कमीत कमी अभिनयाबाबत तर नाहीच नाही. बाकी लिखाणात ज्या काही चुका आहेत, त्या वगळता सैफचा हा शेफ उत्तम आहे. स्वर कांबळेनं साकारलेला अरमानही असाच ठीक वाटतो. स्वतंत्ररीत्या अरमानचं पात्र फारसं प्रभावी वाटत नाही, पण सैफ आणि स्वरच्या केमिस्ट्रीमुळे ही दोन्ही पात्रं जेव्हा एकत्र येतात, त्या जवळपास प्रत्येकच दृश्यात ही जोडी जमून आलेली आहे, हे कळतं. 

पण रोशनचं अरमानवर चिडणं, मग समजावणं इत्यादी एक-दोन प्रसंग लिखाणातच कमी पडतात. त्यामुळे पडद्यावर जे घडतंय ते नाटकी वाटत राहतं. अर्थातच लिखाणातील त्रुटींचं खापर अभिनेत्यांवर फोडता येणार नाही. 

राधावर प्रेम करणाऱ्या, मोठा उद्योगपती असलेल्या 'बिज्जू'च्या पात्रात अभिनेता मिलिंद सोमण चांगलाच शोभतो. पण विशेष उल्लेख करावासा वाटतो तो पद्मप्रिया जानकीरामनचा. तिची या पात्रासाठीची निवड योग्य होती आहे, हे ती सिद्ध करते. शिवाय, तिची व सैफची केमिस्ट्री पडद्यावर उत्तमरीत्या दिसून येते. थोडक्यात, तिचा स्क्रीनवरील वावर सुखावणारा आहे. 

इतर लहान-मोठ्या भूमिकांमधील चंदन रॉय सन्याल आणि राम गोपाल बजाजदेखील उत्तमच. त्यांचा वावर कुठेच नाटकी वाटत नाही. तर उलट त्यांच्या असण्यानं पडद्यावर एक आपलेपण जाणवतं.  

हे सगळं झालं प्रत्येक पात्राविषयी. पण एकसंध पटकथा म्हणून चित्रपट तितकासा लक्षवेधी नाही. उलट काही दृश्यांमुळे राहून राहून मराठीतील 'हॅप्पी जर्नी' आणि इंग्रजी 'रॅटटुई' या चित्रपटांची आठवण येत राहते. त्यात पुन्हा एका दृश्यात 'क्रिटिसिझम' अर्थात समीक्षेबाबतचा एक उल्लेख येतो. ज्यामुळे उगीचच ज्ञान पाजळत असल्याचा आव आणला जातो. आणि या संदर्भामुळे म्हणा किंवा उगीचच एका पात्राच्या तोंडी घातलेल्या संवादानं म्हणा, पण 'रॅटटुई'ची आठवण येते. आणि या गोष्टीमुळे तर चित्रपटातील उणीवा अधिक प्रकर्षानं जाणवतात. 

शिवाय, चित्रपटातील रोशन कालरा हा शेफ जेवण बनवतो कमी आणि खातानाच जास्त दिसतो. पास्ता वगैरे एक-दोन प्रकार सोडता तो इतर काही बनवताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या शेफ म्हणून वावरण्याबद्दल ही गोष्ट शंका व्यक्त करण्यासाठी पुरेशी ठरते. 

बाकी यातील 'रोत्झा' (रोटी पिझ्झा) नामक खाद्यपदार्थ आणि चांदनी चौकातील काही डिशेस तोंडात पाणी आणण्याइतपत सुंदर पद्धतीनं चित्रित केल्या आहेत. 

सैफला या भूमिकेत पाहणं एका अर्थानं चांगलं आहे. कारण तो साकारत असलेली चाळीशीतील बापाची भूमिका पाहून 'चला, कुणीतरी आपल्या वयाला शोभेल असं काम करतंय' असं वाटतं. शिवाय मुलाशी एकदम हसतंखेळतं नातं असणाऱ्या बापाप्रमाणे त्यानं केलेले 'पन्स', त्याचे काही संवाद हे चांगलेच जमून आले आहेत.

या चित्रपटात एका जुन्या चित्रपटाचा संदर्भ असणारा एक संवाद पाहून बरं वाटतं. 

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

शिवाय, अलीकडे सैफ चांगलाच प्रयोगशील झालाय. 'हॅपी एण्डिंग'सारखे चांगले चित्रपटही तो करतोच आहे. याही चित्रपटातील त्याची भूमिका एक उत्तम भूमिका ठरता ठरता राहिली. तेदेखील लिखाणात त्याचं पात्र तितकंसं चांगल्या पद्धतीनं उभं करता न आल्यानं. 

प्रिया सेठचं छायांकन सुंदर आहे. काही दृश्यं, खासकरून गाण्यांमधील काही फ्रेम्स सुंदर दिसतात. तिनं केलेलं खाद्यपदार्थांचं चित्रणही इथं चित्रपटाला पूरक ठरतं. बाकी संगीत आणि पार्श्वसंगीताबाबत बोलायचं झाल्यास ते चांगलं आहे. पण काही ठिकाणी ते फारच लाऊड होतं. तेही अगदी सहन होणार नाही इतकं. एवढी एक गोष्ट वगळता संगीत चांगलं झालंय. या चित्रपटाला रघू दीक्षित आणि अमाल मलिक यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

मध्यंतरापूर्वी येणारं 'दरमियान' हे गाणं चित्रपट संपल्यानंतरही मनात रेंगाळत राहतं. बाकी गाणी फक्त एकदा ऐकण्यापुरती आहेत. बंजारा आणि इतरही जवळपास सर्वच गाणी एकाच बाजाची आहेत.

चित्रपटाचा शेवट पाहताना पूर्ण चित्रपटाला लागू पडतील अशा पियुष मिश्राच्या 'कुछ इश्क किया, कुछ काम किया' या कवितेतील ओळी आठवतात. आणि योगायोगानं चित्रपटाचा शेवटही सैफ अली खान या ओळी म्हणत करतो. पण चित्रपट या ओळींसारखाच नितांतसुंदर असेल, अशी अपेक्षा मात्र ठेवता कामा नये. कारण कितीही प्रयत्न केला तरी या 'शेफ'च्या या डिशची चव आपल्या जिभेवर रेंगाळता रेंगाळता राहून जाते. पण ही डिश एकदा चाखून पाहायला काही हरकत नाही.

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......